अध्याय ५० वा - श्लोक ४६ ते ५०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यवनोऽयं निरुंधेस्मानद्य तावन्महाबलः ।
मागधोऽप्यद्य वा श्वो वापरश्वो वाऽऽगमिष्यति ॥४६॥
बळभद्रातें म्हणे हरि । आजि हा यवन मथुरापुरीं । आम्हां यादवांतें चौफेरीं । रोधूनि नगरीं राहिलल ॥२७॥
यासि करावें समरांगण । तरी हा आम्हांसि दुर्जय पूर्ण । कथूनि गेला विधिनंदन । अजिंकपण पैं याचें ॥२८॥
येणें रोधिलें असतां आम्हां । तंव महाबळिष्ठ मागधनामा । आजि उदियां परवां नेमा । क्रूर संग्रामा येईल ॥२९॥
तेवीस अक्षौहिणी वीर । सेना भयंकर महाघोर । संधि साधूनि जराकुमर । येत्तां दुस्तर यदुचक्रा ॥४३०॥
दादो दुस्तर म्हणसी कैसें । तेंही कथितों मी समासें । तुम्ही विवरूनि निजमानसें । सांगा कैसें निस्तरिजे ॥३१॥
आवयोर्युध्यतोरस्य यद्यागंता जरासुतः । बंधून्वधिप्यत्यथवा नेप्यते स्वपुरं बली ॥४७॥
मथुरेबाहीर उभय बंधु । करूं जातां यवनवधु । तंव मधें आलिया जरासंधु । महाविरुद्ध यदुवंशा ॥३२॥
नगरी भंगील सेनाबळें । स्वबंधु यादव वधील सगळे । किंवा बांधोनि बंधनमाळे । नेईल यदुकुळें निजनगरा ॥३३॥
सतरा वेळ साधिलें यश । तैं तें सर्वही होईल फोस । ऐसें सांगूनि बळभद्रास । मंत्र विशेष हरि बोधी ॥३४॥
तस्मादद्य विधास्यामो दुर्गं द्विपददुर्गमम् ।
तत्र ज्ञातीन्समाधाय यवनं घातयामहे ॥४८॥
प्राप्त संकट दोहींपरी । यास्तव आजि तत्परिहारीं । उपाय कथितों तो अवधारीं । म्हणे मुरारि ज्येष्ठातें ॥४३५॥
द्विपदां दुर्गम सिंधूमाजि । दुर्ग निर्मूनि आम्ही आजी । यदुकुळाची गोत्रराजी । स्थापूनि त्यामाजि सकुटुंबी ॥३६॥
मग यवनाचा करूं वध । मध्यें आलिया जरासंध । यादवहननाचा प्रबंध । तैं त्या अगाध सहजेंचि ॥३७॥
इति संमंत्र्य भगवान्दुर्ग द्वादशयोजनम् ।
अंतःसमुद्रे नगरं कृत्स्नाऽद्भुतमचीकरत् ॥४९॥
ऐसा बलरामेंशीं मंत्र । विवंचूनियां जगन्मित्र । षड्गुणैश्वर्य स्वतंत्र । शौरिपुत्र श्रीभगवान् ॥३८॥
ब्रह्मांडसाम्राज्यपट्टाभिषेक । करूनि गेले अमरेंद्रप्रमुख । तैं त्या भगवंतें उल्लेख । कार्योन्मुख जो कथिला ॥३९॥
तोचि कार्यभाग ये समयीं । षड्गुणसंपन्न शेषशायी । चिंतिता झाला आपुले हृदयीं । दुर्गनवायी अगम्या ॥४४०॥
श्रीकृष्णाच्या चिंतनमात्रें । विश्वकर्म्यानें स्वशिल्पसूत्रें । दुर्गम दुर्ग केलें नेत्रें । पाहतां वक्त्रें न वर्णवे ॥४१॥
महदाश्चर्यें जें ब्रह्मांडीं । तितुकीं ज्यामाजि दिसती उघडीं । ऐसिया दुर्गाची परवडी । न भरतां घडी उभारिली ॥४२॥
द्वादश योजनें पृथक्पृथक् । चतुर्दिक्षु चार्ही भाग । गगनचुंबित दुर्गम दुर्ग । निर्मिलें निलाग जलधींत ॥४३॥
द्वादश योजनें दुर्गम दुर्ग । परिखास्थानीं सिंधु साङ्ग । यास्तव सुरासुरां निलाग । करवी श्रीरंग संकल्पें ॥४४॥
समुद्रामाजि दुर्ग दुर्गम । त्यामाजि नगरी द्वारकानाम । विश्वकर्म्याचें कौशल्यकर्म । जेथ निःसीम शोभतसे ॥४४५॥
चौंश्लोकीं ते दुर्गरचना । शुकें वर्णिली सूत्रसूचना । देशभाषेच्या तद्व्याख्याना । करितां श्रवणा विलोकिजे ॥४६॥
दृश्यते यत्र हि त्वाष्ट्रं विज्ञानं शिल्पनैपुणम् ।
रथ्याचत्वरवीथीभिर्यथावास्तु विनिर्मितम् ॥५०॥
श्रीकृष्णाच्या इच्छामात्रें । जठरस्थलरत्नें भूरत्नाकरें । उच्छ्रित विस्तृत सर्वोपचारें । दुर्गार्थ आदरें प्रयोजिलीं ॥४७॥
हरिसंकल्पें विश्वकर्मा । सदुर्ग द्वारका वैकुंठसद्मा । समान निर्मी कुरुसत्तमा । हेमललामा मणिबद्धा ॥४८॥
द्वारकानगर निर्मिलें कैसें । यथोक्त वास्तुशास्त्रीं जैसें । विश्वकर्म्याचें चातुर्य दिसे । सर्व आपैसें जननयना ॥४९॥
पूर्वपश्चिम सलंब सूत्रें । उत्तरदक्षिण तिर्यक् अपरें । नगरगर्भीं यथाशास्त्रें । चौक चौबारे साधिले ॥४५०॥
छप्पन्न विनायकदेहळी । दुर्गाभंवते प्रथम्म पवळी । निर्मिलें माणिक्यप्रवाळीं । कौशल्यशाळी त्वष्टारें ॥५१॥
दुर्ग दुर्गम पुरटघटित । अमूल्यवैडुर्यमणींचें जडित । चरया शोभती गगनाआम्त । शशिभास्वत लोपविती ॥५२॥
संकर्षण जो अनंतफणी । एके मौळीं धरूनि धरणी । अपर उभविले श्रीकृष्णभुवनीं । चरया करूनि दुर्गाग्रीं ॥५३॥
किंवा गरुडध्वज मुरारि । शयनीं शेष अनंतशिरीं । हरिप्रसादें करूनि मित्री । पाहे नेत्रीं खगकेतु ॥५४॥
शेषमौळींचें अमूल्य मणि । तेंवि सकलशा चरयाश्रणी । गगनगर्भीं भासुर किरणीं । अनेकतरणींसम गमती ॥४५५॥
दुर्गाभोंवते स्वयंभ हुडे । त्वाष्ट्रनिर्मितबहुदेहुडे । महाद्वारींचे कपटजोडे । कुलिशापाडें दृढ कठिन ॥५६॥
मेरुशृंगीं रत्नाचळीं । क्रकचकृंतिका वैडूर्यशिळीं । सरळ सोज्वळ रत्नझळाळी । गोपुरें देहळी त्वाष्ट्रकृता ॥५७॥
क्कचित चौकटी मारकता । क्कचित स्फटिका विशाळ श्वेता । क्कचित पद्मरागादिरक्ता । क्कचित असिता नभनीळा ॥५८॥
ऊर्ध्वपट्टिके विनायक । माणिक्यमणींचे रम्य सुरेख । दुर्गा भैरव द्वय विशाख । कूर्मकीर्तिमुख उदुंबरीं ॥५९॥
रत्नीं रेखिल्या कमलवल्ली । गमती पाचपत्रें कोंवळीं । पुष्कराजाच्या हेमकमळीं । सुनीळनाळीं विराजती ॥४६०॥
माणिक्यमणींचीं रातोत्पळें । शक्रायुधांचीं श्वेतोत्पळें । सोमकांतांचीं कुमुदोत्पळें । निरखितां डोळे निवताती ॥६१॥
चौकटीचिया उभयभागीं । लिखितपुत्रिका ललामरंगीं । यूनायुवतींच्या प्रसंगीं । मानस भंम्गी स्मरबाणें ॥६२॥
रत्नीं रेखिलीं सर्वतोभद्रें । सुरंग स्वस्तिकें गमती आर्द्रें । सुरनरचित्रें पैं उन्निद्रें । मुकुलितमुद्रे सम नयन ॥६३॥
तिग्म तिरळा रत्नज्योति । तेणें चंचळ नेत्रापातीं । प्रस्फुरितां अधरदंतीं । वाक्यें वदती तेंवि गमे ॥६४॥
वज्रकपाटीं शंकु कठिन । वर्जमणींचे प्रकाशमान । नोहे कळिकाळा आंगवण । द्वारलंघन करावया ॥४६५॥
द्वारपाळाच्या बैठका । रत्नजडिता रम्य सुरेखा । पाटांगणीं पाचभूमिका । महाद्वारीं बहिर्देशीं ॥६६॥
ऐसीं सर्वत्र महाद्वारें । उच्च विस्तीर्ण विशाळतरें । शृंगें शिखरें रत्नगोपुरें । दिव्यांबर्बें ध्वजदंडी ॥६७॥
खणोखणीं दिव्य वितानें । चित्र चाहुरिया वोटंगणें । पिंजरां पक्षी करिती पठनें । नामस्मरणें सहस्रशा ॥६८॥
गोपुरकलशीं पाचप्रभा । चंचळ दूर्वांकुरांची शोभा । कोमळ भावूनि कवळलाभा । उच्चैःश्रवा झेंपावे ॥६९॥
शिखरातळीं गोपुरनिडळीं । गोमेदमाणिक्यमणींच्या आवळी । शुकसारिका जंबुफळीं । कवळलोलुपा तळपती ॥४७०॥
कमळवल्ली आमोदप्रचुर । भावें भवंते भ्रमती भ्रमर । ऐसी कौतुकें आश्चर्यकर । निर्मी त्वष्टा महाद्वारीं ॥७१॥
हुडांहुडां दुर्गवप्रीं । चंडपताका गगनोदरीं । फडकती यशलक्ष्मी श्रीहरि । सूचिती हारी अरिवर्गा ॥७२॥
अष्टौ प्रहर मुक्त कपाटें । सुभटद्वारपाळांचीं थाटें । भगवच्चरितें पढती पाठें । यश ऊर्जितें गुणनामें ॥७३॥
दुर्गाभंवतें महाप्रबळ । परिधीभूत अगाध जळ । करिती यादोगण कल्लोळ । गर्जे विशाळ जळराशि ॥७४॥
अंतःपरिधी लघुलघुतर । दुर्गशोभार्थ परम रुचिर । विश्वकर्म्याचें कौशल्यसूत्र । संकल्पमात्रें कृष्णाच्या ॥४७५॥
ऐसिया दुर्गमदुर्गान्तरीं । परम विचित्र द्वारकापुरी । शिल्पविधाता निर्माण करी । न पवे समसरी वैकुंठ ॥७६॥
चौर्यांसीं सहस्र त्रिलक्ष महा । उपरि एकैक हस्त पहा । आयाम तिर्यक् तत्परिणाहा । गणूनि आय साधिले ॥७७॥
पुरवास्तूसि सिंहआय । ध्वजाढ्य विप्रालयसमुदाय । मृगेंद्रआयें क्शात्रनिचय । वृषभआय वैश्यगृहां ॥७८॥
कुंजरआय राजसदना । शुनकआय गणिकाभुवना । ढंकआय देवतायतना । ध्वांक्ष मठादियतिगृहां ॥७९॥
रासभआयीं शूद्रगृहें । पण्यें तत्संधिपरिणाहें । सामान्ययाती पल्लिकानिलयें । पुरीबाहीर दुर्गान्तरीं ॥४८०॥
उत्तरभागीं विप्रागारें । पूर्वभागीं नृपमंदिरें । पश्चिमें वैश्यांचीं धवळारें । सदनें शौद्रें याम्यदिशे ॥८१॥
राजमार्ग ते शृंगाट । पण्यवीथी वैश्यवाट। द्विभागीं सदनें शाळा नीट । रथ्यें निघोंट मध्यपथ ॥८२॥
मध्यमार्गाच्या उभयपार्श्वीं । शाळांगणें चत्वरनांवीं । सूत्रें धरूनि साधिल्या भुवी । रत्नग्रावीं निबद्धा ॥८३॥
उत्तरदक्षिण समान हारी । सर्वत्र वीथी नगरान्तरीं । पूर्वपश्चिम पाहतां नेत्रीं । शोभा साजिरी तत्समता ॥८४॥
यथावास्तु निर्मित ऐसें । सूत्रप्राय बोलिलें व्यासें । भाषाव्याख्यानीं अल्पसें । उपलविलें तें न दुषिजे ॥४८५॥
दुर्गगर्भीं ऐसी रचना । विश्वकर्म्याची कौशल्यसूचना । वनें जीवनें भवनें नाना । श्रवणें नयना अवगमती ॥८६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP