विराटपर्व - अध्याय चवथा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


स्मरतां च वानरांकध्वज गगनांतूनि उतरला महिला,
तो स्थापिला रथीं त्या श्रीकृष्णसखें, शमीतळीं पहिला. ॥१॥
जातां कुरुकटकावरि वाजविला दिव्य देवदत्त दर,
तो होय जनां जैसा कल्पांतीं रुद्रदेव दत्तदर. ॥२॥
भ्याला उत्तर, त्यातें जिष्णु म्हणे, ‘ पावलासि कांप दरें,
अद्यापि बांधलेसें तुजिया मतिनें अधैर्य कां पदरें ? ’ ॥३॥
तो वैराटि म्हणे, ‘ गा ! कोणाचा ही असा न दर वाजे;
बा ! लागले असावे अमरपुरीचे हि आजि दरवाजे. ॥४॥
ते गज दिग्गज, भ्याले बहु या धैर्यावसानद रवा जे;
वाटे, श्रीवृषवाहनविभुचा हि रणीं असा न दर वाजे. ॥५॥
भ्याली बहुधा विद्युत् कांपतसे याचिया चि निःस्वानें,
मीं किति ? ज्याला भी श्री, त्याला भ्यावें कसें न निःस्वानें ? ॥६॥
अर्जुन तुम्हीं च कळलें, ठेवूं द्या दर, न मानसा दर हो;
रक्षा धृति, आहें मीं सूतपणीं हरिसमान सादर हो ! ’ ॥७॥
हांसोनि म्हणे हरिसख, ‘ हो गाढासन, विकंपधी, धीट;
न धरीं बा ! दर, हा दर सादर दे वाजवूं पुन्हां नीट. ’ ॥८॥
ऐसें वदे, करी मृदुपूर्वजलजवादनीं मग जवा, जी !
तेव्हां त्या कुरुकटकीं हगले मुतले समस्त गज वाजी. ॥९॥
द्रोण म्हणे, ‘ न दिसे जय, कां करितां आननें नत ? पहा रे !
आला विजय, जयाचें श्रीशंभुतपापुढें न तप हारे. ’ ॥१०॥
गांधारि म्हणे, ‘ गुरुजी ! पण न करुनि पूर्ण हा प्रकटला, हो !
पुनरपि वनवास करो, गुरुघातकपातक प्रकट लाहो. ’ ॥११॥
कर्णाद्यामांसि म्हणे, ‘ तुमचे विजयी असोत हात रणीं;
शरपटलें छादित हो सार्जुनशस्त्रप्रताप हा तरणी. ॥१२॥
गुरुजींस काय पुसतां ? चापीं गुण मद्वचें चि चढवा, हो !
यांला हें चि म्हणावें, कीं आम्हां धर्मशास्त्र पढवा, हो ! ॥१३॥
प्रियशिष्यधनंजयगुण वर्णूनियां यांसि हृदय निववूं द्या,
उत्पातोत्प्रेक्षेनें जरि आम्हां भिववितात, भिववूं द्या. ॥१४॥
पढवावें मात्र इहीं, भेदावें परहृदब्ज कटुकवचें;
कीं दूरूनि दिसावे प्रेक्षकदृष्टीस युद्धपटु कवचें. ॥१५॥
प्रार्थुनि पुढें करावे हे यज्ञीं कीं सुभोजनावसरीं;
सिंधूंत तरेल कसी जी केली केलिहेतु नाव सरीं ? ’ ॥१६॥  
खळकृतगुरुनिंदेतें वर्णील कधीं न विस्तरें सु-कवी;
कीं ती श्रीगुरुभक्तिप्रेमामरपादपांकुरा सुकवी. ॥१७॥
कर्ण म्हणे, ‘ सत्य वदसि, परि आधि तुझ्या नसो मनीं कांहीं
यद्यपि समरोत्साह त्यजिला अर्जुनभयें अनीकांहीं. ॥१८॥
जावूत गोधनातें घेउनि हे, कीं उगे चि राहोत,
पाहोत युद्धकौतुक, परि भीतिनदींत हे न वाहोत. ॥१९॥
ख्यात जगांत धनंजय, याहुनि मीं कर्ण काय गा ! ऊन ?
गाती, गातिल हि कवि; स्वगुण स्वमुखें चि काय गावून ? ॥२०॥
पाहोत सिद्ध, विद्याधर, मुनि, गंधर्व, देव शुद्ध रण,
करितों आजि सुयोधनहृच्छल्याचें सुखें चि उद्धरण. ॥२१॥
हो स्वस्थ, स्वमनस्था आधिनगा भरतसार्थपा ! खाणीं,
मच्छरटंक सहाया कैंचें सामर्थ्य पार्थपाखाणीं ? ॥२२॥
म्यां जोडिलीं सदस्त्रें शस्त्रें जालीं च आजि अनपार्थें;
देवुनि दर्शन, केलें माजें अतिमात्र हृष्ट मन पार्थं. ॥२३॥
श्रीभार्गवास्त्रतेजें भंगावें संगरांत सुत्राम्या,
आश्चर्य काय, त्याच्या केलें जरि भग्न आजि पुत्रा म्यां. ’ ॥२४॥
त्यासि कृप म्हणे, ‘ कर्णा ! सुज्ञाहीं ऐकतां चि डोलावें
ऐसें चि बोलणें जरि, तरि पुरुषानें दहांत बोलावें. ॥२५॥
तूं नीतिविरुद्ध वदसि, साहस हें , फळ न दे वचनयज्ञ;
अद्भुत कर्म करुनि ही बा ! न वदति एक ही वच नयज्ञ. ॥२६॥
तूं भंगिसील कैसा ? आला बांधोनि काय हात रणीं ?
सर्वाहितांधकारध्वंसकर मनुष्यकाय हा तरणी. ॥२७॥
एकें चि खांडववनीं या पार्थें अग्नि तर्पिला, कर्णा !
सर्व सुरांच्या स्वधनुर्ध्वानें चि त्रास अर्पिला कर्णां. ॥२८॥
एकें चि भगवदनुजा हरिली, भ्याला न लेश कळहाला;
जर्‍हि खवळला पिवूनि प्रभु खलबलदलनदक्षबळ हाला. ॥२९॥
एकें चि ईश्वरासीं केलें युद्ध प्रसिद्ध, राधेया !
एकें चि असुर वधिले, तन्माया एक ही न बाधे या. ॥३०॥
एकें चि जिंकिला तो गंधर्वाधीश चित्रसेन रणीं,
रोमांचिततनु होती वीर धनंजयपराक्रमस्मरणीं. ॥३१॥
एकें त्वां काय कधीं केलें ? कर्णा ! स्वकर्म वाखाण.
हीरक वीरकरगनवटंकें हि चिरे न, जेंवि पाखाण. ॥३२॥
घालूं पाहसि, दंष्ट्रा उपडाया, अहिमुखांत आंगोळी,
ऐसें साहस करितां होइल तनुची पळांत रांगोळी. ॥३३॥
कंठीं बांधोनि शिळा बाहुबळें सागरासि तरशील,
परि साहसें न विजया; हें शील नसो, असो इतर शील. ॥३४॥
सर्व हि मिळोनि भांडों, कर्णा ! व्हावें न साहसा मान्य,
यत्नें नृपयश रक्षूं आजि, नव्हे श्वेतवाह सामान्य. ’ ॥३५ ॥
द्रौणि म्हणे, “ एकाकी तूं चि क्षम जिष्णुवारणा सूत.
बहुधा बद्ध करील चि लूतेचें जिष्णुवारणा सूत. ॥३६॥
करिसि विकत्थन, जिंकुनि नेलें नसतां हि गोधन शिवेतें.
सत्प्रियशुचियश कर्णा ! भलत्या, न करूनि शोध, न शिवे तें. ॥३७॥
साहे विधिधोपद्रव, वाहे पृष्ठीं चतुर्विधें भूतें,
आहे उगीच, कर्णा ! न कधीं बोलोनि दाखवी भू तें. ॥३८॥
जाळी ज्वलन, न बोले; न वदे चि जरि प्रकाश करि तरणी;
न वदोनि कुलज पुरुष हि आले स्वयशःप्रकाश करित रणीं. ॥३९॥
पावुनि हि सर्व महित्तें, विगुणा हि गुरूसि, जे कुळज नर, ते
सत्कारिती, अलि कमळीं तेंवि गुरुपदीं महाकुळजन रते. ॥४०॥
राधेया ! उद्धत तूं, हा दुर्योधन हि फार उद्धत, रे !
गुरुनिंदक हो ! स्पष्ट व्यसनांत बुडे अशुद्ध, शुद्ध तरे. ॥४१॥
छद्मद्यूतें केल्या सत्सर्वस्वापहारकर्मातें
पुरुषार्थ श्लाघ्य असें मानुनि, पावेल कोण शर्मातें ? ॥४२॥
कोणा रणांत पांडव जिंकुनि तद्राज्य साधिलें वद, रे !
कृष्णेसि जिंकिलें त्वां कोणा समरांत सांग, रे ! सदरे ! ॥४३॥
‘ तुज कीर्ति, पांडवां अपकीर्ति, ’ म्हणे ‘ आयकावि ’ कतम रण ?
सावध रे ! कां घेसी मंदा ! खळनायका ! विकत मरण ? ॥४४॥
सिंहासीं द्वेष करुनि कोण बळी वारणांत उरणारे ?
कां भ्रमलासि ? कसा त्वां जय पावावा रणांत उरणा ! रे ! ॥४५॥
अरिच्या हि सद्गुणातें प्रेमें वाखाणितात सुज्ञानी,
खळ हो ! मग वर्णावा कां न जगन्मान्य शिष्य सुज्ञानीं ? ॥४६॥
तुजहुनि विशिष्ट वीर्यें, चापीं जो शक्र, संगरीं विष्णु,
कोणा सुज्ञासि नव्हे तो पूज्य स्तुत्य शंभुसा जिष्णु ? ॥४७॥
सुत शिष्य सम; तयांत व्याधि खळ कुधी, खरे असु ज्ञाते;
प्रिय नसतील कसे जे साधुयशस्कर असे ! असुज्ञा ! ते ? ॥४८॥
केलें दुर्द्यूत जसें, त्वां शक्रप्रस्थ तें जसें हरिलें,
स्वसभेंत आणिलें त्या साध्वीस जसें न भय मनीं धरिलें, ॥४९॥
आतां हि तसें चि तुवां पार्थासीं धैर्य धरुनि भांडावें;
मांडावें कर्ण ! शकुनिसंमतपांडित्य, अन्य सांडावें. ॥५०॥
पांचांस हि जो जिंकी सोडुनियां कुरुसभेंत अक्ष महा,
एकासि शकुनिमामा जिंकाया काय आजि अक्षम हा ? ॥५१॥
आम्हीं आजि झगडतों, जरि येतां तो विराट, तरि त्यासीं;
झगडोंना शब्दें ही पार्थासीं, लव हि अघ न करित्यासीं. ” ॥५२॥
भीष्म म्हणे, ‘ द्रौणे ! तूं उत्तम वदलासि, कृप हि शुद्ध वदे;
धर्मन्यायोचित जें, तें चि सुभाषण मनासि उद्धव दे. ॥५३॥
क्षत्रियधर्में केवळ इच्छितसे युद्ध कर्ण उत्साहें,
उचित चि, परंतु अनुचित करणें गुरुची दहांत कुत्सा हें. ॥५४॥
द्रोणद्रौणिकृपांहीं आजि करावी क्षमा, न कोपावें,
भेद नसावा, बुध हो ! भेदें स्वयश न परासि ओपावें. ’ ॥५५॥
दुर्योधन नमुनि म्हणे, ‘ गुरुजी ! मज अरिकरी न सोंपावें,
तेजोजननार्थ तसें वदलों, त्वन्मत्सरीं नसों, पावें. ’ ॥५६॥
हांसोनि द्रोण म्हणे, ‘ आम्हां कोपों न दे चि वत्सलता,
नसते क्षमाकवच तरि हृदयीं त्वच्छब्द अशनिवत् सलता. ” ॥५७॥
भीष्मासि मग म्हणे, नृप ‘ पुसतों अज्ञातवासपण पुरला,
कीं कांहीं मास तरी, पक्ष तरी, दिन तरी असे उरला ? ’ ॥५८॥
भीष्म म्हणे, ‘ गांधारे ! पांडव पंडित खरे, न दभ्रमती;
न भ्रमले; जे प्राकृत ते चि मनीं धरुनियां मद भ्रमती. ॥५९॥
कामी कोपी लोभी जे संसारांत पावति भ्रम ते.
प्राकृत पंडित पांडव असते, तरि हे हि केंवि न भ्रमते ? ॥६०॥
शास्त्रमतें मासद्वय पांचां वर्षांत अधिक लेखावें,
अज्ञातवास यास्तव सरला चि असें चि तत्व देखावें. ॥६१॥
तेरा वर्षांत अधिक दश पक्ष द्वादह क्षपा पडती,
चांद्रशरन्मानें हे संख्या संख्यावदादृता घडती. ॥६२॥
एवंच चांद्रमानें तेरा हि स्पष्ट सारिले अब्द,
सत्यप्रतिज्ञ पांडव लागों देतिल न आपणा शब्द. ॥६३॥
येतां अन्यायलवें अल्पायासें हि इंद्रपद पदरा,
‘ हूं ’ न म्हणतील, काळापासुनि ही पावतील हे न दरा. ॥६४॥
युद्धेंकरूनि पाक्षिक जय, त्यांत हि विजय पातला समरा,
सम रामासीं हा, हो शम राज्यसमर्पणें, हठें न मरा. ’ ॥६५॥
कुर्वधम म्हणे, ‘ युद्ध चि हो, सख्य न हो, पितामहा ! यासीं.
शक्र हि बुडेल, यातें मद्धृत पद ओपितां, महायासीं. ’ ॥६६॥
भीष्म म्हणे, “ तरि कांहीं बळ घेउनि जा पुरा, नको राहूं,
बा ! ‘ हूं ’ मज चि म्हण, न त्या द्विषदंगारांचिया चकोरा ‘ हूं. ’ ॥६७॥
आम्हांपासीं राहो अर्ध कटक पार्थसिंह घेराया,
एकें भागें न्याव्या गाई, तूं एक भाग घे, राया ! ॥६८॥
मीं, कर्ण, कृप, द्रोण, द्रौणि असे हे रणांत पांच कसा
उतरों धनंजयाच्या कीं नुतरों, तूं चि मात्र वांच कसा. ” ॥६९॥
धाडुनि पुढें नृपाला, त्यामागुनि गोधनासि सत्वर चि,
शास्त्रमतें व्यूहातें तत्काळ चि तो अगाधसत्व रची. ॥७०॥
कर्ण पुढे, गुरु मध्यें, ज्याच्या तेजासि शक्र हि न साहे;
दोंभागीं द्रौणि कृप, व्यूहामागें नदीज तो राहे. ॥७१॥
द्रोण म्हणे, “ सैनिक हो ! हा आला कीशकेतु अर्जुन, हो !
कोण सुहृन्न म्हणे ‘ ख्यात जगीं विजय, विजय अर्जुन, हो ? ’ ॥७२॥
हे दोन बाण माज्या चरणांवरि उतरले, पहा, नमना;
या गौरवें मजपरिस गमला कनकाद्रि ही लहान मना. ॥७३॥
हे अर्जुननामांकितशर मत्कर्णद्वयासि लागोनि
पडले पहा, अहा ! रण न करी, आज्ञा मला न मागोनी. ॥७४॥
जाले बहु, होतिल बहु, आहेत हि बहु, परंतु यासम हा;
यास महादेवा ! दे जय, पाहिन कधिं धनंजया समहा ? ” ॥७५॥
पार्थ म्हणे, ‘ वैराटे ! रथ कुरुकटकासमीप राहों दे,
गोधन हरावयास्तव भट आले कोण कोण पाहों दे. ॥७६॥
तो गुरु, तो गुरुनंदन, तो कृप, तो कर्ण, तो पितामह, रे !
यांहें धेनु वळाव्या ! शिव ! शिव ! गोपाळकृष्ण ! राम ! हरे ! ॥७७॥
रे उत्तरा ! शकुनिचा या व्यूहांत न दिसे मला भाचा,
त्यावांचुनि यांसीं जो करणें संग्राम, तो न लाभाचा. ॥७८॥
बहुधा गोधन घेउनि मागें गेला पळोनि कातर तो,
सर्व हि खोटा व्यसनीं बुडतो, न पळो, पळो, निका तरतो. ॥७९॥
हें कटक सोड, तिकडे चाल, तुज्या हरुनि गोधना खळ तो
प्राणत्राणपरायण जिकडे निजपत्रपाग्रणी पळतो. ’ ॥८०॥
उत्तर निजतुरगांतें, द्याया अरुणासि कौतुक, पिटाळी;
तों गर्जोनि कुरुकटककर्णीं बसवी ध्वजस्थ कपि टाळी. ॥८१॥
कृप सैन्यांसि म्हणे, ‘ हो ! हो प्राप्तारिष्ट शां,त न वधावा
राजा पार्थें, सांगप सगरु सगुरुसुत सशांतनव, धावा. ’ ॥८२॥
गांठुनि पार्थ म्हणे, “ रे ! आलों मीं अनुज भीमसेनाचा,
ज्याच्या शरांसि म्हणती सुर ‘ असुरबळाम्त भीमसे नाचा. ’ ॥८३॥
कोठें जाल ? उभे रे ! मत्स्येश्वरधेनुपश्यतोहर हो !
सोडा गोधन, नाहीं तरि वधिन तुम्हांसि, वश्य तो हर हो. ” ॥८४॥
शरपटळानें झांकी कुरुकटकाला चि तो न वासवि, त्या
खचर म्हणति, ‘ तेजस्वी लोपविता भेटला नवा सवित्या. ’ ॥८५॥
सुरदत्तधनुर्गुणरथनेमिध्वजवासिभूतनादानीं
कांपे न चमू चि, कु ही, स्वकुचांच्या जेंवि पूतना दानीं. ॥८६॥
खळबळजळनिधिमग्ना धेनु उसळल्या, अलावु जाल्या, हो !
हांसुनि विजय, मनिं म्हणे, ‘ कां गोपसखा मला बुजाल्या हो ! ? ’ ॥८७॥
गेल्या पळोनि गाई पृष्ठोपरि पुच्छभार वाहोनी,
राहोनि निश्चळे क्षण विजय निवे त्यांकडे चि पाहोनी. ॥८८॥
येतां चि विक्रमलवें श्रीहरिचा दयितदास वीर गडी
हरि करिघटेसि तैसा त्या कुरुसेनेसि वासवी रगडी. ॥८९॥
आंगावरि गोरज तें श्रीगोपाळांघ्रिचें चि भावुनि घे,
जाया सुयोधनावरि भीमाचा भीमशक्ति भावु निघे. ॥९०॥
भीष्मादि म्हणति, ‘ गेला कीं हो ! दुर्योधनांतकाम खरा. ’
धांवोनि गांठिती त्या जयलक्ष्मीदत्तकौतुका मखरा. ॥९१॥
पाहुनि बीभत्सु म्हणे, ‘ आला दुर्योधनावना कर्ण,
म्यां रिण परिग्रहाचें वारावें आजि, जेंवि नाकर्ण. ’ ॥९२॥
तत्काळ उत्तरें तो नेला कर्णाकडे चि रथ, वातें
घन गिरिकडे, सुवैद्यें स्वौषध रुग्णाकडे चि अथवा तें. ॥९३॥
भंगुनि सहाय, मारुनि बंधु, हराया समस्त तन्मद हा
पार्थ शरानीं झांकी; देखोनि म्हणे तदीयजन्मद ‘ हा ! ’ ॥९४॥
दव जेंवि तृणाऽवरणा, वृष भस्म करी महाशराऽवरणा,
पार्थ म्हणे, ‘ करितो गिरिशकमंडलुसीं पहा शराव रणा. ’ ॥९५॥
कर्ण हि इषुनीं झांकी मग त्या मोक्षेच्छुमानसाध्वसखा,
रुग्णानळा म्हणे जो, ‘ खांडव, सोडूनि सर्व साध्वस, खा. ’ ॥९६॥
तें किति वर्णावें म्यां ? पाहत होते विचित्रसमरा जे,
कर्णाच्या अपयानावधि ते गमले चि चित्रसम राजे. ॥९७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP