शंकर पुढें सांगूं लागले :
हे ब्रह्मदेवा, गणेशप्राप्तीची इच्छा करणार्यांना अत्यंत आवश्यक असें पूजाविधान सांगतों. सूर्यग्रहणांत किंवा चंद्रग्रहणांत, काशी-क्षेत्रीं जाऊन सहस्रलिंगार्चन किंवा विष्णुपूजन केलें
तरी त्याला विघ्नराजाच्या पूजाकलांशाचीहि बरोबर नाहीं. गणेशपूजा धर्मार्थकाममोक्षाला कारण असून सर्ववश करणारी आहे. तशीच आयुर्वर्धक, रोगहारक, सर्वशत्रुविनाशकारी आहे.
रात्रीच्या शेवटच्या प्रहरीं उठून ही पूजा करावयाची असते. एकान्तांत, निर्जन प्रदेशांतील पवित्र भागांत, शांत चित्तानें गोमयानें सारवून घ्यावें. प्रसन्न वाता-वरणांत सुंदर आसनावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावें. करशुद्धि करून मातृकान्यास करावेत. स्वत:च्या शरीराला कुंकुमन्यास करून सुवर्ण वा ताम्रपात्रांत आत्मपूजा, चक्रपूजा करून त्यावर रत्नसिंहासन कल्पून पीठपूजा करावी. त्यावर “ गणानां त्वा ” या मंत्रानें आवाहन करून पुढील मंत्र म्हणावा- “ अशेषगुणकल्याण विद्यागणपते विभो । यावत्पूजां करोभ्यत्र तावत्वं सुस्थिरो भव ॥१॥ ”
पुष्पांजलि वाहून झाल्यावर पद्ममुद्रा करावी.
“ अपसर्पन्तु ” या मंत्रानें भूतशुद्धि करून शंखाची पूजा करून त्यांत सुगंधि जल ठेवून धेनुमुद्रा करावी.
“ गंगे च यमुने ” या मंत्रानें तीर्थांचें आवा-हन करून पूजा करावी. नंतर स्वत:वर आणि पूजाद्रव्यावर प्रोक्षण करावें. पाद्यार्ध्य, आचम-नादि देऊन यथासांग पूजा करावी. नंतर घेनु-मुद्रा आणि योनिमुद्रांच्या द्वारां अमृतीकरण करून गंधफूल वाहिलेलें कुंभामतील अमृतमय पाणी घेऊन पूजा करावी. त्या वेळीं फुलें आणि दुर्वा ३२ संख्येनें वहाव्यात. उडीद, दुधाची खीर, फळें व नऊ प्रकारच्या अनारत्र्यांचा नैवेद्य दाखवावा. कर्पूरमिश्रित तांबूल देवून आरती करावी. पुढच्या बाजूला रमा-रमापतींची बेलाच्या झाडाखालीं पूजा करावी.
दक्षिण बाजूला वटवृक्षाच्या मुळाशीं गिरिजा-गिरिजापतींची पूजा करावी. पिंपळाच्या मुळाशीं पश्चिमेला रति-रतिपतींची, उत्तरेला प्रियंगु झाडाच्या मुळाशीं भूमि-वराहाची,
त्याचप्रमाणें ईशान्य दिशेला पुष्टिदेवीसह गणा-धिपाची पूजा करावी. ही पूजा चार वेळां करावी. नंतर मूलविद्येनें तीन वेळां गणेशाची पूजा करून महादेवी रत्यंबा, मनोभवा प्रीत्यंबा, आणि गणेश यांची क्रमश: चार वेळां मूलमंत्रानें पूजा करावी.
त्यानंतर ऋद्धि-आमोद, समृद्धि-प्रमोद, कान्ति-सुमुख, मदनावती-दुर्मुख, मदद्रवा-विघ्नक, द्रविणी-विघ्नकर्तृक सहा मिथुनांची-जोडप्यांची पूजा मूलविद्यनें करावी. नंतर षट्-कोणांत लक्ष्मी, सरस्वती, कांति, कीर्ति, पुष्टि, तुष्टि यांची क्रमश: पूजा करावी. षट्कोणाबाहेर महामाया, मालिनी, वसुमालिनी, मोहिनी, योगिनी आणि विद्यादेवी यांची यथाक्रम पूजा करावी.
त्यानंतर चतुर्थावरणासाठीं - त्यांवर अष्टदल काढून अष्टविनायकांची क्रमश: पूजा करावी. त्यांचीं नांवें - वक्रतुण्ड, एकदंष्ट्र, महा-गणपति, लंबोदर, गजवक्त्र, विकट, विघ्नराज
आणि धूम्रवर्ण. त्या वेळीं मूलंमत्र म्हणावा. त्या अष्टविनायकांजवळ मूलमंत्रानें ज्या देवतांची पूजा करावयाची त्यांचीं नांवें अशीं उच्चारावींत - अनंगकुसुमा, अनंगमेखला, अनंगमदना, अनंग-मदनातुरा, अनंगरेखा, अनंगवेगिनी, अनंषां-कुशा, अनंगमालिनी.