समासोक्ति अलंकार - लक्षण १९
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
अशारीतीनें दुसर्या शास्त्रांच्या व्यवहाराच्या बाबतींतही समजावें. ही समासोक्ति अनेक अलंकारांत अनुकूल म्हणून (मदत करणारी) राहते. उदा० :---
“सूर्य असतांनाही पद्मिनी [(१) कमलिनी (२) सुंदर स्त्रिया] भुंग्यावरोबर (दारूडयाबरोबर) व्यवहार करतात; (गमन करतात). मग अस्ताला गेल्यावर [(१) सूर्य अस्तास गेल्यावर (२) पुरुषाची स्थिति खालावली तर] त्या जास्तच दुराचरण करणार. जा जगांत स्त्रियांचा विश्वास कुणी धरावा ?”
ह्या ठिकाणीं समर्थ्य म्हणून राहिलेली समासोक्ती अर्थान्तरन्यासाला अनुकूल आहे.
“उत्तम स्त्रियांचा सुद्धां कधीं भरंवसा नसतो. राजस्त्रिया [(१) राण्या (२) चंद्रविकासी कमललता] मधुपाशीं [(१) दारुडयांशीं (२) भुंग्यांशीं ] रममाण होतात.”
ह्या ठिकाणीं समासोक्ति समर्थक अर्थ (वाक्यार्थ) म्हणून राहिली आहे.
“गंजारव करणार्या भुंग्यांच्या थव्यांनीं गोड गायिलेली स्तुति ऐकून अत्यंत लाज वाटूं लागल्यामुळे (च कीं काय), मला वाटते, या अरण्यांत वृक्षांचीं कुटुंबें (बेटें) थेट जमिनीपर्यंत वाकलीं आहेत. (माना खालीं घालून उभीं आहेत).”
ह्या ठिकाणीं दुसर्यांनीं केलेली ऐकून मान खालीं घालणें इत्यादि विशेषणांनीं होणार्या साम्यामुळें उठवलेल्या समासोक्तीच्या योगानें, येथील उत्प्रेक्षा संभवते. सज्जनांच्या व्यवहाराशीं अभिन्नत्वानें (एकरूप होऊन) राहणार्या वृक्षांच्या व्यवहारांत, जमिनीपर्यंत फांद्या पसरणें व मान खालीं वाकविणे या दोहोंचा अभेदाध्यवसान करून व त्याला (म्ह० त्या धर्माला) उत्प्रेक्षेचें निमित्त बनवून तयार केलेली लज्जारुप हेतूची, संभावनारूप ही उत्प्रेक्षा आहे. नाहींतर (म्हणजे सज्जनव्यवहाराची समासोक्ति येथें उत्प्रेक्षेकरतां आधार म्हणून, न मानली तर) लबाड मनुष्यानें खालीं मुंडी घालणें सुद्धां त्रपाहेतूत्प्रेक्षेला अनुकूल आहे, असें मानण्याचा प्रसंग येईल तेव्हां ह्या ठिकाणीं समासोक्ति उत्प्रेक्षेला अनुकूल आहे. (असें मानलेच पाहिजे) याचप्रमाणें,
“मदनाचा (शंबरराक्षसाच्या शत्रुरूप मदनाचा) राज्याभिषेक आहे असें जाणून चंद्र सुधेचा (१) अमृताचा (२) सफेतीचा जगाला जणु लेप करीत आहे.”
ह्या ठिकाणींही धनी व नोकर यांच्या व्यवहारावर [आज्ञाय, राज्याभिषेकं वगैरे विशेषणसाम्यावर] आधारलेली (म्ह० या व्यवहाराच्या समामोक्तीवर आधारलेली) सुधालेपनाची उत्प्रेक्षा आहे. ह्याच पद्धतीनें अचेतनांचा व्यवहार प्रकृत असतां व त्यावर चेतनांच्या व्यवहाराची स्वरूपोत्प्रेक्षा, हेतूत्प्रेक्षा, अथवा फलोत्प्रेक्षा होत असतां तिच्या मुळाशीं समासोक्तीच आहे असें समजावें. त्याचप्रमाणें, चेतनांचा व्यवहार प्रकृत असतां व त्यावर अचेतनाच्या व्यवहाराची स्वरूपोत्प्रेक्षा, अथवा फलोत्प्रेक्षा होत असतां तिच्या मुळाशींही समासोक्तिच आहे असें समजावें.
येथें रसगंगाधरांतील समासोक्ति प्रकरण संपलें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016

TOP