अध्याय २३ वा - श्लोक २१ ते २५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
यमुनोपवनेऽशोकनवपल्लवमंडिते । विचरंतं वृतं गोपैः साग्रजं ददृशुः स्त्रियः ॥२१॥
शांतियमुनेच्या उपवनीं । अशोकद्रुमांची दाटणीं । अकामअलोभ पुष्पीं पर्णीं । नानावृक्ष लगडले ॥१८॥
भूतदयेच्या रसाल वेली । विनयतेचि दाट साउली । संवादाच्या मंदानिलीं । सज्जन मौळि डोलविती ॥१९॥
सत्कीर्तीचा सुमनगंध । वनीं प्रवाहे जो अमंद । द्विरेफांचा कीर्तनानंद । ब्रह्मानंद मंदावी ॥२२०॥
नवपल्लवां डोलवी वारा । तेचि समता गमे चामरां । स्वानुभवाच्या सुखसंभारा । अच्युतमहुरा दाविती ॥२१॥
ध्यानस्थ कोकिला मौनव्रतीं । शब्द न करितीच हेमंतीं । कृष्णस्मरणें घुमघुमिती । पारापतें तन्निष्ठें ॥२२॥
ऐसिये स्वानंदभरीत वनीं । शांतियमुनेच्या उपपुलिनीं । साग्रज सगोप चक्रपाणि । देखती नयनीं मुनिवनिता ॥२३॥
वनीं विहरतां श्रीकृष्णातें । देखत्या झाल्या मुदितचित्तें । तथा लावण्यनटवेषातें । बोधी नृपातें शुकयोगी ॥२४॥
भवविभवातें घालूनि मागां । कृष्णदर्शनीं सानुरागा । आल्या तैशा त्या श्रीरंगा । देखत्या झाल्या मुनिपत्न्या ॥२२५॥
श्यामं हिरण्यपरिधिं वनमाल्यबर्हधातुप्रवालनटेवेषमनुव्रतांसे ।
विन्यस्तहस्तमितरेण धुनानमब्जं कर्णोत्पलालककपोलमुखाब्जहासम् ॥२२॥
कनकखेवणीं इंद्रनील । कीं चंपकप्रसूनीं अलिउळ । विद्युत्प्रभेमाजि सजल । मेघसुनीळ ज्यापरी ॥२६॥
तेवीं मन्मथनयनाञ्जन । प्रभारंगीं मनमोहन । राजस पीत परिधान । कंजलोचन कलुशारी ॥२७॥
गंडमंडितकुंदलप्रभा । वरी कुरकुळीत कुंतळशोभा । श्यामसुंदर गगनगाभा । जेवीं चित्प्रभा पांघुरला ॥२८॥
सरळ नासिका सुरंग अधर । वदन वर्तुळ स्वसुखागार । सुकुंदरदन शशिभास्कर । कंदर्पेंशीं कुरवंडी ॥२९॥
विशाळ भाळ बर्हावतंस । कर्णोत्पळीं शोभाविशेष । विचित्ररंगीं नटवरवेश । मिरवी अशेषदृग्द्रष्टा ॥२३०॥
सुंदर हनुवटी कंबुकंठ । श्रीवत्सांक हृदयकपाट । विश्वनिवासीं पटुतर पोट । त्रिवळीमंडित प्रशस्त ॥३१॥
पंकजनाभ श्रीवैकुंठ । परिवेष्टित पुरटपट । नितंब ऊरु जानु निघोंट । जंघा गुल्फा पदकमळें ॥३२॥
वनसुमनांची विचित्र माळा । वरिष्ठ शोभा नवप्रवाळां । धातु नवरंग तेजाळा । रविशशिकळा लोपवी ॥३३॥
धातु नटनाट्यें चर्चिल्या । प्रसूनपंक्ति तुरुंबिल्या । लाजविती रत्नमूल्या । गुंजापुंज सुतेजें ॥३४॥
गडियांमाजी अनुव्रत । त्यांचें स्कंधीं वाम हस्त । दक्षिणहस्तें जलज धृत । तें भ्रमवीत कौतुकें ॥२३५॥
लीलेंकरूनि भंवडी कमळ । हासयुक्त वदनोत्पल । सर्वसाक्षी सकोमल । नयनीं निहाळ कृपेचा ॥३६॥
ऐशिया कृष्णातें मुनिपत्नी । देखत्या झाल्या सप्रेम नयनीं । आनंदनिर्भर अंतःकरणीं । कवळिती मनीं उल्हासें ॥३७॥
प्रायः श्रुतप्रियतमोदयकर्णपूरैर्यस्मिन्निमग्नमनसस्तमथाक्षिरंध्रैः ।
अंतः प्रवेश्य सुचिरं परिरभ्य तापं प्राज्ञं यथाऽभिमतयो विजहुर्नरेंद्र ॥२३॥
भव्यशरिरे घेवोनि धांवा । सवेग पावल्या त्या माधवा । वृत्ति मिनल्या ऐक्यभावा । तें तूं भूधवा अवधारी ॥३८॥
परमप्रियतम जो परमात्मा । त्याच्या उत्कर्षाची गरिमा । चिरकाळ श्रवणें हृदयपद्मा - । माजीं रुचोनि राहिल्या ॥३९॥
भक्तकैपक्षें अभ्युदय । प्रत्यवतारीं ऊर्जित विजय । बहुकाळश्रवणें करितां प्रिय । हृदयीं सदय ठसावला ॥२४०॥
तया प्रियतमाच्या विजयकीर्ति । तिहीं केली श्रवणपूर्ति । श्रवणभूषणाची आयति । त्या शोभविती सप्रेमें ॥४१॥
प्रथमयौवनीं रतिरहस्य । कीं धनिकामुका जेंवि परिस । तेंवि मुनिवधूंसी सगुणवेश । ध्यानगर्भींचा प्रकटला ॥४२॥
मग त्या हरिगुनकर्णभूषणीं । मनें निमग्न झालिया कृष्णीं । पुढतीं लावण्य विग्रह नयनीं । नेती प्राशोनि हृत्कमळीं ॥४३॥
मग त्या उत्सुका प्रेमबाहीं । निश्चल आलिंगूनि हृदयीं । अनेक जन्मींचा तापत्रयीं । शून्य घालूनि निवाल्या ॥४४॥
जैशा कर्णोन्मुखा अहंमति । परतोनि प्रज्ञा आळंगिती । सुषुप्तिमाजीं लीन होती । ताप सांडूनि भवजनित ॥२४५॥
कीं प्रज्ञावंत सुशीलगुरु । सदय सुविचार प्रबोधचतुर । ताप सांडोनि साक्षात्कार । लाहोनि निवती सच्छिष्य ॥४६॥
तेंवी परमात्मप्राप्तिसुखें । अनेकजन्मींचीं संसारदुःखें । सांडोनि विश्रांती पावल्या हरिखें । द्वैत पारिखें दवडूनी ॥४७॥
एवं श्रीकृष्णर्दशनसिद्धि । पावल्या मुनिपत्न्या समाधि । हें जाणोनि कृपानिधि । प्रेमसंवादीं प्रवर्ते ॥४८॥
तास्तथा त्यक्तसर्वाशाः प्राप्ता आत्मदिदृक्षया । विज्ञायाखिलदृग्द्रष्टा प्राह प्रहसिताननः ॥२४॥
निजात्मदर्शनाकारणें । सर्व कामना त्यजिल्या मनें । तैशा जाणोनि त्या श्रीकृष्णें । हास्यवदनें बोलत ॥४९॥
शीतोष्णादि क्षुधातृषा । सांडिली स्थूळतनूची आशा । करणमार्गें तृष्णावळसा । तेवि आशा सांडिली ॥२५०॥
प्राणत्यागें विषया व्याप्ती । कीं धन वेंचुनि जोडणें स्फीति । ते दंभाशा सांडूनि परती । मुनींच्या युवती पातल्या ॥५१॥
भावी जन्मादि सांसारिक । कीं स्वर्गादि पारत्रिक । अथवा मोक्षश्रीदायक । हे त्यजिली पृथक पुण्याशा ॥५२॥
एवं आत्मप्रियत्वें निष्मामप्रेम । निजात्मअभेदें मेघश्याम । पहावया ससंभ्रम । आला उत्तम सद्भावें ॥५३॥
भक्त कामना धरूनि पोटीं । देवा अर्पी उपचार कोटि । भेदें अपान मुटमुटी । कैसें शेवटीं होईल ॥५४॥
देव पावेल किंवा न पावे । भक्त धाके येणें भावें । तो भावाचि देवतानावें । काय या द्यावें म्हणतसे ॥२५५॥
भाजी अर्पोनि मागे केंचे । तैशिया भजना देवचि लाजे । देव मानी भजनवोझें । भेदें नुमजे देवत्व ॥५६॥
तैसे नोहे अभेद भजन । परस्परें अभिनंदन । जेंवि बाळ आंधळें मातेविण । माता त्याविण आंधळी ॥५७॥
तीर्थगादि अनेक योनी । निष्कामप्रेमा बाळपाळणीं । तैशी अवंचक आवडी मनीं । अभेदभजनी निसर्गें ॥५८॥
सांडोनिया विषयगोवा । करणसमुच्चय आघवा । सुषुप्तिगर्भीं घेऊनि धांवा । प्राज्ञ खेंवा कवळिती ॥५९॥
त्या तैशिया मुनिकामिनी । सर्व आशा विसर्जूनी । प्राप्त झाल्या मुनिकामिनी । हें जाणोनि हरि बोले ॥२६०॥
सर्वबुद्धीचा जो साक्षी । स्वप्रकाशें विश्व लक्षी । पूर्णकरुणेच्या कटाक्षीं । हास्यवक्त्रें वदतसे ॥६१॥
श्रीभगवानुवाच - स्वागतं वो महाभागा आस्यतां करवाम किम् ।
यन्नो दिदृक्षया प्राप्ता उपपन्नमिदं हि वः ॥२५॥
महाभागा हें संबोधन । करूनि आळवी श्रीभगवान । म्हणाल यांचें भाग्य कोण । तें विवरून पहा हो ॥६२॥
चोरापासूनि सूटला । अक्षत वांचूनि सदना आला । तयासि म्हणती सभाग्य झाला । काय तो वांचला चिरकाळ ॥६३॥
विषयासारिखे तस्कर । ज्यांचेनि षड्वैरी कठोर । त्यांपासूनि वैराग्यपर । होऊनि सत्वर निघाल्या ॥६४॥
भगवान स्वमुखें सभाग्य म्हणे । त्यांच्या भाग्यासि काय उणें । अक्षयामृतप्रापकपणें । त्या श्रीकृष्णें संबोधिल्या ॥२६५॥
भाग्यवंत हो म्हणे हरि । तुमच्या आगमनाची परी । कल्याणवंत सर्वप्रकारीं । सुष्ठु आहे कीं सती हो ॥६६॥
सांडूनि मोहाचें अटव्य । आला म्हणोनि झालां स्तव्य । ऐसें तुमचें भाग्य भव्य । कीं झालों सुसेव्य मी तुम्हां ॥६७॥
आतां बैसा वो स्वस्थासनीं । काय प्रियतम अंतःकरणीं । तें निरूपा मजलागूनि । चक्रपाणि म्हणतसे ॥६८॥
काय करूं तें मज सांगा । जें जें अपेक्षित तें तें मागा । मत्प्राप्तीनें तुम्ही सुभगा । निजात्मलिंगा दिदृक्षु ॥६९॥
आमुचे दर्शनेच्छेंकरूनी । सर्वप्रतिबंध निवारूनी । प्राप्त झालां हें मद्भजनीं । संतत रंगोनि साधिलें ॥२७०॥
हेंचि तुम्हांसि संपादलें । जें निर्विघ्न मम दर्शन झालें । काय करूं तें सांगा वहिलें । संपन्नत्वें जाणोनी ॥७१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP