सहगमनाची चाल
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आमच्या लोकांत विष्णूचे दहा अवतार झाले अगर होणार असे मानण्याची चाल आहे हे प्रसिद्धच आहे. या दहा अवतारांपैकी पहिल्या चार अवतरांच्या ज्या कथा आहेत त्यांत देव व दैत्य यांचाच संबंध आहे. अवतारांशी मनुष्यप्राण्याचा संबंध पाचव्या म्हणजे वामन अवतारापासून लागतो. हा अवतार व याच्या पुढील परशुराम अवतार, या दोहोंत स्त्रियांच्या सहगमनाच्या कथा कोठे असल्याचे आढळत नाही. याच्यापुढे सातवा अवतार रामाचा होय. या अवताराच्या चरित्रासंबंधाने वाल्मीकिनावाच्या आद्य कवीने केलेला रामायण ग्रंथ प्रसिद्धच आहे, व त्याशिवाय रामावताराची कथा घेऊन इतर अनेक ग्रंथकारांनीही रामकथा वर्णिली आहे.
रावणाचा पुत्र इंद्रजित नामे होता, त्याचा वध लक्ष्मणाच्या हातून झाला असता इंद्रजिताची पत्नी सुलोचना हिने सहगमन केले ही कथा वाल्मीकिरामायणात कोठे आढळत नाही, तथापि ती आबालवृद्धांच्या तोंडी आहे, यावरून तिला कोठे तरी ग्रंथाधार असलाच पाहिजे असे मानणे जरूर आहे. रामचंद्राचे राज्य उत्तर हिंदुस्थानात असून त्याच्या दक्षिणेस दंडकारण्याची ओसाड राक्षसभूमी, तिच्या दक्षिणेस वानरादिकांची राज्ये, व सरतेशेवटी लंकाद्वीपात राक्षसी राज्य, याप्रमाणे भूपृष्ठाची स्वाभाविक मांडणी आहे, व या मांडणीप्रमाणे शेवटल्या राक्षसी राज्यातच काय ते सहगमनाचे उदाहरण दृष्टीस पडते.
या गोष्टीवरून तर्क करू गेल्यास सहगमनाची चाल मूळची राक्षस नावाच्या रानटी लोकांमधली असून, रावण जातीचा ब्राह्मण असूनही त्याचे राज्य इतक्या दूरच्या प्रदेशात झाल्यामुळे त्याच्या घराण्यात ती उचलली गेली. हा तर्क खरा असल्यास आर्यमंडळात सहगमनाचा आरंभ वेदकाळानंतरचा खरा, तरी बराच प्राचीन असावा असे मानिता येईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP