अभंग ७१ ते ८०

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

७१.
तुम्हीं रामाचे परिवार । तुम्हां माझा नमस्कार ॥१॥
मला गरिबासी आठवा । माझ्या रामासी पाठवा ॥२॥
आई माझे सितापती । मज वश करीं श्री रघुपती ॥३॥
ज्याचा बंधु तूं लक्ष्मण । तो मज भेटवीं राम माझा प्राण ॥४॥
भरत शत्रुन्घ बंधू ज्या तुम्हीं । मज भेटवा राघव स्वामी ॥५॥
वानर नळनीळ सुग्रीवादि सारे । माझ्या राघवासी घेउनि यारे ॥६॥
राम सेवक तूं मारुती । मज साक्षीं दावुनि सितापती ॥७॥
कोणि तरि करा हो उपकार । राम भेटवा नमितों वारंवार ॥८॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । आहे सज्जन सुख रंगांत ॥९॥

७२.
आजि होति सुलक्षणें । सव्य भृकुटी नेत्र स्फुरणें ॥१॥
येतो वाटे सितापती । आमुचा जन्माचा सांगाती ॥२॥
बैसउनि रत्न जडितासनीं । आरत्या ओंवाळिन पूजोनी ॥३॥
घालुनि साष्टांग ममस्कार । मागेन स्वस्वरुपीं दे मज थार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । पाहुनि डोळेभरी वंदिन माथां ॥५॥

७३.
नयनीं भासला प्रकाश । वाटे आला जानकीश ॥१॥
कंठ दाटतो प्रेमानें । ध्वनी ऐकों येतो कानें ॥२॥
माझ्या मी पणाचा नाश । करुनी आपण प्रगटले जगदीश ॥३॥
सुखें सुख वाटे भारीं । आला खचित राम रावणारी ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । निजखुण बाणली चित्ता ॥५॥

७४.
भय कोणाचें मज आतां । पूर्ण आनंद घोटी स्वतां ॥१॥
राम भक्तांचा कैवारी । आजी कळलें मज अंतरीं ॥३॥
माझा गळउनि देहासिमान । आपण प्रगटला जाण ॥४॥
धन्य दिवस आजि सोनियाचा । लाभ झाला मज राघवाचा ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । गेली माझी तळमळ व्यथा ॥६॥

७५.
इतुके दिवस होता कोठें । न मिळसि किती श्रम केले मोठे ॥१॥
असुनि जवळीं तूं ह्रदयस्थ । मज कसुनि पाहिला नेमस्त ॥२॥
भक्त आपुले असंख्य कोटी । तपोनिधी नियमनिष्ट निराश पोटीं ॥३॥
त्यांत माझी कायसी गोष्टी । काय पाहिलें लावुनि कसोटी ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । मी हा अज्ञ हें कीं कळलें आतां ॥५॥

७६.
नयनीं पाहिला श्रीराम राजा । गेला सारा शिण माग माझा ॥१॥
सुख वाढलें अपार । चित्त वृत्ती झाल्या गार ॥२॥
राम आनंद चिद्‌घन । त्याचें घडलें मज दर्शन ॥३॥
गेली माझी तळमळ सारी । वाटे आनंद आनंद भारीं ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझे चरण वंदिन माथा ॥५॥

७७.
बहुत जन्माचा शेवट । श्रेष्ट । नरजन्म चोखट ॥१॥
कळलें मज रामराया । तुझ्या पाहुनि दिव्य पाया ॥२॥
काय इतरा ज्या त्या योनी । तुझी नोळखि जानकि ज्यानी ॥३॥
ऐसा आनंद नाहीं तेथें । जो मी घोटितों नरजन्मीं येथें ॥४॥
किति काळ मी होतों भुकेला । आत्म दर्शनें हेतु पूर्ण केला ॥५॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझी करणी अगम्य पाहातां ॥६॥

७८.
आल्या जन्माचें सार्थक । देव पाहावा आपण एक ॥१॥
आपण सुखाचा सागर । ज्या वरि विश्वलहरि अपार ॥२॥
तो तूं आपण रामराजा प्रगटुनि हेतु पूर्ण केला माझा ॥३॥
मोठा मज वरि हा उपकार । तुज साष्टांग नमस्कार ॥४॥
विनवी तुज विष्णु कृष्ण जगन्नाथा । तुझी करणी अगम्य पाहातां ॥५॥

७९.
सच्चित्सुख सुखरूप आपण मुळिंचा । दिससी तो तूं राम दशरथ कुळिंचा ॥१॥
संरक्षाया भक्ता अपार । धरिसि नानाविध अवतार ॥२॥
त्या तुज करुणा येउनि माझी । चरण दाखविले मज आजी ॥३॥
केला माझा त्वां उद्धार । सकुटुंब सपरिवार ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा । धन्य आपुल्या माता पिता ॥५॥

८०.
अभिमानी तूं भक्तांचा । अनुभव आला मज साचा ॥१॥
तुज आळवित होतों किति काळ । तरि मप्तापें लावियेला येतां वेळ ॥२॥
परि तूं दयेचा सागर । म्हणउनी प्रगटला मजसमोर ॥३॥
तुज भक्तांचा कळवळा । हें मज कळलें त्रीजगत्पाळा ॥४॥
विष्णू कृष्ण जगन्नाथा । सच्चिदानंद आपण स्वता ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP