ब्रह्मदेवा, आतां पुरश्चरणाचें लक्षण सांगतों. पर्वताच्या अग्रभागींत नदीतीरीं, सिद्धदेवालयांत, घरांत, विजनस्थानांत किंवा पवित्र ठिकाणीं पूर्वेकडे तोंड करून, कासवाच्या आसनावर बसून सिद्धीसाठीं मंत्र जपावा. आसनावर न बसतां केलेला जप म्हणजे केवळ शरीराला त्रास देणें! त्यामुळें देवता प्रसन्न होत नाहीं. दर्भासनावर एकपट फलप्राप्ति तर चर्मासनावर आठपट. विष्टरावर सोळापट तर कूर्मासनावर शंभर पटीनें फलप्राप्ति होते. पवित्र आसनावर बसून गुरूंचे, परभगुरूंचें, परात्परगुरूंचें स्मरण करून योनिमुद्रा दाखवून मस्तकावर नमस्कार करावा. नंतर गणपति, दुर्गा, क्षेत्रपाल, सरस्वती यांना दोन्ही गुडघे टेकून नमस्कार करावा आणि पूजा करावी.
आसनावर शुद्धमातृका ठेवून कुंकुमन्यास करावेत. अकारादि क्षकारान्त मूलमंत्रानें मातृकांचे तीन खंडांनीं कुंकुमन्यास करावेत. हे महान्यास करून मग मंत्रन्यास करावेत.
विघ्रेश्वराचें ध्यान करून दररोज १००८ जप करावा. त्याच्या दशांश तर्पण करावें. त्याचा विधि-तांबें, कांसें किंवा माती यांच्या पात्रामध्यें बिंदु, त्रिकोण, षट्कोण, अष्टदल वा षोडशदल वृत्तत्रययुक्त काढून, तें पूजायंत्र पाण्यांत ठेवून तर्पण करावें.
मंत्रन्याससहित ध्यान करून १०८ वेळां मंत्र-तर्पण करून नैवेद्य दाखवावा. मंत्रसिद्धीसाठीं ३० हजार जप करून गणेशप्रसादासाठीं होम करावा. प्रथम सलक्षण कुंड तयार करवून, त्याला तीन मेखला कराव्यात. त्या चौकोनी कुंडावर प्रोक्षण करून लिपिन्यास करावेत. कुंडामध्यें अग्रीची प्रतिष्ठापना करून पर्युक्षण, परिस्तरणासह पात्रासादन करून घ्यावें.
प्रणीता, प्रोक्षणी, आज्यस्थाली, स्रुवा, जुहू कुंडाच्या उत्तरभागाला विधिपूर्वक ठेवून प्रोक्षणीमध्यें पाणी घेऊन “ आपोदेवी. . . ” या मंत्रानें प्रोक्षण करावें. अग्रीच्या उत्तरेला वरुणाची स्थापना करून पूजा करावी. आज्यसंस्कारानंतर स्रुवसंमार्जन करून आज्यभाग देउन अग्रीची पूजा करावी. त्यानंतर पीठपूजा करून क्रमश: सुधासमुद्र, कल्पवृक्ष, आधारशक्ति, सत्त्व, रज, तम, तीव्रादि नव शाक्ति यांची यथाक्रम पूजा करून विद्यागणेशाची “ गणानां त्वा . . . ” या मंत्रानें फुलें वाहून पूजा करावी.
आणि ध्यान करावें. “ द्वादशभुजभरुणाभं गजवदनमंबिकाकारम् ॥
दिव्यमाणिभूषितांगं देवं विद्यागणेश्वरं वंदे ॥१॥ ”
विधीपूर्वक पूजा करून १०८ आज्याहुति द्याव्यात. त्यानंतर ३२ आहुति परिवारदेवतांसाठीं मूलमंत्रानें आज्याच्या द्याव्यात. पुरश्चरणाचा होम असल्यास सपरिवार हवन करावें. १६ वेळां मंत्र म्हणून पूर्णाहुति द्यावी. त्यानंतर महाव्याह्लतिपूर्वक प्रायश्चित्ताहुति द्यावी.
पायस, अपूप इत्यादि मधुर अन्नासह षोडशो-पचार पूजा करून तांबूल द्यावा आणि मंत्रपुष्पां-जलि करावी. पंचमुद्रा प्रकट करून विद्यागणे-शाचें ध्यान करावें :
“ सगुणं निर्गुणीकृत्य सच्चिदानंदविग्रहम् ॥
वामनासापुटेनैव हत्पद्मे भावयेत्प्रभुम् ॥१॥
तन्मयस्त्वमनुप्राप्य स परि-वाचितो भवान्॥
मम ह्लत्कमलं प्राप्य स्थिरो भव विनायक ॥२॥ ”
असा मंत्र म्हणून स्वत:ची गंधफुलांनी पूजा करावी.
स्वत:च्या ठिकाणीं अग्रीची संभावना करून पुढील मंत्र म्हणावा:
“ ॐ भूर्भुव: स्वरोम् एह्यग्रे त्वमुपातिष्ठ स्वमा-त्मानं प्रयाहि मे । ”
नंतर यथाशक्ति मूलमंत्राचा जप करावा आणि पुरश्चरण करावें. हें स्वत: करणें जमत नसल्यास विद्यागणेशभक्तांकडून पुरश्चरण करवून घ्यावें आणि त्याचें दानपूर्वक फल घ्यावें.
तें फल असें आहे “सिद्धयन्ति सर्वकर्माणि नश्यन्ति रिपवस्तथा ॥
तदारभ्य गणाधीश: सखा तस्य भवेत् ध्रुवम् ॥१॥ ”