समासोक्ति अलंकार - लक्षण १८
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
ह्या ठिकाणीं वरील प्रकृत अर्थावर ‘समर्थ: पदविधि:’ या पाणिनि सूत्रावर (पा. २।१।१) पतंजलीनें जें भाष्य लिहिलें आहे, त्या अप्रकृत अर्थाचा आरोप केला आहे. तो अप्रकृत असलेला, भाष्यांतील अर्थ असा :--- ‘अथ ते वृत्ति (समासवृत्ति) मानतात त्याचें काय मत - (ते काय म्हणतात,) असें म्हणून भाष्यकारांनीं, जहस्वार्था व अजहत्स्वार्था अशा दोन वृत्तींना मानणारे दोन पक्ष सांगितले आहेत; त्याच भाष्यांत, उपसर्जन म्ह० गौण असलेल्या पदार्थांचा गुणीशीं (म्ह० धर्माचा धर्मीशी) अभेद असतो. आणि त्यांची संख्या पण एक असते, असें ध्वनीनें सूचित केलें आहे. हें अभेदत्व व एकत्व भर्तृहरीनें (वाक्यपदीय ३।१४।१००) खालीलप्रमाणें स्पष्ट केलें आहे :---
“ज्याप्रमाणें सर्व औषधींचे रस मधांत आपलें सामर्थ्य ठेवतात, व त्या मधाशीं अभिन्नत्वानें राहतात, त्याप्रमाणें संख्याही तशीच म्ह० उत्तरापदरूप प्रातिपदिकाशीं अभिन्नत्वानें (एक होऊन) राहणारी आहे. असें वैय्याकरण समजतात.”
‘समर्थ: पदविधि:’ यांत सांगितलेलें मामर्थ्य म्हणजे ‘सबंध म्ह० समस्त पदांना एक पद समजून होणारा शाब्दबोध’ (म्हणजेच एकार्थीभावरूप सामर्थ्य) असेंही त्याच ठिकाणीं (म्ह० महाभाष्यांत) सांगितलें आहे.
शास्त्रीय व्यवहारावर लौकिक व्यवहाराचा आरोप असा :---
“श्रेष्ठ वैय्याकरण हा अत्यंत गूढ अर्थानें युक्त अशा पाणिनिसूत्राच्या आधारें प्रकृतीच्या पुढें (मूळ शब्दापुढें) प्रत्यय लावून, आगमांचा (मूल शब्दांच्या बरोबर राहाणार्या प्रत्ययाचा) विचार करणारा असा शोभतो.”
येथें व्याकरणपर प्रकृत अर्थावर राजाच्या लौकिक व्यवहाराचा आरोप केला आहे. [तो राजव्यवहाराचा अर्थ असा :--- ज्यांतील उद्देश गुप्त आहे अशी कार्याचीं सूत्रें योजून व त्यामुळें प्रजेचा (प्रकृतीचा) विश्वास संपादून (प्रत्ययं कृत्वा) आगमांची (म्ह० द्रव्यप्राप्तीची) विचारणा करीत असणारा राजा शोभतो.]
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP