अध्याय ५३ वा - श्लोक १ ते ५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - वैदर्भ्याः स तु संदेशं निशम्य यदुनंदनः ।
प्रगृह्य पाणिना पाणिं प्रहसन्निदमब्रवीत् ॥१॥
वैदर्भेचा संदेशार्थ । समग्र परिसोनि कृष्णनाथ । द्विजहस्तासि देऊन हस्त । बोले सस्मित तें ऐका ॥८॥
श्रीभगवानुवाच - तथाऽहमपि तच्चित्तो निद्रां च न लभे निशि ।
वेदाहं रुक्मिणा द्वेषान्ममोद्वाहो निवारितः ॥२॥
मदर्थ भीमकी अनन्य शरण । विह्वळ तैसाचि मी सकरुण । पत्रिकाश्रवणमात्रें मन । भीमकीहरण करूं गेलें ॥९॥
माझिया विवाहा विघ्नकर । रुक्मि मद्द्वेष्टा पामर । तेणें रुक्मिणी चिंतातुर । पत्रिकेपूर्वींच मी जाणें ॥१०॥
सन्नद्ध करितां दळभार । तेथें लागेल पैं उशीर । मी एकला एकाङ्गवीर । भीमकी घेऊनि येईन ॥११॥
जो दुजयाची वाट पाहे । त्याचें कार्य कहींच नोहे । यश कैसेनि तो लाहे । साह्य पाहे सांगाती ॥१२॥
विकल्प रुक्मिया मम द्वेषी । तेणें निवारिलें विवाहासी । विटंबूनि त्याचिया मुखासी । रुक्मिणीसी आणीन ॥१३॥
तामानयिष्य उन्मथ्य राजन्यापसदान्मृथे ।
मत्परामनवद्यांगीमेधसोऽग्निशिखामिव ॥३॥
चैद्यादिक पक्षपाती । त्यांसि रणीं लावीन ख्याति । मी कोपलिया श्रीपति । त्रिजगतीं कोण साहे ॥१४॥
दोन्ही काष्ठांच्या अरणी । मथूनि काढिजे जेंवि अग्नि । तेंवि अरिवीरांतें विभांडूनि । पवित्र रुक्मिणी पर्णीन ॥१५॥
माझ्या कोपाची भृकुटी । रणा आणीन सकळ सृष्टि । त्या मज युद्धाची अटाटी । लग्नासाठीं केवढी ॥१६॥
श्रीशुक उवाच - उद्वाहर्क्षं च विज्ञाय रुक्मिण्या मधुसूदनः ।
रथः संयुज्यतामाशु दारुकेत्याह सारथिम् ॥४॥
रुक्मिणीच्या लग्नासी । कवण दिवस कवणे मासीं । कवण नक्षत्र तें द्विजांसीं । मधुसूदनें पूसिलें ॥१७॥
सारथि बोलावूनि दारुकासी । वेगीं संजोगूनि रथासी । जाणें आहे कौण्डिन्यपुरासी । मात दुजयासि कळों नेदीं ॥१८॥
स चाश्वैः शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकैः । युक्तं रथमुपानीय तस्थौ प्रांजलिरग्रतः ॥५॥
जैसे कां चार्ही पुरुषार्थ । तैशा वारुवीं जुंपिला रथ । ऐका नांवें सुनिश्चित । जेथ श्रीकृष्णनाथ आरूढे ॥१९॥
शैव्य सुग्रीव बलाहकं । चौथा मेघपुष्प देख । चार्ही वारु अतिनेटक । सारथि दारुक धुरेसि ॥२०॥
अनर्घ्यरत्नीं रत्नखचित । गरुडध्वज लखलखित । लोल पताकीं डोलत । रथ शोभत अतिशोभा ॥२१॥
शस्त्रास्त्रांचे संभार । रथीं घातले अपार । दारुकें केला नमस्कार । कर जोडूनि राहिला ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP