असंगृहीत कविता - चंबळच्या तीरावर

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[ वैशाखमासिं या चालीवर ]

गम्भीर हिन्द - कन्यके, विख्यात चम्बळे !
पाहून शान्त तूजला मन हें उचम्बळे,
पाहून आमुची स्थिती नाजूक आजला
निश्चिन्त राहसी कशी तें सांग निश्चळे !    १

न दिसे तरंग, न ध्वनी उमटे तुझ्या जळी.
जाई सवेग वाहुनि ही शुष्क डाहळी;
जोरांत वाहतो किती तव भाव हा दिसे
ज्याने अभंग पात्र हें अगदी तुडुम्बलें.    २

कित्येक पाहिलीं तुवां चिरवाहिनी युगें,
इतिहास बापुडा तुझा स्मृतिसिन्धु-बिन्दु गे
परि सांग, थोए तू कधी क्षण देखिला असा ?
ना ऐकिवांत, पुस्तकीं मज तो न आढळे.    ३

आता स्वराज्य ध्येय हो मुस्लीम-हिन्दवी.
संयुक्त राजकारणीं हो गुप्त यादवी;
आशूर आज, आजची दसरा विशेष हे !
देशाभिमानसंगमीं जन आज डुम्बले.    ४

अल्लास पत्करा, कुणी झर्थुश्त्र आठवा
अज्ञेयवाद घ्या, कुणी वेदान्त साठवा,
ही गांठ राष्ट्रभक्तिची सर्वांस बान्धिते,
हिन्दी जनास हा अता नवधर्म आकळे.    ५

अस्पृश्य बांधवा, मला चल भेटुं दे तुला,
द्विज जाहलास, तूज उन्नति-मार्ग हा खुला
कर माफ़ दोष आमुचे, चल उन्नतीप्रती,
अनुतापवह्रि सारखा हृदयांत या जळे.    ६

" जर लाविली अनार्यता इथल्या तृणा कुणी
तर ताविली बसेल या हृदयास डागणी. "
कविराज ‘ हिन्दवन्दनीं ’ हें बोलला परी
धिक् धिक् ! अनार्य राहिलीं नरजन्तुचीं दळें.    ७

अज्ञान लोपुनी परी पसरेल संस्कृती,
दिननेत्र दीपवील तैं प्रतिभा-चमकृती;
प्रवृत्ति आरुणी असें नव-गीत गातसें,
मोहाळ राष्ट्रभक्तिचें, मध सारखा गळे.     ८

पाषाण-चित्त जीं तुझीं असतील लेकरें,
फ़ुटतील खास त्यांचिया हृदयीं नवे झरे ?
आशीर्वचें तुझ्या न कां पळतील पांडळे ?
तुझें भविष्य माय गे, बघतील आन्धळे !    ९

हा शीत वात सिंहली ये उत्तरेकडे,
पळवीत मेध चालला मारीत कोरडे,
खेकाळतात अश्व ते चौफ़ेर धूळ ही--
न अकालवृष्टि ही रडें वायूस कोसळे.    १०

हांसे, रडे नि ओरडे वेडा असे जणू,
चैतन्यपूर्ण हो परी इथला अणू अणू,
जाई विचित्र या अशा रूपांत काय हा
मोहीमशीर तूजला भेटून चम्बळे ?    ११

गाम्भीर्य चम्बळे तुझें गिरिचें जसें तसें,
वक्षप्रदेश कां अता वर-खालि होतसे ?
परिणाम जाहला गमे तुज वायु भेटतां
पाणी हिमाद्रिनेत्रिं का रविचुम्बनें खळे ?    १२

कोट्यानुकोटि योजनांवरती शशी-रवी,
प्रत्येक लील्या परी सिन्धूस नाचवी,
ही प्रीति आदिशक्ति ! मी म्हणतों नमोस्तुते !
बळ हें हिचें सुरांसुरांहुन होय आगळें.    १३

स्वप्नींहि का मुहम्मदी विसरले कर्बला,
नरसिंहशक्ति आज ती स्मृति देइ निर्बला;
युद्धांत त्या इमाम् हुसैन् मरणास भेटला,
ओठां तृषार्त त्याचिया रणतीर्थ लाभलें;    १४

तो पुण्यशील फ़ातमा-नयनांस गारवा !
चाणाक्ष धीट नाखवा तो धर्म-तारवा--
मेला, परन्तु जिंकलें मृत्यूस शेवटीं
पावित्र्य, शौर्य तें वृथा ! प्रारब्ध ना टळे.     १५

निजहक्क सत्यरक्षणीं तव रक्त वाहिलें,
तव कार्यदुक्ख त्यामुळे अमुचेंहि जाहलें;
आशूर आज-वाहुनी अश्रू न फ़ायदा,
हे ईशसिंह बालका, कृतिला न या फ़ळें.    १६

निजहक्क सत्यरक्षणीं भेटो सुखें यम,
लाभून सद्गती जगीं हो कीर्ति कायम;
मग हिम्दुबन्धुंनो, निज हक्करक्षणीं --
खर्चा करून एकटीं आपापलीं बळें.    १७

दसरा म्हणून चालला कुठल्या शिलंगणा ?
स्वार्थांगणांत चालली त्याची विटम्बना !
नहि हिन्दवन्धु हो अतां दशखण्ड भूमि ही;
कसला मुहूर्त पाहतां ? पळतात हीं पळें    १८

हा जातिभेद कोट जो मज्बूत भोवती
समजा तुरुंग तो, नसे दिल्दार सोबती;
जर मोहिमेस जावया बाहेर इच्छितां,
लावा सुरुंग कोट हा कैसा न ढासळे ?    १९

नटतां कशास दास हो ? यश राहिलें पुढे,
सोनें म्हणून वाटितां विडिपान बापुडें !
सारून अस्तन्या वरी हातीं कुर्‍हाड घ्या,
तोडूनि रूढि-शृंखला व्हा सर्व मोकळे.    २०

वाड्यांत राहिले जरी असतील पूर्वज,
खेळे न आज वायुशी वर उन्नतिध्वज;
पायास लोण लागला, वर आग लागली,
कां आंत घोरतां असें चिन्तीत मागलें ?    २१

तुम्हांस वाघुळापरी अन्धार कां हवा !
मैदान हें पहा खुलें,  बलवर्धिनी हवा !
राष्ट्रीय लागली इथे प्रगतींत शर्यत,
बलिदानतृप्ति कां ? न व्हा हो नीच कावळे !    २२

हातीं मशाल घेउनी निजराष्ट्रभक्तिची,
दारें कुठे उठा पहा येथील मुक्तिचीं;
कोनान् कोपरा तुम्ही शोधा पुन: पुन्हां --
उठवा तयास सक्तिने दिसल्यास वाघुळें.    २३

गोपाळ एक आमुचा नेता सुधारक,
त्याचा सुधार्क तीव्र तो क्षयरोगमारक;
स्वातन्त्र्य, न्याय, सत्य या वन्दा त्रिमूर्तिला,
ध्यातां वृथा कशास हो पाषाण-ठोकळे ?    २४

आवाज कोठला ? सुटे ही तोफ़ चम्बळे,
बारूत - धूम्र - मेघ हे किति उन्च चालले !
श्रीरामचन्द्रजीस हें सविरोध वन्दन,
लटिकेंच रामरावणीं नवयुद्ध जुम्पलें.    २५

गातात भाट लष्करी स्तुतिपाठ हे पुढे---
ऐकून जीव पिन्जर्‍यामधि काय तडफ़डे !
हे देवि हिन्द, शक्ति दे भाटास या तुझ्या,
गाईन वैभवा तुझ्या, मन होय मोकळें.    २६

हातांत शस्त्र राहिलें परकीय वस्तरा,
जिव घाबरा करी चुलींतिल धूर झोम्बरा,
काळीज धडधडे कुठें उडतां फ़टाकडा
अभिमानशून्य जाहलों नामर्द बावळे !    २७

खोटेंच युद्ध हें परी रक्तास तापवी,
मेल्या मनास आजच्या दे चेतना नवी,
लवती विजा धुरांतुनी हो मेघगर्जना,
हे धातुसिंह हो, करा या मोकळे गळे.    २८

उसळून तू तिरावरी हे चम्बळे पहा,
संग्राम पाहिले जरी असशील तू दहा,
उमेदसिंग सोडितो शर राबणावर,
मृत्कण्ठ छिन्न जाहला, जल लाल साण्डलें.    २९

हत्ती धडास मारितां धडकी पडे धड,
किल्ल्यांत गडगडात हो, जीवन्त हो गढ,
चौफ़ेर तोफ़ चालली बुरुजांवरून या,
उसळे नवीन लाट या मनिं आणि आदळे.    ३०

कांठीं तुझ्या बसून ही अनुभूति घेतली,
अन् ज्योत मायभक्तिची हृदयांत चेतली,
विझल्यास ती असो मला धिक्कार सर्वदा !
मुजरा त्रिवार हा तुला रजपूत चम्बळे !     ३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP