अध्याय ५३ वा - श्लोक २१ ते २६
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
बलेन महता सार्धं भ्रातृस्नेहपरिप्लुतः । त्वरितः कुंडिनं प्रागाद्गजाश्वरथपत्तिभिः ॥२१॥
रथकुंजरादि पालाणा । सन्नद्ध करा चतुरंग सेना । घाव घातला निशाणा । केली गर्जना बलभद्रें ॥६०॥
सेनापति तो सात्यक । भारीं बलराम नेटक । यादववीरांसि हरिख । अतिसुटंक दळभार ॥६१॥
सुख संतोष आणि स्वानंद । कैवल्यापासीं निजबोध । तैसा पावला हलायुध । यादववीर हरिपासीं ॥६२॥
ना तरी शमदमादि संपत्ति । बोधावेगळी नव्हे निश्चिती । तैसे कौण्डिन्यपुरा येती । जेथ श्रीपति उभा असे ॥६३॥
तंव येरीकडे राजकुमरी । अवस्था लागलीसे भारी । कां पां न येचि श्रीहरि । विचार करी लिखिताचा ॥६४॥
भीष्मकन्या वरारोहा कांक्षंत्यागमनं हरेः । प्रत्यापत्तिमपश्यंती द्विजस्याचिंतयत्तदा ॥२२॥
वरारोहा भीष्मककुमरी । कृष्णागमनाची अवसरी । विप्र न परते अद्यापिवरी । म्हणोनि अंतरीं सचिंत ॥६५॥
कृष्णासि नाहीं विषयगोडी । म्यां पत्रिका लिहिली कुडी । भार्या होईन आवडी । झाली अनावडी तेणें कृष्णा ॥६६॥
अढालढालाची पैं थोर । अभावभावें अतिसुंदर । दाटूनि रिघों पाहे घर । वशीकरण मज करील ॥६७॥
मग मी होईन ती अधीन । जिवें जिता करील दीन । अमना आणूनियां मन । नाचवील निजच्छंदें ॥६८॥
कार्यकारण समस्त । तेचि करील निश्चित । सुचित आणि दुश्चित । आंदण्या दासी आणील ॥६९॥
तिचा विकल्पिया बंधु । आंदण देईल कामक्रोधु । तिचा बोळावा गर्वमदु । घरभरी दाटेल ॥७०॥
माझेनि आंगें थोरावेल । मज ते नामरूप करील । विषयगोडी वाढवील । मुद्दल वेंचील निजज्ञान ॥७१॥
होईल निर्लज्ज निःशंक । मज देखों न शकती लोक । ऐसें जाणोनि निष्टंक । न येचि देख श्रीकृष्ण ॥७२॥
लिखितीं चुकी पडिली मोठी । पावेन शतजन्मापाठीं । हेंचि देखोनि जगजेठी । उठाउठी न पवेचि ॥७३॥
मज नाहीं वैराग्यकडाडी । भेटी न मगेचि रोकडी । माझ्या मुखरसाची गोडी । प्रतिबद्धक मज झाली ॥७४॥
सिवादि चरणरज वांछित । त्या मज पाठविलें लिखित । आंगें उडी न घलींच येथ । आळसयुक्त भीमकी ॥७५॥
लिखितासाठीं जरी मी सांपडें । तरी कां साधक शिणती गाढे । भीमकी केवळ आहे वेडें । येणें न घडे मज तेथें ॥७६॥
कृष्ण न यावया एकभावो द्विजें देखिला देवाधिदेवो । विस्मयें दाटला पहा हो । कार्य आठवो विसरला ॥७७॥
कृष्ण देखतांचि त्रिशुद्धी । लागली ब्राह्मणा समाधि । हारपली मनबुद्धि । लग्नसिद्धि कोण सांगे ॥७८॥
जे जे श्रीकृष्णासी मिनले । ते परतोनि नाहीं आले । मज आहे वेडें लागलें । वाट पाहें द्विजाची ॥७९॥
मायबापांसि नेणत । वधूनें पाठविलें लिखित । हेंचि देखोनि निंदित । येत येत परतला ॥८०॥
अहो त्रियामांतरित उद्वाहो मेऽल्पराधसः ।
नागच्छत्यरविंदाक्षो नाहं वेद्म्यत्र कारणम् ॥२३॥
लग्नाआड एकराती । कां पां न येचि श्रीपति । परापर उपरि ये वरोति । वाट पाहत उभी असे ॥८१॥
माझें मंदभाग्य पूर्ण । येतां न दिसे पंकजनयन । न यावयासि कारण कोण । हें मजलागून तर्केना ॥८२॥
सोऽपि नावर्ततेऽद्यापि मत्संदेशहरो द्विजः ।
अपि मय्यनवद्यात्मा दृष्ट्वा किंचिज्जुगुप्सितम् ॥२४॥
गेला मत्पत्रिका घेऊनी । तोही ब्राह्मण न येचि आझुनी । कीं स्वयें निर्दोषी चक्रपाणि । मद्दोष लक्षूनि उपेक्षी ॥८३॥
डोळा न लगे सेजेसीं । निद्रेमाजि देखे कृष्णासी । नेणे स्वप्नसुषुप्तीसी । जागृतीसी नाठवे ॥८४॥
अन्न न खाय तत्वता । जेवितां देखे कृष्णनाथा । गोडी लागली अनंता । न मगे आतां धड गोड ॥८५॥
करूं जातां उदकपान । घोंटासवें आठवे कृष्ण । विसरली भूक तहान । लागलें ध्यान हरीचें ॥८६॥
तोंडीं घातलिया फोडी । घेवों विसरली ते विडी । कृष्णीं लागलिया गोडी । अनावडी विषयांची ॥८७॥
आळविल्या कानीं नायके । थापटिलिया ते चंबके । देह व्यापिलें यदुनायकें । शरीरसुखें विसरली ॥८८॥
पाय ठेवितां धरणी । कृष्ण आठवे रुक्मिणी । सर्वाङ्गें थरथरूनी । रोमांचित होऊनि ठाके ॥८९॥
लीलाकमल घेतां हातीं । कृष्णचरण आठवती । नयनीं अश्रु जी लोटती । कृष्णप्राप्तीलागीं पिसी ॥९०॥
मत्पाणिग्रहणे नूनं नायाति हि कृतोद्यमः ।
दुर्भगाया न मे धाता नाऽनुकूलो महेश्वरः ॥२५॥
देवी वा विमुखा गौरी रुद्राणी गिरिजा सती ।
एवं चिंतयती बाला गोविंदहृतमानसा ॥२६॥
गोविंदें हरिलें गे मानस । झाली विषयभोगीं विरस । पाहे द्वारकेची वास । मनीं आस कृष्णाची ॥९१॥
कां पां न येचि गोविंद । तरी माझेंचि भाग्य मंद । नाहीं पूर्वपुण्य शुद्ध । म्हणोनि खेद करीतसें ॥९२॥
मग म्हणे कटकटा । किती करूं गे आहा कटा । मर मर विधातया दुष्टा । काय अदृष्टा लिहियेलें ॥९३॥
आजिचेनि हें कपाळ । कृष्ण प्राप्तिविण निष्फळ । म्हणोनियां भीमकबाळ । उकसाबुकसीं स्फुंदत ॥९४॥
मज न घलावा वो व्यजनवारा । तेणें अधिक होतसे उबारा । प्राण निघों पाहे बाहिरा । शार्ङ्गधरा वांचूनी ॥९५॥
आंगीं न लवा गे चंदन । तेणें अधिकचि होतसे दीपन । माझे निघों पाहती प्राण । कृष्णचरण न देखतां ॥९६॥
साह्य नव्हेचि गे अंबा । विमुख झाली जगदंबा । आतां कायसी लग्नसोभा । प्राण उभा सांडीन ॥९७॥
शिवा भवानी रुद्राणी । कां पां न पवतीचि कोण्ही । कां विसरली कुलस्वामिनी । चक्रपाणि न पवेचि ॥९८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP