अध्याय ५० वा - श्लोक ६ ते १०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
चिंतयामास भगवान्हरिः कारणमानुषः । तद्देशकालानुगुणं स्वावतारप्रयोजनम् ॥६॥
धर्मविरोधी अधर्मकर । केवळ जे कां भूमिभार । त्यांचा करावया संहार । येथ अवतार हा आमुचा ॥१३०॥
भूभार उतरावया कारणें । आम्ही अवतरलों मनुष्यपणें । तेंचि देशकाळानुगुणें । कार्य करणें वोढवलें ॥३१॥
देश तरी हा मथुराप्रांत । शत्रुसैन्यासि काळ प्राप्त । कंसमरणप्रतिकारार्थ । वर्तमान प्रयोजन ॥३२॥
उदितप्रसंगानुसार हरि । निजैश्वर्यें विचार करी । मानुषी अवगणी लोकान्तरीं । बाह्यात्कारी दावितसे ॥३३॥
प्रयोजनार्थ योजूनि आला । तो पाहिजे संपादिला । तदर्थ विचार जो चिंतिला । तो येथ कथिला जातसे ॥३४॥
जीत सोडूनि मागधातें । सैन्य संहारिजे येथें । किंवा वधूनि मागधातें । सैन्य लुंटणें हें उचित ॥१३५॥
किंवा मागध सेनेसगट । वधूनि दाविजे प्रताप श्रेष्ठ । यांमाजि कोण तो पक्ष स्पष्ट । धिषणानिष्ठ स्वीकारिजे ॥३६॥
ऐसें चिंतूनि हृदयकमळीं । प्रथमसमर समरशाळी । करिता जाला तिये वेळीं । तें श्रवणकुशळीं परिसिजे ॥३७॥
हनिष्यामि बलं ह्येतद्भुवि भारं समाहितम् । ममगधेन समानीतं पश्यतां सर्वभूभुजाम् ॥७॥
मागध वधूनि सेनाग्रहण । करतां कलहाचें खंडन । अवशिष्ट भूभारनिर्दळन । नोहे जाणोनि हें न कीजे ॥३८॥
सेना समागध वधिल्यापाठीं । कोण्ही न करीच समरगोठी । यालागीं श्रीकृष्ण जगजेठी । विचारदृष्टी विवरूनि ॥३९॥
प्रथमपक्ष निर्धारिला । संहारूनि मागधवळा । पाहिजे बार्हद्रथ सोडिला । निश्चय केला हृतकमळीं ॥१४०॥
वरिष्ठ भूमंडळींचे राजे । त्यां देखतां मागधराजें । यदुकुळाच्या हननकाजें । सेना पैं जे संग्रहिली ॥४१॥
ते हे भूभाररूपसेना । प्रतापें आणीन समरांगणा । समस्त भूभुजांचिया नयनां । महदाश्चर्य दावीन ॥४२॥
मागधसेना म्हणाल कैसी । कृष्ण प्रशंसी निजमानसीं । शुक निरूपी परीक्षितीसी । श्रोती तैसी परिसावी ॥४३॥
अक्षौहिणीभिः संख्यातं भटाश्वरथसंकुलम् । मागधस्तु न हंतव्यो भूयः कर्ता बलोद्यमम् ॥८॥
तेवीस अक्षौहिणी गणित । पदातितुरंग कुंजररथ । प्रचंडसेना भूभारभूत । आजि समस्त मारीन ॥४४॥
परंतु मागध न मरिजे आतां । हा अभिमानी उद्योगकर्ता । पुन्हां भूभारा ऊर्वरिता । संहारविता होईल ॥१४५॥
प्रतापभंगें आवेशोनी । पडेल पुरुषार्थें अभिमानी । भूभार भूपति मेळवूनी । येथ आणोनि वधवील ॥४६॥
खांदेकरूनि फेडिती ऋण । तेंवि हा पुढती पुढती रण । करितां भूभाराचें हरण । दुष्टनिर्दळण तद्योगें ॥४७॥
तस्मात् मागध सोडिजे जीत । करूनि सेनेचा निःपात । वारंवार जे आणील येथ । ते ते समस्त संहरिजे ॥४८॥
किमर्थ शोधिजे पृथ्वीवरी । येथ आणूनि देईल घरीं । ऐसें चिंतूनि अभ्यंतरीं । विवरी श्रीहरि काय पुन्हा ॥४९॥
एतदर्थोऽवतारो हि भूभारहरणाय मे । संरक्षणाय साधूनां कृतोऽन्येषां वधाय च ॥९॥
इतुक्या कार्याचि कारणें । भूताळीं माझें अवतार घेणें । तेंचि कार्य अवधारणें । जें भूभारहरणें मुख्यत्वें ॥१५०॥
आणि साधूंचें संरक्षणें । असाधूंचें निर्दाळणें । हें कां चिंतिलें भगवानें । राया म्हणसी तरी ऐक ॥५१॥
जेंवि अमेध्याचिया पचना । पलांडुरामठलवणलशुना । तैसी योजूनि व्यंजना । दुर्जन अशना प्रिय करिती ॥५२॥
तैसे दुष्टीं दुष्ट मिळती । साधुसमुच्च्चय दैवसंपत्ति । मागध असाधु दैत्यवृत्ति । पक्षपाती या तैसे ॥५३॥
एवं असाधु जे दुष्कृति । ते ते मागधा पक्षपाती । होऊनि येथें समरा येती । त्यांची शांति अम्हां उचित ॥५४॥
अन्योऽपि धर्मरक्षायै देहः संभ्रियते मया ।
विरामायाप्यधर्मस्य काले प्रभवतः क्कचित् ॥१०॥
क्कचित्काळीं अधर्मप्रभव । होतां अन्य म्यां ऐसाचि देह । धर्मगुप्तीकारणें स्वमेव । अधर्मक्षयार्थ धरिजे तो ॥१५५॥
मागधसैन्य अवलोकून । ऐसें चिंतूनि श्रीभगवान । हृदयीं करित असतां ध्यान । आश्चर्य गहन वर्तलें ॥५६॥
N/A
References : N/A
Last Updated : May 08, 2017
TOP