अध्याय २३ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीभगवान् उवाच - पतयोःनाभ्यसूयेरन्पितृभ्रातृसुतादयः ।
लोकाश्च वो मयोपेता देवा अप्यनुमन्वते ॥३१॥
भर्तारादि स्वजन वर्ग । म्हणाल आमुचा करिती त्याग । विधिलंघनें यज्ञभंग । म्हणाल स्वर्ग अंतरला ॥२९॥
लोकीं झालों म्हणाल निंद्य । मत्पादप्रेम मानाल हृद्य । हें अनिष्ट इष्टत्वें फळेल सद्य । मी गोविंद तुष्टल्या ॥३३०॥
सर्वांमाजीं मी वसें आत्मा । पदार्थमात्रीं तद्गतप्रेमा । यालागीं न निंदिती कांत तुम्हां । या निजवर्मा जाणावें ॥३१॥
पतिप्रेमा तुमच्या ठायीं । असतां सुहृद आप्त ते कायी । माता पिता बंधु तेही । पूर्ण स्नेहें वोळगती ॥३२॥
तेव्हां इहलोकींच्या सुसंपत्ति । पूर्विल्याहूनि पूर्णस्थिति । कोटिगुणें सुखावाप्ति । तुम्हांसि करिती मद्वरें ॥३३॥
यज्ञरूप जो मी हरि । त्या मज भजलां परमादरीं । यज्ञसांगता सर्वीं शिरीं । तुम्हीं निर्धारीं साधिली ॥३४॥
माझे गोपाळ आघवे । देवसमूह हे जाणावे । माझे आज्ञेच्या लाघवें । तुमच्या दैवें पातले ॥३३५॥
इहीं याचितां तुम्हांसि अन्नें । तुम्हीं केलीं कृष्णार्पणें । यालागीं देवही प्रसन्नपणें । तुमच्या यज्ञें तुष्टती ॥३६॥
यज्ञसिद्धीचें विहित फळ । ते ते भोगाल लोक अमळ । मीं तुष्टल्या श्रीगोपाळ । सर्व अनुकूळ सर्वदा ॥३७॥
दासी होऊनि चरणपद्मीं । प्रेमा वांछिला जो कां तुम्हीं । त्याचें रहस्य हृदयपद्मीं । सांगेन जें मी तें ठेवा ॥३८॥
न प्रीतयेऽनुरागाय ह्यंगसंगो नृणामिह । तन्मनो मयि युंजाना अचिरान्मामवाप्स्यथ ॥३२॥
मत्स्या न टाकवे जीवन । तैसें टाकूं न शकां चरण । मद्वियोगें जाती प्राण । म्हणोनि ग्लानि जरि मानां ॥३९॥
तरी हा भौतिक अंगसंग । न लवी निरुपाधि अनुराग । म्हणाल सोपाधि तर्ही चांग । विषयसंग घडेल ॥३४०॥
तरी मनाची असतां अनावडी । देहसंगीं कैंची गोडी । मन भांबावे विषयवोढी । स्वसुख मोडी स्वतःसिद्ध ॥४१॥
असतां निदसुरी कामिनी । भर्तार आला प्रवासींहूनी । अंगसंगें गजबजूनी । शंखध्वनी करीत उठे ॥४२॥
जार तस्कर झोंबला म्हणे । इच्छी सक्रोधें धांवणें । तोचि ओळखिल्या निजमनें । कवळी मौनें निजशेजे ॥४३॥
किंवा असतां देशांतरीं । मानसप्रेमें अभ्यंतरीं । आळंगिती परस्परीं । स्वप्नामाझारीं कीं नाहो ॥४४॥
तैसाचि मातापुत्रांच्या ठायीं । मानसप्रेमाचि मुख्य पाहीं । मनावेगळा देहोदहीं । झगडतां नाहीं सुखलाभ ॥३४५॥
मनुष्यासी जीवलोकीं । सर्व मनाची वोळखी । मनचि हेतु सुखीं दुःखीं । गोष्टी ठाउकी असूं द्या ॥४६॥
याकारणें यज्वसती । माझ्या ठायीं निजविश्रांति । मनेंचि भोगितां अहोरात्री । सद्यः मत्प्राप्ति पावाल ॥४७॥
करूनि देहाचें सन्निधान । तुझ्या ठायीं योजूं मन । म्हणाल तरी हें न घडे वचन । ऐका विवरूनि सांगतों ॥४८॥
श्रवणाद्दर्शनाद्ध्यानान् मयि भावोऽनुकीर्तनात् । न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान् ॥३३॥
ऐकोनि स्वर्गींचें विचित्र सुख । करिती मोदादीं शतमख । सन्निध हृदयींचें चित्सुख । सांडिती मूर्ख सलगीनें ॥४९॥
नित्य सूर्याचें दर्शन । तेथ सादर न होती नयन । दुर्लभ राहूचें म्हणून । पाहती ग्रहण सप्रेम ॥३५०॥
गृहीं असतां अंगनारत्न । परवनितेचें करिती ध्यान । ऐकोनि त्रिवेणीमहिमान । तनु संपूर्ण कर्वतिती ॥५१॥
यालागीं श्रवणीं दर्शनीं ध्यानीं । प्रेमा वाढे अनुकीर्तनीं । तैसा प्रेमा सन्निधानीं । सहसा मनीं न राहे ॥५२॥
मलयाचळींच्या किरातजननी । चंदन कल्पिती पचनेन्धनीं । किंवा गंगाजीवन शौचाचरणीं । अपानशोधनीं तटस्थां ॥५३॥
म्हणोनि सती हो मद्गुणश्रवणें । रंगलां चिरकाल कीर्तनें । तेणें निवालां मद्दर्शनें । निष्कामपुण्यें मत्प्राप्ति ॥५४॥
आतां हेंचि ध्यानसुख । भोगावया भावपूर्वक । माझ्या ठायीं मनचि एक । तुम्ही निष्टंक ठेऊनी ॥३५५॥
सुखें जाइजे सदनाप्रति । विध्युक्त भजोनि आपुले पति । करितां यज्ञाची समाप्ति । मत्प्रेम चित्तीं असों द्या ॥५६॥
जैसें श्रवणें दर्शनें ध्यानें । प्रेम वाढे मत्कीर्तनें । ऐसें न वाटे सन्निधानें । ये निजखुणे जाणावें ॥५७॥
श्रीशुक उवाच - इत्युक्ता विप्रपत्न्यस्ता यज्ञवाटं पुनर्गताः ।
ते चानसूयवः स्वाभिः स्त्रीभिः सत्रमपारयन् ॥३४॥
शुक म्हणे गा परीक्षिति । ऐसें बोलोनि जगत्पति । धाडिता झाला गृहाप्रति । पावन युवति विप्रांच्या ॥५८॥
तिहीं हें ऐकोनि श्रीकृष्णवचन । परतोनि ठाकिलें यज्ञसदन । पाहतां निजपत्नींचें मन । आनंदोनि हरिखेले ॥५९॥
ते ते ब्राह्मण आपुलाल्या स्त्रिया । परम साध्वी जाणोनियां । तदवलंबें यज्ञकार्या । सांगतया संपविती ॥३६०॥
पूर्विलाहूनि कोटिगुणें । पतिस्नेहें परिलालनें । देखोनि ऋषिपत्न्यांचीं मनें । सुखसंपन्नें इहभोगीं ॥६१॥
आपुल्या ठायीं दोषदृष्टि । कांत कल्पान्तीं न धरिती पोटीं । अनसूयत्वें गृहरहाटी । ऐशी गोठी हरिवरें ॥६२॥
तत्रैका विधृता भर्त्रा भगवंतं यथाश्रुतम् । हृदोपगुह्य विजहौ देहं कर्मानुबंधनम् ॥३५॥
अपूर्व ऐकें गा भारता । एकी ब्राह्मणी वना जातां । जाऊं नेदी तिचा भर्ता । धरिली तत्त्वता सक्रोधें ॥६३॥
तुज म्यां गृहस्थाश्रमासाठीं । पड्विधकर्माची राहटी । चालवावया बांधिली गांठी । केंवि सैराटी धांवसी ॥६४॥
ऐकोनि सक्रोध पतीचें वचन । विशेष देहा निर्बंधन । भगवद्रूप होतें श्रवण । तैसें ध्यान चिंतिलें ॥३६५॥
ते ध्यानींची भगवन्मूर्ति । आलिंगूनि सप्रेम भक्ति । तनु वोपुनि कांताहातीं । निजविश्रांति पावली ॥६६॥
जेणें चाले कर्मसमूह । तो हा पांचभौतिक देह । घेईं म्हणोनि त्यजिला पहा हो । कृष्णीं स्नेह गोउनी ॥६७॥
मोहें ब्राह्मण चाकाटले । अंत्येष्टीतें प्रवर्तले । हें आश्चर्य नृपा कथिलें । पुढें वर्तलें कथीतसे ॥६८॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP