आणखी खरोखर विचार करू गेल्यास आता लिहिल्या प्रकारची पाळी येणे हे सर्वथा अपरिहार्य व न्याय्यही आहे. विवाहाचे कृत्य आजमितीला धर्मशास्त्रापैकी एक म्हणून आपण समजतो, व जनसमुदायाच्या कल्पनेप्रमाणे व समजुतीप्रमाणे ते ईश्वरानेच मनुष्यास लावून दिले आहे; परंतु ही कल्पना मुळात पाहता खरी नव्हे. मनुष्यजातीची उत्पत्ती प्रथम झाली तेव्हापासून विवाह होत आले आहेत ही गोष्ट अर्वाचीन धर्मशास्त्रकारदेखील मानीत नाहीत. तसेच अमुक पुरुषाने अमुक स्त्रीस वरू नये, तिजशी दैहिक संबंध करू नये, अशा प्रकारचे निषेधही आद्य काळी नव्हते.
स्त्रीपुरुषांच्या दैहिक व्यवहाराचा उच्चार करणे किंवा त्यांचे सूचक हावभाव करून दाखविणे, हे आजमितीस आपण अयोग्य समजतो; व स्त्रियांनी पुरुषांस किंवा पुरुषांनी स्त्रियांस या व्यवहारासंबंधाने साक्षात संबोधिणे हेही आपण त्याचप्रमाणे गैर मानितो. परंतु ही मर्यादा प्राचीनकाळी मुळीच नव्हती. मनात इच्छा झाली की स्त्रीपुरुषे ती एकमेकांस खुशाल निर्भीडपणे व नि:शंकपणे बोलून दाखवीत. ऋग्वेदसंहितेत ‘ आगधिरारिगधिता० ’ व ‘ उपोप मे परामृश ’ हे दोन मंत्र आले आहेत, त्यांत हल्लीच्या काळच्या समजुतीप्रमाणे पूर्ण विचकटपणा भरलेला आहे. अथर्ववेदात अखेरीस कुंतापसूक्ते म्हणून काही सूक्ते लिहिली आहेत, त्यांत ‘ न तत्कुमारि तत्तथा ’ इ. मंत्रभाग आले आहेत, त्यांतही विचकटपणाचा हाच, पण अंमळ सुधारलेला मासला स्पष्टपणे दृष्टीस पडतो. पुरुषांची वामदेव्यव्रते चालू असता पुरुषसमागमाच्या इच्छेने स्त्रिया तेथे येत, व पुरुष त्यांची इच्छा पूर्ण करीत, हे नुकतेच वर कलम १८२ येथे सांगितले आहे. तात्पर्य सांगावयाचे इतकेच की, स्त्रिया आनि पुरुष यांच्या व्यवहारासंबंधाने विशेष नीतीची म्हणून कलमे आजमितीस आपल्या दृष्टीस पडतात, ती मूळची ईश्वरदत्त नसून समाजाची उत्क्रान्ती होत होत अपोआप बनत आली आहेत.
श्वेतकेतूची कथा वर आली आहे, तिजवरून पाहिजे तो पुरुष पाहिजे त्या स्त्रीस आपणाशी रममाण होण्याकरिता घेऊन जात असे, हे स्पष्टच आहे. हळूहळू समाजात निर्बंध होऊ लागले, व ते तरी ज्या वेळी जशी सोय वाटली त्से त्या वेळच्या सोईस अवलंबूनच झाले असले पाहिजेत. ‘ बळी तो कान पिळी ’ हाच मूळचा न्याय. परंतु त्यासही कालान्तराने आळा पडू लागला. स्त्रीपुरुषांचा विवाह ही कल्पना या वेळी अस्तित्वात आली नव्हती, व कौमारस्थितीत स्त्रियांवर संपूर्ण पुरुषसमाजाची सारखीच सत्ता, असा प्रकार चालत होता.
छांदोग्योपनिषदात सत्यकाम जाबालाची कथा आली आहे, तीत त्याच्या आईस कौमारस्थितीत अनेक पुरुषांशी संबंध घडल्यामुळे आयते वेळी मुलाचा बाप कोण हे सांगता आले नाही म्हणून वर्णिले आहे, त्याचे बीज हेच. असो; अशा प्रकारची स्थिती चालता चालता पुढे कोणतीही स्त्री एकवार एकाने आपली म्हटली म्हणजे तिच्या नादी दुसर्या कोणी पुरुषाने लागू नये या नियमाचा उदय झाला. कोणतीही स्त्री आपली म्हणण्यापूर्वी तीस आपली करण्याच्या उपायासंबंधाने या नियमात प्रतिबंध नसल्याने राक्षस अगर पैशाच विवाहप्रकारात वर्णिलेली स्थिती चाल्त असे. हळूहळू या स्थितीतही फरक पडत जाऊन स्थलविशेषी इतर प्रकारच्या विवाहांची उत्पत्ती होत चालली.
फार प्राचीन काळी संपूर्ण मनुष्यजातीचा एकच वर्ण मानण्यात येत असे; परंतु पुढे ती परिस्थिती बदलून चातुर्वर्ण्याची स्थापना झाली; व जे निरनिराळे विवाहप्रकार उत्पन्न होत गेले, ते वर्णश: थोड्याबहुत प्रमाणाने वाढत जाण्याची पाळी आली. कालान्तराने समाज जसजसा सुधारत चालला तसतसा या विवाहप्रकारांपैकी राक्षस व पैशाच पद्धतींचे विवाह प्रत्यक्ष होण्याची चाल बंद पडली, व त्या विवाहांचा आदर कोणी कोठे केल्यास कोणी कोठे केल्यास त्यास फौजदारी कायद्याच्या दृष्टीने गुन्ह्याचे स्वरूप आले. आजमितीस हे विवाह कोठेही दृष्टीस न पडण्याचे कारण हेच - म्हणजे राजकीय सत्ताच होय. ही सत्ता प्रथम केव्हा वापरण्यात आली, याचा शोध लागत नाही. तथापि स्मृतिग्रंथात हे विवाह थोड्याबहुत अंशांनी तरी धर्मशास्त्रसंमत सांगितले असून ते कोठे दृष्टीस पडत नाहीत, यावरून ही बंदी स्मृतिकाळानंतर झाल्याचे स्पष्ट दिसते.
प्राचीन काळी समाजाची स्थिती जसजशी बदले, तसतसे नवे स्मृतिकार उदयास येत; परंतु जैनधर्माचे अगर बौद्धधर्माचे प्राबल्य या देशात होत जाऊन ब्राह्मण धर्मास र्ह्हासाची कळा लागली, तेव्हापासून नवे स्मृतिग्रंथ होण्याचे बंद पडले, व लोकसमुदायात पूर्वीच्या स्मृतिग्रंथांस अनुसरूनच चालेल तोपर्यंत व्यवहार आटपून घेण्याचा रिवाज पडला. ही अशी स्थिती झाल्याने ब्राह्मणधर्मी समाजाची स्थिती क्रमश: कशी बदलत गेली हे सांगणे प्रसंगी दुर्घट झाले आहे. कसेही असो; या मधल्या काळात ब्राह्म व प्राजापत्य हे दोन विवाहप्रकार प्राय: जिवंत राहिले. इतर विवाह बहुतेक नामशेषच झाले यांत संशय नाही.
हे राहिलेले प्रकार तरी मूळच्या व्याख्येप्रमाणे शुद्ध रूपाचे राहिले नसून तेथे थोडीबहुत कालवाकालवी झालीच आहे; व या कालवाकालवीत यात आणखी नवीन गोष्टींची जशी भेसळ होत जाइल, - व ही भेसळ होत जाणे सर्वथा दुष्परिहार्य होय, - तसे पूर्वकाळच्या विवाहप्रकारांहूनही नवे नवे विवाहप्रकार अस्तित्वात आल्यावाचून राहणार नाहीत. कोणत्याही प्रकारांचा उदय होवो, जोपर्यंत ते कोणा व्यक्तिविशेषाच्या जुलुमामुळे उत्पन्न झाले नाहीत, तोपर्यंत अज्ञ समाज त्यालाच ‘ धर्म ’ म्हणणार, व हा धर्म ईश्वरप्रणित आहे अशीच त्याची समजूत होत राहणार.
खरा प्रकार म्हटला म्हणजे धर्म ईश्वरदत्त असतो ही कल्पनाच चुकीची आहे; व धर्माचे स्वरूप नेहमी परिस्थितिविशेषावर अवलंबून राहते. पूर्वीचे स्त्रीपुरुषव्यवहार अनियंत्रित होते, ते कालान्तराने नियमबद्ध होत चालले, व त्यापासून ‘ विवाह ’ या कल्पनेची उत्पत्ती झाली, व तिची वर दर्शविल्याप्रमाणे स्थिती होत होत तिला सांप्रतचे रूप प्राप्त झाले आहे. मालतीमाधव नाटकात भवभूतीने -
कालो ह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।
असे म्हटले आहे. त्याचा अर्थ ‘ काल अनंत असून पृथ्वीही मोठी आहे ’ असा आहे, व त्या धोरणाने पाहू गेल्यास, आजपर्यंत गेला हा काल काहीच नाही, अद्यापि किती तरी काल आहेच आहे; - अर्थात आजची विवाहस्थिती हीच कायमची व अखेरची मानण्याचे कारण नसून तीत यापुढेही अनेक फेरफार होणे शक्य आहे, व ते होतीलच.