अध्याय १३ वा - श्लोक ३४ ते ३७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ततः प्रवयसो गोपास्तोकाश्लेषनुस्निर्वृताः । कृच्छ्राच्छनैरपगतास्तदनृस्मृत्युदश्रवः ॥३४॥

प्रबुद्ध वयस्क ते गोपाळ । कृष्णमय जे वत्सपाळ । आलिंगूनि सुखकल्लोळ । झाले केवळ निजांगें ॥४॥
त्यानंतरें परमक्लेशें । सुतानुस्मृति निजमानसें । करितां हळुहळूच पूर्वाध्यासें । जीवात्मदशे भेटविलें ॥४०५॥
आनंदाचें भरतें पोटीं । सप्रेम अश्रु स्रवती सृष्टि । लब्ध अवस्था जिरवूनि पोटीं । पहाती दृष्टि उघडूनि ॥६॥
ऐशी गाई गोपिकांची । वृषभादिका बल्लवांची । देखोइ अभिवृद्धि प्रेमाची । मनीं विवंची बळराम ॥७॥

व्रजस्य रामः प्रेमर्द्धेर्वीक्ष्यौत्कंठ्यमनुक्षणम् । मुक्तस्तनेष्वपत्येष्वप्यहेतुविदचिंतयत् ॥३५॥

प्रेमबुद्धीची उत्कंठता । व्रजींची पतिक्षणीं अभिवर्धतां । रामें पाहोनि विवरी चित्ता । ते तत्त्वतां अवधारीं ॥८॥
अनुक्षणीं प्रेम वाढे । तेणेम उत्कंठा अधिक चढे । कारण कांहीं दृष्टी न पडे । हें नूतन कोडें विचारीं ॥९॥
नवप्रसूता तान्हीं वत्सें । घरीं टाकूनि जैसीं तुच्छें । स्तनींचीं सुटलीं तें स्वेच्छें । पारठीं वत्सें पाजिती ॥४१०॥
नव वत्सांतें न आणिती दृष्टी । दुरूनि पहातां थानतुटी । उड्या घालूनि गिरिकपाटीं । आल्या निकटीं धेनुका ॥११॥
धेनुवत्सांच्या न्याहळीं । थानें चार्‍हींही मोकळीं । धारा पडती भूमंडळीं । हें नव्हाळी प्रेमाची ॥१२॥
बाळकें विसरोनि घरींचीं तान्हीं । वत्सपां पाजिती प्रेमें जननी । पान्हा मोकळा नावरे स्तनीं । वोरस मनीं प्रेमाचा ॥१३॥
गाई गोपींचा हा मोह । बल्लव वृषांचाही हा देह । वत्सपां देखोनि द्रवे स्नेह । हा नवलावो न चोजवे ॥१४॥
विवरूनि पहातां पहातां आपुल्या ठायीं । एथें कारण न दिसे कांहीं । हेतु नेणतां रामहृदयीं । करी कांहीं विवंचना ॥४१५॥
ते विवंचनेचीपरी । श्लोकद्वयें शुकवैखरी । परीक्षितीसी कथन करी । तेंचि चतुरीं परिसावें ॥१६॥

किमेतदद्भुतमिव वासुदेवेऽखिलात्मनि । व्रजस्य सात्मनस्तोकेष्वपूर्वं प्रेम वर्धते ॥३६॥

प्राणिमात्रांसी आत्मप्रेम । अखिलात्मा हा मेघश्याम । सगुणवेषें झाला सुगम । यास्तव परम प्रिय वाटे ॥१७॥
बल्लवगोपीगोवृषांची । असो अखिल चराचरांची । कृष्णीं जडली प्रेमरुचि । हे पूर्वींच मी जाणें ॥१८॥
परी हें वाटे परमाद्भुत । गाईगोपिका आपुले सुत । देखोनि होती स्नेहवंत । प्रिय भगवंत ज्यापरी ॥१९॥
हीं तो मानवें गोरुवें । परी मीही जाकलों प्रेमभावें । वत्सपत्सप हे आघवे । आत्मगौरवें वेधिती ॥४२०॥
पूर्वीं कृष्णचि होता प्रिय । आतां अवघाचि समुदाय । कृष्णा ऐसा सर्वां प्रिय । मजही होय किमर्थ ॥२१॥
स्वपुत्रमोहें मनुजें गुरें । कवळिलीं हें म्हणों खरें । परी मजलागीं कां परावीं पोरें । सप्रेमभरें प्रिय गमती ॥२२॥
आणिकही वाटे अपूर्व । असो गोगोपींचा मोह । परी वृषभादि जे गोप सर्व । प्रेमलाघव वाढविती ॥२३॥
( विषयभूरे पंचभूते । प्रथक् प्रथक् मूर्तिमते । तमात्मके स्वगुणे सहिते । प्रथक् प्रभूतें अर्चिती ॥४२३॥ )
त्याहीमाजि अपूर्व एक । जातमात्र विसरोनि तोक । गोगोपींचा प्रेमा अधिक । पूर्ववत्सकवत्सपीं ॥२४॥
माझा यांवरी प्रेमा गहन । इथें प्रेमवृद्धीचें कारण । न कळे म्हणोनि संकर्षण । करी विवरण मानसीं ॥४२५॥

केयं वा कुत आयाता दैवी वा नार्युतासुरी । प्रायो मायाऽस्तु मे भर्तुर्नान्या मेऽपि विमोहिनी ॥३७॥

कोण माया हे कोणीं प्रेरिली । किंवा कोठून किमर्थ आली । व्रजासकट मजही भुली । हे न वचे केली विवंचना ॥२६॥
जरी हे म्हणों नराची माया । ते समर्थ मनुजेंचि मोहावया । याही माजि ते योगियां । भुलवावया असमर्थ ॥२७॥
माया म्हणों हे आसुरी । ते नरां असुरां मोहनकारी । इंद्रादिश्रेष्ठां सुरांवरी । तिची थोरी न चाले ॥२८॥
दैवी म्हणों हे निष्टंक । ते भुलवूं न शके ब्रह्मादिक । अन्य जे का सिद्धप्रमुख । ते मम मोहक न होती ॥२९॥
ब्रह्मादिकांच्याही माया । समर्थ न होती भुलवावया । तो मी भ्रांत केलों इयां । या आश्चर्या बहुमानी ॥४३०॥
एवं सर्व प्रकारें करून । दृढ निश्चय हाचि जाण । विश्वमोहक जो भगवान । तो श्रीकृष्ण जगदात्मा ॥३१॥
ही त्या कृष्णाची माया । समर्थ मजही भुलवावया । म्हणून भ्रांत केलों इयां । मनुजें कार्या स्वामीच्या ॥३२॥
माझ्या स्वामीचें हें कृत्य । प्रायशा हाचि निश्चय अत्य । मजही मोहावया समर्थ । अन्य प्राकृत न होती ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : April 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP