अध्याय १३ वा - श्लोक १ ते २
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीशुक उवाच - साधु पृष्टं महाभाग त्वया भागवतोत्तम । यन्नूतनयसीशस्य श्रृण्वन्निव कथां मुहुः ॥१॥
शुक म्हणे गा सार्वभौमा । भागवतामाजीं उत्तमोत्तमा । हरिगुणश्रवणीं तुझा प्रेमा । कीं अगाध आम्हां आढळला ॥३६॥
तुवां प्रश्न केला भला । तेणें भाग्यमहिमा कळला । म्हणोनि महाभाग तुजला । बोलावयाला प्रशस्तीं ॥३७॥
मोह अज्ञान महाभ्रम । हानि संकट संधवर्म । हें तें तोंवरी भोगिती अधम । जव हरिप्रेम नुदैजे ॥३८॥
हरिप्रेमाचा लागतां झरा । मानव वंद्य होती निर्जरां । कोण गणी तैं भाग्या येरां । हरिशंकरा प्रियता जैं ॥३९॥
भगवद्भजनीं माझा प्रेमा । कैसा कळला म्हणसी तुम्हां । तरी राया तुझिया श्रवणकामा । तुळणा आम्हा करवेना ॥४०॥
अखिल चराचराचा ईश । परमात्मा जो जगदाधीश । तद्गुणकीर्तनश्रवणींसोस । वर्ते अशेष ऐकोनिही ॥४१॥
वारंवार विभूचेच गुण । करीत असतां तुवां श्रवण । नित्यनूतन प्रेमागहन । येणें मम मन सुखांवें ॥४२॥
प्रथमापासूनि नवमस्कंध - । पर्यंत हरिगुण महिमा विशद । परिसोनि पावल्या परमानंद । पुढती सादर श्रवणाची ॥४३॥
उभयवंशाचें गुणचरित्र । ऐकोनि तुझे न धाती श्रोत्र । कृष्णकीर्तिसि झाले पात्र । हें विचित्र तव प्रेम ॥४४॥
द्वादशाध्याय परिसमाप्ति । ऐकिल्याही कृष्णकीर्ति । श्रवणीं अधिकचि उपजे रति । विस्मय चित्तीं मज हाचि ॥४५॥
नित्य करितांही स्तनपान । बालकाचा प्रेमा गहन । तैसे ऐकोनि ऐकसी हरीचे गुण । नित्य नूतन सप्रेमें ॥४६॥
जे ऐकलीच नव्हती कोठें । ते अपूर्व वार्ता जैं श्रवणा भेटे । तेचि श्रवणीं मानस नेहेटे । प्रेम दुणवटे तेंवी तुझें ॥४७॥
श्रवणीं नववत् सप्रेमळ । हें अपार निष्काम सुकृत फळ । कृपेनें तुष्टोनि लक्ष्मीलील । भाग्य केवळ हें वोपी ॥४८॥
सतामयं सारभृतां निसर्गो यदर्थवाणिश्रुतिचेतसामपि ।
प्रतिक्षणं नव्यवदच्युतस्य यत्स्त्रिया विटानामिव साधुवार्ता ॥२॥
ऐसे जे कां लब्धभाग्य । ते या श्रवणप्रेमा योग्य । येर विषयग्रस्त अभाग्य । ते अयोग्य ये ठायीं ॥४९॥
हा सारांश लाधला ज्यासी । सारभूत म्हणिजे त्यासी । सहज स्वभाव त्या संतासि । तो परियेसीं नृपवर्या ॥५०॥
असार प्रवृत्तिनवरस । सेवनीं उपजला ज्यांसि त्रास । तेचि सारभूत सत्पुरुष । निसर्ग सारांश हा त्यांचा ॥५१॥
तो निसर्ग म्हणसी कैसा । अच्युतवार्ताश्रवणरसा । प्रेमा नित्य नूतन मानसा । दे संतोषा प्रतिक्षणीं ॥५२॥
जेथ नाहीं यातायात । तया धामातें अच्युत म्हणत । तो अवतरोनि अमूर्त मूर्त । कीर्ति अच्युत विस्तारी ॥५३॥
अस्ति भाति प्रियात्मक । अच्युतपदाचा विवेक । तेथ नामरूप हें मायिक । काल्पनिक म्हणाल ॥५४॥
तरी नगाचीं लटिकीं अनेक नांवें । सुवर्ण नाम तैसें नव्हे । वर्ते उपादान व्याप्तीसवें । होय आघवें नसोनि ॥५५॥
तैसा अनंत अच्युत । अयोनिसंभव अव्यक्तव्यक्त । धर्मसंस्थापनादि कृत्य । करूनि अलिप्त अक्षयी ॥५६॥
तयाचीं तीं पुण्य चरितें । अनंत गुणीं यशोंकितें । अच्युतपदीं करिती सरतें । मोक्षावरौते सुख देती ॥५७॥
प्रपंचकथा आणि अच्युतवार्ता । समान न म्हणावी सर्वथा । भवभयाची अपार व्यथा । भगवत्कथा निवारी ॥५८॥
श्वानशूकरादि प्रपंचीं निरत । परम सुकृती हरिगुणीं रत । प्रपंचप्रेमें अधःपात । कैवल्य प्राप्त हरिप्रेमें ॥५९॥
तें हरिप्रेम म्हणाल कैसें । स्त्रैण स्त्रीकामीं जेंवी पिसे । इंद्रियें सहित निज मानसें । वनिताध्यासें वेधती ॥६०॥
ठाण माण गुण लावण्य । स्मित भाषण कटाक्षबाण । प्रेमें सादर निरीक्षण । करूनि स्मरण ते धरिती ॥६१॥
मग समसमान वयस्क मिळोनि तरुण । करिती कांतातनुवर्णन । चुंबन मैथुन आलिंगन । कुचमर्दन इत्यादि ॥६२॥
छंद प्रबंध श्लोक आर्या । श्रृंगाररसिक गाती नार्या । स्त्रैण श्रवणानंदकार्या । तें अनार्या प्रिय वाटे ॥६३॥
स्त्रिया गाती स्त्रिया ध्याती । स्त्रीअवयव सादर पाहती । नित्य नूतन वाढे रति । दुजी विश्रांति न माने ॥६४॥
ऐसे स्त्रीकामीं विषयनिष्ठ । तयासी बोलिजे स्त्रियाविट । जेंवी ते स्त्रीविलास वार्ता विनट । भगवन्निष्ठ तेंवी संत ॥६५॥
म्हणाल पवित्रा अपवित्रा उपमा । श्रीशुकें एथें दिधली कामा । तरी सर्वा विदित हा विषयप्रेमा । भगवद्गरिमा अनोळख ॥६६॥
बोधवावया ब्रह्मानंद । श्रुति उपमिती उपस्थानंद । जेवीं शरावोदकी बिंबला चांद । ते उपमा मंद न मानावी ॥६७॥
प्रेम म्हणिजे मनोरंजन । तेणें विषय सुखातें कवळिती जन । तैसें रुचल्या भगवद्भजन । भवबंधन मग कैचें ॥६८॥
मानस वेधे परांगनेसीं । कीं जैसें गुंते परधनापासीं । तैसें लंपट हरिचरणांसीं । होतां कायसी भवचिंता ॥६९॥
यालागीं भक्तीसि विषयप्रेमा । तुकितां असाम्य न म्हणिजे उपमा । उपजे सकामा निष्कामा । अनुभवगरिमा दोहींची ॥७०॥
बालपणीं तें स्त्रीशरीर । विष्ठा मूत्र श्लेष्मागार । उतारवयसीं भयंकर । भासे घोर पिशाच ॥७१॥
तारूण्यकाळीं मैंदापरी । लावण्य मिरवी बाह्याकारीं । कूटिल लपटूनि अंतरीं । जेंवी साजिरी गवाक्षा ॥७२॥
याहीमाजि व्यथाभूत । किंवा क्षुत्क्षाम कालग्रस्त । मलिन अमंगळ अवस्थाभूत । जीतची प्रेत भासे तैं ॥७३॥
ऐसिये स्त्रीतनूसीं भुलोनि । सारसुखाची करिती हानि । हेही हरिमायेची करणी । जेंवी हरणां किरणीं जलभ्रांति ॥७४॥
विवरूनि झाले जे विरक्त । तेचि पैं सारग्राही संत । ऐक तयांचा वृत्तांत । जो एकांत हरिचरणीं ॥७५॥
परमोत्कर्षेंसि निःसीम । हरिगुणश्रवणीं ज्यांचें प्रेम । तदर्थ अवघा इंद्रियग्राम । नित्यनेम हा ज्यांचा ॥७६॥
लुब्ध जैसा जोडी धन । त्याहूनि प्रयत्नें हरीचे गुण । सद्गुरुमुखें करूनि श्रवण हृदयीं जतन ठेविती ॥७७॥
जया श्रवणसुखापुढें । विषयसुखाची गोडी मोडे । इंद्रादिवैभवही नावडे । प्रेमा जडे हरिचरणीं ॥७८॥
कवडी कवडी जोडि कृपण । कीं धान्य वेंचिती अनाथ दीन । तैसे हरीचे अनंत गुण । श्रवणें करून जोडावे ॥७९॥
हरिगुणप्रश्नार्थ वेंचे वाणी । श्रोत्र अच्युतवार्ताश्रवणीं । मानस वेंचे तच्चिंतनीं । अंतःकरणीं हरिप्रेम ॥८०॥
अच्युतकथांचा श्रवणस्वार्थ । मुख्य जोडिती इतुका अर्थ । इतर न शिवती भव अनर्थ । हा परमार्थ संतांचा ॥८१॥
वचनें श्रवणें अंतःकरणें । हरिगुणेंचि अर्थ जोडणें । हीं मुख्य संतांचीं लक्षणें । झालीं लेणीं तुज आंगीं ॥८२॥
इहीं लक्षणीं भाग्यवंता । ऐकें एकाग्र करूनि चित्ता । पुसली तेचि सांगेन कथा । जे ऐकतां भव नासे ॥८३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 29, 2017
TOP