जाले कर्णकृपगुरुप्रभृतिमहावीरभंग नउ ठावें,
स्वबळ हि तर्हि कुरुप उठे, जर्हि शिंक म्हणे, ‘ कदापि न उठावें. ’ ॥१॥
हाणी भल्ल ललाटीं, त्यासि म्हणे पार्थ, ‘ हाण, चवताळ,
धृष्टा ! दुष्टा ! भ्रष्टा ! तुझिया वृत्तीं नसे चि चव ताळ. ’ ॥२॥
हांसे तो भटतल्लज, भल्लज पीडा न तल्ललाटांत,
हेतींत पोहणारा, सिंधूच्या जेंवि मल्ल लाटांत. ॥३॥
होय कुरुप नरशरपरिवृत दववृत जेंवि कुंज रानीं, कीं
शिरला शराणपंचानन त्या कुरुकटककुंजरानी कीं. ॥४॥
धावे विकर्ण सत्वर कीं तो निष्फळ असो नरायास,
प्राणव्यसनीं सोडिल केंवि, भ्राता असोन, रायास ? ॥५॥
नर शर त्यावरि सोडी, वधिती तत्काळ तन्महेभा ते;
प्रेमें म्हणे, ‘ पुजावे म्यां धनुसह बहुत जन्म हे भाते. ’ ॥६॥
खळतत्सहायभंग चि निजसद्व्रत हें मनांत आणून,
प्रथम विकर्ण पळविला, मग नृप, तदुरांत बाण हाणून. ॥७॥
मिळतां त्रिवर्गसद्यश, सज्जन भेदील कां न नीचोर ?
जो खळ सर्वस्व हरी धर्माचें जेंवि काननीं चोर. ॥८॥
कुरुप म्हणे, ‘ बा ! सूता ! दे मज असुदान, हाक हाक हरी. ’
प्राकृत न म्हणतिल कसें, ‘ कां खवळविला नहाक हा कहरी ? ’ ॥९॥
पळतां सुयोधनातें, पार्थ म्हणे, करुनि बाहुशब्द, “ अरे !
कोठें जाशिल ? नाशिल तुज दहना मद्धनुःसदब्द अरे ! ॥१०॥
वृद्धांधगुरुमिथुन हो बहु धन्य परंतपा ! परत रे ! तें.
न मळो, जाला अससी ज्या शुद्धकुळीं, अपापरत, रे ! तें. ॥११॥
केले होते कीं त्वां गुरुपाशीं क्षत्रधर्म मुखपाठ !
देती वृद्ध चि उष्णा कीं दहना व्हावयासि सुख पाठ ? ॥१२॥
कांपसि भयें ? रणसमय हेमंतसमय नव्हे, तुझी आण;
मीं सत्य धनंजय, परि पार्थ, नव्हें असितपथ, खरें जाण. ॥१३॥
म्हणतां, ‘ पुण्ययशःसुखहेतु स्वर्दान ’ कां, ‘ नको, राहो ? ’
ऐका निजमतिचें, अभिमानमळनिरुद्ध कान कोरा हो ! ॥१४॥
स्वर्गतिकपिलादान चि घे, बहुहित हें चि तुज सुपात्रास,
असु वसु चि मानले, परि याला बहु काळदस्युचा त्रास. ॥१५॥
यश चि यशोभिरता बहुमत, नाम चि एक जेंवि नामरता,
अपयश चि कुजन सेवी, जाणुनि ही पथ्य जेविना मरता, ॥१६॥
मान विसरलां कीं तो सरला ? रुसलां अहो ! सुयोधन ! हो ! ?
प्राणरहित हो, परि पळभरि मानरहित कधीं सुयोध न हो. ।१७॥
जसि कीर्ति सदा हरिस, न तसि आवडली नवी रमा नवरी,
स्वांतःपुरांत ही, जो गतकीर्ति, करी न वीर मान वरी. ” ॥१८॥
इत्यादि नर वदे जें, जालें त्या कुंजरासि अंकुश तें,
सद्वचनें दुखवे खळहृदय, जसें तप्तलोहशंकुशतें. ॥१९॥
परते पर पार्थावरि पद पीडितपुच्छभागतक्षकसा,
न उगारेल गरुडसा त्यावरि तो दुष्टनाशदक्ष कसा ? ॥२०॥
तेव्हां नृप रक्षाया सावध होता नदीज त्यामागें,
कर्णें हि वामपार्श्वीं रक्षियला, निधि जसा महानागें. ॥२१॥
त्याच्या दक्षिणपार्श्वीं अश्वत्थामा, पुढें कृपद्रोण.
दुःशासनादि बहु खळ होते, आर्यांत योजितो कोण ? ॥२२॥
ते लागले समस्त हि शस्त्रांहीं एकदा चि वर्षाया,
हांसत म्हणे धनंजय, ‘ या हो ! या, एकदा चि वर्षा, या. ’ ॥२३॥
जैं स्वरथा हि नर शिवों एका ही आशुगा न दे, वर्षे,
शक्र म्हणे, ‘ कर हरिहरविजयांचें आशु गान, देवर्षे ! ’ ॥२४॥
साधु म्हणति, “ हा होय द्रोणप्रियशिष्य, होय हरदास,
होय अजितसख, म्हणतिल घन ‘ गुरुजी ’ या शरप्रकरदास. ” ॥२५॥
प्रथम परास्त्रें वारी, द्रुत मग संमोहनास्त्र नर योजी,
चित्तांत म्हणे, ‘ गुरुजी ! मनिं बाणासुरसहाय हर यो, जी ! ’ ॥२६॥
संमोहनास्त्र, चापप्रवर, प्रोद्दाम देवदत्तदर,
मोहिति परा, नर तसा होय, जसा वामदेव दत्तदर. ॥२७॥
पार्थ म्हणे, ‘ भगिनीचें स्मर उत्तर, उत्तरा ! उतर, वास
घे कर्णाचें, भ्रमले धनुच्या परिसोनि राउत रवास. ॥२८॥
डसला मोहाहि ससुत गुरुस, मग न कां सुयोधना चावे ?
एक कबंध चि सक्रिय हे हर्षाया सुयोध नाचावे. ॥२९॥
जा, न हसावें, न तुवां भ्यावें, घेतां हरूनि वास, कृपा,
घे मद्गुरुप्रसाद हि, नत न लुटिति काय गा ! शिवा सकृपा ? ॥३०॥
गुरुसुतसुयोधनांचीं नीळें, भरितें सदा नव सुवासें,
घ्यावीं, त्या काय उणें ? कितिकां देती न दान वसुवासें ? ॥३१॥
भ्रमला नसे महात्मा, आहे याहुनि हि शांतनव साजो,
शिवसा पावत आला, व्हाया व्यसन प्रशांत, नवसा जो. ’ ॥३२॥
हरवी बाळाकरवीं त्या पांचांचीं हि कीर्तिसह वासें,
बुडती च सदहितांच्या बहु थोरांची हि कीर्ति सहवासें. ॥३३॥
भीष्माची परमसुखा विजयिहरिजना पहात पावे धी;
मग मुरडितां चि रथ तो, इषुनीं त्यातें महातपा वेधी. ॥३४॥
पार्थ हि त्याच्या वेधी, सोडुनि शीघ्र क्षुरप्र, वाहांतें,
तत्सूताचें हि धरी विजयविशिखहत उर प्रवाहांतें. ॥३५॥
कुरुकतकांतूनि निघे घनघनपटलामधूनि जेंवि रवी,
हरिजनतेज न वदवे, षडरींस हि, अरि वधूनि, जें विरवी. ॥३६॥
हरिजन हरिसम सत्य, स्वरिपूस हि पार्थ सुगति दे वधुनीं,
आहे त्याची हि सदाचरणप्रभवा सुकीर्तिदेवधुनी. ॥३७॥
हे तों एक प्रभु, नरनारायण यांत भेद न गमो, जी !
यांच्या गुणापुढें न त्रिदशांचा आपणासि नग मोजी. ॥३८॥
भूप म्हणे, ‘ ज्या एकें केले बहु हे असे परासु भट,
तो सोडिला कसा हो ! ? सोडिति जीवा, न परि परा, सुभट. ’ ॥३९॥
हांसोनि नदीज म्हणे, ‘ हा काळवरि त्वदीय शक्तिमती
कोठें गेल्या होत्या, चापलतेसह भुजा हि शक्तिमती. ॥४०॥
पार्थ बहु भला, तुमच्या तों आजि अपार्थ कापिता माना;
या अभयदा, न व्हाया नरजाति अपार्थका, पिता माना. ॥४१॥
वा ! न द्रवे अधार्मिक; सर्व हि ये, परि न ये नटा कविता;
अस्मद्वधार्थ धृत असि याकरवीं काळ ही न टाकविता. ॥४२॥
जे काय दुरभिमानी, श्रमती जोडूनि अघ नर सदा ते.
भूपा असदुपदेशद, मरुपथिका जेंवि अघनसदातें. ॥४३॥
जावू गोधन, योध न वेंचावे, तूं पुरासि चाल कसा;
दे कर्णकृपद्रोणा रथ, मज ही आतुरासि, चालकसा. ’ ॥४४॥
भूपाचें, उपदेशीं मग होतां गर्व शांत, न वच रणा.
वदला विहित हित म्हणुनि, नमिति मनें सर्व शांतनवचरणा. ॥४५॥
परतों लागे जेव्हां कुरुबळ सोडूनि हुरुप दीनमनें,
विजय करी पाडुनि शर भीष्मद्रोणादिगुरुपदीं नमनें. ॥४६॥
मग कुरुपतिचें भेदुनि मुकुट, विखरिला धुळींत मणिगण कीं;
भीमीं भक्ति, बहु दया त्या ही तज्जन्मपत्रकरगणकीं. ॥४७॥
करि कृष्णसख कुपतिची कुदशा केवळ, तथापि कु रुसेना,
परते गरुडत्यक्ता जैसी नागी तसी च कुरुसेना. ॥४८॥
पर ते प्रथम परतले, मग नगभित्तनुज वीर तो परते.
नरतेज किति तया, ज्या स्मरतां असुरवर युवतिसीं न रते ? ॥४९॥
प्रभु सुरदत्तदरातें वाजवि, परिसोनि तद्रवा हगती
मुतती भयें, विसरती त्या कुरुकटकांत भद्र वाह गती. ॥५०॥
तो अभयदेश जातां मत्स्यपुरा, करुनि अभय देशपथें,
जे भग्नभीतशरणागत कुरुभट त्यांसि अभय दे शपथें. ॥५१॥
हरुनि यशोधन गोधन, योध न गणित अक्षासि नेवून,
त्या नृपपुत्रासि म्हणे, “ चाल पुरा, हें मनीं च ठेवून. ॥५२॥
यद्यपि सत्य वदावें निजगुरुपासीं, तथापि त्यासम जो
तुज बहुमत धर्म प्रभु, तदनुमतें हे कथा पिता समजो. ॥५३॥
म्हण ‘ कुरुमर्दन, गोधनमोचन, इत्यादि कर्म हें माजें, ’
अनृत हि हित, साधूच्या रक्षी प्रेमा, तसें चि हेमा जें. ” ॥५४॥
‘ साजेल कसा तुमच्या आंगींचा मज मुलास पेरावा ?
लज्जाफळार्थ कैसा गुरुकर्णीं अनृतशब्द पेरावा ? ॥५५॥
आहे प्रसादकामुक, आज्ञा मोडिल हा कसा दास ?
म्हणतां तसें म्हणेल चि, जड कंदर दे चि हाक सादास. ’ ॥५६॥
जयकथन करिति जावुनि नृपपुत्रप्रहित दूत नगरातें,
बाळांस हि न गिळों दे वदनींचा मधुर नूतन गरा तें. ॥५७॥
तीं स्वायुधें शमीवरि ठेववितां राघवा वृषाकपिला
स्मरुनि कपि उडे, विजयश्री ज्यासि भजे, जसी वृषा कपिला. ॥५८॥
गेला गगनपथें ध्वज जो निजतेजें म्हणे ‘ उभा ’ रविला,
पहिला सिंहांकध्वज पार्थें त्या स्यंदनीं उभारविला. ॥५९॥
झांकी वपुला क्षत्तजें, बसतां वर्मीं अरीषु, न्हाल्याला,
जाला सारथि पहिल्या योषावेषासि तो पुन्हा ल्याला. ॥६०॥
वैराटि रथी केला, सत्प्रेम बहु श्रितीं, न बहु लेंकीं,
व्रीडद महत्व त्या तें, विजयजयश्रीविवाहबहुलें कीं. ॥६१॥
विजयी विराट इकडे ये, पूजिति पौर विप्रजन यातें;
येतां चि सभेंत पुसे प्रेमें त्या उत्तरा स्वतनयातें. ॥६२॥
जन कथिति, “ धेनु कुरुनीं वळिल्या, येवूनि उत्तरशेला,
त्वत्कीर्तिनें पसरिला स्वपरित्राणार्थ उत्तरा शेला. ॥६३॥
गेला कुरु जिंकाया, आहे सारथि बृहन्नडा, गमला
सत्य कुमार चि, वदला ‘ लागो अपकीर्तिचा न डाग मला. ’ ” ॥६४॥
भूप म्हणे, ‘ कुरु होतिल वारे, करितील आजि अभ्र मुला;
दुःख सुदेष्णेला, जें शिरतां सिंहांत कलभ अभ्रमुला. ॥६५॥
अक्षत असाल ते जा, मेळविलें काल आर्य ! हो ! यश तें
लघु, गुरु हें घ्या, धीरां वीरांच्या सिद्ध कार्य होय शतें. ’ ॥६६॥
हांसुनि धर्म म्हणे, “ हो ! विजयिसुतातें पहाल नयनाहीं,
आहे बृहन्नडा जरि सारथि, तरि गोधनासि भय नाहीं. ॥६७॥
सारथि बृहन्नडा जरि, उत्तर मांसें भरील तरि भूतें,
परिभूतें होतील चि तन्मंत्रेंकरुनि आजि अरिभूतें. ॥६८॥
घालिल बृहन्नडा, जसि देवी घाली नरामर क्षेमीं,
वादी म्हणेल ‘ उरविन बाधा, घालीन रामरक्षे मीं. ’ ” ॥६९॥
ऐसें धर्म वदे, तों करिती येउनि सभेंत दूत नती,
कथिती विजयकथा, जी देणारी हर्ष नित्य नूतन, ती. ॥७०॥
“ देवा ! कुमार आला, सोडविल्या धेनु, पळविलीं कटकें,
‘ न वय प्रमाण तेजस्विजनीं ’ म्हणती कवी, न तें लटकें. ” ॥७१॥
धर्म म्हणे, ‘ आयकिलें दूतांचें वचन चांगलें कानें,
राया ! सुखरोमांचित केलें कीं आजि आंग लेंकानें. ॥७२॥
सारथि बृहन्नडा ज्या, तद्विजयें करुत बायका नवला,
चिंतामणिगलबालक जो, दुर्लभ त्यासि काय कानवला ? ॥७३॥
दूतांतें सुखवुनि नृप सचिवांसि म्हणे, ‘ गुढ्या उभारा हो !
पुर शोभवा, पुढें जा, राजपथीं विप्रजन उभा राहो. ॥७४॥
गाजत, वाजत, साजत, आज तया जतन करुनि आणा, हो !
मजमागें मत्स्याचा हा रिपुशशिराहुबाहु राणा हो. ’ ॥७५॥
यापरि वदोनि हर्षें, सामोरे सर्व लोके पाठउनीं,
आजि करावी अक्षक्रीडा ऐसें मनांत आठउनीं, ॥७६॥
सर्वस्व समर्पाया धर्मासि ब्राह्मणासि वाणकसें,
नृप कृष्णेसि म्हणे, ‘ गे ! सैरंध्रि ! मदक्षपात्र आण कसें. ’ ॥७७॥
धर्मासि म्हणे, ‘ हूं, या, मांडा उकलूनि रम्यतळ पट, हो ! ’
कृष्णा हि म्हणे, ‘ मेल्यां अक्षकरांचें समूळ तळपत हो. ’ ॥७८॥
‘ द्यूत करूं या ’ म्हणतां, धर्म म्हणे, “ आवरूनि धी राहें,
व्यसनावर्तीं पाडी, न निघों दे सावरूनि धीरा हें. ॥७९॥
हें कामकोपलोभप्रमुखमहानर्थकोटिचें वतन,
‘ बत ! ’ न म्हणे कवण कितव ? धर्म हि दुःखांत पावला पतन. ॥८०॥
धर्मा नळा हि देवन दे वनवास प्रसिद्ध, उत्साहें
‘ हूं ’ न म्हणवे, विराटा निर्मील प्राणहानि कुत्सा हें. ॥८१॥
अक्षासह टाकूनि श्री, स्त्री, धी, कीर्ति ही कितव देतो,
आग्रह तरि प्रवर्तो द्यूत, नृपा ! जो सखा, हित वदे तो. ” ॥८२॥
द्यूत प्रवर्ततां, तो भूप म्हणे, ‘ ऐकिलेंसि कंका ! तें ?
कुरु जिंकिले कुमारें, वय तरि अद्यापि उचित अंकातें. ’ ॥८३॥
धर्म म्हणे, ‘ हे कौरव किति ? सूत बृहन्नडा कुमारा ज्या,
समरी अमरींच्या ही तो भय देईल कुंकुमा, राज्या ! ’ ॥८४॥
मत्स्य म्हणे, “ अरे ! कंका ! शंका सोडूनि बोलसी भलतें,
क्लीबासि मत्सुताधिक म्हणसी, हें वचन मन्मनीं सलतें. ॥८५॥
कंका ! रंका ! सद्योजात हि हरि भंगितो करिघटांतें,
ब्रह्मांडाधिक हि घटज, सेवुनियां सागरा, करि घटांतें. ॥८६॥
विप्राधमा ! जरि मनीं वांचावें हें असेल, हो मूक,
न पुन्हा असं वद, सखा म्हणवुनि म्हणतों, ‘ न जीविता मूक. ’ ” ॥८७॥
धर्म म्हणे, ‘ जिंकाया शक्त न भीष्मादिकां नगाराती,
कुरुगुरुपुढें विरे परशक्ति, नृपा ! होय कां न गारा ती ? ॥८८॥
त्यांवरि बृहन्नडा चि प्रौढा, जसि दानवांवरि भवानी,
गावें या दोघींचें यश भूपा ! आदरें हरिभवानीं. ॥८९॥
कुरुगुरुसवें झगडतां त्या सुरगुरुचे हि ओंठ करपावे,
विंध्यस्कंधगशिशुचा कां विधुच्या मंडळा न कर पावें ? ’ ॥९०॥
ऐसें सत्य वदे जों, तों घाली माळ अक्षमा राया,
शिकवी युधिष्ठिराच्या भालीं पाणिस्थ अक्ष माराया. ॥९१॥
अक्षप्रहार होतां, वाहों लागे अशुद्ध नाकानें,
तें स्वांजळींत धरिलें, त्या शांतिक्षांतिविजितनाकानें. ॥९२॥
धर्माभिप्रायज्ञा कृष्णा ताटांत तें धरी रगत,
पतिहृग्दत साध्वीनें, नाडीनें जाणिजे शरीरगत. ॥९३॥
तों तो उत्तर आला, द्वास्थानीं त्या नृपासि जाणविला,
तेणें अत्युत्कंठित होउनि भेटावयासि आणविला. ॥९४॥
तेव्हां कंक हळू च क्षत्त्यासि म्हणे, ‘ बृहन्नडा राहो,
पाहोनि हें, सभेंत न तक्षोभें रक्त नृपतिचें वाहो. ॥९५॥
रण नसतां मद्देहीं जो क्षत कीं क्षतजलेश काढील,
तो तत्काळ वधावा, जरि त्याला अमृत शक्र वाढील. ॥९६॥
हे सत्य तत्प्रतिज्ञा, या राज्याचें म्हणोनि हो हित, रे !
मारील विराटातें हें माजें देखतां चि लोहित, रे ! ’ ॥९७॥
क्षत्त्यानें गुंतवितां, जरि सक्षत तरि निराकुलक्षणसा
राहे बाहेर प्रभु, परम सुलक्षण हि तो कुलक्षणसा. ॥९८॥
उत्तर पित्यासि वंदुनि, पाहे कंकासि तों सभाकोणीं,
तातासि पुसे, ‘ ऐसा केला अन्याय हा महा कोणीं ? ’ ॥९९॥
भूप म्हणे, ‘ पुत्रा ! म्यां केला स्वकरें चि दंड या कंका;
कीं हा करी प्रशंसा षंढाची, न च धरी मनीं शंका. ’ ॥१००॥
उत्तर म्हणे, ‘ अहाहा ! केला अन्याय हा, धरा पाय,
ब्रह्मक्षोभ स्वर्गापाय हि, केवळ नव्हे धरापाय. ’ ॥१०१॥
नमुनि विराट म्हणे, ‘ बा कंका ! चुकलों, महायशा ! पावें,
न मला सख्या तुवां, या मदघा घेउनि सहाय, शापावें. ’ ॥१०२॥
कंक म्हणे, “ सोड चरण मज ‘ सोसावें ’ असें जरि न कळतें,
गळतें रक्त महिवरि, तरि हें त्वद्राष्ट्र तत्क्षणीं जळतें. ” ॥१०३॥
शमतां शोणितधारा, संपादी धर्मराज तो शुचिता;
तों ये बृहन्नडा, मग दावी जी रीति आपणा उचिता. ॥१०४॥
राजा म्हणे, ‘ कुमारा ! या वृत्तें लाज त्या कुमारा हो;
निंदुनि इंदुनिभयशा क्षण मौनव्रतपरा उमा राहो. ॥१०५॥
त्वां जिंकिला कसा तो अश्वत्थामा ? तसा चि तो कर्ण ?
तो हि द्रोण महात्म अदिव्यधनुर्वेदशंभुगोकर्ण ? ॥१०६॥
केला कसा कृपाचा भंग ? कसा पळविला सुयोधन गा ! ?
कैसा भीष्मप्रमुखा स्वभुजअशनि कळविला सुयोधनगा ? ’ ॥१०७॥
उत्तर म्हणे, ‘ पित्या ! कुरु पाहुनि, झालों भयाकुळ, पळालों,
सिंह प्रेक्षुनि यूथभ्रष्टकलभसा च मीं बहु गळालों. ॥१०८॥
मरणेच्छुनिर्धना जें दाता, सोडूनि सुजळ, दे वसुतें,
जैसें यश, तैसें हें केलें मद्वदन उजळ देवसुतें. ॥१०९॥
मज सारथि करुनि रथी झाला, विद्या प्रकाम रुद्रा ज्या
ठाव्या, त्या देवसुता, बहुमत तो त्र्यंबका मरुद्राज्या. ॥११०॥
दिव्यदराच्या नादें निर्मुनि त्याकुरुबळांत आधींतें,
हरिलें होतें गोधन जें, सोडविलें पळांत आधीं तें. ॥१११॥
आधीं कर्ण पळविला, मग केला विरथ तो कृप हि राया !
शकला न एक ही त्या देवसुताच्या यशा नृप हिराया. ॥११२॥
अरिसेनेसि न वरतें पाहूं दे, जेंवि साधु कुलटेतें,
काय वदूं, गुरु गुरुसुत जिंकुनि भीष्मावरी हि उलटे तें ? ॥११३॥
श्रीमद्भीष्मास हि तो निजशस्त्रास्त्रप्रवीणता कळवी,
पळवी सुयोधनातें, त्यासकट तदश्रिताननें मळवी. ॥११४॥
संमोहनास्त्र योजुनि सर्वांस हि देवपुत्र मग मोही,
हरिहरलीलेहूनि न्यूना लीला तुम्हांसि न गमो ही. ’ ॥११५॥
मत्स्य म्हणे, “ तद्दर्शन तुज घडलें, तें मला चि कां नाहीं ?
नेत्रें बहु तळमळती, लाभ मिळविला भला चि कानाहीं. ॥११६॥
सर्वस्वें पूजावा, तो आम्हां मायबापसा मान्य,
लीलेनें हरिला जरि तेणें हा ताप, काय सामान्य ? ॥११७॥
साम्ग, कसें तुज दिसतें, तो मज दावील काय पाय सखा ?
याहुनि उणा चि दुकळीं म्हणता, ‘ हो पुष्टकाय, पायस खा. ’ ” ॥११८॥
उत्तर म्हणे, ‘ उद्यां कीं परवां भेटेल तो असें वाटे,
जळ कारुण्य हि विनतानुगत चि सोडील तें कसें वाटे ? ’ ॥११९॥
समजावें चि, परि न त्या यमधर्मवरें चि तत्व तें समजे,
सज्ञ्ज्ञानीं सत्करुणेवांचुनि मतिचे न चालती गमजे. ॥१२०॥
राजाज्ञेनें वस्त्रें कुरुवीरांचीं बृहन्नडा उचली,
त्या उत्तरेस चि न, ती भेटि, बहुत सुकविमतिस ही, रुचली. ॥१२१॥
कन्येसि असीं वस्त्रें ओपी निर्मवयासि बाहुलि हा.
श्रोते हो ! हृत्फलकीं प्रेमें श्रितकल्पवृक्षबाहु लिहा. ॥१२२॥
शोभा सोडुनि होता शुद्ध वसंतीं करीरसा पार्थ;
मग मंत्रातें, व्हाया उद्धव संतीं, करी रसापार्थ. ॥१२३॥
मंत्र नुपसुतासीं कीं, ‘ हा हि, उद्यांचा हि तो दिवस, जावा.
परवां बैसोनि पदीं धर्मप्रभु, द्यावया शिव, सजावा. ’ ॥१२४॥