अध्याय ५० वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शंखं दध्मौ विनिर्गत्य हरिर्दारुकसारथिः । ततोऽभॊत्परसैन्यानां हृदि वित्रासवेपथ्हुः ॥१६॥

शैब्यसुग्रीव बलाहक । मेघपुष्पादि तुरंग चौक । चार्‍ही निगम जैसे अर्क । येतां दारुक खगकेतु ॥७४॥
स्वयें श्रीकृष्ण महारथी । मागधमर्दनोत्साहवृत्ति । शंख स्फुरिला प्रचंडशक्ती । घोषें गाजती त्रिभुवनें ॥१७५॥
नगरांतूनि निघोनि नेटें । तेणें दणानिलीं गिरीकूटें । वाटे वोखटें अरिवर्गा ॥७६॥
शंखश्रवणानंतर पहा । परसैनिकां संत्रास महा । म्हणती प्रळय वोढवला हा । भरला दाहा सर्वांगीं ॥७७॥
सैनिकांसि आली शारी । वाजती वीरांचीं दातोरीं । थरथराटें कांपती टिरी । नधरत वस्त्रीं लघुशंका ॥७८॥
थरथरा कांपती महावाट । म्हणती भंगला ब्रह्मांडघट । एकां जाला हृदयस्फोट । एकां सुभट सांवरिती ॥७९॥
झांपडी पडिली सर्वां नयनीं । कित्तेक प्रेतप्राय अवनीं । मागध दचकोनि आपुले मनीं । स्वस्थ होऊनि पाहतसे ॥१८०॥
तंव समर्म्गीं निकटवर्ती । रामकृष्ण महारथी । देखोनि बोले तयाप्रति । कौरवपति तें ऐक ॥८१॥

तावाह मागधो वीक्ष्य हे कृष्ण पुरुषाधम । न त्वया योद्धुमिच्छामि बालेनैकेन लज्जया ।
गुप्तेन हि त्वया मंद न योत्स्ये याहि बंधुहन् ॥१७॥

रोषावेषें पैशून्योक्ति । निंदूनि बोले कृष्णाप्रति । निंदेमाजि श्रीभारती । करी स्तुति तें ऐका ॥८२॥
अरेरे कृष्णा पुरुषाधमा । लज्जे करूनि तुजसीं आम्हां । युद्ध न घडे म्हणसी कामा । तरी अयोग्य संग्रामा तूं मजसी ॥८३॥
तूं तंव बाळक वसुदेवाचें । अद्यापि भय तुज बागुलाचें । सुभटासमरीं तूं कालिचें । केंवि लेंकरूं तडवसी ॥८४॥
तुजसी युद्ध करितां मज । हांसती पृथ्वीचे भूभुज । बार्हद्रथ मी कीर्तिध्वज । पावेन लाज तव समरीं ॥१८५॥
म्हणसी विष्णूचा अवतार । प्रतापें वधिला कंसासुर । हें यश मानिती पामर । प्रतापी शूर न गणिती ॥८६॥
जरीं तूं विष्णु होतासि सत्य । तरी कां गोवळीं राहतासि गुप्त । विश्वस्त कंसा केला घात । तुजवरी हात नुचलीं मी ॥८७॥
प्राण वांचविला लपोन । ऐसाचि जाय रे पळोन । तुजला दिधलें म्यां जीवदान । ह्मी बंधुघ्न न मारीं ॥८८॥
इत्यादि निंदेच्या उतरीं । कृष्णा मागध नोकी समरीं । निंदेमाजि स्तवी वैखरी । तें समासें चतुउरीं ऐकावें ॥८९॥
कृष्णापासूनि पुरुष अपर । अविद्यावेष्टित जीवमात्र । तितुके पुरुषाधम निर्धार । क्रुष्ण साचार पुरुषोत्तम ॥१९०॥
गोवळीं गुप्त ऐसी वाणी । तरी गुहायश हा चक्रपाणि । सर्वांतर्यामी आसोनी । करणालागूनि अप्राप्त ॥९१॥
यालागिं गुप्त हेंही खरें । दर्शना अयोग्य अनधिकारें । मंद अमंद हें उत्तरें । होती साचारें पूर्णत्वीं ॥९२॥
चंचळ बुद्ध्यादि करणवृंद । तया पुरुषानाम अमंद । अचळ अमळ पूर्ण प्रसिद्ध् । मंद स्वतःसिद्ध परमात्मा ॥९३॥
ये चैव सात्विका भावा । राजस तामस मिश्र अथवा । मजपासूनि जाण पाण्डवा । तैं अमंद अघवा श्रीकृष्ण ॥९४॥
बंधुघ्नशब्दाची व्युत्पत्ति । कृष्ण साचार बंधुघाती । अविद्याबंधन सर्वांप्रति । कृष्णस्म्रुति घातक त्या ॥१९५॥
याहि म्हणिजे करीं गमन । क्रुष्ण सर्वग विद्यमान । प्रापणार्थीं हें जाणोन । करी स्तवन वाग्देवी ॥९६॥
ऐसा उपेक्षूनि श्रीकृष्ण । मग रामासि बोले वचन । समरा योग्य संबोधून । तें सर्वज्ञ परिसतु ॥९७॥

तव राम यदि श्रद्ध युध्यस्व धैर्यमुद्वह ।
हित्वा वा मच्छरैश्छिन्नं देहं स्वर्याहि मां जहि ॥१८॥

मागध म्हणे रे संकर्षणा । मजसीं भिडसी आंगवणा । जरी तुज आवडी समरांगणा । तरी ये रणा धीर धरीं ॥९८॥
मत्समरंगीं होसी अधळ । दोहीं प्रकारीं उत्तम फळ । माझ्या शरीं संच्छिन्न स्थूळ । टाकूनि केवळ स्वर्ग वरीं ॥९९॥
स्थूळशरीर माझ्या बाणीं । छिन्न भिन्न टाकूनि रणीं । शौर्यें स्वर्गाप्रति जाऊनी । अमरभुवनीं सुख भोगीं ॥२००॥
अथवा म आतें जिंकूनि रणीं । कीर्ति विस्तारीं भूपाळगणीं । भोगीं असपत्न हे धरणी । प्रकार दोन्ही शुभ फलद ॥१॥
मागधामनीं ऐसा भाव । अच्छेद्य अभेद्य माझा देह । निर्बळ बळाचा कायसा भेद । म्हणोनि हांव उद्बोधी ॥२॥
ऐसीं ऐकोनि मागधवचनें । परमाविस्मयें हास्यवदनें । दिधलें प्रत्युत्तर श्रीकृष्णें । तें नृपाकारणें शुक सांगे ॥३॥

श्रीभगवानुवाच - न वै शूरा विकत्थंम्ते दर्शयंत्येव पौरुषम् ।
न गृह्णीमो वचो राजन्नातुरस्य मुमूर्षतः ॥१९॥

श्रीकृष्ण म्हणे मागधाप्रति । शूर प्रताप आंगीं वाहती । वृथा वल्गना ते न करिती । प्रकट दाविती पुरुषार्थ ॥४॥
ऐकें राया मागधपते । जें हें विकत्थन योग्य तूंतें । तूं बोलसी सन्निपातें । मर्तुकांमातें हें उचित ॥२०५॥
आतुर केवळ मुमूर्षुप्राणी । सन्निपातें बरळे वाणी । ते हे तुझी विकत्थनी । आम्ही श्रवणीं न गणूं पां ॥६॥
अल्पबळेंशीं अर्भक कृष्ण । न गणूनि आपुलें हेळी वचन । तेणें मागध प्रक्षोभून । करी आंगवण तें ऐका ॥७॥

श्रीशुक उवाच - जरासुतस्तावभिसृत्य मागधौ महाबलौघेन बलीयसाऽवृणोत् ।
ससैन्ययानध्वजवाजिसारथी सूर्यानलौ वायुरिवाभ्ररेणुभिः ॥२०॥

शरीरशकलें जरासंधित । यालागीं म्हणिजे जरासुत । कृष्णोक्तीचा ऐकतां अर्थ । धांवोनि वेष्टित बलकृष्ण ॥८॥
मधुअन्वयामाजि जन्म । यालागीं माधव ऐसें नाम । ते हे श्रीकृष्ण बलराम । मागध अधम अभिवेष्टी ॥९॥
तेवीस अक्षौहिणी सैन्य । ससैन्य रामकृष्णां वेष्टून । आच्छादिलें जैसा पवन । सूर्यकृशान झांकोळी ॥२१०॥
गज रथ तुरंग आणि पदाति । चातुरंग चमू होती । तयेसहित महारथी । राम श्रीपति वेष्टिले ॥११॥
ससैन्य यानें वाजिरथ । गरुडतालध्वजचिन्हित । आच्छादिले सैन्यावर्त । भवंता घालूनि प्रतापें ॥१२॥
जैसा प्रचंड चक्रवात । धुळीनें अनिळाच्छादित । अभ्रें आच्छादी भास्वत । झांकिले तद्वत बलकृष्ण ॥१३॥
अनेक केतु उच्चतर । भवंता बृहत्पताकाभार । तेणें बलराम श्रीधर । सकेतुरहंवर लोपले ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP