अध्याय २३ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


गोपा ऊचु :- नमो वो विप्रपत्नीभ्यो निबोधत वचांसि नः ।
इतोऽविदूरे चरता कृष्णेनेहेषिता वयम् ॥१६॥

विप्रपत्नीहो तुम्हांकारणें । गोपाळ अवघे करितसों नमनें । येथें आम्हांसी धाडिलें कृष्णें । आमुचीं वचनें परिसावीं ॥७३॥
अविदूर म्हणिजे समीप वनीं । बलरामेंसीं चक्रपाणी । धेनु चारावयालागुनी । यमुनापुलिनीं पातला ॥७४॥

गाश्चारयन् सगोपालैः सरामो दूरमागतः । बुभुक्षितस्य तस्यान्नं सानुगस्य प्रदीयताम् ॥१७॥

गाई चारीत होत्साता । सवें गोपाळ आणि जेष्ठभ्राता । बहुत दूर झाला येतां । सवें न घेतां शिदोरिया ॥१७५॥
कोमल तृणें गोधनें तृप्त । जल प्राशूनि झाल्या स्वस्थ । समुदायेशीं क्षुधाक्रांत । तेणें येथें पाठविलें ॥७६॥
तया सानुगा क्षुधिता हरी । सप्रेम सदन्नाचिया परी । वोपूनियां आमुच्या करीं । अतिसत्वरीं पाठवा ॥७७॥

श्रुत्वाऽच्युतमुपायातं नित्यं तद्दर्शनोत्सुकाः । तत्कथाक्षिप्तमनसो बभूवुर्जातसंभ्रमाः ॥१८॥

ऐसी गोपांची मंजुळवाणी । पडतां यज्वपत्न्यांचे काना । समीप आला चक्रपाणी । हें ऐकोनी हरिखेल्या ॥७८॥
जो का दुर्लभ सनकादिकां । करिती निगमागम ठाउका । तो पातला मृत्युलोका । सप्रेमसुखा वालभें ॥७९॥
निर्गुण निर्विकार निरुपम । त्यासीही भुलवी ज्याचें प्रेम । सगुणसाकार परब्रह्म । धावे सकाम भेटीसी ॥१८०॥
अनंत कल्प अनिवडपणें । भजती आत्मनिवेदनें । सूर्यासवें अभिन्न किरणें । तेवी अवतरणें त्यां भक्तीं ॥८१॥
त्याची हेंचि वोळखण । जेवीं उगवतां चंडकिरण । पद्मिनी होती फुल्लारमान । प्रेम अभिन्न उभयत्र ॥८२॥
तेवी अवतरतां श्रीपरेश । सरिसें अवतरती तदंश । बाह्य वेगळे दाविती वेश । परि अभिन्न अशेष सप्रेमें ॥८३॥
परस्परें अविसरपणें । यज्व पत्न्यांचीं अंतःकरणें । इकडे तैसेची श्रीकृष्णें । केले येणें तत्प्रेमें ॥८४॥
ऐशा यज्वपत्न्या हरिपदनिरता । हरिदर्शनीं उत्सुकचित्ता । समीप पातलियां अच्युता । झाल्या ऐकतां उताविळा ॥१८५॥
नित्य नूतन कृष्णकथा । परस्परें करिती बैसोनि स्वस्था । अर्था स्वार्था आणि परमार्था । त्याविण सर्वथा नेणती ॥८६॥
ज्याचे कथेंत निमग्नमनें । तो समीप आला हें ऐकोनि श्रवणें । प्रेमें कळवळूनि अंतःकरणें । चिन्मात्रजीवनें चुवकळल्या ॥८७॥
वसंतग्रीष्मीं तापलीं मोरें । आनंदती नवघनगजरें । प्रेमें धांवती सामोरें । कीं मधुकरें नवकंजीं ॥८८॥
नातरी प्रावृट्काळींच्या रातीं । क्रमितां चकोरां अपार खंती । शरत्काळींचा राकापति । जेवि त्यांप्रति तोषद ॥८९॥
तेंवि अच्युताचेनि आगमनें । आनंदभरित झालीं मनें । प्रेमें सप्रेम कवळिती गगनें । प्रपंचभानें विसरल्या ॥१९०॥
समीप पातला अच्युत । सरामसगोप क्षुधाक्रांत । आमुचें अन्न अपेक्षित । हें ऐकोनि त्वरित ऊठिल्या ॥९१॥

चतुर्विधं बहुगुणमन्नमादाय भाजनैः । अभिसस्रुः प्रियं सर्वाः समुद्रमिव निम्नगाः ॥१९॥

जाऊनियां पाकशाळे । पात्रें घेऊनि सोज्वळें । अन्नें भरियलीं रसाळें । बहुपरिमळें स्वादिष्टें ॥९२॥
लेह्यें चोष्यें भक्ष्यें भोज्यें । अन्नें निर्मिलीं दुग्धें आज्यें । जेवावया त्रिदशपूज्यें । नेती अभोज्यें यजमानीं ॥९३॥
खाद्यपेयादि पदार्थ । त्यांसि अन्न म्हणणें व्यर्थ । म्हणोनि चतुर्विध हा शब्दार्थ । शुकसमर्थ वाखाणी ॥९४॥
नानासंस्कारीं संस्कृत । स्निग्धस्वादसुरभियुक्त । खाद्यपेयादि समवेत । भरिती त्वरित अमत्रकें ॥१९५॥
धातुपाषाणमृदुभाजनीं । बहुविध दिव्यान्नें भरूनी । निघत्या झाल्या गजगामिनी । आत्मा लक्षूनि जेंवि श्रुति ॥९६॥
तेवीं प्रियतमा कृष्णाप्रति । न धरत सर्वही पवनगति । जैशा सरिता समुद्रा येती । तैशा धांवती निःशंक ॥९७॥
सांडूनि गृहकृत्यें लेंकुरें । यज्ञविधाननियमोत्तरें । लज्जाभयशंकाव्यवहारें । जाती सत्वरें सांडवल्या ॥९८॥

निषिध्यमानाः पतिभिर्भ्रातृभिर्बंधुभिः सुतैः । भगवत्युत्तमश्लोके दीर्घश्रुतधताशयाः ॥२०॥

त्यांसि वर्जावया भर्तार । आडवे धांवती सत्वर । म्हणती लंघूनि अध्वर । बाह्य संचार न करावा ॥९९॥
कर्मभंगाची अर्गळा । घालूनि करिती ते अडखळा । बंधुलज्जापाशें गळा । बांधोनि वेह्लाळा कोंडिती ॥२००॥
भ्रातृवर्गगोत्राभिमानें । वृत्तिक्षेत्रादि धनधान्यें । गोऊनि करिती दृढबंधनें । कां पैशून्य सुहृदादि ॥१॥
कन्यापुत्र स्नेहदोरें । बांधोनि कर्षिती अभ्यंतरें । इतुक्यां उरमडूनि बलात्कारें । त्या सत्वरें निघाल्या ॥२॥
इत्यादि सर्व ईषणात्यागें । धांवती वेगें निर्वेध मार्गें । निंदाद्वेष घालूनि मागें । सप्रेमरंगें निघाल्या ॥३॥
एवढें काय त्यांचें बळ । राया म्हणसी जरी केवळ । पूर्वीं त्यांहीं बहुत काळ । श्रीगोपाळ प्रिय केला ॥४॥
विषयमैंदाचें सन्निधान । सांडूनि शम दम साधुजन । दृढ विश्वासें सेवूनि पूर्ण । श्रवणमनन साधिलें ॥२०५॥
मधुमक्षिका मधुरसासी । तेवीं आत्मा प्रिय मानसीं । उबग केला विवर्तासी । गुरुदास्यासी विनटोनी ॥६॥
त्याचेनि मुखें भगवद्गुण । आत्मप्रेमें करितां श्रवण । विसरोनि गेल्या विवर्तभान । सगुण निर्गुण हरिप्रेमें ॥७॥
एवं असत्प्रपंचरोधें । ब्रह्मात्मैक्यसुखावबोधें । उत्तमश्लोकीं परमानंदें । ज्या स्वच्छंदें अनुसरल्या ॥८॥
अंतःकरण मनीषा मन । चित्त अहंता करणें प्राण । चिद्रूपीं उपरमलीं संपूर्ण । त्या निर्वाण धृताशया ॥९॥
मथनें निवडलें नवनीत । जरी ताकाचि माजि वसत । तरी तेणेंशीं अलिप्त । नोहे लिप्त कालवितां ॥२१०॥
जळामाजूनि निघे कमळ । परी तें जळाहूनि वेगळ । धांवे दिगंती परिमळ । प्रिय अळिउळ अनुरागें ॥११॥
तैसें हरिगुणश्रवणीं प्रेम । रंगलें होतें बहुतजन्म । उत्तमश्लोकीं करूनि धाम । करणग्राम वसिन्नला ॥१२॥
तेणें मुनिपत्न्यांचीं मनें । होतीं श्रीकृष्णीं संलग्नें । कृष्णागमन ऐकोनि श्रवणें । प्रपंचभान सांडवल्या ॥१३॥
स्वप्नीं कुटुंबवत्सल । होत्या यज्ञादिक्रियाशील । कृष्णारुणोदयीं तत्काळ । चेइल्या केवळ हरिप्रेमें ॥१४॥
सूर्योदयीं जैसे पक्शी । नीडें सांडूनि प्रपंचवृक्षीं । धांवती चित्सुखचारयासी । त्या हरीपाशीं तैसिया ॥२१५॥
घेऊनि अन्नांचे संभार । मार्गें धांवती अनावर । जेंवि सरिता सिंधूसमोर । पूरें निर्भर धांवती ॥१६॥
मनें वेधल्या कृष्णवेधें । कृष्णस्मरणें ठेविती पदें । चपळ चौताळती तच्छंदें । श्रीगोविंदें मोहिल्या ॥१७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP