मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|संतांच्या स्मृतीत चोखामेळा|

चोखोबांच्या स्त्रीचे बाळंतपण

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्‍पृश्‍य होते.


चोखोबाची कांता असे ती गर्भिण । झाले तीस पूर्ण नव मास ॥१॥
करूनि विनंति पतिसी बोलत । असावें साहित्य घरामाजीं ॥२॥
ऐकूनियां चोखा करीत विचार । कोणें ऐसा घोर वागवावा ॥३॥
न पुसतां गेला बहिणीच्या गांवा । आनंदे केशवा आळवीत ॥४॥
दोन प्रहर झाले न येती भोजना । कांता विचारणा करीतसे ॥५॥
शोध करितांना संध्याकाळ झाली । पति माझा गेला कोणीकडे ॥६॥
विरक्तासी मी तों सांगितलें काम । कैसा झाला भ्रम माझे बुद्धी ॥७॥
अहो पांडुगंगा आणा त्यासी आतां । न सांगे मी वार्ता संसाराची ॥८॥
झाली तेव्हां श्रमी । प्रसूत वेळा आली । विठाई धांवली तेचि वेळां ॥९॥
चोखोबाची बहीण झाला सारंगधर । वहिणी उघडा द्वार हांका मारी ॥१०॥
दोघीही भेटल्या तेव्हां आनंदानें । आलें तें रूदन चोख्याकांते ॥११॥
बरें बाई तुम्हां देवानें धाडिलें । पती माझा गेला कोणीकडे ॥१२॥
चाणाक्ष बायका तुम्ही अनिवार । अज्ञान भ्रतार तुमचे गांवीं ॥१३॥
म्हणोनियां तुम्ही सांगता त्या काम । विरक्तासी श्रम वाटतसे ॥१४॥
दादा माझा सुज्ञ आधींच हें श्रुत । होयाचें तें होत आपणची ॥१५॥
केली त्वां सूचना आला माझ्या घरा । त्यानें केली त्वरा मजलागी ॥१६॥
सर्वही साहित्य दिलें म्हणे आतां । नका करूं चिंता वहिनी कांहीं ॥१७॥
सर्वहि साहित्य होतें तिजपाशीं । ऋद्धिसिद्धी दासी तयाचिया ॥१८॥
प्रसुत ते झाली पुत्र झाला तिला । आनंद वाट्ला पांडुरंगा ॥१९॥
वांटिली शर्करा सर्वत्र यातीसी । माझ्या चोखोबासी पुत्र झाला ॥२०॥
लावुनि उटणें न्हाणियले तिला । श्रम तिचा गेला सर्वांगाचा ॥२१॥
पांचवीही केली तिनें आनंदाने । घातलें भोजन याती लागीं ॥२२॥
तेरावे दिवशी बाळ ते पाळणा । घालितसे राणा वैकुंठीचा ॥२३॥
साडी आणि चोळी आंगडें टोपडे । आणियलें कोणे रखमाइनें ॥२४॥
बोलावुनि सुवासिनी पाळणां घातलें । नाम तें ठेविलें कर्ममेळा ॥२५॥
बारसेंहि केलें तिनें आनंदानें । घातलें भोजन सर्व याती ॥२६॥
चोखोबासी मास झाला बहिणीघरीं । विचारी अंतरीं चोखा तेव्हां ॥२७॥
सोडोनियां आलों प्रपंचाचे भये । अंतरले पाय देवाजीचे ॥२८॥
सदगदित झालें तयाचें अंतर । प्रेम अश्रुनीर बाहे डोळा ॥२९॥
येतो बाई आतां कृता असो द्यावी । सांगोन पाठवी आपल्या हातें ॥३०॥
आतां जातें वहिणी आपुल्या गांवाला । रागें भरतील मला धनी माझे ॥३१॥
ऐकोनियां बोले चोखोबाची कांता । नका जाऊं आतां बाई तुम्ही ॥३२॥
येऊं द्या घरधनी करतील बोळवण । काय मी उत्तीर्ण होऊं आतां ॥३३॥
काय काय आठवूं तुमचे उपकार । न पडे विसर जन्मोजन्मीं ॥३४॥
दादा माझा असे पांडुरंग भक्त । सदां त्याचें चित्त देवावरी ॥३५॥
मान्य करी वहिनी तयाचें वचन । तेणेंचि कल्याण असे तुमचे ॥३६॥
सदगदित झालें दोघावें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥३७॥
सांभाळी हा आता माझा कर्ममेळा । येईल चोखामेळा घरीं आतां ॥३८॥
थांबा बाई आता शिवते मी चोळी । न लगे वनमाळी बोलतसे ॥३९॥
पुसोनी सर्वांसी गेला तो सांवळा । आला चोखामेला घरालागीं ॥४०॥
येवोनिया कांता वंदित चरण । दिलें उचलोन बाळ हातीं ॥४१॥
बाई आतां गेल्या भेटल्या वाटेसी । खंती या जिवासी वाटे त्याची ॥४२॥
सांगितला त्यासी सकळ वृत्तांत । सदगतित चित्त चोखा झाला ॥४३॥
कैसि बाई येथें आले पांडुरंग । धन्य तुझें भाग्य भेटी झाली  ॥४४॥
सदगदित झालें दोघांचें अंतर । प्रेम अश्रुनीर वाहे डोळां ॥४५॥
भक्तांसी संकट पडों नेदी देव । घालीतसे धांव त्यांच्या काजा ॥४६॥
विष्णुदास नामा वंदी त्याचे चरण । वर्णितसे गुण वारंवार ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : July 10, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP