अथवा शुद्धसाधारण्यानें व कर्याहून निराळ्या धर्माला पुढें करून होणार्या समासोक्तीचें हें दुसरें उदाहरण :---
“(म्यां आंधळ्यानें) म्यां अज्ञान्यानें (कठिण जागेवरून चालत असतां) भयंकर संकटांत (पडेन या भीतीनें) नाश होईल या भीतीनें, हिमालयाच्या शिखरवरून आलेल्या गंगेचा पूर्ण आश्रय घेतला. (काठी घट्ट हातांत धरली.)” या ठिकाणीं हिमालयाच्या शिखरावर होणार्या कळकाची काठी पकडणें हा जो अप्रकृत वृत्तांत, त्याच्याशीं अभेदानें प्रकृत व्यवहार राहिला आहे.
आतां कार्यरूप धर्मानें केलेल्या व शुद्धा साधारण्यानें होणार्या समासोक्तीचें उदाहरण हें :---
“हे राजा, तुझी चोहोंकडे कवि लोभानें वाटेल ती स्तुती करोत, पण तेवढयानें तूं स्तूति करण्यास योग्य थोडाच होणार आहेस ? कारण तुझ्या धनुष्याचा प्रबळ (तरूण) प्रताप आजकाल पृथ्वीला आपल्या वेंघेंत घेत आहे. (पोटाशीं धरीत आहे, हा दुसरा अर्थ). दिशांना व्यापून टाकीत आहे. (दिशांना आलिंगित आहे हा दुसरा अर्थ). स्वर्गाअला चिकटतो (स्वर्देवतेचें चुंबन घेतो, हा दुसरा अर्थ). गमन करण्यास कठीण अशा अमरावतीकडे जातो. (उपभोगाला अयोग्य अशा अमरावतीचाही उपभोग घोतो हा दुसरा अर्थ).
कार्यरूपीं धर्म व इतर अप्रकरचे धर्म यांचा संकर होऊन झालेल्या (साधारण धर्मावर आधारलेल्या) समासोक्तीचें उदा) :---
“ (हे राजा), तुझ्या शत्रु - राजांच्या सुंदर स्त्रिया जंगलांतून घाईंआईनें घांवत असतां, (कोणतें) काटेरी वृक्ष काय काय पकडीत नाहींत ? ते काटेरी वृक्ष वर उचलले असतां (त्या स्त्रियांची) वेणी धरतात; वाजूला सारले असतां त्या स्त्रियांच्या बगला (बाजू) पकडतात; दूर लोटले असतां (त्यांच्या कमलकोमल) पायांना बिलगतात; व रागानें दुरूनच टाळलें असतां, पदर खेंचतात.”
ह्या ठिकाणीं कंटकचितत्व (अंगावर रोमांच उभें राहणें) ह्या कार्याह्न इतर, अशा साधारण धर्माशीं कबरीग्रहण (वेणी पकडणें) हा (प्रस्तुत) कार्यरूप धर्म संकीर्ण (मिश्रित) झाला आहे.
समासोक्तींत सूचित होणारा जो अप्रकृत व्यवहार तो उपस्कारकच (म्ह० वाच्यार्थाला उपस्कारक असल्यानें गौण) असतो; (म्हऊन) तो प्रधान अर्थ होत नाहीं. त्या अप्रकृत अर्थानें उपस्कृत असा प्रकृत अर्थच (समासोक्तींत) प्रधान असतो. पण समासोक्तींत व्यंग्याचें प्राधान्य मानलें व वाच्याचें प्राधान्य मानलें नाहीं तर, वरील ‘देव त्वां परित: स्तुवन्तु०’ या, वर समासोक्तीचें उदाहरण म्हणून दिलेल्या, श्लोकांत, (वाच्यार्थ अप्रधान होऊं लागेल, व व्यंग्यार्थ प्रधान होऊं लागले व मग) निंदेचें (प्रथम प्रतीत होण्यार्या निंदेचें) स्तुतींत पर्यवसान (शेवट) होणार नाहीं. कारण (ह्या श्लोकांत) स्तुति ही प्रकृत व्यवहाराच्या आश्रयानें राहिली आहे; व निंदा ही अप्रकृत व्यवहाराच्या आश्रयानें राहिली आहे, हें येथें ध्यानांत ठेवलें पाहिजे. (या समासोक्तीचे संदर्भांत) अलंकारसर्वस्वकारांनीं म्हटलें आहे :---
“हे भाग्यवंता ! सडपातळ, मोहक, फुलांसारखे डोळे असणारी, फुलासारखी हसणारी अशी बाला, तुला पाहतांच खुलते.” (हींच विशेषणें लतेकडे समास बदलून लावावीं; व असा अर्थ करावा :--- सडपातळ, मोहक फुले हेच जिचे डोळे आहेत, फुलें हेंच जिचें हास्य आहे अशी एक कोवळी वेल तुला पाहताच विकसित होते.