अध्याय १३ वा - श्लोक ५३
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
कालस्वभावसंस्कारकामकर्मगुणादिभिः । स्वमहिध्वस्तमहिभिर्मूर्तिमाद्भिरुपासिताः ॥५३॥
एवं आत्मादि स्तंबपर्यंत । चराचर जे मूर्तिमंत । वाखाणिलें पृथक व्यक्त । उपसंहरित तें आतां ॥५३०॥
कालप्रकृति गुणक्षोभक । स्वभाव परिणामहेतुक । संस्कार वासना । उद्बोधक । जननावनांतक तें कर्म ॥३१॥
काम म्हणजे तो अभिलाष । एवं गुणात्मकचि अशेष । तथापि सात्त्विक राजस तामस । गौण या सगुणरूप ॥३२॥
देंठ शिरा मध्य अग्र । अवघें पर्णचि समर । काळे हरितरंग कल्लोळ नीर । अवघा सागर ज्यापरी ॥३३॥
तेवीं काल स्वभाव संस्कार । इत्यादि नामीं पृथगाकार । सूक्ष्म एथींचा प्रकार । त विचार अवधारा ॥३४॥
प्रथम स्फुरणाचि माझारीं । कालादि अवघी एकसरी । जन्मली असतां पृथगाकारीं । कोणेपरी तें ऐका ॥५३५॥
धनुष्य ओढी भरे शरू । ऊर्ध्व गगनीं करी संचारू । ओढी सरली हा विचारू । फिरे सत्वर जाणोनि ॥३६॥
कां वार्षिकीं जेवीं वृष्टिभरें । सरिता ओसंडे महापुरें । जलप्रमाण जाणोनि उतरे । तेवीं अवसरे जो क्षोभे ॥३७॥
स्थिति प्रलय आणि उत्पत्ति । मशकापासूनि मूलप्रकृति । ज्यांची जैशी अवधि पुरती । निमेषपंक्ति जो गणिता ॥३८॥
उत्पत्ति जाणोनि क्षोभवी रजा । सत्त्व क्षोभवी स्थितिकाजा । पुढती तम क्षोभवूनि वोजा । करवी पैजा संहार ॥३९॥
ज्या ज्या गुणाची निद्रा भरे । त्या त्या चेतवी यथावसरें । पुढती कर्म पूर्वानुसारें । क्षोभे स्फुरे ज्याचेनि ॥५४०॥
जो सूक्ष्माहूनि सूक्ष्मतर । थोरां जन्मस्थितिसंहर । ज्यामाजीं तो अजरामर । अनंत अपार पैं काल ॥४१॥
आतां स्वभाव म्हणाल काय । जो परिणामासी कारण होय । अध्यात्मनामें बोलिजेत आहे । किं आत्मत्वें राहे म्हणोनि ॥४२॥
आपुलें आस्तिक्य जेथें स्फुरे । कालक्षोभाच्या अवसरें । परिणमोनि रूपांतरें । दावी विकारस्वभाव ॥४३॥
राई राळे राजगिरा । अश्वत्थ वट वांगीं धोतरा । इत्यादि बीजें धरी धरा । पावती विकारा स्वास्तिक्यें ॥४४॥
राई विसरोनि नोहे राळा । वट विसरोनि नोहे जोन्हळा । स्वास्तिक्य स्मरोनि परिणामकाळा । स्फुरवी स्वलीला स्वभावो ॥५४५॥
उगवणें वाढणें रसा येणें । पिकणें नासणें सडोनि जाणें । अवस्थांतरीं पालटणें । त्यांतें म्हणणें परिणाम ॥४६॥
अन्न परिणमोनि होय मळ । दुग्ध परिणमोनि होय आम्ल । अमृत परिणमोनि सर्पी गरळ । जळ तें केवळ जगद्बीज ॥४७॥
परिणामहेतु जो स्वभाव । याचा कथिला अंतर्भाव । संस्कार म्हणजे कोणा नांव । तो अभिप्राव अवधारा ॥४८॥
हिंग सरोनि लोटले मास । पात्र क्षाळिल्याहि निःशेष । परंतु सूक्ष्म उरे वास । वासनालेश त्यापरी ॥४९॥
जेव्हां देह पडोनि ठाय । भूतें स्वाकरणीं पावल्या लय । स्वभावगर्भीं जो सामाय । वासनामय संस्कार ॥५५०॥
तोही दुष्ट कनिष्ठ इष्ट शुद्ध । क्रुद्ध स्निग्ध ऋणानुबंध । यांचे विविध कथूं जरी भेद । तरी भेद अगाध नुमाणवे ॥५१॥
तो संस्कार पूर्वानुसार । उदया आणी वासनांकुर । स्नेह मैत्रकां द्वेष वैर । पुढें तदनुसार प्रवृत्ति ॥५२॥
मानवि देह जेव्हां लाहे । वेदविश्वास वर्णीं राहे । श्रुतिसंस्कारें पालट होय । लाभे सोय सन्मार्गीं ॥५३॥
लवनसंस्कारें तिक्तादिक । पचोनि होती रुचिदायक एक । तेवी श्रुत्युक्त संस्कार आवश्यक । भक्तिपूर्वक जरी घडे ॥५४॥
तरी परिसें पालटे अष्ट लोह । कीं मलयागरें काष्ठसमूह । तैसा सत्संस्कारें होय रोह । सन्मतीचा सन्मार्गें ॥५५५॥
परिसें न पालटे पाषाण । येरंडा न वेधी चंदन । इंद्रवारुणी न पची लवण । तेवीं भक्तीहीन संस्कारें ॥५६॥
संस्कार तो कथिला ऐसा । आतां काम तो म्हणाल कैसा । तो निरूपिजेल होय तैसा । सावध परिसा क्षण एक ॥५७॥
संस्कार उद्बोधी जे वासना । ते न खवळे कामेंविणा । जेविं कार्मुकेंवीण मार्गणा । नव्हे संधानार्हता ॥५८॥
कां अरणिज सूक्ष्म पावक । वायु तयासी प्रवर्धक । तेविं जो वासनाप्रेरक । तो कामनामक अभिलाष ॥५९॥
कामें कामिजे फळ । त्याचें प्राप्तिसाधन जें कां सकळ । तें कर्म त्रिगुणात्मक केवळ । जननप्रतिपाळक्षयरूप ॥५६०॥
जें अभिवृद्धीचें साधन । जननरूप तें कर्म जाण । संपादल्याचें संरक्षण । तें पाळण बोलिजे ॥६१॥
उपसंहारूनि कीजे व्यय । त्या कर्मातें बोलिजे क्षय । एवं उत्पत्ति स्थिति प्रलय । हें कर्मचि होय त्रैगुण्य ॥६२॥
आतां गुण ते म्हणाल कैसे । रजप्रयत्नीं साभिलाषें । सत्त्व संरक्षी ज्ञानप्रकाशें । निद्रालस्यें तम नाशी ॥६३॥
यांपासूनि जे जे सकळ । त्यांपूर्वील जे अविकळ । आदि शब्दें त्यांचे मेळ । पृथक् गोपाळ उपासिती ॥६४॥
ते उपासनेची रीती । जैसा प्रकटलिया गभस्ति । खद्योत स्वतेजा मुकती । तथापि असती तैसेची ॥५६५॥
तेवी भगवन्महिमेपुढें । ज्यांची महिमा समूळ उडे । प्रलयतेजाच्या उजिवडे । दीप रोकडे दीपले ॥६६॥
तैसे अवघेचि मूर्तिमंत । परंतु दिसती महिमोपहत । तैसे नियोगी नियोगरहित । दिसती अनाथ प्रभूपुढें ॥६७॥
कालप्रकृति गुणक्षोभक । परी आपणा सृजूं न शके देख । तेणें स्वमूर्ति देखतां अनेक । झाला लुक निजमहिमे ॥६८॥
ज्यां प्रभूचे महिमेपुढें । काळादिकांचें महत्त्व उडे । त्या किमात्मका मूर्ति हें निवाडें । वाडेंकोडें शुक सांगे ॥६९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP