आरती - आरती पांचवी
श्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.
जय जय जगदंबे । श्रीअंबे । रेणुके, कल्पकदंबे ॥धृ०॥
अनुपम स्वरुपाची । तुझि धाटी । अन्य नसे या सृष्टीं
तुजसम रुप दुसरें । परमेष्ठी । करितां झाला कष्टी
शशिरस रसरसला । वदनपुटीं । दिव्यसुलोचन दृष्टीं
सुवर्ण रत्नांच्या । शिरिं मुकुटीं । लोपति रविशशि कोटी
गजमुखि तुज स्तविलें । हेरंबें । मंगल सकळारंभे ॥१॥
कुंकुम - चिरि शोभे । मळवटीं । कस्तुरीटिळक लल्लाटीं
नासिक अति सरळ । हनुवटी । रुचिरामृत रस ओठीं
समान जणुं लवल्या । धनुकोटी । आकर्ण लोचनभ्रुकुटी
शिरिं निट भांगवळी । उफराटी । कर्णाटकची धाटी
भुजंग निळ रंगा - । परि शोभे । वेणि पाठिवर लोंबे ॥२॥
कंकणें कनकाचीं । मनगटीं । दिव्य मुद्या दश बोटीं
बाजूबंद नगे । बाहुवटीं । चर्चुनी केशर उटी
सुगंध पुष्पांचे । हार कंठीं । बहु मोत्यांची दाटी
आंगीं नवि चोळी । जरिकांठीं । पीत पितांबर तगटी
पैंजण पदकमळीं । अति शोभे । भ्रमर धांवती लोभें ॥३॥
साक्षप तूं क्षितिच्या । तळवटीं । तूंच स्वयें जगजेठीं
ओवाळित आरती । दीपताटीं । घेउनि करसंपुष्टीं
करुणामृत ह्रदयें । संकटीं । धावसि भक्तांसाठीं
विष्णुदास सदा । बहु कष्टी । देसिल जरि निज भेटी
तरि मग काय उणे । या लाभें । धाव पाव अविलंबे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP