अध्याय ५० वा - श्लोक ३६ ते ४०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


माथुरैरुपसंगम्य विज्वरैर्मुदितात्मभिः । उपगीयमानविजयः सूतमागधबंदिभिः ॥३६॥

मथुरावासी प्रबुद्ध जन । दुर्गाग्रप्रदेशीं राहोन । पहात होतो समरांगण । मागध श्रीकृष्ण भेडतां ॥२९॥
मागधसैन्य मारिलें सकळ । विजयी जालें श्रीकृष्णबळ । परततां देखोनि उताविळ । पुढें सत्काळ धांविले ॥३२०॥
रामकृष्ण आळंगिती । आशीर्वादें तोषविती । विजयानंदें निर्भर होती । धन्य म्हणती जयघोषें ॥३१॥
आंगीं परचक्रभयाचें शारें । संतप्त होते तेणें ज्वरें । हरियश देखोनि जनपद सारे । जाले विज्वर सर्वांग ॥३२॥
सर्वां आंगीं विजयलक्ष्मी । प्रकटा स्फुरती आनंदउर्मी । कृष्णप्रताप मनोधर्मीं । आह्लादगामी करणश्री ॥३३॥
परमानंदीं निमग्न जीव । मुदिताह्लादीं सर्व स्वभाव । कृष्णपरमात्मा देवाधिदेव । देखतां अवयव नावरती ॥३४॥
टाळ्या वाहूनि हरिसन्मुख । विस्मृतावयवीं नाचती एक । रामकृष्णांचा स्मरण घोक । जयजयपूर्वक दीर्घ स्वरें ॥३३५॥
म्हणती रामें रक्षिली मथुरा । कृष्णें भंगिलें मागधासुरा । विजयलक्ष्मी आणिली घरा । नागरां अमरां गौरविलें ॥३६॥
वसनपल्लवीं ऊर्ध्वकरीं । वीजिती होऊनि चामरधारी । हरियश गाती दीर्घस्वरीं । जयजयगजरीं हरि स्मरती ॥३७॥
उधळिती वीरश्रीउत्साहचूर्णें । अपरें श्वेतें सुंगधपूर्णें । दिव्यसौरभ्यें माळासुमनें । विजयभूषणें अवतंस ॥३८॥
ऐसे माथुर विज्वर मुदित । हरिबळ भेटोनि तिहीं सहित । अपि या अव्ययाचाही अर्थ । ऐका शुकोक्त व्याख्यान ॥३९॥
मथुरादेशींचे गुढेकरी । परिखाश्रित होते बाहेरी । तेहि धांवोनि भेटले हरि । नाचती गजरीं हरिरंगीं ॥३४०॥
गुरें वासुरें लेंकुरें । आह्लादनिर्भर हरियशगजरें । बाहीर निघती यमुनातीरें । जीवनचारे स्वीकरिती ॥४१॥
कृष्णविजयाचे पवाडे । भाट बिरुदें पढती पुढें । वंशावळी वर्णिती तोंडें । मागध देव्हडे हरिरंगीं ॥४२॥
वंशप्रशंसा पौराणिका । सूत स्वमुखें वर्णिती देखा । वीररसरंगें अनेका । वैताळिक तद्वेत्ते ॥४३॥
ऐसा विजय उपगीयमान । मथुरा प्रवेशतां भगवान । विजयवाद्यें गर्जे गगन । तें सज्जन परिसतु ॥४४॥

शंखदुंदुभयो नेदुर्भेरीतूर्याण्यनेकशः । वीणावेणुमृदंगानि पुरं प्रविशति प्रभौ ॥३७॥

रणदुंदुभि कुंजरपृष्ठीं । परकटकींच्या वाहिल्या शकटीं । पटहपणव क्रमेळपृष्ठीं । अश्वढक्के ठोकती ॥३४५॥
विजयस्वनें वाजती शंख । श्रृंगें तुतारी भेरी अनेक । वांकें बुरंग्गें गोमुख । काहळा मृदंग गुजबुजी ॥४६॥
मुरजमंदलमृदंगजाति । वेणुमोहरी वंशोत्पत्ति । रुद्रवल्लकी विपंची तंती । सारमंडळ ब्रह्मवीणा ॥४७॥
कांसोळताळ किंकिणी घंटा । घटिकायंत्रादि जेंगटा । पुरी प्रवेशतां वैकुंठा । ब्रह्मांडमठामाजि ध्वनि ॥४८॥
कृष्णपरमात्मा त्रैलोक्यनाथ । अचिंत्यैश्वर्यें समर्थ । गायक गाती गणिकानृत्य । यशें वर्णिती जयघोषें ॥४९॥
मथुरापुरीं महाद्वारीं । प्रवेशतां श्रीकैटभारि । विजयालंकृत शोभे पुरी । कवणे परी तें ऐका ॥३५०॥

सिक्तमार्गां हृष्टजनां पताकाभिरलंकृताम् । निर्घुष्टां ब्रह्मधोषेण कौतुकाबद्धतोरणाम् ॥३८॥

मार्ग चत्वर रथ्यावीथी । श्रृंगाटकादि पण्यप्रांतीं । सेकोपलेपें प्रशोभती । अमरावती समसाम्य ॥५१॥
केशरकस्तुरी मलयजगंधें । चंद्रोदकादि पुष्पामोदें । सर्वत्र सिक्ता भूमि सुगंधें । परमानंदें सुशोभिता ॥५२॥
हृष्टजनपद पुरुषयुवति । भगवद्विजय संवादती । ध्वजपताका सदनाप्रति । यथासंपत्ति विराजिता ॥५३॥
प्रासादशिखरीं दामोदारीं । पणचत्वरीं उपगोपुरीं । तालमृदंगवाद्यगजरीं । हरि यशस्वी जन गाती ॥५४॥
ब्रह्मण्यदेव श्रीकृष्णनाथ । ब्रह्मवृंदें मथुरेआंत । विजयी येतां श्रीभगवंत । पढती समस्त स्वस्त्यनें ॥३५५॥
आशीर्वाद वेदप्रणीत । पढती ब्राह्मण स्वशाखोक्त । उदाक्त अनुदात्त प्रचेत स्वस्त्यनें । तेणें नादित मोक्षपुरी ॥५६॥
समस्तनगरीं विजयोत्सव । आसमंतात् सर्वत्र सर्व । तोरणें बांध्हिती अति अपूर्व । भगवद्वैभव विराजित ॥५७॥
ब्रह्मघोषें नादित पुरी । तोरणें पताका घरोघरीं । सुगंधसडे पथचत्वरीं । जीतें श्रीहरि प्रवेशला ॥५८॥
नगरीं प्रवेशला भगवंत । जातां नगरीमाजि मिरवत । पुरजनवृंदीं सुपूजित । कैसा यथोक्त तो ऐका ॥५९॥

निचीयमानो नारीभिर्माल्यदध्यक्षतांकुरैः ।
निरीक्ष्यमाणः सस्नेहः प्रीत्युक्तलितलौचनैः ॥३९॥

मथुरेचिया नगरानारी । वप्रीं गोपुरीं दामोदरीं । पुष्पीं दध्यक्षतांकुरीं । ऐसा कंसारी प्रवेशला ॥३६०॥
पुढें जाऊनि राजसदना । भेटता जाला उग्रसेना । श्रोतीं सावध करूनि सुमना । त्या व्याख्याना परिसावें ॥६१॥

आयोधनगतं वित्तमनंतं वीरभूषणम् ।
यदुराजाय तत्सर्वमाहृतं प्रादिशत्प्रभुः ॥४०॥

रणभूमि जे आयोधन । जेथ मारिलें मागधसैन्य । तेथील संपदा संपूर्ण । वीरभूषणें शस्त्रास्त्रें ॥६२॥
कवचें कुंडलें किरीटमाळा । बाहुभूषह्णें रत्नमेखळा । वीरकंकणें मुद्रिका तरळा । अमूल्य किळा रत्नांच्या ॥६३॥
कंचुकोष्णीषें कटिबंधनें । अनेक रंगीं अमूल्य वसनें । अंगुलीयकें गोधाबाणें । बिरुदें तोडर कूर्परिका ॥६४॥
वैषाणचापें कनकबंदी । अनेक आयुधांच्या समृद्धि । निशित मार्गणीं पूर्ण इषुधि । सेना मागधी लुंटन जें ॥३६५॥
वोझीं क्रमेळकुंजरपृष्ठीं । खेसरीं वेसरीं अश्वीं शकटीं । तेवीस अक्षौहिणींची लुटी । आणिली सुभटीं रामकृष्णीं ॥६६॥
अश्वकुंजरपदातिरथ । दासदासी असंख्यात । कोशभण्डार अपार वित्त । आणिलें समस्त नृपसदना ॥६७॥
तितुकें अर्पूनि उग्रसेना । विनीत भावें नमिलें चरणां । देवकप्रमुखां वृद्धां मान्यां । नम्रमौळें जुहारिलें ॥६८॥
व्वसुदेवाचे चरणीं माथे । ठेविले सप्रेमभरितचित्तें । येरें हुंगोनि हरिमौळातें । वरदहस्तें गौरविलें ॥६९॥
ब्राह्मणांसि वांटिलीं धनें । विद्योपजीवियां त्यागदानें । वीर गौरविले सम्मानें । वस्त्राभरणें यथोचित ॥३७०॥
परसेनेचीं आणिलीं यंत्रें । स्वदुर्गीं स्थापिलीं त्रैलोक्यमित्रें । शस्त्रशाळेमाजि शस्त्रें । राजाज्ञेनें स्थापविलीं ॥७१॥
एवं मारूनि मागधसैन्य । दिधलें मागधा जीवदान । विजयी जाले रामकृष्ण । भेटले वंदूनि जननीतें ॥७२॥
देवकी आलिंगूनि कुमरां । जाली आनंदें निर्भरा । कुरवंडूनि चुंबी वक्त्रा । लघुलेंकरा सम मानी ॥७३॥
देवकीची घेऊनि आज्ञा । पातले स्वकीय सभास्थाना । किरीटकवचा कटिबंधना । संग्रामवसना । फेडिलें ॥७४॥
स्वस्थ बैसले सभास्थानीं । देखूनि मथुरापुरीच्या जनीं । पुष्पवृष्टि नानारत्नीं । वोवाळूनियां सांडिती ॥३७५॥
एवं परमानंदें भरित । मथुरादेशींचा जन समस्त । म्हणती कृष्णें शल्यरहित । केलें मारूनि मागधा ॥७६॥
लग्नें मुहूर्तें मंगलकर्में । करिती घरोघरीं संभ्रमें । सर्वीं सर्वत्र नित्य नेमें । करिती सप्रेमें कीर्तनें ॥७७॥
हरलें कंसाचें शासनभय । परचक्रनाशें अतिनिर्भय। वर्ततां जनपद आनंदमय । वर्त्तलें काय तें ऐका ॥७८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP