कर्णपयानकोपें झालीं सैन्यें समस्त एकवट,
त्यांत धनंजयरथ तो, जैसा प्रलयार्णवांत एक वट. ॥१॥
जाणों बुभुक्षितांतें तो दुष्काळांत अन्न दे खाया,
सदयोदारा शतमख ये होवुनि सुप्रसन्न देखाया. ॥२॥
होत्ये यदंशशेषश्वसज्वळनांत हे समिद् धरणी,
त्याचा सखा धनंजय होय खलशलभलया समिद्ध रणीं. ॥३॥
कोणाचें हि शरीर द्व्यंगुळ हि अविद्ध तो न राहूं दे,
मुनि म्हणति, ‘ खळांस हि गति बा ! नारायणसखा ! नरा ! हूं, दे. ’ ॥४॥
वाहे शोणितपूरीं शतश इभांचें इ कुणप, टोळांचा
मद किति गरुडीं ? सद्भटभुजभुजग हि वरिति गुण पटोळांचा. ॥५॥
इतरांची काय कथा ? अद्भुत संगर करी सहाय कृप,
होय विरथ, सुर म्हणती, ‘ सिंह पथ न दे करीस हा सकृप. ’ ॥६॥
बीभत्सुपुढोनि विरथ सुविकळ कृप पळविला नरवरानीं;
तद्ध्नुचा भयद भटां,हरिचा हि तसा गजां न, रव, रानीं. ॥७॥
मग गगनगनगभिन्मुखसुरमत गुरुसीं हि अनव मुनि नर तो
कलह करी, कीं इतरीं गुरुकळहीं, यासि जन वमुनि, न रतो. ॥८॥
प्रथम गुरुच्या रथासीं रथ भिडवी क्षिप्र, मग अकोपार्थ
शिर चरणांसी प्रार्थुनि, ‘ करुणेसि ’ म्हणे, ‘ त्यजूं नको, ’ पार्थ. ॥९॥
‘ गुरुजी ! करा प्रहार प्रथम, तुम्हीं गुरु, अविप्र हा, रामीं
शांतनवसा, करीन, प्रमुदित व्हाया कवि, प्रहारा मीं. ’ ॥१०॥
सच्छिष्यावरि सद्गुरु आधीं प्रेमेंकरूनि आशींची,
मग वृष्टि बहिःकोपें सुबहु करी बहुविधेषुराशींची. ॥११॥
गुरुला विविधशरांची वाहे तो रागराशि लाखोली,
भेटे अस्त्रतति तया, जसि पाहों सागरा शिला खोली. ॥१२॥
शरसागरीं तिमिंगिल गुरु, पळभरि होय शिष्य कंप्र तिमी,
परिभूत द्रोण म्हणे, ‘ श्रीभार्गवसा चि धन्य संप्रति मीं. ’ ॥१३॥
त्या समयीं शंभु म्हणे, ‘ जरि तूं रुससील तरि उमे ! रूस,
गुह काय ? विदारिल हा वत्स विजय शक्तिनें सुमेरूस. ’ ॥१४॥
करिती सूर्यास्तोदय एकमुहूर्तांत एक शतदा ते,
त्यांत न एकासम ही होती मेघांअसे हि शत दाते. ॥१५॥
पाडिति शरपटलानीं जेव्हां नभ भरुनि अंधकारा ते,
कातर म्हणति, ‘ असमयीं करविसि कां कल्प अंधकाराते ! ? ’ ॥१६॥
द्रोणार्जुन तुल्यक्रिय बिंबप्रतिबिंबसे चि ते गमती,
किति कुरुकटकें ? प्रेक्षक वृत्रघ्नाचीं हि लोचनें भ्रमती. ॥१७॥
समरीं शंकरसा च द्रोण गमे, जिष्नु ही अजित साच;
त्रिजगद्विस्मयकर अति अद्भुत परिभव हि तो अजि ! तसा च. ॥१८॥
सुरमुनि म्हणति, ‘ छात्रें छिन्नध्वजकवच गुरु पहा केला,
जालीं बळें पराड्मुख, मारितसे कुमति कुरुप हाकेला. ॥१९॥
अधिका न क्षत्रियता, न न्यूना विप्रता; पहा तरणा
नसतां हि कसा, ज्याचे विक्षत हि न विप्रताप हात रणा. ’ ॥२०॥
केला शीघ्रास्त्रबळें शिष्यें परिभूत सत्वराशि कवी,
या चि सुयशोर्थ बहुधा न शिके हा, गुरु हि न त्वरा शिकवी. ॥२१॥
अश्वत्थामा धांवे रक्षाया संकटांत जनकास,
जन कासया विते सुत, कसिते न करावया भजन कास ? ॥२२॥
इंद्रोपेंद्र तसे ते गुरुबंधु सखे कृपीपृथातनय,
धन यश ज्यांचे, त्यांत हि उठवी वैरासि शकुनिचा अनयें. ॥२३॥
तो उत्तमर्णसा गुरु सोडुनि, पुत्राकडे हरिसख वळे,
स्वपितृप्रतापहरणें द्रौणि हि हृतमणिफणीपरिस खवळे. ॥२४॥
सांवर्तिकमेघांच्या लाजाव्या द्रौणिसायकां धारा,
सत्ताताहुनि होइल सुत, म्हणवायासि ‘ हाय ! ’, कां धारा ? ॥२५॥
‘ अत्युग्र राम कीं हा द्विज, ’ म्हणति असें पराशरव्यास,
‘ काळ हि चुकेल, याचा न चुकेल चि शर परा शरव्यास. ’ ॥२६॥
बहु कल्पना सुकविसा, विजय हि बहु शरपरंपरा, व्याला,
भंगूं पाहे समरीं गुरुपुत्रास हि, जसें पराव्याला. ॥२७॥
ज्या इषुनीं क्षत होतां रागें वरि आंत ही हर भरे, हो !
ते द्रौणिशरा, जैसे कपिला दासें दिले हरभरे, हो ! ॥२८॥
तैं सुर, नर, हय, गज, ‘ हा ! ’ म्हणति, न याचे चि आठ वाजी ‘ हा ! ’
घडलें गुर्वघ जाया, अद्भुत संग्राम आठवा जी ! हा. ॥२९॥
आचार्यसुतें केली छिन्ना, सोडूनि खरशरा ज्या, तें
पाहुनि मुनि हि म्हणति, ‘ हा ! पावेल अजातरिपु न राज्यातें. ’ ॥३०॥
भीष्मेंद्रमुखनरामर म्हणति, ‘ भला गा ! भला महाबाहो !
त्वद्दोःप्रताप अतितर अद्भुत चि, कधीं उणा न हा बा ! हो. ’ ॥३१॥
हांसे नारायणसख तें सज्य पुन्हा करून कोदंड,
जें काळासि म्हणे, ‘ गा ! झांक, मजपुढें करूं नको दंड. ’ ॥३२॥
शक्र म्हणे, ‘ व्यर्थ भरीं हा, त्यजुनि विचार तर्क, विप्र भरे,
वत्सा ! तुझ्या शरानीं केला सुप्रभ हि अर्क विप्रभ रे ! ’ ॥३३॥
स्त्रीस म्हणे, ‘ वत्सा चे तैसे गुरुसूनुचे शचि ! न भाते,
अक्षय्य काय असते, तरि करिते निरवकाश चि नभा ते. ’ ॥३४॥
प्रतिरवमिषें, शरानीं भरतां, कुंथावयासि नभ लागे;
देवी म्हणति, ‘ सख्यानो ! दारुण हा क्षत्रधर्म, न भला, गे ! ’ ॥३५॥
करितां तुमुलतर समर, शर सरले, गुरुसुतीं उणें होतें,
पूर्णत्व पांडवीं, हें एकें हरिदासतागुणें हो ! तें. ॥३६॥
झाले भाते समरीं,आणाया गुरुसुतीं उणीव, रिते;
देती सामग्री जय, तरि कां सन्नीतिला गुणी वरिते ? ॥३७॥
भंगे अश्वत्थामा; अश्वत्था मा क्कचित्, सदा हरिला;
तसि इतरासि जयश्री, नित्य हरिजनासि, तो तिणें वरिला. ॥३८॥
करितां पार्थें गुरुसुत घटजमुनिवरें समुद्रसा चि रिता,
धावे कर्ण, गजावरि खर नखरानीं तया जसा चिरिता. ॥३९॥
कर्णधनुर्ध्वनि कर्णीं शिरतां, तिकडे चि पार्थ तो पाहे,
राहे अश्वत्थामा, कढले चधले अपार कोपा हे. ॥४०॥
पार्थ म्हणे, ‘ रे ! कर्णा ! बहु भट मजसीं भिडोनि गडबडती,
ही आजि आजि आहे, नोहे केली सभेंत बडबड ती. ॥४१॥
तेव्हां पांच हि आम्हीं होतों दृढ धर्मपाशबद्ध, रणीं
आतां सुटलों, खळ हो ! कसि हरिली कपट करुनि सद्धरणी ? ॥४२॥
कत्थन सुकर, सुदुष्कर समर, अमर यदरवींद्रमुख हि तुला
होउत सहाय, न जयें होय खळांच्या कधीं हि सुख हितुला. ॥४३॥
जैं गांजिली कुरुसभेमध्यें त्वां बायको निकर करुनीं,
बांधावें चि यमें तुज पुरजे तें नायकोनि करकरुनीं. ॥४४॥
तेव्हां यमधर्माचें अस्मद्धर्मापुढें न बळ मांडे,
आजि तुम्हीं ओगरिलां काळामत्रांत सर्व खळ मांडे. ’ ॥४५॥
कर्ण म्हणे, ‘ आलों बळ दावायास, स्वयें पहायास,
शोभे समरीं च, तसा न भटांचा भाषणीं महायास. ॥४६॥
बहु कर्म करी पंडित, कथनावसरीं हि थोडकें च वदे,
शाकांत प्रवर जसें पथ्य हि, तैसें न दोडकें चव दे. ॥४७॥
केला पण पूर्ण म्हणसि, आलासि करावयास कळहास,
ये, मजसीं युद्ध करीं, भग्न, करोत हे सकळ हास. ॥४८॥
तूं काय ? वासवास हि पळवीन रणांत आजि भंगुन, गा !
बहु हास्य येतसे, कीं, पाहे लंघावयासि पंगु नगा ! ’ ॥४९॥
पार्थ म्हणे, ‘ राधेया ! करुनि पलायन हि तूं न लाजसि रे !
साध्वी विटालयीं जसि, तसि बहुधा त्वन्मनीं न लाज सिरे. ॥५०॥
मारविला मजकरवीं त्वां अनुज, न तारिला, न तारविला,
जारविलासन्याय स्मरला या खळतमाचिया रविला. ’ ॥५१॥
ऐसें वदोनि, सहसा, न पहावा साधुधर्महानिकर
म्हणुनि शरांचा सोडी, झांकाया त्यासि, तो महानिकर. ॥५२॥
हस्तीं हाणुनि खरतर शर, नरमुष्टीस कर्ण समरांत
सहसा विशीर्ण करिता, जाला होता हि मान्य अमरांत, ॥५३॥
त्या कर्णाच्या तोडी तो हरितनुजनु धनुष्यवल्लीला.
जन म्हणति, ‘ मूर्त काळ चि हा, वरि दावी मनुष्यवल्लीला. ’ ॥५४॥
उग्रें कोपें रोपें भेदी मूर्छार्थ अंगपोराला,
रवि हि तमांत बुडे हो ! न घडों द्याया कुसंग पोराला. ॥५५॥
हरिहरगुरुप्रसादज अमित निजभुजप्रताप कळवीला,
वळवीला कर, जाणों तो गर्वयशःसमेत पळवीला. ॥५६॥
भीष्मावरि जातां धृतिमान् केला जेंवि वज्रकवचानीं,
श्रांत भ्रांतस्वांत स्वांतत्रासार्त उत्तर वचानीं. ॥५७॥
तद्धैर्यार्थ स्वयशें वर्णी स्वमुखें, जर्ही न वानावीं,
स्थिर त्यासि रथीं करि, गुरुजैसा हरिच्या सुमानवा नावीं. ॥५८॥
कुरुगुरुपितामहांसीं जिष्णु करायासि जाय कळहातें,
कीं साधुच्या हि साधु हि पावे दुःसंगभंगफळ हातें. ॥५९॥
नारायणप्रियसखें सर्वमुनिवरें नरें सुरोपास्यें
प्रथम चि पितामहाचा ध्वज तोडुनि पाडिला सुरोपास्यें. ॥६०॥
पाखंडागम रोधूं पाहति, येवूनि आड, वेदास;
पार्थासि तसे कौरव, ज्या यावे एक आडवे दास. ॥६१॥
खळ दुःशासन दुःसह आणि विविंशति विकर्ण हे चवघे
विजयें दमुनि पळविले, दोष जसे दाशरथिगुणें अवघे. ॥६२॥
सर्व महारथ म्हणती त्या विजया, वासवा जसे नग, ‘ हूं, ’
केले पिष्ट असुरगिरि जेणें, किति त्यास ते ससेन गहूं ? ॥६३॥
हरिनीं गजसे, कुरुभट जिष्णुशरानीं उदंड लोळविले,
दिव्यांगनांसह गगनयानीं मग बैसवूनि बोळविले. ॥६४॥
क्षतजनद्या पक्षिरवें म्हणती वीरांसि, ‘ आयका, मन द्या,
आम्हांऐशा बुडवुनि करिति दुज्या पूर्ण काय काम नद्या ? ’ ॥६५॥
युद्ध न हरिसख मांडी, त्या सद्यःस्वर्गहेतुसत्रास;
जाले सहस्रशः कृतकृत्य, न जाले कृतार्थ सत्रास. ॥६६॥
कर्ण, कृप, द्रोण पुन्हा धावुनि पार्थासि एकदा चि तिघे
झांकिति दिव्यास्त्रानीं, तैं तो पळभरि महाचळस्थिति घे. ॥६७॥
योजुनि इंद्रास्त्रातें, पळवी सकळांसि तो महातेजा,
भीतिल त्या रिपु न कसे ? भीती गगनस्थ ही पहाते ज्या. ॥६८॥
द्रोणाद्यखिळ पळवितां, भीष्मप्रभु कार्मुकासि आकर्षीं,
केतुस्थ वानराला ताडी, तों खिन्न होय नाकर्षी. ॥६९॥
नर तच्छत्रें छेदी, लाजे पूर्णेंदु पांडुरा ज्यातें,
सत्सुतकृतनिजपूर्वजलंघन ही श्लाघ्य पांडुराज्यातें. ॥७०॥
चित्तीं भीष्म म्हणे, ‘ मजवर कर शस्त्रास्त्रवृष्टि, वत्सा ! हूं,
आम्हीं पुण्ययशोर्थ स्वशरीरीं दिव्यवृष्टिवत् साहूं. ’ ॥७१॥
नर हि म्हणे, ‘ ज्यासि दिले स्वमुखींचे त्वां पितामहा ! घांस,
तो हा तुसीं झगडतो, होवुनियां स्थापिता महाघांस. ’ ॥७२॥
पांघुरविलें स्वयें प्रियपौत्राला शस्त्रवस्त्र शांतनवें !
तत्काल योजिलें हो ! पहिलें होतां चि अस्त्र शांत, नवें. ॥७३॥
योजी आज्यावरि शरपटळ, करुनि चाप सज्ज, नातू, तें
पाहुनि कुळज कवि म्हणति, ‘ हें परम श्लाघ्य सज्जना ! तूतें. ’ ॥७४॥
भीष्में विजयें हि सम चि शस्त्रपटळ सबहुमान वारावें.
अमररवे चि भरावें तैं नभ बहु न बहुमानवाऽरावें. ॥७५॥
मानी वृद्ध प्रेक्षक म्हणती, ‘ अपयश कधीं न यो जीना. ’
तरुण म्हणती, ‘ असोनि श्रीपाशुपत हि अधीन योजीना ! ’ ॥७६॥
साधु प्रेक्षक सुर नर म्हणति, ‘ भला ! साधु ! धन्य ! शांतनवा !
तूं रविसा, दीपकसा योद्धा होता चि अन्य शांत नवा. ॥७७॥
पार्थप्रतिभट गुरु कीं जो होय निमित्त पूतनामरणीं
कीं तो प्रभु, विजयप्रद ज्याचें मुनिवित्त पूत नाम रणीं. ’ ॥७८॥
निजकुळगुरुस्तुतिप्रति परिसुनि, अभिमन्युचा पिता महती
तच्चपलता खंडी, वणी धानुष्कता पितामह ती. ॥७९॥
पार्थमनीं, ‘ साधावी, जिंकुनियां कुरुपितामहा महि म्यां,
ऐसा चि पात्र व्हावा सुरलोकीं गुरु पिता महामहिम्या. ’ ॥८०॥
केलें सज्ज धनु असें अतिसत्वर त्या समस्तयोधनुतें
कीं, दशशताक्ष हि म्हणें, ‘ तुटलें नाहीं च काय हो ! धनु तें ? ’ ॥८१॥
वरकड चित्र चि झाले केवळ तैं चित्रसे न ते, ज्यांतें
हरिहर मानुनि, वर्णी हरिपासीं चित्रसेन तेज्यांतें. ॥८२॥
देवी म्हणति, ‘ न भ्यावें, हो सावध, हे ! सुरापगे ! सारे !
त्वत्सुत ज्यांच्या पक्षीं, खळ केवळ हे सुराप गे ! सारे. ’ ॥८३॥
त्यांचा श्रम शमवाया बहु शीतल मंद गंधवह वाहे,
शक्र स्वयें हि त्यांवरि पुष्पें प्रेमाश्रुबिंदुसह वाहे. ॥८४॥
सुरपुष्पवृष्टिला न स्पर्शौ देती तयां तदिषुवृष्टि,
कीं मधुपचुंबिता त्या पतिता त्यांच्या पडो नये दृष्टि. ॥८५॥
खंडी धनुष्य, द्याया निजनिपुणत्वें प्रमोद पुनरपि त्या;
स्वगुणोत्कर्षें पूर्वज जिंकुनियां सुखविती, न कुनर पित्या. ॥८६॥
तुटले कीं न अशा या घाली जों संशयांत देव पुन्हा,
तो पार्थ म्हणे, ‘ आर्या ! स्वांबास्रें शुद्ध होवु दे वपु, न्हा. ’ ॥८७॥
साहुनि पितामहाचे, त्याच्या पार्श्वीं च तो असुख रचिते
हाणी सत्वर खरशर दश, अमराचे हि ते असु खरचिते. ॥८८॥
त्या खरशरप्रहारें जों पावे मोह आपगेय महा,
देवी गंगेसि म्हणति, ‘ नातु नव्हे, बाइ ! आपगे ! यम हा. ’ ॥८९॥
कुरु म्हणति, “ हाय ! हाय ! न व्हावा हा हरिचिया हि हत हातें,
त्या प्राकृतांसि युक्त चि, गीर्वाणांला हि म्हणति, बत ! हा ! ’ तें. ” ॥९०॥
दुःखद हि सुखद म्हणती कपि नारद ‘ रामराम ! शिवशिव ! ’ तें;
यद्ध्वनि पतिता जीवा, बापा मुलसें, बळें चि शिव शिवतें. ॥९१॥
पडतां मूर्च्छित नेला माघारा भीष्म जाणत्या सूतें;
ईशप्रहिता देइल, दुःख न ज्या दिव्य बाण, त्या सू तें. ॥९२॥