समासोक्ति अलंकार - लक्षण ११
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
“ह्या श्लोकांत, तनुत्व वगैरे विशेषणांचें साम्य (म्ह० हीं विशेषणें बाला व लता या उभयतांनाही साधारण) असल्यानें, सुंदर बालेवर लता व्यवहाराची प्रतीति होते. ही प्रतीति होण्याला, केवळ लतेच्या ठिकाणींच शक्य असणारा जो विकासरूपी धर्म, त्याचा प्रकृत बाला या धर्मीवर समारोप करणें हें (लताव्यवहाराची प्रकृतधर्मीच्या ठिकाणीं प्रतीति होण्याला) कारण आहे. असें जर न मानलें तर, केवळ विशेषणसाम्यानें लताव्यवहाराची निश्चितपणें (हमखास) प्रतीति होईलच असें नाहीं. येथें विकास हा धर्म प्रकृत बालेच्या ठिकाणीं उपचरित म्ह० लाक्षणिक समजावा.”
या अंलकारसर्वस्वकारांच्या म्हणण्याचा विचार करूं या :--- (या बाबतींत आमचें म्हणणें असें कीं) तुम्ही (म्ह० सर्वस्वकार) “या ठिकाणीं, विशेषणांच्या साम्यानें लतेच्या व्यवहाराची प्रतीति होत नसून अप्रकत जी लता तिचा असाधारण (खास) धर्म जो विकास त्याच्या (प्रकृत धर्मीवर केलेल्या) आरोपाच्या जोरावर ती (लताव्यवहाराची) प्रतीति होते.” असें स्वत:च (पूर्वी) म्हटलें आहे; मग ‘विशेषण साम्याने अप्रस्तुताचे सूचन’ हें जें तुम्ही समासोक्तीचें लक्षण केलें आहे तें, या ठिकाणीं (म्ह० ‘तन्वी मनोहरा.’ यांत) कसें लागू पडेल ? यावर तुम्ही म्हणाल, “आमच्या समासोक्तीच्या लक्षणांत केवल विशेषणाच्याच साम्यानें होणारें अप्रकृत व्यवहाराचें सूचन आम्हाला सांगायचे नसून विशेषणाच्या साम्यानेंही होणारें अप्रकृताचें सूचन आम्हांला येथें सांगावच आहे. (अभिप्रेत आहे.) तेव्हा प्रस्तुत स्थलीं, विकासरूपी धर्म विशेषण साम्याच्या जोडीला (अधिक) आला असून तो गमक झाला आहे (हें कबूल). पण म्हणून विशेषणसाम्याचें जें गमकत्व (म्ह० अप्रकृत व्यवहाराचें सूचन करण्याचें सामर्थ्य) तें काहीं नाहीं.” यावर आमचें (म्ह० जगन्नाथाचें) म्हणणें असें कीं, विशेषणसाम्य व आणखी दुसरें कांहीं तरी अप्रकृताच्या सूचनाचे कारण मानल्यास, तुमच्या लक्षणाची श्लेषांत अतिव्याप्ति होईल. (कारण श्लेषांतही विशेषणें श्लिष्ट असल्यानें ती उभयसाधारण असतात. व आणखी विशेष्यही श्लिष्ट असल्यानें उभयसाधारण होऊन अप्रकृतार्थाचें सूचन करतें). तुम्ही (अलंकारसर्वस्यकार) म्हणाल “लक्षणांत आम्हाला केवळ विशेषणांचें साम्यच सांगायचे आहे. (विशेष्याचें साम्य आम्हाला नको आहे आणि श्लेषांत तर विशेष्याचेंही साम्य असतें.) तेव्हां त्या द्दष्टीनें येथें या लक्षणाची अतिव्याप्ति होणार नाहीं; शिवाय तन्वी ‘मनोहरा,’ येथेंही लक्षणाची अव्याप्ति होणार नाहीं; (यांतही समासोक्तीचें लक्षण लागू पडेल”). पण आमचें (म्ह० जगन्नाथाचें) म्हणणें असें कीं, ‘तन्वी मनोहरा०’ यांत मुळीं समासोक्तीच नाहीं. ज्या ठिकाणीं, साधारणविशेषणांच्या जोरावर अप्रकृताचें भान (सूचन) होतें, त्या ठिकाणींच समासोक्ति अलंकार होतो; पण ज्या ठिकाईं असाधारण (म्ह० केवळ अप्रकृतालाच लागू पडणाण्या विशेषणांच्या बळावर अप्रकृताचें सूचन होत असेल, त्या ठिकाणीं व्यंग्यरूपक असतें अशी (समासोक्ति व व्यंग्यरूपक या दोन) अलंकारांच्या विषयांची व्यवस्था लावून टाकली आहे. तेव्हां, प्रस्तुत ‘तन्वी मनोहरा०’ या श्लोकांत साधारणविषेशणें असली तरी त्यांच्या बळावर अप्रकृत लतेचें सूचन होत नसून विकास या अप्रकृताच्या (लतेच्या) असाधारण धर्मामुळेंच अप्रकृताचें सूचन होत असल्यानें येथें व्यंग्यरूपक मानणेंच योग्य होईल.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP