अध्याय २३ वा - श्लोक २६ ते ३०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नन्वद्धा मयि कुर्वन्ति कुशलाः स्वार्थदर्शनाः । अहैतुक्यव्यवहितां भक्तिमात्मप्रिये यथा ॥२६॥

इंद्रियांवांचूनि विषयग्रहण । करूं न शकेचि अंतःकरण । यालागीं विषयांचें प्रियपण । करणालागूनि बोलिजे ॥७२॥
प्राणवाहेंकरण पुष्ट । प्राणप्रवाह संकल्पनिष्ठ । तो संकल्पही होय प्रविष्ठ । लक्षूनि स्पष्ट स्वसाक्षी ॥७३॥
तो प्राज्ञही करणनाशें । वेठे प्रत्यगात्मत्ववेशें । आप्तप्रियत्वें स्वलक्षांशें । प्रेमें भजितसे निष्काम ॥७४॥
तो आत्मा मी गोपवेशें । नटलों अस्पष्टभूतलेशें । विशुद्धविज्ञानप्रकाशें । कळलें ऐसें ज्यांलागीं ॥२७५॥
ते विवेक माझ्या ठायीं । विचारें विवरूनि स्वप्रत्ययीं । आत्मप्रियत्वें भजती पाहीं । दृढनिश्चयीं स्वस्वार्थें ॥७६॥
ईश्वरपर्यंत शुद्ध सत्त्व । उभवी मायेचें लाघव । तिचा जेथें अनुद्भव । तोचि स्वयमेव श्रीकृष्ण ॥७७॥
ऐशिया अपरोक्षबोधें दृष्टि । यथार्थभक्ति त्यांचे गांठीं । येर भजणें जें विषयासाठीं । ते उफराटी भववेली ॥७८॥
वृत्तिक्षेत्रार्थसंपन्न । वृद्धवंध्यापुत्ररत्न । जोडल्या करी त्याचें भजन । तत्कल्याण फळलाभा ॥७९॥
आपुलें वेंचूनि तनु मन धन । इच्छी तयासीच कल्याण । तयावरूनि आपुला प्राण । कुरवंडूनि सांडीतसे ॥२८०॥
आत्मा वै पुत्रनामासि । त्या आत्मत्वीं प्रेमा ऐशी । मां जे अपरोक्ष कांतदर्शी । यथार्थतैशीं न भजती कां ॥८१॥
फलाभिलापरहित भक्ति । अवंचकत्वें संतत गति । हे आत्मत्वींच घडे प्रतीति । अभेद स्थिति अपरोक्ष ॥८२॥
तरी आत्मत्वींच अभेदभजन । म्हणाल घडेल काय म्हणून । त्या आत्म्याचें श्रेष्ठपण । सर्वांहून तें ऐका ॥८३॥

प्राणबुद्धिमनःस्वात्मदारापत्यधनादयः । यत्संपर्कात्प्रिया आसंस्ततः को न्वपरः प्रियः ॥२७॥

देहात्मता अधिकरून । वर्ततां घडे जें कर्माचरण । प्रारब्ध होय तें परिणमोन । तेथ चैतन्य अनुकरे ॥८४॥
तया चैतन्याचेनि संपर्कें । प्रारब्धजनकें उपकारकें । दारापत्यधनादिकें । प्राप्तिविशेषें प्रिय होती ॥२८५॥
ज्या चैतन्याचेनि सन्निधानें । नाना संकल्प करिजती मनें । त्या मनाच्या अभिरंजनें । कवळी प्रियपणें पदार्थ ॥८६॥
ज्याच्या संपर्कें बुद्धि शाहणी । विविधां विषयां पारखिणी । प्राणप्रवाह तनुधारिणी । निजाधिकरणीं पटुतर ॥८७॥
देह आत्मत्वें कवळून । करिती तयाचें अभिमंडन । अनेकपदार्थसंग्रहण । हें बाह्य प्रियपण ज्याचेनी ॥८८॥
तया प्रारब्धाचिये क्षयीं । चैतन्यसंपर्क उपलयीं । दारापत्यादिप्रियत्वें पाहीं । कोण ते ठायीं कवळिता ॥८९॥
शरीरपरत्वें दारादिभरण । त्या देहासी उबगती स्वजन । एवं आत्मत्वें चैतन्य । त्याहूनि कोण प्रिय सांगा ॥२९०॥
तो मी परमात्मा श्रीकृष्ण । लीलाविग्रही चैतन्यघन । वैराग्यभाग्यें सुसंपन्न । कृतार्था म्हणोन पावलां ॥९१॥
एथूनि तुमचिये प्राप्तदशे । कर्मबाधेचें नातळे पिसें । मदैकशरणा मत्समरसें । अविनाशतोषें आथिलां ॥९२॥
तस्मात् तुम्ही पूर्ण कामा । सती साध्वी यज्ववामा । मदाज्ञेनें निजाश्रमा । निष्कामकर्मा साधा जा ॥९३॥

तद्यात साध्व्यो यजनं पतयो वो द्विजातयः । स्वसत्रं पारयिष्यंति युष्माभिर्गृहमेधिनः ॥२८॥

जाऊनि यज्ञमंडपासी । समाप्ति पावविजे यज्ञासी । तुमच्या योगें भर्तारांसी । सर्वकर्मांसी अधिकार ॥९४॥
यज्ञभोक्ता तूं पूर्णपणें । आम्ही कृतार्थ तव दर्शनें । आतां किमर्थ परतोनि जाणें । कर्माचरण किमर्थ ॥२९५॥
ऐसें न मना वो सुंदरी । ब्राह्मण केवळ कर्माधिकारी । तदनुग्रहार्थ संसारीं । श्रुतिनिर्धारीं वर्तावें ॥९६॥
तुमच्या परिग्रहें करून । झाले गृहमेधी ब्राह्मण । यालागीं वेदाज्ञे प्रमाण । कर्माचरण संपादा ॥९७॥
ऐसें ऐकोनि हरीचें वचन । सप्रेम यज्वपत्न्यांचें मन । अवियोगाचें प्रतिपादन । करिती पूर्ण विधिवाक्यें ॥९८॥

स्त्रिय ऊचु :- मैवं वचोऽर्हति भवान्गदितुं नृशंसं सत्यं कुरुष्व निगमं तव पादमूलम् ।
प्राप्ता वयं तुलसिदाम पदावसृष्टं केशैर्निवोढुमतिलंघ्य समस्तबंधून् ॥२९॥

श्रीकृष्णातें यज्वजाया । म्हणती निष्ठुर बोलावया । योग्य नव्हेसि यादवराया । शरण आलिया आमुतें ॥९९॥
निष्ठुरवाक्यें मेघश्यामा । शरणागतांचा भंगे प्रेमा । कोणें शिकविजे हें तुम्हां । तूं जगदात्मा सर्वज्ञ ॥३००॥
आणि प्रतिज्ञापूर्वक तुझें वचन । जें श्रुतिस्मृतिरूपें प्रमाण । कीं निर्वाणभक्त मदेकशरण । पुनरावर्तन त्या नाहीं ॥१॥
न मे भक्तः प्रणश्यति । ऐशिया तुझ्या अनेकोक्ति । पादप्रपन्ना पुनरावृत्ति । निषेधस्थिति बोलिल्या ॥२॥
यद्गत्वा न निवर्तन्ते । इत्यादि पुनरावृत्तिवर्जितें । अभयवाक्यें श्रीअनंतें । वृथा कैशीं करिजती ॥३॥
दासी हुआवया आवडी । सांडूनि बंधुवर्गाची गोडी । करूनि तदवज्ञा रोकडी । घातली उडी पदपंकीं ॥४॥
जेथ रुळती तुलसीदाम । तें दुर्लभ श्रीपाद्पद्म । केशीं झाडावयाचें प्रेम । तें दास्यकर्म वांछितसों ॥३०५॥
पायें लोटूनि अवज्ञेवारी । तुलसीदाम तां दिधलें हरि । तें सद्भावें वाहों शिरीं । आम्ही किंकरी होआवया ॥६॥
करूनि बंधुवर्गाची अवज्ञा । मोडूनि विध्युक्त वेदाज्ञा । प्राप्त झालों तुझिया चरणां । केंवि शरणां उपेक्षिसी ॥७॥

गृह्णन्ति नो न पतयः पितरौ सुता वा न भ्रातृबंधुसुहृदः कुत एव चान्ये ।
तस्माद्भवत्प्रपदयोः पतितात्मनां नो नान्या भवेद्गतिररिंदम तद्विधेहि ॥३०॥

आतां ऐकें मेघश्यामा । ज्यांची अवज्ञा करूनि आम्हां । शरण आलिया त्वत्पदपद्मा । पुन्हा का मा उपेक्षिसी ॥८॥
अवज्ञा करूनि बंधुवर्गाची । जोडी केली श्रीचरणांची । तेथ गेलिया पुन्हा आमुची । सांगा कैशी प्रतिष्ठा ॥९॥
विप्रवेदाग्निभगवान् । माता पिता सुहृत्स्वजन । साक्षी करूनि पाणिग्रहण । केलें जाण पतीनें ॥३१०॥
काया वाचा आणि मनें । अर्थें स्वार्थें जीवें प्राणें । भर्त्राज्ञेतें नुलंघणें । ऐसें श्रुतिवचन नेमिलें ॥११॥
त्या पतीसी तृणावरी । न लेखूनि श्रीमुरारि । आम्ही धांविलों वनांतरीं । घेऊनि शिरीं यज्ञान्नें ॥१२॥
आज्ञाभंग यज्ञभंग । लौकिकमर्यादेचा भंग । करूनि पावलों श्रीरंग । पुढती पांग जरी त्यांचा ॥१३॥
आतां आमुच्या दर्शनें । क्षुब्ध होती त्यांचीं मनें । आमुचीं देखूनियां वदनें । करिती स्नानें सचैल ॥१४॥
असो भर्ताराची कथा । जन्मकारणें माता पिता । आम्हां देखोनि कांतत्यक्तां । मानिती वांतासारिखें ॥३१५॥
पोटीं जन्मले जे कुमर । आम्हां मानूनि त्यक्ताचार । आमुच्या मृत्यूचे विचार । निरंतर विवरिती ॥१६॥
पोटीं जन्मलीं कन्यारत्नें । निर्भर्त्सिती तीं प्रयत्नें । बंधुवर्ग मानिती उणें । गोत्रज जिणें धिक्कारिती ॥१७॥
आप्तवर्गाची ऐशी परी । पिशुन सोयिरे संसारी । यांवेगळा अंगीकारी । कोण धरित्रीवरि सांगा ॥१८॥
ज्यांचें त्यांहीं उपेक्षिलें । न वचे कोणीं संरक्षिलें । पत्र वृक्षाचें तूटलें । न वचे जडलें अन्य द्रुमीं ॥१९॥
काम क्रोध लोभ मोहो । मदमत्सरादि शत्रुसमूहो । दमितां अरिंदम महाबाहो । तो तूं नाहो कमलेचा ॥३२०॥
अरिंदम हें संबोधन । तुज एकातें शोभायमान । येरां प्रतिष्ठाविशेषण । नोहेचि जाण अन्वर्थ ॥२१॥
अरिदमा श्रीअनंता । आदिपश्चात्सर्ववेत्ता । याकारणें आमुची कथा । विवरीं चित्तामाजिवडी ॥२२॥
मागें उरला नाहीं थार । पुढें नेदिसी तूं आधार । वाक्यें बोलसी निष्ठुर । कोण विचार तैं आमुचा ॥२३॥
तुझिया पदकमलाचीं अग्रें । तेथें आमुचीं शरीरें । पडलीं असतां दंडाकारें । गत्यंतरें न चिंतूं ॥२४॥
जेव्हां भर्तार टाकिले । तेव्हांचि इहसुख अंतरलें । यज्ञविधीतें उल्लंघिलें । तेव्हां गेलें आमुष्मिक ॥३२५॥
आतां स्वपादशरणां आम्हां । न लवीं इहामुष्मिककामा । निजचरणांचा देऊनि प्रेमा । दास्यकर्मा अनुमोदीं ॥२६॥
आम्ही त्वच्चरणाच्या दासी । होऊनि रंगों सप्रेमेंशीं । ऐसें करावें हृषीकेशी । अन्यगतीसि नेदूनी ॥२७॥
ऐसें ऐकोनि श्रीभगवान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । अशेष अभिप्राय लक्षून । बोले वचन तयांसी ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP