समासोक्ति अलंकार - लक्षण १६
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
तर मग (तुम्ही विचाराल). “पुरा यत्र स्त्रोत:०’ यांत अलंकार तरी कोणता ? (येथें अप्रस्तुतप्रशंसा म्हणावी तर) अप्रकृत वाच्य असून त्यानें प्रकृत व्यवहाराचें सूचन जिच्यांत होतें, अशा अप्रस्तुतप्रशंसेचा येथें संभवच नाहीं; कारण येथें प्रकृत वृतांतच वाच्य आहे.” यावर आम्ही म्हणतों, चांगलें विचारलें आपण (महाशयांनीं ) ! ह्या आपल्या शंकेचें समाधान अप्रस्तुतप्रशंसाप्रकरणांत आम्ही विस्तारानें करणार आहोंत, शिवाय, अलंकारसर्वस्वकारांनीं, ‘साद्दश्यगर्भ विशेषणावर आधारलेली साद्दश्यमूला समासोक्ति होतें,’ असें म्हटलें आहे; या त्यांच्या लक्षणांत विशेषणसाम्य (मग तें साद्दश्यगर्भ विशेषणांचें साम्य असेना कां ?) असल्यानें, त्यांचें म्हणणें शक्यकोटींतलें तरी आहे; पण तुमच्या ह्या सारूप्यानें होणार्या समासोक्तींत तेवढेंही (साद्दश्यगर्भ विशेषणांचें साम्यही) नाहीं; तेव्हां तुम्हांला स्वत:चा आधारभूत ग्रंथ (अलंकारसर्वस्व हा) समजला तरी नाहीं किंवा त्याच्याशीं तुमच्या म्हणण्याचा धडधडीत विरोध तरी आहे. थोडक्यांत हा विषय सांगितला.
अशी ही समासोक्ति (१) लौकिक व्यवहारावर लौकिक व्यवहाराचा आरोप (२) शास्त्रीय व्यवहारावर शास्त्रीय व्यवहाराचा आरोप व यांचे उलट (म्हणजे) (३) लौकिक व्यवहारावर शास्त्रीय व्यवहाराचा आरोप (४) व शास्त्रीय व्यवहारावर लौकिक व्यवहाराचा आरोप, अशी चार प्रकारची होते. पैकीं, लौकिक व्यवहारावर लौकिक व्यवहाराच्या आरोपानें होणारी समासोक्ति पूर्वीं सांगितलीच आहे.
शास्त्रीय व्यवहारावर शास्त्रीय व्यवहाराच्या आरोपानें होणार्या दुसर्या प्रकारच्या समासोक्तीचें उहाहरण हें :---
“ज्या ज्ञानस्वरूप (प्रत्ययात्मकचिद्रूप) सर्वोत्कृष्ट ब्रह्माचें ठायीं. त्रिगुण व अवयवांची वृद्धि हीं दोन्हींही संभवत नाहींत. (कारण ब्रम्हा निर्गुण व निरवयव आहे) व जें ज्ञाते लोकांत ‘सत्’ म्हणुन प्रसिद्ध आहे, त्या ब्रम्हाची आम्ही उपासना करतों.”
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP