असंगृहीत कविता - आई, हें पहिलेंच चुंबन तुझें
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.
[ सुनित ]
आई, हें पहिलेंच चुंबन तुझें की जें मला आठवे,
याची शान्त सुखानुभूति न कधी जाईल चित्तांतुनी
डोळे उत्सुक आणि तोण्ड रडवें माझे बघोनी तुवां
खाली वाकुन ओठ ते भिडविले डाव्या कपोलावरी.
" आशीर्वाद असे मदीय तुजला जा, बाळ जा त्या स्थळीं
जेथें अन्नऋणानुबन्ध असतो, जावेंच लागे तिथे;
नेकीने पण चाल नित्य; अमुची काही नको काळजी
सर्वत्र प्रभु हा, तया जवळ घे ज्याला न आपंगिता "
ऐसें बोलुन तू पुन्हा वठविलें भाळीं कृपा-चुम्बन,
अन् काही तरि वर्णनीय न असें नेत्रांत तुझ्या दिसे;
माझे हात करून ऊंच तुझिया आई गळाभोवती
प्रीतीचा विळखा, सुटो न कधिही, ऐसा तदा घातला.
" देवा रे, म्हटलें मनीं, बिलगुनी मी घट्ट राहों असा !
आईच्या पदराशिवाय जगिं या कोठे दुजा कोंवसा ? "
२६ ऑगस्ट १९१४
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP