अध्याय ३० वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इत्येवं दर्शयंत्यस्ताश्चेरुर्गोप्यो विचेतसः । यां गोपीमनयत्कृष्णो विहायान्याः स्त्रियो वने ॥३६॥
कामी गुंतलाचि पाहिजे । जारिणीचें तो होय खाजें । बळें सांडूनिया लाजे । नीच काजें करविती ॥६८॥
असो ऐसिया त्या विरहिणी । नानावितर्कीं श्रीकृष्णकरणी । दाविती भावूनि अंतःकरणीं । वनीं उपवनीं हुडकितां ॥६९॥
चित्तें गुंतलीं कृष्णापासीं । विचेतसा त्या लावण्यराशि । काननीं भ्रमती जैसीं पिशीं । देहभावासि विसरूनी ॥२७०॥
झाडीं खोडीं अरडी दरडी । धांवती सैराट जैशीं वेडीं । रमली गोविंदीं आवडी । वितर्कपरवडी तच्छंदें ॥७१॥
असो ऐसा गोपिकांचा । अभेदभक्तिप्रेमा साचा । यावरी महिमा अभिमानाचा । किंचित् वाचा शुक वर्णी ॥७२॥
सांडूनि समस्त व्रजकामिनी । एकली प्रियतम ललना वनीं । घेऊनि गेला चक्रपाणि । लावण्यखाणीं रतिरसिका ॥७३॥
बाहु ठेवूनियां खांदां । संलग्न होउनि श्रीमुकुंदा । पदोपदीं विचरतां प्रमदा । कृष्णें प्रमोदा पावविली ॥७४॥
चरणीं रुतती तरुवर । ललनालालस भयकांतार । स्कंधीं वाहे मुरलीधर । जे कां सुंदर बहुमानें ॥२७५॥
जे उतरूनि पृथ्वीवरी उभा ठाकूनि प्रपदांवरी । पुष्पें वेंचूनि श्रीमुरारी । अत्यादरीं दे जीतें ॥७६॥
जिचें स्वकरीं श्रीभगवान । करी केशप्रसाधन । विविधा कुसुमीं मौलग्रथन । वेणिकारचन कौशल्यें ॥७७॥
मुकुराकार आपुले नयनीं । लावण्य उमाणी चक्रपाणि । झाली तन्मानें मानिनी । प्रमदागुणीं स्मयरूढा ॥७८॥
सा च मेने तदाऽत्मानं वरिष्ठं सर्वयोषिताम् । हित्वा गोपीः कामयाना मामसौ भजते प्रियः ॥३७॥
ऐसी बहुधा सम्मानिली । पाहिजे विनयभावा भजली । परी ते उचितातें विसरली । गर्वें फुगली उफराटी ॥७९॥
पतिव्रता ज्या साध्वी रामा । क्रीडती जाणोनि कांतकामा । वाढवूनिया विनयधर्मा । दास्यकर्मा अनुसरती ॥२८०॥
जैसी श्यामाकमंजरी । उभारितांही बळात्कारीं । सहसा आंगीं ताठा न धरी । पुन्हा स्वीकारी नम्रत्व ॥८१॥
तैसें नोहे वर्जरीकणिस । ताठे कुलटेसम विशेष । शुद्ध नम्रत्वें उजळी यश । नित्य निर्दोष पतिव्रता ॥८२॥
जारिणीपासूनि ऐसें न घडे । सम्मानितां ते गर्वा चढे । कामिक नाचवी आपणां पुढें । करूनि वेडे तृणप्राय ॥८३॥
जेंवि कां द्रव्याचेनि बळें । धनिक राबविती आपुलीं कुळें । तेंवि गोवूनि कामकळे । कामिक मोकळे नाचविती ॥८४॥
विद्यादानें राबवी शिष्यां । वेतनें स्वामी राबवी दासां । तैशा कामिनी कामुकां पुरुषां । कामसुखाशा नाचविती ॥२८५॥
नेत्र मुरडोनि दाविती रुसणें । बळेंचि कुंथूनि काढिती दुखणें । ईर्ष्यारोषें गर्वें फुगणें । न्यून उपसणें पिशुनापै ॥८६॥
प्रेमें अर्पितां न घेती अन्न । अव्हेरिती अर्पिलें वसन । न करवे म्हणती पदाभिगमन । अळुमाळ वचन न साहती ॥८७॥
जंव जंव जाविती त्या विकार । तंव तंव कामिक मर्कटाकार । त्यांच्या छंदें नर्तनपर । अन्य विचार विसरोनी ॥८८॥
तिचेंचि वालभ वाढवी वाड । तिची मोडूं न शके भीड । तिचे ठायीं विश्वास दृढ । वाटे अवघड तीसाठीं ॥८९॥
मायबापादि आप्तकोटी । त्यांतें न गणी तृणासाठीं । कोणी प्रियेची मोडितां गोठी । क्षोभे पोटीं अनिवार ॥२९०॥
क्षणक्षणा प्रियेचें वदन । पाहोनि जीवाचें उतरी लोण । येरी मानी तृणासमान । डिंगर करूनि राबवी ॥९१॥
तैसी श्रीकृष्णलालनें ललना । चढली लावण्यें अभिमाना । येरी समान मानूनि तृणा । भावी आपणा श्रेष्ठत्व ॥९२॥
भूस टाकूनि घेती कण । कीं मृगांग टाकूनि कस्तूरीग्रहण । कीं कंटक सांडूनि सेविती सुमन । घेती सुज्ञ गुणलाभें ॥९३॥
तैशा समस्त रानटा गोपी । कृष्णें सांडूनि विगुणा विरूपी । मद्गुणलावण्यकंदर्पकल्पीं । कृष्ण प्रतापी तापविला ॥९४॥
कुवलयगंधीं चंचरीक । वेधे नागस्वरें पन्नक । चकोरा वेधी जैवातृक । मत्कामुक हरि तैसा ॥२९५॥
तस्मात् माझिये सुकुमारते । गुणलावण्यचतुर्यते । अगाध जाणोनि श्रीअनंतें । वनिताशतें । उपेक्षिलीं ॥९६॥
कृष्ण भुलविला गुणलावण्या । त्रिभुवनीं एक मी वरांगना । स्कंधीं वाहे समान सुमना । सुगंधव्याजें स्रग्रूपी ॥९७॥
जंववरी अम्लानता असे सुमनीं । तंववरी भजिजे गुणज्ञजनीं । तेंवि माझिये सुकुमारगुणीं । चक्रपाणि वशवर्ती ॥९८॥
माझें कुशल सुकुमारपण । असतां कृष्ण मज अधीर । माझें उल्लंघूं शके वचन । धरिला अभिमान सुभगत्वें ॥९९॥
कृष्णसम्मानें सगर्वा । चढली प्रमदा गुनस्वभावा । काय बोलिली श्रीकेशवा । कुरुपुंगवा तें ऐक ॥३००॥
ततो गत्वा वनोद्देशं दृप्ता केशवमब्रवीत् । न पारयेऽहं चलितुं नय मां यत्र ते मनः ॥३८॥
आपुल्या हातें सुगंध सुमनीं । कृष्णें जिची गुंफिली वेणी । जे रमविली बहुतां गुणीं । सम्मानूनि सुभगत्वें ॥१॥
त्यानंतरें ते सगर्व ललना । वनप्रदेशीं करूनि गमना । श्रीकृष्णातें बोले वचना । वराभिमाना दाखवूनी ॥२॥
पुढें न चलवे मजकारणें । जेथें आवडी धरिजे मनें । तेथें स्कंधीं वाहूनि नेणें । लालसपणें मत्प्रेमें ॥३॥
येथूनि चालों न शकें पुढां खांदीं वाहून प्रेमचाडा । तुझें मानस सुखसुरवाडा । वांछी तिकडे मज नेईं ॥४॥
कामिक जाणोनि चढली डोई । मग म्हणे चालों न शकें भुई । मना मानेल तेथें नेईं । खांदां घेईं प्रियमानें ॥३०५॥
तंव तो असंग आत्माराम । अखंड अजस्र पूर्णकाम । जाणोनि वनितास्मयसंभ्रम । पावे उपरम तें ऐका ॥६॥
एवमुक्तः प्रियामाह स्कंध आरुह्यतामिति । ततश्चांतर्दधे कृष्णः सा वधूरन्वतप्यत ॥३९॥
प्रमादप्रणीत प्रमदावाणी बोलोनि बोधिला चक्रपाणी । मग तो प्रियतम प्रेमवचनीं । स्कंधारोहणीं प्रवर्तवी ॥७॥
देखोनि वशवर्ती वनमाळी । खांदीं घ्यावया बैसला तळीं । मग ते सगर्वा वेल्हाळी । पदाब्जं उचली आरोहण ॥८॥
मौळ कवळूनि दोहीं करीं । बैसों जातां स्कंधावरी । तंव अंतर्धाम पावे हरि । राहे सुंदरी चवकली ॥९॥
दाही दिशा निरखी डोळां । कोठें न देखे गोपाळा । म्हणे म्यां परम अपराध केला । हरि हरविला हातींचा ॥३१०॥
जाणोनि वशवतीं श्रीकृष्ण । करूं इच्छीं स्कंधारोहण । विनयभावें न भजे चरण । ऐसी अज्ञान निर्दैवें ॥११॥
हातींचा हारविला चिंतामणि । गर्वा चढोनि पडलें वनीं । आतां माझा अपराध न गणीं । कृपें विरहिणी वांचवीं ॥१२॥
तुझिया अधरामृताची रुचि । निधानलक्ष्मी लावण्याची । दुर्लभ जाणोनि कमला शोची । गर्वें हातींची ते गेली ॥१३॥
ऐसा पावूनियां अनुताप । आंगीं प्रज्वळला कंदर्प । आथवूनि मन्मथबाप । करी विलाप तें ऐका ॥१४॥
हा नाथ रमण प्रेष्ठ क्कासि महाभुज । दास्यास्ते कृपणाया मे सखे दर्शय सन्निधिम् ॥४०॥
लावण्यगुणा भुलला कृष्ण । वाढला होता जो अभिमान । कृष्णें पावोन अंतर्धान । केलें निरसन तयाचें ॥३१५॥
अखंड असंग निजात्मरत । ललनालाघवीं अनावृत । कामिनीकामीं अनासक्त । नित्य निर्मुक्त श्रीकृष्ण ॥१६॥
शशांक बिंबला दिसतां जळीं । धीवरा नाकर्षवे तो जाळीं । तैसा नाकळवे वनमाळी । कंदर्पकेलि कुलटांतें ॥१७॥
अनासक्तता प्रकटूनि ऐसी । गुप्त होतांचि श्रीकृष्णासी । कामिनी स्फुंदे उकसाबुकसीं । दीर्घस्वरेंशीं आक्रंदे ॥१८॥
हाहाकारें आक्रंदोनी । दीर्घविलापें करी ग्लानि । अश्रुधारा स्रवती नयनीं । मनीं स्मरोनि हरिचरिता ॥१९॥
कोठें आहेसी प्राणनाथा । प्राणवल्लभा देईं सुरता । मजला सांडूनि न वचे परता । मम दुश्चरिता नाठवीं ॥३२०॥
माझिया परमप्रियतम इष्टा । तव वियोगें पावलें कष्टा । तुज म्यां नेणोनि स्वसंतुष्टा । केल्याचेष्टा त्या विसरें ॥२१॥
सरल सुपीन सलंब भुज । प्रेमालिंगनीं आनंदभोज । अधर चुंबूनी मकरध्वज । हृदयकंज प्रकाशीं ॥२२॥
पाहातां तुझिया आननचंद्रा । स्वानंदभरितें स्मरसमुद्रा । विकसित होय मानसमुद्रा । सौभाग्यभद्रा सम लाभें ॥२३॥
तुजवीण दीना मी तव दासी । कोठें सांडून मज गेलासी । एकली विलापें मी वनवासी । सन्निधानासि मज देईं ॥२४॥
दावीं आपुलें सन्निधान । माझें नाठवीं गर्हिताचरण । करूं इच्छिलें स्कंधारोहण । तें उद्धरपण विसरिजे ॥३२५॥
केशीं झाडीन मी तव चरण । बाहीं देईन आलिंगन । अधरामृताचें देऊन पान । वांचवीं प्राण जाताती ॥२६॥
ऐसें विलाप नानापरी करूनि रुदतां दीर्घस्वरीं । तंव पातल्या सख्या येरी । वनीं श्रीहरि गिंवसितिया ॥२७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 04, 2017
TOP