आरती - आरती आठवी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
( चाल : आरती भुवनसुंदराची )
अंबे, चित्सुखकल्पलते । जय जय करुणामृत सरिते ॥धृ०॥
अविद्या तम होतां हरण । जाहला ज्ञानोदय पूर्ण
अरुणोदयीं रक्त वर्ण । मुखावर पडतें रविकिरण
अंबें, तुझे नमुनि चरण । भास्कर करितो पुढें भ्रमण
( चाल ) सिंहाद्रिवासि सिद्ध पुरुष
म्हणति आम्हांस - घडो हा वास - नको कैलास
प्रणिता प्रदक्षणि वहाते । दुजें वैकुंठ महीवरतें ॥१॥
लोपति चंद्र - सूर्य कोटी । तुझ्या सुवर्ण रत्नमुकुटीं
सभोंवतीं मोत्यांची दाटी । लाजती शुक्र गुरु पोटीं
अनुपम सुंदर हनुवटी । कुंकुम कस्तुरी मळवटी
( चाल ) आंगीं उटी केशराची
कमळदळनयन - सदा शुभ वदन - सुपंक्तीरदन
अवलोकिती भक्त नर तें । दुर्लभ दर्शन सुरपतितें ॥२॥
शोभति अलंकार गळां । त्यांवर पुष्पांच्या माळा
शतपट चपळेहुनि अगळा । कांसे पितांबर पिवळा
जो नर पाहिल पदकमळां । तो नर साधु जगीं विरळा
( चाल ) हरिहर - ब्रह्मदेव ह्रदयीं
धरिति तव ध्यान - त्यजुनि अभिमान - उडालें भान
न कळे अंत नारदातें । भ्रांती पडे सरस्वतितें ॥३॥
सुवर्णपात्रिं लक्ष वाती । लाविल्या उजळुनिया ज्योती
प्रार्थुनि रेणुकेचि मूर्ती । भावें ओवाळिन आरती
कृपेनें भवनिधि जग तरती । विघ्नें दुर्धर दुर सरती
( चाल ) विष्णुदास, शरण विनवी
जाहालों कष्टि - कृपेची वृष्टि करुनिया दृष्टि
धांवे पावे विश्वकर्ते । जय जय रेणुके, सुख भरते ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP