अच्युतपदासि चिंतुनि, सानुज धर्म स्ववेष घेवून,
सुदिनीं बसे नृपपदीं, त्या मत्स्याच्या सभेंत येवून. ॥१॥
मागुनि विराट येउनि हांसोनि म्हणे, ‘ सभासदा ! कंका !
भद्रासनीं बसाया आजि तुज कसी न वाटली शंका ? ’ ॥२॥
अर्जुन म्हणे, “ नृपा ! हा हरिच्या अर्धासनीं बसायाचा,
आहे प्रतापमहिमा विख्यात जगत्त्रयीं असा याचा. ॥३॥
गंधर्वांसि हरि म्हणे, ‘ याचीं च यशें, करूनि तांडव, गा. ’
हा पुण्यश्लोक प्रभु सम्राट् सद्गुणसमुद्र पांडव, गा ! ” ॥४॥
मत्स्य म्हणे, ‘ पांडव हा तरि भीमप्रमुख बंधु जे चवघे
कोठें ? कृष्णा कोठें, जीस क्षण हि न विसंबती अवघे ? ’ ॥५॥
पार्थ म्हणे, ‘ सूद तुझा बल्लव मगधेंद्रकाय हा चिरिता,
करिता जाला सूतान्वयसागर भीमकाय हा चि रिता. ॥६॥
हयपाळ जो नकुळ तो, गोपाळक तो चि होय सहदेव,
अर्जुन बृहन्नडा मीं, भिडला ज्या चापपाणीसह देव. ॥७॥
सैरंध्री हे कृष्णा, मेले कीचक इला अनादरिते,
हे किति ? हरमुरज उदधि व्हावे क्षोभें इच्या अनाद रिते. ॥८॥
अज्ञातवास दुर्घट परि निर्विघ्न त्वदाश्रयें घडला,
होतों सुखरूप तुज्या गर्भांत, श्रम न लेश ही पडला. ’ ॥९॥
उत्तर हि पांडवांतें वर्णुनि, कळवी पुन्हा स्वजनकास
कीं, ‘ हे चि घालणारे, व्यसनीं तारावया स्वजन, कास. ’ ॥१०॥
भूप म्हणे, ‘ त्वां अर्जुन पूजावा सर्वकाळ, भीम हि म्यां;
बा ! सत्य हरिजनाच्या, सोडुनियां गर्व, काळ भी महिम्या. ॥११॥
वत्सा ! काय वदों रे ! ? धर्मात्मा धर्म हा असा मान्य,
म्यां ताडिला ललाटीं अक्षें, अपराध हा असामान्य. ॥१२॥
सचिवांहीं, म्यां, त्वां ही प्रार्थावा धर्मराज, कन्या या
द्यावी धनंजयाला, पोटीं घालावयासि अन्याया. ’ ॥१३॥
उत्तर म्हणे, ‘ बहु बरें, न कळत अपराध घडति, परि साचे
साधु क्षमी यशस्कर; घन हि सुभूषेंत पडति परिसाचे. ’ ॥१४॥
भेटे विराट राजा त्या पांचां पांडवांसि गुरुसा च.
व्यसनांत आश्रयप्रद, अन्नप्रद, वृद्ध, होय गुरु साच. ॥१५॥
धर्मासि म्हणे, “ बा ! गा ! साधो ! जोडा नसे चि या दिवसा !
स्वपदीं सच्चितीं ही, संपादुनि सुकृतजयदयादि, वसा. ॥१६॥
तूं चि बळी स्वजनांसह तरलासि, न वायुनंदन वनौका;
वरिति सुमति सत्संगति, उतराया, वरिति मंद नव नौका. ॥१७॥
‘ तारुनि परासि, तरती हरिजन, ’ जें वर्णिलें असें कविनीं,
तें दाविलें मज तुम्हीं कुरुकुळसंततिसरोजिनीरविनीं. ॥१८॥
राज्यादि सर्व दिधलें, तुज म्यां, ‘ हें आपुलें, ’ असें म्हण गा !
शशिचूड ‘ नको ’ न म्हणे धुतर्याचें फूल वाहत्या भणगा. ॥१९॥
धर्मा ! धनंजयवधू होउ, म्हणो ‘ धन्य भाग्य ’ मत्तनया,
देसील मान वचना तूं चि प्रभु, अन्य भाग्यमत्त न या. ” ॥२०॥
पाहे धर्म धनंजयवदनातें, तेधवां नर वदे तो,
तें परिसिते म्हणति, ‘ सुख याहुनि हरिवेणुचा न रव देतो. ’ ॥२१॥
‘ प्रेम तुझें आम्हांवरि ऐसें चि दयासुधानदा ! राहो,
अभिमन्युची वधू हो, ती माझी बा ! बुधा ! न दारा हो. ॥२२॥
केंवि वरावी ? वर्तत होती कीं एक वर्ष कन्यासी !
हरिजनकथेंत शिरतां न विशंकावे शुकादि संन्यासी. ॥२३॥
तो साधुजना तोखद, ओखदसा होय खळजना भाचा,
योग्य तुला जामाता बहिश्चर प्राण जळजनाभाचा. ’ ॥२४॥
मत्स्य म्हणे, ‘ बा धर्मा ! वंद्य तुजें नंदना वना शील,
त्रिजगदघातें तुमचें पुण्यलताकंद नाव नाशील. ॥२५॥
देवा ! सौभद्रार्थ स्वीकारावी तुम्हीं च कन्या, हो !
घ्या पदरीं, हे संतति या संबंधें जगांत धन्या हो. ’ ॥२६॥
धर्म म्हणे, ‘ बहु उत्तम; हें मज अश्लाघ्य काय हो ! नातें ?
मिळतां सुवर्णमुद्रा अर्थी इच्छील काय होनातें ? ’ ॥२७॥
धाडूनि दूत धर्में आप्ताला हा विवाह जाणविला;
अभिमन्यु, राम, कृष्ण, द्रुपद, स्वकुमारवर्ग, आणविला. ॥२८॥
आणुनि संपत्ति दिल्या श्रीकृष्णें भक्तनायका सारा;
तो आटतां चि आला भेटाया मेघ काय कासारा ? ॥२९॥
अभिमनुविवाहोत्सव जग निववी, जेंवि चंद्र पुनिवेचा,
धर्म म्हणे, ‘ हूं ! कनकें मणि बहु वस्त्रान्नराशिहुनि वेचा. ’ ॥३०॥
नटनर्तकीगणांतें धर्म म्हणे, ‘ रामकृष्णागानाचा
नृत्याचा रस शिवसे जाणति, जा त्यांपुढें चि, गा, नाचा. ’ ॥३१॥
भीम म्हणे ‘ वाढा हो देवि ! अहो भूमिदेव ! जेवा, जी !
चालों नका, बसा, या, न्या व्हावे जे महेभ, जे वाजी. ’ ॥३२॥
राम म्हणे, ‘ घालाव्या कुडक्या च्यारी हि या च कानीं कीं. ’
मुनि भूशवितां, भासे मूर्तस्वर्वृक्ष याचकानीकीं. ॥३३॥
सहदेव, नकुळ, अर्जुन, अच्युत, बळ, भीम, धर्म नव्या ही
त्या नात्यासि न मिरविति, ते गमति विराटबंधु, न व्याही. ॥३४॥
श्रोते हो ! वर्णावें किति ? मज ‘ गप्पी ’ असें वदाना कीं ?
स्वल्प उपप्लव्यपुरीं उत्सव, बहु होय हो ! तदा नाकीं. ’ ॥३५॥
वदवि मयूराकरवीं श्रीराम ‘ विराटपर्व ’ चवथें, बा !
स्वल्प म्हणोनि न सोडी अमृताची शक्ति सर्व चव थेंबा. ॥३६॥
रामघन सत्प्रसादामृत जों जों बहु वळोनि वर्षतसे,
तों तों भक्तमयूर स्वार्याकेका करूनि हर्षतसे. ॥३७॥
------------------------------------------------
इति श्रीमदार्याभारते श्रीरामनंदनमयूरेश्वरकृतौ विराटपर्व समाप्तम् ॥
॥ श्रीमद्रामाचरणपद्मयोरर्पितम् ॥