अध्याय ५८ वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


राजाधिदेव्यास्तनयां मित्रविंदां पितृष्वसुः । प्रसह्य हृतवान्कृष्णो राजम्राज्ञां प्रपश्यताम् ॥३१॥

भक्तवत्सल जो श्रीपति । जाणोनि मित्रविंदेची आर्ति । कृपेनें द्रवोनि विवरी चित्तीं । कुरुवर नृपति तें ऐकें ॥२५५॥
वसुदेवाची कनिष्ठ भगिनी । राजाधिदेवी चातुर्यखाणी । जयत्सेनाची वरिष्ठ पत्नी । कृष्णें जाणोनि पितृष्वसा ॥५६॥
पितृष्वसेचें कन्यारत्न । सप्रेमभावें मदेकशरण । विंदानुविंदीं करूनि विघ्न । मजलागून उपेक्षिलें ॥५७॥
रुक्मिणीचिये विवाहकाळीं । रुक्मि जैसा विरोधशाळी । तैसीच मित्रविंदा वेल्हाळी । विंदानुविंदीं निषेधिली ॥५८॥
तरी मी जाऊनि अकस्मात । जिंकूनि भूभुज विवाहीं प्राप्त । मित्रविंदेचें पुरवीन आर्त । हा सिद्धांत दृढ केला ॥५९॥
मग आज्ञापि दारुकाप्रति । तेणें तुरंग जुंपिले रथीं । गरुडध्वज सहसा रथीं । पावला श्रीपति अवंतिके ॥२६०॥
तंव मंडपीं नृपांच्या श्रेणी । बैसल्या असती ऐश्वर्यखाणी । नोवरी आणिली श्रृंगारूनी । पाहती नयनीं नृपरत्नें ॥६१॥
सखिया कथिती नृपांच्या नामा । वीर्यशौर्यादि प्रतापगरिमा । परंतु मित्रविंदेचा प्रेमा । मेघश्यामा अनुसरला ॥६२॥
ऐसिये समयीं अकस्मात । मृगेंद्र जैसा कुंजरांत । उडी घालूनि आमिष नेत । तेंवि हरि हरित नोवरिये ॥६३॥
बलात्कारें धांवोनि हरि । नोवरी उचलूनि दोहीं करीं । वाहता जाला निजरहंवरीं । नृपें घाबिरीं खळबळिलीं ॥६४॥
घ्या घ्या म्हणोनि उठिले एक । एक म्हणती पहा कौतुक । एक म्हणती यदुनायक । मागधप्रमुखनिर्जेता ॥२६५॥
भो भो राया कौरवप्रवरा । पाहता असतां भूभुजचक्रा । चक्रपाणि सुचारुवक्त्रा । वाहूनि रहंवरा निघाला ॥६६॥
आस्फुरिला पाञ्चजन्य । तेणें दणाणिलें त्रिभुवन । नृपचक्राचा भंगला मान । जाले म्लानमुख अवघे ॥६७॥
कोण्ही न करिती पाठिलागा । अवलंबूनियां निजपुरमार्गा । भूपतीफिरोनि गेले मागां । वरी श्रीरंगा यशोलक्ष्मी ॥६८॥
मित्रविंदा वाहूनि रथीं । द्वारके आला कमलापति । ऐकूनि वधू हरणाची ख्याति । यादव गर्जती जयघोषें ॥६९॥
पितृष्वसेची तनया ऐसी । कृष्णें हरिली लावण्यराशि । द्वारकेमाजि यथाविधीसीं । लग्न सुदिवसीं लावियलें ॥२७०॥
नित्यनोवरा द्वारकाधीश । वर्‍हाडी यादव निर्जरअंश । रूपें धरूनियां बहुवस । वरी कृष्णास यशोलक्ष्मी ॥७१॥
विधिविधान पुनः पुनः । कथितां ग्रंथ नावरे गगना । यालागिं पूर्वोक्त पाणिग्रहणा । समान सूचना श्रोत्यांसी ॥७२॥
यानंतरें षष्ठ विवाहो । करिता जाला रुक्मिणीनाहो । तोही परिसें महोत्साहो । करूनि लाहो अवधाना ॥७३॥

नग्नजिन्नाम कौशल्य आसीद्राजाऽतिधार्मिकः । तस्य सत्याऽभवत्कन्या देवी नाग्नजिती नृप ॥३२॥

राया परिसें परीक्षिति । कोशलदेशीं अयोध्यापति । नग्नजिन्नामा पैं भूपति । स्वधर्ममूर्ति धार्मिक जो ॥७४॥
तयाची कन्या सुभगा सत्या । नाग्नजिती जे पितृनामता । तिचिया स्वयंवरसंकेता । नृपें तत्वता पण केला ॥२७५॥
सप्त प्रमत्त मारुतगण । तैसे अपेट बलीवर्द जाण । एक्याच समयीं त्या बाधून । करी शासन बाहुबळें ॥७६॥
तया नृपातें नाग्निजिती । वरूनि होईल सुभगा युवती । हें ऐकूनि बहु भूपति । विमुख जाती लाजूनी ॥७७॥
राया म्हणसी ऐसें काय । गोवृषांचें केउतें भय । तरी तूं क्षणैक सावध होय । पीयूषप्राय हरियश घे ॥७८॥

न तां शंकुर्नृपा वोढुमजित्वा सप्त गोवृषान् । तीक्ष्णश्रृंगान्सुदुर्धर्षान्वीरगंधासहान्खलान् ॥३३॥

सत्या पर्णूं न शकती भूप । सप्त गोवृष विद्युत्कल्प । त्यांतें न जिंकूनियां अल्प । विगलितदर्प बहु जाले ॥७९॥
राया ऐकें गोवृषांतें । तीक्ष्ण श्रृंगें असती ज्यांतें । बळें थडकिती कुंजरांतें । निर्भय पुरते बळराशि ॥२८०॥
न साहती वीरांची घाणी । तरुण बलिष्ठ फळदुर्गुणी । देखतां थडकिती धांवोनी । श्रृंगीं भेदूनि मारक जे ॥८१॥
ऐसियांतें देखोनि राजे । पर्णूं न शकती भूपात्मजे । असत्या आयुष्यें वृथा कां मरिजे । असाध्य पैजे भजोनियां ॥८२॥
ऐसिया योगें नृपाच्या सदनीं । नोवरी उपवर लावण्यखाणी । हें ऐकोनि पंकजपाणि । पाणिग्रहणीं प्रवर्तला ॥८३॥

तां श्रुत्वा वृषजिल्लभ्यां भगवान्सात्वतां पतिः । जगाम कौशल्यपुरं सैन्येन महता वृतः ॥३४॥

सप्तवृषजयें नोवरी लाभे । ऐसें ऐकोनि पंकजनाभें । निघता जाला समारंभें । परम बालभें नृपनगरा ॥८४॥
चतुरंगिणी सेना सज्ज । करूनि चालिला अधोक्षज । दारुकसारथि गरुडध्वज । वृष्णिभोजयदुकटक ॥२८५॥
महासैन्येंसीं वेष्टित हरि । जाऊनि उतरला कौशल्यपुरीं । सात्वतपति या नामोच्चारीं । भक्तकैवारी हें बिरुद ॥८६॥
देखोनि शरयूतट प्रशस्त । यदुवाहिनी जाली स्वस्थ । पुढें प्रेरूनि वार्तिक दूत । नृपा वृत्तान्त जाणविला ॥८७॥

स कोशलपतिः प्रीतः प्रत्युत्थानासनादिभिः । अर्हणेनापि गुरुणा पूजयन्प्रतिनंदितः ॥३५॥

मग तो ऐकूनि कोशलपति । कृष्णदर्शना परम प्रीति । पुढें जाऊनि सप्रेम भक्ति । भावें श्रीपति गौरविला ॥८८॥
साष्टांग घालूनि लोटांगण । स्नेहें दिधलें आलिंगन । तेणेंचि न्यायें यदुनंदन । सम्मानिले यूथपति ॥८९॥
मग आणूनि निजमंदिरा । आसनें अर्पिली यादववीरां । भद्रीं बैसवूनियां श्रीधरा । राजोपचारां समर्पिलें ॥२९०॥
गुरु म्हणिजे परमश्रेष्ठ । तया अर्हणें श्रीवैकुंठ । पूजिता जाला सद्भावनिष्ठ । तेणें संतुष्ट हरि जाला ॥९१॥
देखूनि अंतःकरणशुद्धि । पूजाविधान सप्रेम विधि । नृपाची कळली विशुद्धबुद्धि । मग आनंदी मृदुवचनीं ॥९२॥
म्हणे राया धन्य धन्य । येणेंचि सार्थक भद्रासन । सुहृदां आप्तां कृतसम्मान । देव ब्राह्मण प्रिय ज्यातें ॥९३॥
रायें पुषिलें स्वागत । क्षेम कुशल यथास्थित । कृपेनें केलें मज सनाथ । कथिजे हेत आगमनीं ॥९४॥
हें ऐकोनि शार्ङ्गपाणि । कोशलपतीतें अमृतवचनीं । आगमनाचा हेतु श्रवणीं । घालिता जाला संक्षेपें ॥२९५॥
राया तुमचें दुहितारत्न । उपवर सुंदर सद्गुणभुवन । ऐकोनि केलें म्यां आगमन । हेतु यावीण अन्य नसे ॥९६॥
कृष्णपूजनाच्या अवसरीं । कोशलपतीच्या अंतःपुरीं । गवाक्षमार्गें पाहती नारी । सहित नोवरी नाग्नजिती ॥९७॥
श्रीकृष्णाच्या लावण्यतेजें । कोटिकंदर्पश्रेणी लाजे । वाङ्माधुर्या पीयूष न सजे । तुळणें तुळितां गौनत्वें ॥९८॥
ठाणमाण रूपलावण्य । सस्मित ईक्षण मृदुभाषण । देखोनि नाग्नजितीचें मन । कृष्णीं रंगोन राहिलें ॥९९॥
साखरेवरूनि नुडे माशी । तैसी टकमक डोळ्यांसी । कृष्णस्वरूपें केली पिशी । तेंचि नृपासी शुक सांगे ॥३००॥

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP