त्रैवर्णिक मृताचे शव दहनार्थ श्मशानात नेऊन चितेवर ठेविले असता दहनार्थ श्मशानात नेऊन चितेवर ठेविले असता त्या ठिकाणी शवाची जिवंत पत्नी शवाजवळ निजते, व आता अग्निसंस्कार व्हावयाचा, अशा प्रसंगी कर्मकर्ता शवास उद्देशून पुढील मंत्र म्हणतो :
इयं नारी पतिलोकं वृणाना निपद्यत उप त्वा मर्त्य प्रेतम् ।
विश्वं पुराणमनु पालयंती तस्यै प्रजां दविणं चेह धेहि ॥
( तैत्तिरीयारण्यक प्रपा. ६ अनु. १ ).
अर्थ : “ हे मरणधर्म्या ! ही स्त्री ( तुझी पत्नी ) पतिलोकाची प्राप्ती व्हावी, या हेतूने तुझ्या प्रेताजवळ पडली आहे. ती आजपर्यंत संपूर्ण प्राचीन धर्माने वर्तत आली आहे. तिला तू या लोकी संतती आणि द्रव्य दे. ( म्हणजे तिला या लोकीच राहू दे, व तुझी संपत्ती पुढील संततीच्या उपयोगाकरिता तिच्या स्वाधीन कर ). ” या मंत्रानंतर प्रेताचा कनिष्ठ बंधू, शिष्य अगर सेवक चितेजवळ येऊन शवाजवळ पडलेल्या त्या स्त्रीच्या डाचा हात आपल्या हाताने धरितो, व तिला उद्देशून पुढील मंत्र म्हणतो :
उदीर्ष्व नार्यभि जीवलोकमितासुमेतमुपशेष एहि ।
हस्तग्राभस्य दिधिषोस्त्वमेतत्प्रत्युर्जनित्वप्रभिसंबभूव ॥
( तैत्तिरीयारण्यक प्रपा. ६ अनु. १ ).
अर्थ : “ हे स्त्रिये ! ऊठ. तू ज्याच्याजवळ पडली आहेस, त्याचे प्राण निघून गेले आहेत. तू आता जिवंत असलेल्या लोकांकडे चल, आणि ज्याने तुझा हात धरला आहे, व जो तुजशी पुनर्विवाह करू इच्छितो, त्याची तू पत्नी हो. ”
येणेप्रमाने मंत्र म्हणणे झाल्यावर ती स्त्री चितेवर प्रेताच्या हातात दिलेली वस्तू काढून घेऊन चितेवरून उतरते, व घरी परत येते. प्रेतदहन झाल्यानंतर निराळ्या दिवशी अस्थीसंचयन होऊन अस्थी एका मृत्तिकापात्रात ठेविल्या जातात, व मृतास एकीहून अधिक पत्न्या असल्यास ज्येष्ठ पत्नीने, व एकच असल्यास त्याच स्त्रीने, तय अस्थी पुढील संस्काराकरिता बाहेर काढावयाच्या असतात. प्रेतक्रिया प्रतिदिवशी चालू असतेच, ती सर्व येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. दहाव्या दिवशी क्रिया चालते त्या वेळी आप्त, सोयरे वगैरे नात्याच्या व घरच्या सुवासिनी बाया क्रियेच्या जागी जमलेल्या असतात, व त्यांना नेत्रांत घालण्याकरिता काजळ देण्याचा विधी होतो, त्या वेळी पुढील मंत्र म्हणण्यात येतो :
एमा नारीरविधवा: सुपत्नीराञ्जनेन सर्पिषा संभृशंताम् ।
अनश्रवो अनमीवा: सुशेवा आरोहंतु जनयो योनिमग्रे ॥
( तैत्तिरीयारण्यक प्रपा. ६ अनु. १ ).
अर्थ : ‘ सुवासिनी, व चांगले पती असणार्या, अशा ह्या स्त्रिया हे अंजनयुक्त लोणी आपल्या नेत्रांस लावोत. अश्रुरहित, रोगरहित व सत्कारास पात्र अशा स्त्रिया आधी घरात प्रवेश करोत. ’ आताचे हे शेवटचे दोन मंत्र आश्वलायन गृह्यसूत्रातही आले आहेत.