मत्स्यपुरोत्तरभागीं प्रातःकाळीं च ये सुयोधन, हो !
ज्यासि जयप्राप्ति, मनीं म्हणती भीष्मादि ही सुयोध, न हो. ॥१॥
सहसा व्रजांत गांठुनि, बहु ताडुनि करुनि बद्धभुज गवळी,
षष्टिसहस्र सुगोधन तो कुरुकुळचंदनद्रुभुजग वळी. ॥२॥
गोपाध्यक्ष रथावरि बैसुनि धांवे नृपासि सांगाया,
चित्तीं म्हणे, ‘ बुडाया कुर्वधमा ! हरिसि धेनु कां गा ! या ? ॥३॥
तो राजगृहीं जावुनि रायाच्या उत्तराख्यातनयातें
नमुनि म्हणे, ‘ हो ! नेतो दुर्योधन धेनु करुनि अनयातें. ॥४॥
गोधन षष्टिसहस्र, व्रज ओस करूनि, नेतसे कुटिल,
लुटिल प्रजा हि; जो गोपीडक, तो ब्राह्मणां न कां कुटील ? ॥५॥
कवची धन्वी खङ्गी व्हा, चित्तीं रामचंद्र हि असा ध्या,
बैसा रथीं, जयश्री गोविप्रावनपरासि न असाध्या. ’ ॥६॥
उत्तर म्हणे, ‘ असें जरि मीं एकाकी लहान, परि सवतें
यश जोडितों चि असता सारथि तरि, कथन मज न परिसवतें. ॥७॥
होता परम निपुण, परि त्या ख्यात रणांत सारथि गळाला,
झांलो छिद्र भलतसा; अडले म्हणतात ‘ सार ’ थिगळाला. ॥८॥
कर्णादिकांसि देता समरी वैराटिकेसरी करिता,
जिष्णुपुढें असुरजनीं कोण्हीं वैरा टिके सरी करिता ? ॥९॥
मिळवा कोण्ही तरि, हो ! धैर्याचा मात्र उदधि सारथि जो,
कुरुभटसमूह पावुनि मज, जेंवि हिमासि सुदधिसार थिजो ’ ॥१०॥
ऐसे बहुत चि बोले तो बालिश बोल बायकांमाजि.
चित्रपटकटकसें शिशुभाषण येईल काय कामा ? जि ! ॥११॥
तें परिसुनि एकांतीं पार्थ म्हणे, ‘ देवि ! कृष्णसखि ! जावें
उत्तरसारथि होवुनि म्यां, त्वां मजवरि कदापि न खिजावें. ’ ॥१२॥
कृष्णा म्हणे, ‘ बहु बरें, व्हा मारुत, हो पलाल खळबळ तें;
मद्धृदय न अरिसैन्यें, तुमच्या दैन्यें चि फार खळबळतें. ॥१३॥
त्या उत्तरासि सांगे, ‘ सारथ्य बृहन्नडा करिल; यातें
सूत करुनि, विजयानें नेल बहु खांडवीं अरि लयातें. ॥१४॥
सारथ्यगीतनृत्यप्राप्तीचा हेतु जिष्णुसहवास;
पूर्णत्वाचा लागे पशुपां, भ्रमतां हि विष्णुसह, वास. ॥१५॥
भगिनीमुखें चि विनवा तन्मतिला उत्तरा चि वळवील,
अतिसहवासिवच मना, कतक कलुषिता वना निवळवील. ’ ॥१६॥
उत्तर म्हणे, ‘ कुरुकटक न पशूंस, यशास हि, स्वसे ! नेतें,
अवकाश पळ हि नाहीं कळवाया वृत्त हें स्वसेनेतें. ॥१७॥
माजें सारथ्य करो तुजिया वचनें बृहन्नडा, गमला
हा चि सदुपाय, वत्से ! लागो अपकीर्तिचा न डाग मला. ’ ॥१८॥
ती धांवत जाय, म्हणे, ‘ गानादिक हें बृहन्नडे ! राहो,
समयीं सारथ्यगुण न उघडूनि कदर्युचा न डेरा हो. ॥१९॥
गोधन षष्टिसहस्र स्वपुरा नेताति हरुनि कौरव हो !
गौरव हो न बुधजनीं, त्या मेल्यांला अनंत रौरव हो. ॥२०॥
त्यांवरै जातो उत्तर, त्याचें सारथ्य ये करायास,
सुखद इहामुत्र हि गोविप्रत्राणोत्थ जे करायास. ॥२१॥
देता जाला पूर्वीं तुज निजसारथ्य सव्यसाची, हो !
सैरंध्रीची वाणी, व्हाया गोवत्सभव्य, साची हो. ’ ॥२२॥
उठल्या उत्साहाच्या त्या शांतश्रीमदुदधिवरि लहरी;
धरितां हनु, ‘ ननु ’ म्हणतां, प्रणतांचें कां न सुदधि वरिल हरी ? ॥२३॥
देवातें भक्ति तसी पार्थातें ने करूनियां वश, हो !
त्याच्या हि मनीं होतें कीं विश्वामाजि आपुलें यश हो. ॥२४॥
उत्तर म्हणे, ‘ बहु बरें, देवुनि वचनास मान आलीस; ’
बोले बृहन्नडा स्मितपूर्वक, ‘ विटवील कोण आलीस ? ॥२५॥
वाद्य असो, नृत्य असो, हो अभिनय, किमपि गान अथवा हो,
जाणोनि कसें म्हणतां समरांत बृहन्नडा चि रथ वाहो ? ’ ॥२६॥
वैराटि म्हणे, ‘ नर्तनें हो, कीं वादक तथैव गायन हो,
सारथि हो या समयीं, एक हि वश कौरवांसि गाय न हो. ’ ॥२७॥
ऐसें वदे, कवच दे त्या श्रितकुशलावहास ल्यायाला,
तद्धारणीं चुके तों कन्या पाहोनि हांसल्या याला. ॥२८॥
ज्याचें किरातरूपिप्रभुधिक्कृतिगर्भ गाय नाक वच,
हांसे आपण हि, म्हणे, ‘ ठावें मज काय गायना कवच ? ’ ॥२९॥
लेवविलें राजसुतें, जाणों ल्याला कधीं न तो कवच,
सच्चरित अप्रगल्भ हि हृदयहर जसें स्वधीन तोकवच. ॥३०॥
होउनि सिद्ध रथावरि चढतां चि, सहोत्तरा तिच्या आली
म्हणती, ‘ बृहन्नडे ! तुज वीरश्री गौरवावया आली. ॥३१॥
दिव्यरुचिरवस्त्रांतें आण करायासि बाहुल्या, कटकें
जिंकुनि अरिचीं तूं हीं; बहु शोभाया स्वबाहु, ल्या कटकें. ’ ॥३२॥
‘ उत्तर आणिल तें तें, जें निर्माया सुबाहुल्या लागे,
मज कवच लेववुनि, हा आपण चि पहा सुबाहु ल्याला, गे ! ’ ॥३३॥
ऐसें बोलुनि हाकी उत्तररथरत्न कृष्णसारथि तें,
सांगे स्वदास्य सिंहा, हरवाया तेज, कृष्णसार थितें. ॥३४॥
म्हणति स्त्रिया प्रयाणीं, ‘ तुजला मंगळ बृहन्नडे ! हो तें,
जें खांडववनदाहीं नरसारथ्यांत जाहलें होतें. ’ ॥३५॥
द्विज म्हनति ‘ या यशस्वी होउनि; जयदायि आज्यजिर तें हो.
खळबळ सदाश्रितजनीं, दहनीं पुष्कळ हि आज्य, जिरतें, हो ! ’ ॥३६॥
सत्वर बृहन्नडा नृपसुतरथ नेवूनि जाय बाहेर,
त्यासि म्हणे, “ ‘ हेरावें ’ म्हणसी ‘ कुरुकटक काय ? ’ बा ! हेर. ” ॥३७॥
आपण चित्तांत म्हणे, ‘ मेळवितों आजि, नीच हो ! यश मीं,
शिवमूर्तिसी श्मशानीं अस्मज्जयहेतु ती च होय शमी. ’ ॥३८॥
कुरुकटकासि पहातां तो उत्तर बाळ फार गडबडला.
स्वपरबळाबळ नेणुनि बालिश बहु बायकांत बडबडला. ॥३९॥
बोले, ‘ बृहन्नडे ! हें कुरुबळ कल्पांतसिंधुसें गमतें,
ने रथ पुरांत, माजें मन नयन हि पाहतां बहु भ्रमतें. ॥४०॥
दुर्योधन, दुःशासन, कर्ण, कृप, द्रोण, भीष्म ज्या कटकीं
त्यांत मरेन चि शिरतां, काट्यांवरि घालितां चिरे पट कीं. ॥४१॥
एकाकी मीं, रिपु बहु, या ऐशा कीर्ति काय हो ! मरणीं ?
पश्वर्थें केंवि करूं सर्वपुमर्थदसुकायहोम रणीं ? ॥४२॥
आज्ञा नसतां आलों, रागें न भरेल काय हो ! तात ?
रोमांच घर्म कंप प्रकट, व्यापूनि काय, होतात. ’ ॥४३॥
पार्थ म्हणे, “ राजसुता ! आतां वदतोसि हें अहा ! काय ?
शय्येवरि न पडाया योग्य, रणक्षितिवरी च, हा काय. ॥४४॥
तेव्हां स्त्रियांत तैसें बोलुनि, आतां असें कसें वदसी ?
एक हि बाण न सुटला, नाहीं अद्यापि झळकला सदसी. ॥४५॥
गोमुक्त्यर्थ न शिरतां धैर्यें या वीरनायकानीकीं,
करिजेल हास्य, आस्य प्रेक्षुनि, नगरांत बायकानीं कीं. ॥४६॥
देउनि सारथ्य मला घेउनि आलासि काय उत्साहें ?
नेनसि काय, पलायन करितां, लोकांत होय कुत्सा, हें ? ॥४७॥
निजवृत्तिरसीं लोभी हो, साधो ! बुद्धि अन्यथा न करीं.
निजहितलोभें धरितो शिशु हि मुखीं एक, अन्य थान करीं. ॥४८॥
सैरंध्रीनें कथिलें माजें सारथ्यनिपुणपण साचें,
टाकिति न बाह्यरंगें फळ नीरस म्हणुनि निपुण पणसाचें. ॥४९॥
मीं भांडेन, स्थिर हो, तुज हि मज हि विहित आजि न परतणें;
हरितील न गाईंतें, भीतिल, करितील आजि न परतणें. ॥५०॥
मरती च, न दाखविती, पावुल हि पळोनि, तोंड लेंक वित्या,
म्हणती ‘ सद्यः कीर्तिप्रज्ञाघ्नस्पर्श तोंडलें ’ कवि त्या. ॥५१॥
कज्जळ कस करूं, जें सैरंध्रीकृत दुधासम स्तवन ?
सन्मन अनृता भीतें, जेम्वि कुठारायुधा समस्त वन. ॥५२॥
ती या मुखीं न येतां, यावी सुयशेंकरूनि सुखमा जी,
दावाया सैरंध्रिप्रति हे मति वरिल केंवि मुख माजी ? ॥५३॥
चाल, उगा चि अपयशें न तुजें मुखचंद्रमंडल मळावें,
होतों बळाब्धिपारद, पारदतुल्य न तुवां डळमळावें. ” ॥५४॥
ऐसें पार्थ वदे तों भिवुनि कटकबागुलासि पोर पळे,
शत्रुप्रतापपदावज्वाळानीं तो कुरंग होरपळे. ॥५५॥
पार्थ म्हणे, “ प्रभुपासीं वर हा घे, हें चि याचितों, डमरो !
‘ बोलेल बहु निरर्थक, तो स्वजनीं दावितां चि तोंड मरो. ’ ” ॥५६॥
त्यास हि म्हणे, ‘ अस्रे ! रथगिरिशिखरच्युत महोपळ ! उभारे,
आली तुला वराया कीर्ति, पराड्मुख न हो, पळ उभा रे ! ॥५७॥
हरिनीळहार कृष्णव्याळ नव्हे, स्वभ्रमें पळविलास;
वरितां अकीर्ति, न रुचे रंभेसीं हरिस ही पळ विलास. ’ ॥५८॥
तो किमपि न दे उत्तर उत्तर, उत्तर दिशेसि सोडूनीं,
जाय पळत दक्षिणदिग्गत नगरीप्रति अकीर्ति जोडूनीं. ॥५९॥
जाय पुरीप्रति, जोडी अपकीर्ति, सुकीर्ति हातिची दवडी,
मातेप्रति प्रो जसें मुद्रा हारवुनि, मेळउनि कवडी. ॥६०॥
धावें पार्थ धराया, कीं त्यास हि अपयशीं न मज्जन हो,
उपदेशी भगवान् कीं, ‘ असि मज्जनरीति हो, नमज्जन हो ! ’ ॥६१॥
सकळा सकळा विद्या श्रुतमात्रा ज्यासि राहिली पाठ,
अरिनीं कुसंगतिस्तव त्या तैशाची हि पाहिली पाठ. ॥६२॥
वाटे, पुढें पळे तो स्त्रीसंगविरक्तधी कुमारमणी,
पुत्रस्नेहें धांवे त्यामागें शंभुची उमा रमणी. ॥६३॥
किति हासले विलोकुनि, झाले किति चकित बुद्धनय शस्त्री,
कां वांछील भगवतीहुनि अन्या, करुनि युद्ध न, यश स्त्री. ॥६४॥
कौरव म्हणति, ‘ नव्हे स्त्री, व्यक्त स्त्रीवेषपुरुष तर्कशतें,
मृदुलप्रकृति स्त्रीवपु, एवंविध धावनीं न कर्कश तें. ॥६५॥
सारोप्य अर्जुनाचें, बाहु परिघसे, तसें चि कीं शिर तें;
पय रुचिकसम, परिरसिकमन काय पयीं तसें चि कीं शिरतें ? ॥६६॥
हा क्लीव हि समवेषें, क्लीबीं ऐसें परंतु तेज नसे;
वाटति देखावेसे काय पुरुषवेष षंढ ते जनसे ? ॥६७॥
काल त्रिगर्तपतिनें गोग्रह केला, म्हणोनि पृतनेला
घेउनि विराट गेला, बहुधा तो पितृवनीं न मृत नेला. ॥६८॥
तत्सुत उत्तर होता नगरीं, तो परिसतां चि गोहरणा,
पार्थासि करुनि सारथि आला, जो बाळ सुलभमोह, रणा. ॥६९॥
हरिण जसा सिंहीला, सेनेला पाहतां चि तो भ्याला;
सुयशाहुनि जीवित बहु बाळाला, जेंवि वित्त लोभ्याला. ॥७०॥
कातर रथी पळाला, या अयशःसागरीं तरायाला
मानी अर्जुन सारथि त्यामागें धावला धरायाला. ’ ॥७१॥
वदति असें कुरु जों, तों पदशत धावोनि कुंतळीं धरिला;
जाणों अपकीर्तिनदीपतित शिशु बळेंकरूनि उद्धरिला. ॥७२॥
स्वमनीं पार्थ म्हणे, “ रे ! जरि विहित रडें चि मानितोस, रड;
‘ मीं प्रभु, ’ हें अज्ञ पदीं कीं कुंपीं बसुनि मानितो सरड. ” ॥७३॥
उत्तर म्हणे, ‘ नको, गे ! पायां पडतों बृहन्नडे ! सोड,
जोड दिली, दुखउ नको; केवळ पितृकरतळस्थ हा फोड. ’ ॥७४॥
जों जों वैराटि रडे, तों तों तो पार्थ सदय, परि साचा
खळसा हांसे, लोहा निंद्य नव्हे ग्रावभा परिसाचा. ॥७५॥
दाटूनि हित कराया तत्केशांतें धरूनि आकर्षी,
बसवी रथीं बळें, हरिभजनीं मंदासि जेंवि नाकर्षी. ॥७६॥
कुरवाळूनि म्हणे, ‘ गा ! राजसुता ! योग्य तूं न कांपला,
मृदुलत्व म्लानत्व स्वीकारुनि, जाहलासि कां पाला ? ॥७७॥
तुज उत्साह नसे तरि करितों घेवुनि धनूस मीं रण, हो !
मज दहनासि कुरुवनीं जायासि सहाय तूं समीरण हो. ॥७८॥
घे रश्मि करीं, सारथि हो, हूं, चालीव आजि हे बाजी,
मीं मथितों कुरुपृतना, करित्ये क्षुब्धाब्धिसीं हि हेवा जी. ’ ॥७९॥
जाय शमीप्रति किंचित्स्वस्थासि रथीं बळें चि वाहूनीं
आलिंगाया समरप्रियसख गांडिवचाप बाहूनीं. ॥८०॥
द्रोण म्हणे, ‘ कौरव हो ! काय पहातां रथाकडे चि ? रहा;
अद्भुत अश्वाश्रुध्वजकंपाद्युत्पात ही पहा चिर हा. ॥८१॥
परिसा बरें शिवांचें रुदित जरि असे असुस्वर, क्षण हो !
व्यूह रचा, हो ! रक्षा गोधन, हें यश, असुस्वरक्षण हो. ॥८२॥
न बुडे बळें बुडवितां, उसळे चि जळीं जसा अलाबु, बुळा
दिसतो, तसा चि जपतो स्वयशा, न जपे तसा भला बुबुळा. ॥८३॥
राया ! भीष्मा ! सकृदपि या नयना पाहवेल न क्लीबा,
बहुरूप अर्धनारीश्वरसा तद्भक्त हा हि नक्ली बा ! ॥८४॥
आइकतों कीं, हा कृश केवळ होता तपें, परि भवातें
झाला बहुमत समरीं, करिल पराच्या न कां परिभवातें ? ॥८५॥
अस्मत्परिभव करितो, आजि नभातें शरव्रजें भरितो,
गोधन हरितो, वरितो कीर्ति, अशनिभृदरिकरिघटाहरि तो. ’ ॥८६॥
कर्ण म्हणे, ‘ कुरुगुरुजि ! स्तवितां मज यूथपतिपुढें कलभा,
म्हणतां शकलीं बहु रविकांतगिरिपरिस रविपरिस बल भा. ’ ॥८७॥
भूप म्हणे, ‘ कर्णा ! हा जरि अर्जुन, देव पावला नवसा;
जाइल पुन्हां वनाला बंधुसह अरण्यावासि मानवसा. ॥८८॥
अथवा असेल दिसतो तैसा, तरि परिभवें बुळा लाजो,
मर्कट नुरे चि, झोंबे हनुमत्पाणिस्थिता गुळाला जो. ’ ॥८९॥
जावुनि शमीनिकट, तो विजय म्हणे, ‘ स्वस्थ तूं कुमारा ! हो;
पाहुनि मत्कृतखळबळमथन चकित भगवती उमा राहो. ॥९०॥
मद्भुजबळानिळें हे ध्वस्त अहितकटक अभसारें हो;
परि हीं तुजीं धनुष्यें क्षण हि न टिकतील दभ्रसारें, हो ! ॥९१॥
आहेत पांडवांचीं दिव्यास्त्रें या शमीद्रुमीं, उतरीं;
पाहुनि पळोत त्या हरिनखरांतें सर्व खळबळें कुतरीं. ’ ॥९२॥
उत्तर म्हणे, ‘ शमीवरि शव आहे ऐकिलें, न शिववे चि;
सांगसि असें कसें ? गे ! कुणपाचा स्पर्श सर्व शिव वेची. ’ ॥९३॥
पार्थ म्हणे, ‘ कैंचें शव ? ठकवुनि बुडवीन काय हो ! यश मीं ?
त्या शस्त्रांला, असतां शव, आश्रय योग्य कय होय शमी ? ’ ॥९४॥
वृक्षीं वेष्ठन सोडुनि, नमुनि म्हणे, ‘ रक्ष, आयुधग्रामा !
आलों शरण तुला मीं, लोक जसा रक्षआयुधग्रामा. ’ ॥९५॥
जाणों, सच्छस्त्रें हो ! स्वाश्रयपांडवजयार्थ सुतपातें
करितां, व्हाया सद्यश लोकत्रितयांत अंधसुतपातें. ॥९६॥
वैराटि चापखङ्गाद्यायुधचिन्हें समस्त वाखाणी,
भवभीतिसि कवि, ज्यांच्या करुनि हरिस्तवसम स्तवा, खाणी. ॥९७॥
वर्णुनि शस्त्रांसि, पुसे, ‘ कवणांचीं कवण यांत सांग मला,
त्या पांडवांसि यांचा व्यसनांत त्याग योग्य कां गमला ? ’ ॥९८॥
पार्थ म्हणे, ‘ वैराटे ! ज्यावरि शतकनकबिंदु पाहसि, तें
गांडीव, यशें जोडी जेणें विधुहूनि शुभ्रवाह सितें. ॥९९॥
ब्रह्मा धरिता जाला गांडीवातें सहस्रमित वर्षें,
धरिला प्रजापतीनें त्र्युत्तरपंचाशदब्द हा हर्षें. ॥१००॥
मग पंचाशीति समा शक्रें, सोमें हि पंचशत अब्द,
वरुणें शत संवत्सर, याणें लागों दिला न दुःशब्द. ॥१०१॥
आहे पार्थापासीं सार्धद्वात्रिंशदब्द हा चाप;
राहे चरमापत्याजवळि प्रेमार्द्रधी जसा चाप; ॥१०२॥
जें इंद्रगोपचित्रित, तें धर्माचें धनुष्य जाणावें;
ज्यावरि कांचनवारण तें भीमाचें मनांत आणावें. ॥१०३॥
धरिजें तें त्र्यर्कांकित कार्मुक नकुळें समस्तयोधनुतें,
सौवर्ण शलभ ज्यावरि, सहदेवाचें चि होय हो ! धनु तें. ’ ॥१०४॥
सांगे असें चि वर्णुनि गुण, तूण, कृपाण, बाण, जाणाया
तें गांडीवाद्यायुध उतरुनियां आपुलें चि आणाया. ॥१०५॥
“ कोठें बृहन्नडे ! ते, ज्यांचे गुण हर्ष नित्य नव देती ?
कोठें देवी, जी ‘ व्हा भस्म ’ असें त्यां खळांसि न वदे, ती ? ” ॥१०६॥
पार्थ म्हणे, ‘ वैराटे ! जो अर्जुन, तो चि मीं, असें जाण;
जो कंक, तो चि राजा धर्म, नव्हे अनृत हें, तुजी आण. ॥१०७॥
बल्लव भीम, ग्रंथिक तो चि नकुळ, तंतिपाळ सहदेव,
सैरंध्री ती, जीचा कैवारी वृष्णिमूर्तमहदेव. ’ ॥१०८॥
वैराटि म्हणे, ‘ ज्यांतें जाणति, जपति हि पूज्यपाद शमी,
सांग बरें, जाणतसें नामें त्या शक्रसूनुचीं दश मीं. ’ ॥१०९॥
सांगे, ‘ अर्जुन, फाल्गुन, जिष्णु, किरीटी, ’ असीं दहा नावें,
त्यांची निरुक्ति हि करी, कीं तेणें सर्व सत्य मानावें. ॥११०॥
दशनामनिरुक्तिप्रति परिसुनि पार्थासि तो करी नमन,
प्रार्थूनि म्हणे, ‘ समरीं सारथि होवुनि, सुखी करीन मन. ’ ॥१११॥
घेवूनि आयुधांतें उत्तर उतरे, परंतु संदेह
उठला, जेंवि रविपुढें उठती उदयीं च दैत्य मंदेह. ॥११२॥
‘ सत्य चि अर्जुन जरि तूं, कां क्लीब ? क्लीबवेष कां धरिला ? ’
पार्थ म्हणे, “ गुर्वाज्ञा, म्हणुनि व्रत वर्ष एक आदरिला. ॥११३॥
बैस रथीं, तूं माजा सारथि हो, तरणिचा जसा अरुण;
न्यावा चमूवरि तुवां रथ, तरुणीप्रति जसा स्मरें तरुण. ॥११४॥
आतां सोडवितों पशु, खळबळ पळ न लगतां चि पळवीतों,
मीं ‘ विजय ’ असें तुज चि न, सकळां ही कौरवांसि कळवीतों. ” ॥११५॥
धृतरश्मिकुमार म्हणे, ‘ दारुक कीं आजि मातली लाजो,
दंड करावा या कुरुसेनेला, योग्य मातलीला जो. ’ ॥११६॥
काढूनि शंखवलयें, ल्याला पुंभूषणें, सितें वस्त्रें,
वांधोनि केश माथां, प्राड्मुख होवूनि आठवी अस्त्रें. ॥११७॥
तों तीं तद्दृष्टिप्रति गोचर होऊनि करुनिया प्रणती,
‘ आम्हां स्वकिंकरांला आज्ञा काय ? प्रभो ! ’ असें म्हणती, ॥११८॥
त्यांसि नमुनि जिष्णु म्हणे, ‘ या, या हृदयीं रहा, असीं न रहा;
आधीं वीररसीं, मग बुडवावा सद्यशोरसीं नर हा. ’ ॥११९॥
शिरतां अस्त्रें चित्तीं, निजतेजें भानुला मनीं कढवी,
चढवी गुण गांडीवीं, तन्नादें कंप महिस ही पढवी. ॥१२०॥
उत्तर म्हणे, “ खरा तूं, नाहीं कोण्ही च कीं परि सहाय
म्हणतों मनांत पार्था ! बहु वनसार्थाधिपापरिस ‘ हाय ! ’ ” ॥१२१॥
हांसे जिष्णु म्हणे, “ गा ! तुजला असहाय पार्थ कां गमला ?
आहे प्रसाद गुरुचा, कोण अधिक यापरीस सांग मला ? ॥१२२॥
मागें युद्धें केलीं, म्हणवूनि जनांत घेतलें धन्य,
तेव्हां गुरुप्रसादाहूनि मज सहाय कोण तो अन्य ? ॥१२३॥
असतां द्रोण, सुरेश्वर, हरि, हर हे गुरु समर्थ, असहाय
एकाकी पार्थ कसा ? न म्हणावें त्यजुनि वीररस ‘ हाय ! ’ ” ॥१२४॥