विद्यागणपतिरहस्यम् - अध्याय ६ वा
प्रस्तुत पोथी म्हणजे गणेशप्राप्तीची इच्छा करणार्यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान.
शंकर म्हणाले :
ब्रह्मदेवा, आतां तुला स्तंभनविद्या सांगतों. पूर्वींप्रमाणेंच बीजमंत्रासहित यंत्र लिहून धरणी-बीज मध्यभागीं लिहावें. मंत्राक्षरें लिहून साध्य-नामासह प्राणप्रतिष्ठा-स्थापना करून सात रात्रीं-पर्यंत पिवळ्या फुलांनीं पूजा करावी. लोखंडावर, तांब्याच्या पत्र्यावर किंवा भूर्ज-पत्रावर यंत्र लिहून अर्धरात्रीपर्यंत १००८ जप करावा. आणि रणभूमीमध्यें तें यंत्र बलि देऊन पुरून टाकावें. त्यामुळें चतुरंगसेना स्तंभन केला जाते. त्याचप्रमाणें नगरांत, नगराच्या आंतील भागांत, स्नेहसंमेलनांत, तसेंच शेतांत येणार्या टोळधाडी, रस्त्यांत येणारे चोर, हिंस्र पशूया सर्वांचेंहि या यंत्रपद्धतीनें स्तंभन करतां येतें. बैलाचें शेण जमिनीवर पडण्यापूर्वी घ्यावें. पिंडाकार करून विशेषत: मंगळवारीं जाळावें. त्याच्या भस्मांत यंत्र साध्यनामासह लिहून त्यावर विघ्रेशाची सात रात्रींपर्यंत पूजा करावी. भस्म ज्याला लावावें त्याचें स्तंभन होईल. किंवा तें घेऊन एखाद्या सभेंत गेलांत तर तुमच्या वाणीनें सभेचें स्तंभन होईल.
ताडपत्रावर यंत्र लिहून त्याची प्राणप्रतिष्ठा करून पिवळ्या फुलांनीं पूजा करावी.
कुंकू वाहून ८००० वेळां जप करावा.
आणि तें ताडपत्र शिखेंत ( शेंडींत ) ठेवल्यास लोकस्तंभ होईल. गजयुद्धांत, मेषयुद्धांत हें यंत्र बांधल्यानें प्रति-योद्धयाचें स्तंभन होतें.
शंकर पुढें म्हणाले :
हे ब्रह्मदेवा, तुला जास्त काय सांगूं !
आतां तुला रहस्यच सांगतों.
ऐक, “ आनय ” आणि “ स्तंभय ” हे दोन शब्द साध्याच्या नांवाबरोबर लिहिले तर त्याच्या केवळ जपानेंहि स्तंभन होतें. ब्रह्मदेवा, शत्रूचें उच्चाटन करणारें स्तंभन सांगतों. पूर्वीप्रमाणेंच लोखंडाच्या पट्टीवर यंत्र लिहून मंत्राक्षरें वायुबीजानें युक्त करावींत. प्राणप्रतिष्ठा करून काळ्या फुलांनीं त्याचें पूजन करावें. नऊ रात्रींपर्यंत पूजा करून दररोज ८००० जप करावा. वाळलेलीं पानें त्याभोंवतीं गुंडाळून गवताळ भूमि किंवा स्मशान, खड्डा किंवा किल्लयासारख्या घरांत तें जाळावें. त्याचें भस्म बेहडयामध्यें बांधून शत्रूच्या घरांत टाकावें. त्यामुळें शत्रु स्वत:च्या बंधूसह देशान्तराला जाईल; आणि तो कोठेंहि गेली तरी त्याचें उच्चाटन होईल. त्याचप्रमाणें “ उच्चाटय ” ह्या पदासह केवल जप केल्यास शत्रूचें ताबडतोब उच्चाटन होईल, यांत मुळींच शंका नाहीं.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP