अध्याय ३० वा - श्लोक ११ ते १५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
अप्येणपत्न्युपगतः प्रिययेह गात्रैस्तन्वन्दृशां सखि सुनिर्वृतिमच्युतो वः ।
कांतांगसंगकुचकुंकुमरिजितायाः कुंदस्रजः कुलपतेरिह वाति गंधः ॥११॥
अहो ऐका कुरंगिणी । तुम्ही सभाग्या कुरंगपत्नी । तुम्हांसमीप सहकामिनी । कृष्ण येऊनि गेला कीं ॥३॥
तुम्हांसि जालें हरिदर्शन । आम्हीं वोळखिलें तुमचें चिह्न । जें पूर्णानंदनिर्भर मन । दिसती नयन संतुष्ट ॥४॥
तें हरिदर्शन म्हणाल कैसें । सुंदरीच्या रतिविलासें । ज्याचें सर्वांग चिह्नित दिसे । शोभाविशेषमंडित ॥१०५॥
शामतमाललावण्यरसिक । आजानुबाहु मुख शशांक । हृदयीं वधूकुचकुंकुमांक । कज्जलांक गंडयुगीं ॥६॥
विरंग अधर वधूनिपीत । परिवेष्टित कटिपट पीत । मदनमोहन मंदस्मित । ललनाभुक्त शुभस्रग्वी ॥७॥
ज्याचे कंठींचे कुंदमाळे । कांताअंगसंगाचे वेळे । मिळतां उभय वक्षःस्थळें । कुंकुम लागलें कुचांचें ॥८॥
तेणें रंगली लोहीव वर्ण । सकेशरा सुगंध पूर्ण । घ्राणा होतसे अवघ्राण । कीं समीप कृष्ण गमतसे ॥९॥
शास्त्रवक्ता सर्वज्ञ मूर्ति । नामें बोलिजे तो कुळपति । कामशास्त्राचे व्युत्पत्ति । गोपी म्हणती कृष्णातें ॥११०॥
एवं कृष्णाचिये गळां । कुचकुंकुमाक्त कुंदमाळा । भावूनि तयेचिया परिमळा । पुसती अबळा हरिणींतें ॥११॥
कुरंगिणी हो तुमच्या नेत्रां । मदनमोहना स्वकीयगात्रा । दावूनि केलें आनंदपात्रा । तुमची तनुयात्रा धन्यतम ॥१२॥
कुरंगनयना कुरंगींप्रति । ऐशा पुसोनि पुढें जाती । फळल्या फळपुष्पीं द्रुमयाति । वितर्क करिती त्यां पाहतां ॥१३॥
बाहुं प्रियांस उपधाय गृहीतपद्मो रामानुजस्तुलसिकालिकुलैर्मदांधैः ।
अन्वीयमान इह वस्तरवः प्रणामं किं वाऽभिनंदति चरन्प्रणयावलोकैः ॥१२॥
सफळ तरु हो सभाग्य तुम्ही । वनीं देखोनि आमुचा स्वामी । विनीत त्याचिये पादपद्मीं । अर्चाधर्मीं अनुसरला ॥१४॥
श्रेष्ठ आलिया सदनाप्रति । गृहस्थ पूजिती यथासंपत्ति । कीं उपायनें घेऊनि हातीं । नृपा वंदिती जेंवि प्रजा ॥११५॥
तेंवि आपुल्या पुष्पीं फळीं । समीप येतांचि श्रीवनमाळी । पूजा अर्पिली चरणकमळीं । सुकृतबहळीं सज्जन हो ॥१६॥
तो बळरामाचा धाकुटा बंधु । मदनमोहन लावण्यसिंधु । रतिरहस्यें लावूनि वेधू । गेला व्रजवधू वधूनिया ॥१७॥
वधिल्या बरवें एक्या घायीं । आम्हां न वधूनि वधिलें पाहीं । प्राण असतांही विह्वळ देहीं । हरिली सर्वही मनबुद्धि ॥१८॥
बाहु ठेवूनि वनितास्कंधीं । पद्मधारक कौशल्योदधि । मधुप वेधले तुळसीगंधीं । तिहीं मदांधीं अनुयायी ॥१९॥
सुगंधतुळसीमाळा गळां । गंधासक्त भ्रमरमेळा । तयां मदांधां अळिउळां । समान काळा अनुयायी ॥१२०॥
तुळसीगंधासक्त भ्रमर । जैसे मदांध विवशतर । कामिनीकंठीं घालूनि कर । उभय परतंत्र अनुगामी ॥२१॥
मधुपां अनुलक्ष्यें मधुपति । उभयतां समानशील पथीं । येतां देखोनि विनयभक्ति । तुम्ही श्रीपति पूजिला ॥२२॥
पुष्पफळोत्करेंशीं मौळी । तुम्ही ठेवितां चरणकमळीं । कृष्णकृपेच्या न्याहाळीं । सुखसुकाळीं डुल्लतसां ॥२३॥
ऐसा वनितास्कंधासक्त । पद्मधारक श्रीअच्युत । द्रुम हो सांगा कोठें स्थित । देह संतप्त त्यासाठीं ॥२४॥
ऐशा प्रार्थूनि वृक्षांप्रति । कृष्णपदवी अनुलक्षिती । तंव लतावेष्टित वनस्पति । देखोनि बोलती तें ऐका ॥१२५॥
पृच्छतेमा लता बाहूनप्यालिष्टा वनस्पतेः । नूनं तत्करजस्पृष्टा विभ्रत्युत्पलकान्यहो ॥१३॥
तंव कोणी एका बल्लवी म्हणती । ऐका सखिया हो समस्ती । सन्मुख लता ज्या या दिसती । श्रीकृष्णसंगति यां घडली ॥२६॥
बहुतेक कृष्ण स्पर्शला यांसी । म्हणोनि सानंदा मानसीं । यास्तव कृष्ण यांजपाशीं । निश्चयेंशीं हुडकावा ॥२७॥
आम्हीं दुर्भगा विरहाकुळा । लता सौभाग्यसुकृतबहळा । कांतसंगतिसुखसोहळा । प्रेमें गोपाळा भोगिती ॥२८॥
पति सन्निध असतां आम्हां । पाहणें दुर्घट मेघश्यामा । द्रुमालिंगनीं लतांचा प्रेमा । हरिसंगमा अनुकूल ॥२९॥
पति लतांचे तरुवर । त्यांचे बाहु शाखाभार । त्यांसि वेष्टूनि लतांकुर । प्रेमें श्रीधर कवळिती ॥१३०॥
कृष्णा क्षेम देती लता । तेणें डोलती उभयता । क्षोभ नुपजे पतींच्या चित्ता । सभग्यता हे यांची ॥३१॥
म्हणाल कृष्ण यां भेटला । केंवि तुम्हांसि जाणूं आला । जिहीं चिन्हीं वोळखिला । त्या चिह्नांला परियेसा ॥३२॥
कृष्णनखें आमुचे कुच । स्पर्शतां जेंवि येती रोमांच । तेंवि उत्पुलकिता लतां सत्वच । दिसती साच सानुरागा ॥३३॥
आपुलाल्या पतिसन्निधि । दुर्लभ क्रीडतां हे सुखवृद्धि । यालागिं श्रीकृष्ण अमृतोदधि । यांहीं त्रिशुद्धि भोगिला ॥३४॥
अहो ऐसा करूनि खेद । म्हणती केवढे भाग्य मंद । कृष्णीं रमतां न वटे मोद । द्रुमांसमान पशुपांसी ॥१३५॥
शुक म्हणे गा परीक्षिति । कथिली गोपींची उन्मत्तवृत्ति । आतां वस्तुसामर्थ्यशक्ति । तनुविस्मृति तादात्म्यें ॥३६॥
आंगींची विसरल्या कामिनीपणें । कृष्णस्मृतीचें लेइल्या लेणें । कृष्णाविर्भावें बोलणें । कृष्णाचरणें अवधारा ॥३७॥
इत्युन्मत्तवचो गोप्यः कृष्णान्वेषणकातराः । लीलाभगवतस्तास्ता ह्यनुचक्रुऽस्तदात्मिकाः ॥१४॥
कृष्णान्वेषणाचे चाडे । सप्रेमवेधें मानस वेडें । होऊनि उन्मत्तापडिपाडें । पुसती पुढें भेटलिया ॥३८॥
वृक्षवल्ली लता द्रुमा । पुष्पपादपा गुल्मा रामा । मृगमानिनी वल्लरीयुग्मा । मेघश्यामा त्या पुसती ॥३९॥
एवं उन्मत्ताचिये परी । स्थिरजंगमां पुसतीं हरि । तादात्म्यवेधाचिये भरीं । कृष्णानुकारीं बरळती ॥१४०॥
जन्मादारभ्य ज्या ज्या लीला । कृष्ण होऊनि त्या त्या सकळा । स्वयें अनुकरती वेल्हाळा । त्या तूं नृपाळा अवधारीं ॥४१॥
चौं श्लोकीं तें अनुकरण । कीजेल शुकोक्तिविवरण । पुढें चौं श्लोकीं व्याख्यान । कथिजेल पूर्ण तन्मयता ॥४२॥
पुढती अनुकारचेष्टाकथन । एका श्लोकें अनुकरून । पुढें भूमीं उमटले चरण । बरळती लक्षून व्रजललना ॥४३॥
कस्याश्चित्पूतनायंत्याः कृष्णायंत्यपिबत्स्तनम् । तोकायित्वा रुदत्यन्या पदाऽहन् शकटीतयाम् ॥१५॥
असो त्यांमाजि अनुकार आतां । प्रथम परिसें धरित्रीकांता । पूतनारूपें बल्लववनिता । कोण्ही एकी अवगल्या ॥४४॥
कृष्णरूपें अवगल्या एकी । मौनें निद्रिस्ता मंचकीं । पूतनारूपिणी येऊनि तवकीं । उचलूनि चूचुकीं लाविती ॥१४५॥
प्राणासकट प्याला स्तन । म्हणूनि अनुकरती क्रंदून । पसरूनिया करपदवदन । गतप्राण म्हणविती ॥४६॥
एकी बाळकरूपें रुदना । करूनि झाडिती कोमळ चरणां । एकीं शकटाकार पतना । तन्निघातें पावती ॥४७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 03, 2017
TOP