समाजधुरीणांचे काव्य व उपसंहार

प्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.


समाजधुरीणांचे काव्य व उपसंहार
फेरफार कोणतेही झाले तरी ते त्या ज्या वेळच्या समाजाच्या सोयींस अनुसरून असणे हे इष्ट होय, व असे फेरफार झाले तरच त्यापासून समाजाचे कल्याण होऊ शकते. समाजाची साधारन स्थिती पाहू गेल्यास, त्यात ज्ञानी, विद्वान व दूरदूर दृष्टी ठेवून व गाणारे लोक थोडे असतात, व अज्ञानी आणि चालत्या रूढीस चिकटून राहू पाहणारे अशा लोकांचा भरणाच विशेष असतो. या बहुजनसमुदायास विशेष्ट मार्गाने नेणे हे काम समाजनेत्यांचे अगर समाजधुरीणांचे आहे; व ते जर योग्य रीतीने वागले तर अज्ञसमाजाच्या वर्तनास चांगले काम लावून देणे, व त्यायोगे समाजाचे वास्तविक हित साधणे या गोष्टी त्यांच्या हातून होऊ शकतात. तेच त्यांचे वर्तन तसे नसले, तर आलेली वेळी कशी तरी निघून जाते, पण समाजाच्या अयोग्य वर्तनाचे दुष्परिणाम तेवढे मागे राहतात.
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जन: ।
स यत्प्रमाणं कुरुते लोक्स्तदनुवर्तते ॥
हे वचन भगवद्गीतेत आले असून, त्यात, ‘ श्रेष्ठ म्हणजे समाजातील धुरीण लोक जे आचरण करितात तेच आचर्ण इतर लोकही करितात, धुरीण लोकांकडून जी गोष्ट प्रमाण म्हणून करण्यात येते तिचे अनुसरण सामान्य लोकांकडून होत जाते, ’ असे सांगितले आहे. यावरून पाहू गेल्यास समाजाच्या कल्याणाची जबाबदारी समाजधुरीणांवर असल्याचे उघड होते.
या जबाबदारीतून पार पडण्यास या धुरीणांचे वर्तन उत्तम असले पाहिजे, व ते तसे असले तरच त्यांचे वजन समाजावर राहू शकते. अडाणी लोकांना पुढचा पोच नसतो, व ते तात्कालिक सुख पाहणारे असल्याने रूढीला आश्रयून कर्मांची फळे मिळवू पाहतात. अशांची मने वळविणे हे काम सोपे नव्हे. ते काम करण्यास कौशल्य लागते. या कौशल्याचे वास्तव्य समाजधुरीणांच्या अंगी नसेल तर समाजाचा विश्वास धुरीणांवर राहात नाही; त्याच्या बुद्धीला भ्रान्ती होऊन त्याचे वर्त्न निरर्गल होते, व त्याला आवरण्याला कोणी नाहीसा होतो. भगवद्गीतेत “ न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसंगिनाम् ” असे म्हटले आहे, त्याचा अर्थ हाच आहे.
विवाहसंस्थेत आजमितीला अनेक दोष आहेत, परंतु त्यांची ओळख अगर परीक्षा अडाणी लोकांस नाही. ती ओळख समाजधुरीणांनी प्रथमत: स्वत:च्या मनास करून दिली पाहिजे, व नंतर युक्तीयुक्तीने ती अज्ञ लोकांच्या मनासही पटविली पाहिजे. या पुस्तकातील शेवटल्या प्रकरणात अनेक प्रकारच्या दोषांची चर्चा याच हेतूने केली आहे. आजच्या स्थितीत आगंतुक जातिभेदाशी विवाहाच्या कल्पनेची सांगड पडली आहे. ही सांगड आपोआप केव्हा तरी मोडेल, व मोडण्यास निराळे यत्न करण्याची जरूर नाही, असे म्हणणारे लोक आपल्या समाजात आहेत; परंतु असे म्हणणे समाजाच्या नेत्यास कदापि शोभत नाही.
सामाजिक बबतीत उघड असलेले दुष्परिणाम प्रत्यक्ष पाहात असूनही ज्यांच्याने अशा प्रकारे स्वस्थ बसवते, ते लोक आपल्या उदासीन वर्तनाने समाजाचे धुरीणत्व भोगण्यास आपणा स्वत:स अपात्र करून घेतात, व एका अर्थी ते समाजाचे शत्रूच होत असे म्हटले असताही चालेल. ही अपात्रता ज्यास नको असेल, त्यांनी पोक्त विचाराने साक्षात उद्योगच केला पाहिजे, व प्रसंगी समाजाची दूषणे व तज्जन्य त्रास सोसण्यासही धैर्याने तयार असले पाहिजे.
अंत:करणात सद्धेतू ठेवून केलेले वर्तन, आज नाही उद्या, केव्हा तरी फलद्रूप झाल्याशिवाय राहावयाचे नाही. ‘ सत्यसंकल्पाचा दाता भगवान ’ ही साधुवर्य तुकारामाची उक्ती अक्षरश: खरी आहे. मनुष्याचे वर्तन दृढनिश्चयाचे असले तर ते परिणामी हितकारक होतेच होते, हा जगाचा अनुभव आहे. समाजातले दोष आज आपणास कायमचे जडलेले वाटतात, तेच समाजनेत्यांनी दृढनिश्चयाने उद्योग केल्यास अल्प काळात नाहीसे होऊ शकतील, व त्या कामी दयाळू परमेश्वराचे साहाय्य मिळेल हे निर्विवाद आहे.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:55:45.1730000