अध्याय ३० वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


न लक्ष्यंते पदान्यत्र तस्या नूनं तृणांकुरैः । खिद्यत्सुजातांघ्रितलामुन्निन्ये प्रेयसी प्रियः ॥३१॥

ऐशीं कृष्णपदें केवळ । गोपी हुडकिती विरहाकुळ । तंव ध्वजांकुशादि वज्रमेळ । चिह्नित कोमळ हरिचरण ॥२७॥
प्रमदाचरणचिह्नांरहित । श्रीकृष्णाचीं पदें व्यक्त । देखोनि गोपी हृदयाआंत । वितर्क करिती तें ऐका ॥२८॥
अहो या कृष्णाचीं पाउलें । ध्वजांकुशीं उपलक्षिलें । प्रमदापदारहित भलें । भाग्यें जोडलें वंदूं या ॥२९॥
तंव एकी म्हणती ते काय झाली । जे कृष्णाचा अधर प्याली । वनीं असती जरी ठाकली । तरी आम्हां भेटली न वचती ॥२३०॥
तीचीं सुकुमार चरणकमळें । तृणांकुरीं सखेदबहळें । जाणोनि कारुण्यें गोपाळें । स्कंधदेशीं ते धरिली ॥३१॥
झणें तिचिया चरणारविंदा । तीक्ष्ण तृणांकुर करिती भेदा । म्हणोनि खांदा वाहिली प्रमदा । परम मुकुंदा प्रियतम जे ॥३२॥
ऐसा ललनेचा लंपट । करूनि सर्वांसि दृष्टिकपट । जिणें भुलविला पीतापट । पाडूनि विपट आम्हांशीं ॥३३॥
कडे खांदा वाहे मुग्धा । तेचि प्रियतम गोविंदा । वृथा अवघ्या आम्ही प्रमदा । विरहखेदा वरपडलों ॥३४॥

इमान्यधिकमग्नानि पदानि वहतो वधूम् । गोप्यः पश्यत कृष्णस्य भाराक्रांतस्य कामिनः ॥३२॥

एक म्हणती खरें गे खरें । पदें कृष्णाचीं परम सुभरें । खांदां वाहिली तिचेनि भारें । भूमी निष्ठुरें रुतलीं गे ॥२३५॥
कामासक्त पहा गे हरि । कडे घेऊनि प्रियसुंदरी । चाले त्याच्या पाउलांवरी । आम्हीं निर्धारीं तर्किलें ॥३६॥

अत्रावरोपिता कांता पुष्पहेतोर्महात्मना । अत्र प्रसूनावचयः प्रियार्थे प्रेयसाः कृतः ।
प्रपदाक्रमणें एते पश्यताऽसकले पदे ॥३३॥

तंव एकी म्हणती पहा गे येथें । देखोनि सुपुष्पिता वल्लीतें । पुष्पासाठीं वल्लभेतें । भूमीवरतें उतरिलें ॥३७॥
आत्मा म्हणिजे ज्याचा काय । विराटरूपी ब्रह्मांडमय । ऐसे ब्रह्मांदसमुच्चय । परमाणुप्राय रोमकूपीं ॥३८॥
कीं मानवी नाट्यें नंदसूनु । जो गोपाकृति गोमटी तनु । तेही वंदिती ब्रह्मेशानु । आत्मा महान् यास्तव ही ॥३९॥
अथवा आत्मा म्हणिजे मन । सत्यसंकल्पा अधिष्ठान । प्रकृतिपुरुषां जन्मस्थान । तो श्रीभगवान महात्मा ॥२४०॥
प्रणवबीजाचे अंकुर । जेथें विरढोनि उपसंहार । पावन असतांही निर्विकार । तो हा श्रीधरा महात्मा ॥४१॥
येवढें महत्त्व विसरोनि येणें । कान्तेअधीन कां वो होणें । तिचें मानस संरक्षणें । छंदें वर्तणें तयेच्या ॥४२॥
लता देखोन बहळपुष्पा । सुमनीं भरावया सुंदर खोपा । झोंबतां वल्लरी कां पादपां । नाहीं त्रपा या आली ॥४३॥
स्त्रियेचें प्रेम रक्षावया । येथ वेंचिलें कुसुमनिचया । भूमीं प्रपद रोवूनियां । पुष्पफांदिया वोढिल्या ॥४४॥
पहा गे येथ चवड्यावरी । टांचा न लवितां धरित्रीवरी । उभा ठाकूनि श्रीमुरारि । झोंबे तरुवरीं सुमनार्थ ॥२४५॥
श्रमूनि प्रसूनें वेंचिलीं । तिहीं प्रियेची वोटी भरिली । आंगीं झाडें वोरबडलीं । तत्प्रेमभुली तें न गणी ॥४६॥
कमलकोमलपाणिकमळें । तळवा मर्दितां शंका कमळे । कुंकुमाक्तें कुचकड्मलें । परममृदुलें मर्दितसे ॥४७॥
ज्याची कोमळ अंगयष्टि । निबर न्यहारें रुपती दृष्टि । तो येथ ललनालंपट कष्टी । झोंबे काष्ठीं सुमनार्थ ॥४८॥
नेणें पीतांबर फाटला । न म्हणे कंठींचा कौस्तुभ तुटला । चरणींण कंटकही नेहटला । प्रेमें भुलला न विचारी ॥४९॥
धन्य धन्य ते सुंदरी । जिणें प्रेमें भुलविला हरि । आम्ही वृथा विरहातुरी । भ्रमों कांतारीं निशिगर्भीं ॥२५०॥
ऐशा वदती विरहाकुला । पुढें कांतारीं रिघती अबला । तंव कांहीं कौतुक देखोनि डोळां । मिनल्या सकळा ते ठायीं ॥५१॥

केशप्रसाधनं त्वत्र कामिन्याः कामिना कृतम् । तानि चूडयता कांतामुपविष्टमिह ध्रुवम् ॥३४॥

उभयभागीं कृष्णपदें । सामुद्रिकें मंडित विशदें । प्रमदापाउलें तयांमध्यें । जोडली दिसती भूभागीं ॥५२॥
तियें दावूनि परस्परीं । एकीमेकींतें म्हणती नारी । पहा गे येथें बैसोनि हरि । माथा विंचरी प्रियेचा ॥५३॥
जानूंमध्यें आपणा पुढां । तिसी बैसवूनि सकाम भिडा । कुरळ केशांचा उकली बुचडा । केला वेडा कंदर्पें ॥५४॥
तिचे विंचरोनियां केश । सुगंध सुमनांचे विशेष । गुंफूनियां वेणीकेश । खोपा विशेष शोभविला ॥२५५॥
श्वेतारक्तगुच्छहारी । भांगीं माणिक्यमुक्तांपरी । कर्णप्रदेशीं कर्णिकारीं । केतकीपत्रीं द्विभाग ॥५६॥
कुंद मोगरे चंद्रकांति । चामीकराभ पंकजद्युति । यूथिका अतपत्री मालती । खोपा निगुती रचिला गे ॥५७॥
कामलंपटें श्रीकृष्णानें । येथ बैसोनि वानरासनें । कामिनीकेशप्रसाधनें । अढळ निजमनें जाणा गे ॥५८॥
ऐसी कामुकविडंबना । स्वयें अनुकरे त्रैलोक्यराणा । गोपीविरहोक्तिव्याख्याना । मिसें तत्कथना त्या केलें ॥५९॥

श्रीशुक उवाच :- रेमे तया चात्मरत आत्मारामोऽप्यखंडितः ।
कामिनां दर्शयन्दैन्यं स्त्रीणां चैव दुरात्मताम् ॥३५॥

शुक म्हणे गा महाराजा । कुरुकुळकोटीरललामतेजा । श्रवणप्रेमें गरुडध्वजा । हृदयांभोजा रंगविलें ॥२६०॥
सूर्य जैसा स्वप्रकाश । मिडगणप्रभेची न पाहे वास । तेंवि आत्माराम हृषीकेश । स्वसंतुष्ट । आत्मरत ॥६१॥
सूर्यप्रकाशीं मिडगणादिकां । तेंवि सौख्या विषयात्मका । ज्याचेनि आस्तिक्यें आवांका । विषयकामुकां भुलवावया ॥६२॥
विषयसुखाचा आभासमात्र । देखोनि दुःखाचें होती पात्र । तैसा नोहे जो स्वतंत्र । अखंड अजस्र सुखधाम ॥६३॥
तोही स्त्रैण कामुकांची । कुटिलाकारता जे मनाची । ते दैन्यावस्था क्रीडोनि साची । करूनि दावी कामुकां ॥६४॥
आणि स्त्रियाही ज्या जारिणी । केवळ कुतर्कांचिया खाणी । त्यांचें दैन्य चक्रपाणि । लीलाचरणीं प्रकटीतसे ॥२६५॥
येर्‍हवीं तयांची रूपवयसा । नेत्रकटाक्षभ्रामकदशा । भुलवूं न शके श्रीपरेशा । नात्यासरिसा क्रीडे तो ॥६६॥
आतां स्त्रियांचें दुरात्मकत्व । कामासक्ति मोहकत्व । पुरुषा भुलवूनि दास्यत्व । वरिष्ठत्वें करविती ॥६७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP