अध्याय ३० वा - श्लोक ६ ते १०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


कचित्कुरबकाशोकनागपुन्नागचंपकाः । रामोनुजो मानिनीनां गतो दर्पहरस्मितः ॥६॥

आपुल्या कुसुमामोददानें । श्रांतां विश्रांति अर्पणें । महानुभावांचीं आचरणें । उदारपणें वागविती ॥५९॥
म्हणोनि तरुवरां पुण्यशीलां । कृष्णपदवी पुसती अबळा । चंपकादि वृक्षमेळा । संबोधिती पृथक्त्वें ॥६०॥
श्वेतरक्तपीतादिक । चतुर्विधकुसुमांचे कुरबक । श्वेत रक्त द्विविधाशोक । आणि चंपक कनकाभ ॥६१॥
नाग पुन्नाग पाटळ । इत्यादि पुष्पतरूंचा मेळ । त्यांसि पुसती उताविळ । तुम्हीं गोपाळ देखिला हो ॥६२॥
बळरामाचा अनुज हरि । स्मितईक्षणें ललनान्तरीं । रिघोनि सदर्प मानस हरि । तो कांतारीं देखिला ॥६३॥
तुम्ही सदय परोपकारी । उदार सत्पुरुषाचे परी । त्याविण आम्ही दुःखिता नारी । वार्ता तर्‍ही वदा त्याची ॥६४॥
ऐशा पुसोनि तरुवरांसी । पुढें शोधितां श्रीकृष्णासी । तंव ते वनीं कल्याणराशि । देखिली तुळसी हरिप्रिया ॥६५॥

कच्चित्तुलसि कल्याणि गोविंदचरणप्रिये । सह त्वाऽलिकुलैर्बिभ्रद्दृष्टस्तेऽतिप्रियोऽच्युतः ॥७॥

गोपी म्हणती अवो तुळसी । गोविंदाच्या श्रीचरणासीं । परम प्रियतम सुकृतराशी । तुज अहर्निशी न विसंबे ॥६६॥
वनमाळांसह वैजयंती । हृत्पद्मस्था पद्मा सती । त्याहूनि विशेष तुजवरी प्रीति । तुज एकांतीं न विसंबे ॥६७॥
तूतें प्रियतम श्रीअच्युत । अळिकुळमाळाअभिवेष्टित । पावन सुरभि गंधासक्त । धरितो अभिरत होत्साता ॥६८॥
त्या कृष्णाची सांगें शुद्धि । आमुची हरूनि मानसबुद्धि । देखिला असेल काननसंधीं । तरी दावीं त्रिशुद्धी तो आम्हां ॥६९॥

मालत्यदर्शि वः कच्चिन्मल्लिके जाति यूथिके । प्रीतिं वो जनयन्यातः करस्पर्शेन माधवः ॥८॥

नम्रा गुणाढ्या ज्या युवति । नंदनंदन त्यां वशवर्ती । गुणसंपन्ना मालती जाति । देखोनि पुसती गोपिका ॥७०॥
गुणसंपन्ना सुगंधगुणी । नम्रा तनुलाघवें करूनी । यालागीं यांही चक्रपाणि । असेल नयनीं देखिला ॥७१॥
मालती जाती नामीं दोहीं । वल्ली गुल्म भेद पाहीं । भाषा नामें बोलिजे जाई । त्यांसै लवलाहीं हरि पुसती ॥७२॥
मल्लिका आणि जे यूथिका । आबई जुई नामात्मका । त्यांतें पुसती व्रजनायका । असे ठावुका तरी सांगा ॥७३॥
तुम्हां स्पर्शोनि शंतम करी । प्रीति प्रकटोनि अंतरीं । जातां देखिला असेल हरि । तरी झडकरी सांगा हो ॥७४॥
दीन दयाळ फलाढ्य तरु । सर्वप्राणितर्पणपर । ज्यांचा सर्वांतरी उपकार । म्हणोनि श्रीधर यां विदित ॥७५॥

चूतप्रियालपनसासनकोविदारजंब्वर्कबिल्वबकुलाम्रकदंबनीपाः ।
येऽन्ये परार्थभवका यमुनोपकूलाः शंसंतु कृष्णपदवीं रहितात्मनां नः ॥९॥

चूत आम्र दोन्ही जाति । काळवैशिष्ट्यें बोलिजती । एक हेमंतीं मुहुरती । आम्र शिशिरीं सर्वत्र ॥७६॥
चूताम्राचे जातिभेद । तैसेचि कदंब नीप विशद । लंब वर्तुअळ पर्णी बोध । रक्तश्वेतप्रभेदीं ॥७७॥
अहो आम्र अहो चूत । अहो कदंब नीप समस्त । अहो बकुल पारियात । अहो श्लेष्मांत कोविदार ॥७८॥
जंबू बिल्वादि आमलकी । चारी बोरी भल्लातकी । ताल तमाल केतकी । हरितकी खर्चूरी ॥७९॥
करंज कुटज असन पनस । तिंतिणी गोस्तनी पलाश । पिचुमंदादि चंदनास । पुसती परेश व्रजललना ॥८०॥
कारी कर्वंदी कर्मठी । अंजन धामोडे धायटी । शाल्मली आरग्वध मर्कटी । राजादना पुसताती ॥८१॥
जितुके यमुनेसमीप द्रुम । जैसे दयाळ मुनिसत्तम । परोपकारार्थ ज्यांचे जन्म । वर्णाश्रम तीर्थाश्रित ॥८२॥
पत्रें पुष्पें फळें मूळें । काष्ठ त्वचा अग्र कोवळें । न वंचिती कोण्ह्या काळें । छाये शीतळे निवविती ॥८३॥
वृष्टि आतप वात शीत । सर्व साहती जेंवि व्रतस्थ । ऐसे जे परोपकारार्थ । जन्म धरूनि राहिले ॥८४॥
परदुःख हरूनि सुखी करिती । म्हणोनि गोपिका त्यांतें पुसती । विरहतप्ता आम्ही युवति । कोण्ही श्रीपती सांगो कां ॥८५॥
कृष्णें मानस हिरोनि नेलें । हृदयशून्य आम्हांसि केलें । कोण्ही असेल त्या देखिलें । तरी सवेग कथिलें पाहिजे ॥८६॥
दुःख हिरोनि सुखी करणें । कैवल्य साधे या साधनें । यालागिं कृष्णपदवीकथनें । आमुचे प्राणे न वचतां ॥८७॥
कृष्ण गेला कोणे वाटे । सूचिजे चालवूनि सूक्ष्म फाटे । तुम्ही सदय स्नेहाळ मोठे । तरी सांगा कोठें हरि गेला ॥८८॥
ऐशी द्रुमांतें करूनि ग्लानि । पुढें चालिल्या विरहिणी । तृणीं टवटवीत देखोनि धरणी । तयेलागूनि प्रशंसिती ॥८९॥

किं ते कृतं क्षिति तपो बत केशवांघ्रिस्पर्शोत्सवोत्पुलकितांगरुहैर्विभासि ।
अप्यंघ्रिसंभव उरुक्रमविक्रमाद्वा आहो वराहवपुषः परिरम्भणेन ॥१०॥

अवो धरित्री सांगें गुज । कोण तपश्चर्या घडली तुज । जेणें कृष्णाचे पदरज । तुजला सहज लाभले ॥९०॥
तेणें केशवांघ्रिस्पर्शें । तूं मिरवसी हर्षोत्कर्षें । रोमांचिता तृणविशेषें । परमोल्हासें मंडित ॥९१॥
उत्कट तपांचें ऐसें फळ । श्रीकृष्णाचें चरणकमळ । स्पर्शोत्साहें आनंदबहळ । तूं निर्मळ भाससी ॥९२॥
अहो हा उत्साह येचि काळीं । वृंदावनीं श्रीवनमाळी । क्रीडतां स्पर्शोनि श्रीचरणकमळीं । तुज वेल्हाळी जोडला ॥९३॥
तूं विस्तीर्ण वसुंधरा । वृंदावनादि वनसंचारा । क्रीडतां एकदेशी या श्रीधरा । पदाधिकारा लाधलीसी ॥९४॥
तया पुण्याचें हें फळ । भोगिसी स्पर्शानंदबहळ । किंवा निखिल ब्रह्मांडगोळ । त्रिविक्रमें आक्रमिता ॥९५॥
तैं साकल्यें सन्निधान । स्पर्शले सर्वांगीं श्रीचरण । तेणें उत्साहयुक्त पूर्ण । प्रेमरोमांच वाहसी ॥९६॥
अथवा त्याहूनि पूर्वीं सुभगें । आलिंगितां वराहभोगें । कृपेनें स्पर्शिलीं सर्वांगें । अद्यापि तद्योगें सोत्साह ॥९७॥
एवं तुझिया तपोराशि । अमोघ अक्षय निश्चयेंशीं । प्रत्यवतारीं हरिचरणांसी । तूं भोगिसी सौभाग्यें ॥९८॥
आम्ही अल्पका मंदभाग्या । चरणस्पर्शासि अयोग्या । सप्रेम श्रीकृष्णासी भोग्या । मां कैसेनि अभाग्या हों शकों ॥९९॥
म्हणोनि सुभगे धरादेवी । सांगोनि श्रीकृष्णाची पदवी । निजात्मवल्लभ हरि भेटवीं । स्वसुखीं निववीं संतप्तां ॥१००॥
परोपकाराएवढें पुण्य । त्रिजगीं दुसरें नाहीं ज्राण । म्हणोनि श्रीकृष्णाचे चरण । दावूनि उपकार तूं घेईं ॥१॥
ऐशा पुसोनि धरणीप्रति । वनीं विरहिणी हरि शोधिती । तंव हरिणींची देखोनि पंक्ति । त्यांतें पुसती तें ऐका ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP