अध्याय ५० वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - अस्तिः प्रपतिश्च कंसस्य महिष्यौ भरतर्षभ । मृते भर्तरि दुःखार्ते ईयतुः स्म पितुर्गृहान् ॥१॥

वशिष्ठमहर्षि विधिसंभव । शक्तिनामा वसिष्ठप्रभव । शक्तीपासूनि प्रादुर्भाव । महावैष्णव पराशुर ॥५१॥
वसुवीर्यजा सत्यवती । वासवी ऐसें जीतें म्हणती । पराशरवीर्यें व्यासोत्पत्ति । जठरशुक्ति तयेचिये ॥५२॥
अरणीसंभव व्यसतनय । तो हा श्रीशुक योगिवर्य । सिंहावलोकें कथान्वय । कथित होय कुरुकुळपा ॥५३॥
कुरुकुळमकरालयकौस्तुभा । तव मति रतली पंकजनाभा । यास्तव हरिगुणकीर्ति शुभा । सत्संदर्भा अवधारीं ॥५४॥
कंसें मरण चुकवावया । दुर्घट यत्न केले राया । ते सर्वहि गेले विलया । गंधर्वनिलया समसाम्य ॥५५॥
कंसें जितुकें केलें कपट । कृष्णें भंगिलें तें निष्कपट । कांबिटकरटिमल्लांसगट । केला शेवट कंसाचा ॥५६॥
अग्रज पावला देखोनि मरण । अनुजीं करितां समरांगण । स्पष्ट निमाले अष्टही जन । जाला श्रीकृष्ण वरविजयी ॥५७॥
पुष्पवृष्टि करिती अमर । पुरजन करिती जयजयकार । तेणें कंसकामिनी घोर । दुःख दुस्तर पावलिया ॥५८॥
उग्रसेना दिधलें राज्य । हर्षें यदुकुळ नाचे भोज । कंसमानिनी मानूनि लाज । जाल्या निस्तेज निर्दैवा ॥५९॥
कृष्णें केलें समाधान । उत्तरक्रिया संपादून । तथापि त्यांचें सरोष मन । स्नेहें कृशान जेंवि क्षोभे ॥६०॥
कंसें जाचिले यादव सर्व । विशेष देवकी आणि वासुदेव । उग्रसेन जो केला राव । तोही सदैव त्रासिला ॥६१॥
कोण्या तोंडें तयापाशीं । काळ कंठिजे अहर्निशीं । कांतमरण प्रतिकाराशी । निजमानसीं उद्युक्ता ॥६२॥
रामकृष्णांचा व्रतबंध । जेणें त्रिजगीं परमानंद । तये संधीमाजीं मागध - । सदना प्रसिद्ध त्या गेल्या ॥६३॥
अस्ति प्राप्ति दोघीजणी । सहित कंसाच्या अनुजपत्नी । वेष्टित स्वकीयपरिवारगणीं । मागधभुवनीं प्रवेशल्या ॥६४॥
पट्टमहिषी कंसाचिया । अस्ति प्रपति मागधतनया । भर्तारमरणदुःखें काया । जळती उभिया सचेतना ॥६५॥
निजजनकाच्या गृहाप्रति । जात्या जाल्या ऐसिये रीति । भरतश्रेष्ठा परीक्षिति । काय त्या करिती तें ऐकें ॥६६॥

पित्रे मगधराजाय जरासंधाय दुःखिते । वेदयांचक्रतुः सर्वमात्मवैधव्यकारणम् ॥२॥

मगधविषयप जरासंध । जनक कैपक्षी सुस्निग्ध । त्यातें समूळ दुःखकंद । वदती विशद दुःखार्ता ॥६७॥
आपुलें वैधव्यकारण । गगनवाणी मुखें करुण । कथित्या जाल्या कंसमरण । कपटाचरण वृष्णींचें ॥६८॥
गगनवाणी ऐकोनि कंस । वधीत होता देवकीस । तैं वसुदेवें दिधली बहष । स्निग्ध विश्वास दाखविला ॥६९॥
अष्टही गर्भ देवकी उदरीं । होतां अर्पीन तुझिये करीं । वैरानुबंधें त्यांतें मारीं । देवकी न मारीं भोजेन्द्रा ॥७०॥
अंतरीं निर्मळ भोजपति । स्नेहविश्वास धरिला चित्तीं । कपटी वसुदेव दुर्मति । विश्वासघातकी दुष्टात्मा ॥७१॥
तेणें रोहिणी निज सुंदरी । जाली जाणोनि गुरूदरी । नेऊनि ठेविली नंदाघरीं । जीचे जठरीं बळ जाला ॥७२॥
अष्टमगर्भाची प्रसूति । कृष्णनभोऽष्टमीमध्यरातीं । देवकीसी पुत्रप्राप्ति । जाणोनि दुर्मति वसुदेव ॥७३॥
पुत्र नेऊनि नंदसदनीं । ठेवूनि आणिली तन्नंदिनी । कंसाहस्तीं ते अर्पूनी । साधुत्वकरणी दाखविली ॥७४॥
व्रजीं वाढले रामक्रुष्ण । तिहीं क्म्साचे घेतले प्राण । राज्यीं स्थापिला उग्रसेन । वैधव्यदान अम्हां केलें ॥७५॥
इतुकें आमुचें वैधव्यबीज । मागधराया कथिलें तुज । आमुचे शिरीं तूं प्रतापपुंज । असतां वोज हे आमुची ॥७६॥
आम्ही नेणतीं तव लेंकुरें । यादवीं आम्हां गांजिलें निकरें । ताता आमुच्या कैवारें । निवटीं शिरें वैर्‍य़ांचीं ॥७७॥
इत्यादि शोकें आक्रंदती । दीनवदनें ग्लानि करिती । भू भिजवूनि अश्रुपातीं । मूर्च्छित पडती दुःखार्ता ॥७८॥
दुहितदुःखें मागधपति । कळवळूनि क्षोभला चित्तीं । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे सुमति शुकयोगी ॥७९॥

स तदप्रियमाकर्ण्य शोकामर्षयुतो नृप । अयादवीं महीं कर्तुं चक्रे परममुद्यमम् ॥३॥

प्रतापमार्तंड मगधपाळ । दुहितादुःख ऐकोनि सकळ । परमशोकें केला विकळ । जाला केवळ कंसपर ॥८०॥
आठवी कंसाचें चातुर्य । गुण लावण्य वीर्य शौर्य । धैर्य स्निग्धता ऐश्वर्य । मानी अकार्य दुहितांचें ॥८१॥
क्षणैक पडिला शोकावर्तीं । तंव क्षोभली आवेशवृत्ति । चित्तीं आठवला श्रीपति । म्हणे दुर्मति गोरक्ष ॥८२॥
सिंहाचिये जिह्वेसी दंश । मूषकें करूनि मानिला तोष । आतां निर्मूळ यादववंश । करीन निःशेष निःशल्य ॥८३॥
मागधकाळकृतांतकवे । महेंद्र महत्त्वें सांडी हावे । तेथ मशकें वृष्णियादवें । भणगे निर्दैवें म्रियमाणें ॥८४॥
क्षणक्षणा कंसपर । दुःख आठवी वारंवार । नधरत शोकनदीचा पूर । भ्रमवी अंतर आवर्ती ॥८५॥
कुमरी सुकुमारा सुंदरा । केंवि पावती दुःखाब्धिपारा । सकळ सौभाग्या पडिला चिरा । हा शंकरा काय केलें ॥८६॥
माझीं नेणतीं तान्हुलीं । मज देखतां अनाथें जालीं । यदुकुळाची करीन होळी । कर पद चोळी सक्रोधें ॥८७॥
हृदय पिटूनि रडती दांत । श्मश्रु मिळूनि चोळी हात । यदुकुळाचा पुरला अंत । क्षोभला कृतांत मम रूपें ॥८८॥
ऐसा शोकामर्षयुक्त । यादवनिर्दळणा उद्युक्त । प्रधान सैनिक सेनानाथ । करवी एकांत समरार्थ ॥८९॥
कंसाचिया अनुजपत्नी । तातसदना पाठवी यत्नीं । त्यांचें जनक आरब्धप्रयत्नी । करी अभिमानी तद्द्वारा ॥९०॥
जे जे स्ववश माण्डलिक । ससामंत प्रतापार्क । आज्ञापत्रें त्यां सम्यक । आदरपूर्वक आणवी ॥९१॥
स्वसेनेचे यूथपति । गज रथ तुरंगम पदाति । सज्जूनि मागध कोणे रीति । निघे युद्धार्थी तें ऐका ॥९२॥

अक्षौहिणीमिर्विशत्या तिसृभिश्चापि संवृतः । यदुराजधानीं मथुरां न्यरुणत्सर्वतोदिशम् ॥४॥

गणक ज्योतिषी सिद्धान्तवक्ते । मुहूर्त विवरूनि त्यांचेनि मतें । फल्गुतटाके पश्चिमप्रांतें । प्रस्थानशिबिरें उभविलीं ॥९३॥
रथ सज्जिले केतुमंत । रथी सारथि अश्वयुक्त । शस्त्रास्त्रसमृद्धिसमवेत । जाती यूथ स्वशिबिका ॥९४॥
गजपल्ल्याणे परोपरी । दिव्य वितानें कलशहारी । प्रासादपताकादामोदरीं । पुरी गोपुरी जेंवि शोभे ॥९५॥
सेनासाहित्य यात्रोपकरणें । क्रमेलपृष्ठीं वाहिली भरणें । वृषभ वाजी वोझीं गौणें । खरें वेसरें शकटादि ॥९६॥
रत्नखचितपल्याणबद्ध । शिक्षित तुरंग केले सिद्ध । गमती उच्चैःश्रवे प्रसिद्ध । अनेक भूतळीं अवतरले ॥९७॥
अश्वसादी समरप्रवीण । निरृतिसम ज्यां आंगवण । पृष्ठिं खेटकें कटीं कृपाण । शूळशक्ति यमदंष्ट्रा ॥९८॥
अमोघमार्गणपूर्ण इषुधि । वैषाणचापें सुवर्णबंधी । कवची खड्गी सर्वायुधि । राउत राने रणरसिक ॥९९॥
आपुलाल्या पृथग भारें । राजे ठाकिती शिबिरागारें । सन्नद्ध पदाति शस्त्रास्त्रें । साटोप समरा उद्युक्त ॥१००॥
ऐसी चतुरंग सेना । शिबिरीं उतरले प्रस्थाना । मागध वेष्टित सामंतगणा । शिबिरस्थाना पातला ॥१॥
यज्ञवेदी कुळदेवता । आचार्यादि वंदूनि निघतां । ऋषीची आज्ञा स्मरली चित्ता । तेणें अवचिता दचकला ॥२॥
यादवेंशीं विरोध उपजे । तैं भंगती प्रतापतेजें । ऐसें बोलिलें मुनिराजें । म्हणे तें सहजें वोढवलें ॥३॥
ऐसा स्फुरतां हृदयीं तर्क । म्हणे यशदानी त्र्यंबक । तंव सन्मुख जाली शिंक । दचके अधिक तद्योगें ॥४॥
एव टाळूनि घटिका पळ । शिबिरा गेला मगधपाळ । पुराणान्तरीं हे कथा सकळ । संक्षेप केवळ शुक वदला ॥५॥
सेना तेवीस अक्षौहिणी । ऐसी सन्नद्ध अवलोकूनी । सव्य दक्षिण अग्र पार्ष्णि । वीरवरगणीं वेष्टित ॥६॥
प्रस्थानभेरी कुंजरपृष्ठीं । व्यूह खैवंगीं वाहिल्या शकटीं । अश्वढक्के क्रमेळपाठीं । यूथदुंदुभि पृथक्त्वें ॥७॥
रनमोहरीं पनवानक । टाळ मुरज काहळा शंख । इत्यादि राजवाद्यें अनेक । काळसूचक घटी यंत्रें ॥८॥
घाव घातला निशाणा । वीर करिती गडगर्जना । पश्चिमदिशेसि चालिली सेना । शोणजीवना टाकिलें ॥९॥
शरयुसंगम दर्दरक्षेत्र । गोमतीसंगम अतिपवित्र । प्रयागीं क्रमूनिया त्रिरात्र । यमुनातीरें चालिले ॥११०॥
ऐसा मागध वीरपाळ । घेऊनि प्रचंड दळ प्रबळ । मेघपटळीं प्रावृट्काळ । तेंवि भूतळ आच्छादी ॥११॥
महाराजिक मथुराप्रांतीं । प्रजा पळाल्या दिगंतीं । कित्तेक अभयपत्रें घेती । राष्ट्रें लंघिती कितिएक ॥१२॥
यादवाम्ची राजधानी । मथुरापुरी सुकृतखाणी । अष्टौ दिग्भागीं वेष्टूनी । बळें रोधूनि राहिला ॥१३॥
असाध्य मथुरापुरीचे दुर्ग । ग्रहणीं वीर करिती लाग । वांटूनि अष्टही दिग्भाग । युद्धप्रसंग अतिक्रूर ॥१४॥
परस्परें यंत्रगोळ । सुटती जैसे वज्रकल्लोळ । नगरगर्भीं हलकालोळ । प्रलयकाळ वोढवला ॥११५॥
ऐसिये समयीं श्रीभगवान । यदुकैपक्षी कंसमथन । अभ्यंतरीं कळवळून । काय करी तें ऐका ॥१६॥

निरीक्ष्य तद्बलं कृष्ण उद्वेलमिव सागरम् । स्वपुरं तेन संरुद्धं स्वजनं च भयाकुलम् ॥५॥

विश्रांतिघांटीच्या महाद्वारीं । परमोत्तुंगगोपुरशिखरीं । वेंघूनिया कैटभारि । पाहे चौफेरी परसेना ॥१७॥
वेळावर्जित अक्रूपार । क्षोभे जाणोनि प्रळयावसर । तसा अपार सेनाभार । रोधूनि स्वपुर पसरले ॥१८॥
दुर्गग्रहणाचे प्रयत्न । प्रचंड यंत्रें सुटती तीक्ष्ण । वनोपवना विध्वसन । विवरें खनन दुर्गार्थ ॥१९॥
ऐसें प्रचंड मागधबळ । जेंवि प्रळयाब्धि उद्वेळ । कृष्णें देखोनिया सकळ । मथुरा व्याकुळ संरुद्ध ॥१२०॥
गाई हंबरडा हाणिती । जळासाठीं तळमळिती । नगराबाहीर जावों न ल्हाती । दुर्गावर्तीं जन सकळ ॥२१॥
एक म्हणती रामकृष्ण । अझूनि पाहती कां निर्वाण । एक म्हणती आंगवण । मागधासमान त्यां कैंची ॥२२॥
इहीं कंस वधिला नसता । तरी कां एवढा प्रलय येता । कोन एवढ्या प्रळयावर्ता - । पासून आतां रक्षील ॥२३॥
एक म्हणती हें लेंकरें । द्वंद्वयुद्धीं बळप्रचुरें । नव्हती शस्त्रास्त्रसाधनीं चतुरें । समर निकरे यां न घडे ॥२४॥
आतां कोण विचार कीजे । कैसें दुस्तर निस्तरिजे । कंसप्रतिकारनिष्कृतिकाजें । यदुकुळ सहजे निर्दळलें ॥१२५॥
एक म्हणती रामकृष्ण । वसुदेव आणि उग्रसेन । मागध यांचे घेईल प्राण । येरा लागून न मारी ॥२६॥
एक म्हणती कंसासाठीं । सर्वां वधील महाहट्टी । एक म्हणती सांडा गोठी । कृष्ण संकटीं स्मरा हो ॥२७॥
कृष्णें पाहूनि परवाहिनी । आणि स्वपुरजनाची ग्लानि । चिंतिता जाला आपुले मनीं । तें शुकमुनि निरूपी ॥२८॥
कृष्णें केलें जें चिंतन । पुढें चौश्लोकीं तें कथन । षड्गुणैश्वर्यसंपन्न । करी विवरण हृत्कमळीं ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP