आनुवंशिक वर्णपद्धतीविरुद्ध आणखी पुरावा
प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.
आता लिहिल्या प्रकारची वर्णलोपाची वेडगळ कल्पना व तिचे समाधान या दोन्हींचा उल्लेख या ठिकाणी करावा लागला, याचे कारण आपल्या लोकांनी भ्रान्तीने स्वीकरिलेली आनुवंशिक वर्णपद्धती होय. ही पद्धती मूळची खरी नव्हे. अशाविषयी सविस्तर प्रतिपादन मागे कलम १११ ते १२४ येथे झालेच आहे, तथापि त्याच्याच पुष्टीकरणार्थ आणखीही एक पुरावा देता येण्याजोगा असल्याने त्याचा प्रसंगाने या ठिकाणी उल्लेख करणे विहित वाटते.
‘ ऋषींचे कुळ आणि नदीचे मूळ पाहात बसू नये ’ अश्सी एक म्हण मराठी भाषेत प्रसिद्ध आहे. तिचा अर्थ इतकाच आहे की, हे कुळ किंवा मूळ जर कोणी पाहात बसेल, म्हणजे जर कोणी त्याचा शोध लावील, तर तो शोध लागण्यापूर्वी ऋषी आणि नदी याविषयी त्याच्या मनात असलेली पूज्यबुद्धी नाहीशी होईल. जी नदी आज कोणाला पवित्र व गंगातुल्य वाटत असेल, ती उत्पत्तिस्थळी जाऊन पाहता अतिशय घाणेरड्या ठिकाणाहून निघाली आहे असे दृष्टीस पडण्याचा संभव असतो; त्याचप्रमाणे एखादा ऋषी कितीही मोठा व पवित्र वाटत असला, तरी त्याच्या उत्पत्तीचा प्राकर, त्याची मातापितरे, इत्यादी गोष्टीसंबंधाने काही तरी घोटाळा आहे, असेच बहुधा आढळून येण्याची भीती असते. सर्वच ऋषींची उत्पत्ती चांगल्या आईबापांपासून झाली आहे असे नाही. मनुषयोनीशिवाय इतर योनीशी मनुष्याच्या संयोग घडून कोणाची उत्पत्ती झाली; कोणाचा बाप ब्राह्मण, तर आई अत्यंत हीन जातीची; कोणाची दोन्हीही मातापितरे सर्वथा निषिद्ध वर्गाची, अगर निषिद्धाचरणाचे; असे प्रकार पुराणादी ग्रंथांचे परिशीलन करणाराच्या दृष्टीस पदोपदी पडतील. व्यासाची उत्पत्ती नुकती मागे कलम १६१ येथे आलीच आहे. कित्येक पुराणातून वसिष्ठाचा जन्म नापितापासून ( ! ) झाल्याचे सांगितले असून, त्याने अक्षमाला अथवा अरुंधती स्त्री वरिली ती धडधडीत चांडालकन्या असल्याचे प्रत्यक्ष वेदात लिहिले आहे.
तात्पर्य सांगायचे इतकेच की, शोधन करू लागले म्हणजे या असल्या घाणेरड्या गोष्टी ऐकाव्या व मानाव्या लागतात. याकरिता हे असले प्रकार पाहात बसूच नये अशी धर्मभोळ्या लोकांची साधारण सर्वत्र समजूत आहे. ही समजूत बरीवाईट कशीही असो, या समजुतीप्रमाणे आचरण ठेवून जनसमाज ऋषीविषयी आपला पूज्यभाव कायम ठेवण्याचा यत्न करितो. ऋषीचे नुसते नाव निघाले की तो उत्तम पवित्र ब्राह्मण आहे, त्याचे तप व सामर्थ्य ही फ़ार मोठी आहेत, इत्यादी प्रकारच्या कल्पनाच त्याच्या मनाने अगदी ठाम धरून ठेविल्या असतात. पण त्या कल्पनांवरून प्राचीन काळाबद्दलचे अत्यंत स्वाभाविक अनुमान काय निघते याबद्दलचा विचार मात्र कोणी करीत नाही. तो जर का क्षणभर कोणी करील, तर प्राचीन काळी वर्णपद्धती ही व्यक्तिनिष्ठ होती, आनुवंशिक नव्हती असे स्पष्ट रीतीने त्यास कबूल करावेच लागेल !!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP