समासोक्ति अलंकार - लक्षण १७
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ब्रम्हापर प्रकृत अर्थानंतर व्याकरणपर अप्रकृत अर्थाचें सूचन श्लिष्ट विशेषणांच्या योगानें येथें झालें आहे तें असें :--- ‘जें शतृशानच् (म्ह० वर्तमानकालवाचक धातुसाधिताचें परस्मैपदी व आत्मनेपदी प्रत्यय) प्रत्ययरूप (पदार्थ) पुढें (म्ह० धातूच्या पुढें) आले असतां गुण आणि (अथवा) वृद्धि होत नाहीं, व ज्याला वैयाकरण ‘सत्’ असें नांव देतात, त्या प्रत्ययाची आम्ही माहिती करून घेतों.”
ह्या ठिकाणीं, वेदांतशास्त्रांत प्रसिद्ध असलेल्या ब्रम्हाविषयक व्यवहारावर व्याकरणशास्त्रांत प्रसिद्ध असलेल्या शतृशानच् व्यवहाराचा आरोप केला आहे. लौकिक व्यवहारावर शास्त्रीय व्यवहाराचा आरोप केल्याचें उदाहरण :---
“दुसर्याचें कार्य करण्याचा नाद असल्यानें, आपला स्वार्थ सोडून देणारा, गुणरूप (म्ह० गुणी) पुरुषांचे ठायीं सतत अभिन्नत्वरूप ऐक्याची भावना धारण करणारा; ह्रदयांत स्वभावत:च ललित (म्ह० सुंदर) व भव्य महामत्ता - मोठेपणा जाग्रत असणारा व नित्य समर्थ असणारा असा एक अवर्णनीय पुरुष अत्यंत उत्कर्षशाली आहे.” (ह्या प्रकृत लौकिक अर्थावर येथें अप्रकृत शास्त्रीय अर्थाच - व्यवहाराचा - आरोप केला आहे. हा अप्रकृत व्यवहार व्याकरणशास्त्रांतील तत्पुरुषसमासाविषयींचा आहे. त्याचा अर्थ असा :--- “स्वत: मधील पदांचा अर्थ ह्या समासांत टाकूत दिला जातो, निराळा दुसरा अर्थ सांगण्याकरतां; ह्यांतील गुणभूत (गौण) पदार्थांचा प्रधान पदार्थाशी अभेदसंबंध असतो; व त्याची सतत एकत्व संख्या असते. ह्यांतील अन्त्य स्वर जात्याच उदात्त असतो; व ह्याचें एकार्थीभावरूप सामर्थ्य नित्य असतें; असा हा तत्पुरुष समास अत्यंत उत्कर्षशाली आहे.)
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP