आधुनिक फ़ार्शी कवितेचा मासला म्हणून ‘ पूरिदाउद ’ च्या ‘ नवाये बूनी ’ या कवितेचें खालील भाषान्तर रसिक जिज्ञासूंस मनोरंजक वाटेल अशी आशा आहे.
[ वृत्त : अक्रूर ]
तव विरहाने काय सुन्दरी, झालें !
हातींचें स्वास्थ्य पळालें,
काळे तूझे कस्तूरीसम केस,
मज तसेच आले दिवस.
बोरूवाणी झालों मी रडण्याने
कृश केसापरि कुढण्याने,
या डोळ्याचें, शोकभराचें पाणी
सय हाऊराची’ आणी;
चेहर्यावरूनी बुरखा
कर दूर ! अवधि कां इतका ?
किति बघू वाट ? कर सुटका.
हा जिव झाला अर्धा लागुन झुरणी,
वाहीन यास तव चरणीं. १
अनुपदेशक हा कथी हुरींच्या गोष्टी,
थोरवी न त्यांची मोठी !
मत्प्रेमाचें वतन पुरातन धाम,
इतरांशी नाही काम.
मी पक्षि असें, करीं मनोहर गान,
घ्रटें मम होय इराण.
परि वक्रगती नीचलक्र फ़िरल्याने
पारीस होय मम ठाणें.
जरि या शहराचा हेवा
बेहेस्त करी परि देवा !
होईल मला सुख केव्हा ?
हें स्थान नसे सखिच्या आरामाचें,
हें काय मला कामाचें ? २
सण आज असे, लोक विलासी इथले
बेहोश धुन्द हे पडले;
मी तर्र जरी देशभक्ति-चषकाने
हरपलीं न माझीं भानें.
वाजे सनई, कुठे तम्बुरी, चंग,
काव्यगान चढवी रंग--
माझ्या कानीं दूर अन्तरावरुन
परि इराणचें ये रुदन
डोंगरी कबूतर जेवी
ठुमकतें मिरवती तेवी
लावण्यवती या देवी;
परि फ़िरण्याने बघुनी हे देखावे
हृदयांत दुक्ख हेलावे. ३
जोंवर आहे इतिहासाच्या स्मरणीं
शत्रूची जुलमी करणी,
तोंवर मजला जिनगीचा कण्टाळा,
शोकाशी मात्र जिव्हाळा.
हें रडणें, हे आंसू, हे उच्छ्वास--
येणार खास फ़ल यांस;
येईल उद्या लाल-फ़ुलांना बहर
होईल जिथे मम कबर.
दाऊद-सुताच्या हृदयीं
आपुल्या इराणाविषयी
चेतली प्रीति, या समयीं
म्हणुनी माझीं रसाळ गाणीं जमती,
ओजाची नाही कमती. ४
१९ डिसेंबर १९१५