आत्मसुख - अभंग १०१ ते ११०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१०१
विसावा विठ्ठल सुखाची साउली । प्रेमपान्हा घाली भक्तांवरी ॥१॥
दाखवी चरण  दाखवी चरण । दाखवी चरण नारायणा ॥२॥
विठठल आचार विठठल विचार । दावीं निरंतर पाय आतां ॥३॥
नामा म्हणे नित्य बुडालों संसारीं । धांवोनियां धरीं हातीं मज ॥४॥

१०२
भुक्ति मुक्ति मागों तुज । तरी मज हांसती पूर्वज ॥१॥
मज प्रेम  पढियें देवा । न मगें आन कांहीं सेवा ॥२॥
मोक्ष मागूं तुजप्रति । संत छलवादें हांसती ॥३॥
चाड धरीन ब्रह्मज्ञानीं । तरी मज व्यर्थ व्याली जननी ॥४॥
होऊं सिद्धीचा साधिता । दैवें सांडिलें तत्त्वता ॥५॥
नामा म्हण्ने कांहीं न मगें । उभ राहेन संतांमागें ॥६॥

१०३
असोनि न दिसे लौकिक वेव्हरीं । ऐसा तूं अंतरीं लपवीं मज ॥१॥
परि तुझे पायीं माझें अनुसंधान । वरी प्रेमाजीवन देई देवा ॥२॥
मनाचिया वृत्ति आड तूं राहोनि । झेंपावती झणीं कामक्रोध ॥३॥
नामा म्हणे ऐसें पाळिसी तूं मातें । मी जीवें तूतें न विसंवें ॥४॥

१०४
उडाली पक्षिणी गेली अंतराळीं । चित्त बाळाजवळी ठेवूनियां ॥१॥
तैसें माझें मन राहो कां ईश्वरीम । मग सुखें संसारीं असेना का ॥२॥
धेनु चरे वनीं वच्छ असे घरीं । चित्त वच्छावरी ठेवूनियां ॥४॥
विष्णुदास नामा विनवी परोपरी । हें प्रेम श्रीहरी द्यावें मज ॥५॥

१०५
येई वो कृपावंते अनाथांचे नाथे । निवारीं भवव्यथे पांडुरंगे ॥१॥
मी बाळक भुकाळु तूं  माउली कृपाळु । करीं  माझा सांभाळु पंढरिराया ॥२॥
माझें माहेर पैं नित्य आठवे अंतरीं । सखा विटेवरी पांडुरंग ॥३॥
मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्म तूं अन्न । मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगा ॥४॥
मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर । मी याचक तूं दातार पांडुरंगा ॥५॥
मी धनलोभी शुंभ तूं पूर्ण कनक कुंभ । मी मगर तूं अंभ पांडुरंगा ॥६॥
मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तूं बोध । मी शुष्क नदी तूं ओग पांडुरंगा ॥७॥
मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक । मी प्रजा तूं पाळक पांडुरंगा ॥८॥
मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी । मी अपत्य तूं जननी पांडुरंगा ॥९॥
मी भक्ति तूं निजसोय मी  ध्यान तूं ध्येय । मी आडळ तूं साह्य पांडुरंगा ॥१०॥
ऐसी जे जे माझी विनंती ते तुजचि लक्ष्मीपती । निज सुख सांगाती पांडुरंगा ॥११॥
शीघ्र येई वो श्रीरंगे भक्त मानस घे गे । प्रेमपान्हा दे गे नामदेवा ॥१२॥

१०६
बहु दिस होतों तुमचां गांवीं । आतां कृपा असों द्यावी ॥१॥
आम्ही जातों आपुल्या गांवा । विठोबा लोभ असों द्यावा ॥२॥
आमुचे ठायीं तुझें मन । तुझें चरण आमुचे प्राण ॥३॥
आमुचें स्मरण असों द्यावें । लिखित पत्र पाठवावें ॥४॥
नामा म्हणे जी केशवा । अखंड प्रेमभाव द्यावा ॥५॥

१०७
प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतें छंदें नाचों रंगीं ॥१॥
कोणे वेळे काय गाणें । हें तो भगवंता मी नेणें ॥२॥
वारा धावे भलतेया । तैसी माझी रंगछाया ॥३॥
टाळ मृदंग दक्षिणेकडे । आम्ही गातों पश्चिमेकडे ॥४॥
बोले  बाळक बोबडें । तरी तें जननीये आवडे ॥५॥
नामा म्हणे गा केशवा । जन्मोजन्मीं देई सेवा ॥६॥

१०८
टाळ दिंडी हातीं उभा महाद्वारीं । नामा कीर्तन करी पंढरिये ॥१॥
आवडीचेनि सुखें वोसंडतु प्रेमें । गातों मनोधर्में हरिचे गुण ॥२॥
सांडोनि अभिमान नाचे धरोनि कान । अंतरीं ध्यान विठोवाचें ॥३॥
श्रीहरिची उत्तम जन्मकर्मनामें । घेतलीं त्या प्रेमें सुखरूपें ॥४॥
संतांची विश्रांति ज्ञानियांचें गुज । जें कां मुक्तिबीज मोक्षदानी ॥५॥
गोवर्धनधरे गोपीमनोहरे । भक्तकरुणाकरे पांडुरंगा ॥७॥
सकळा मंगळनिधी पातकभंजना । हरिजगज्जीवना परमानंदा ॥८॥
तूंचि एक सकळ आदिमध्यअंतीं । नित्य सुखसंपत्ति सज्जनांची ॥९॥
तूंचि माझा श्रोता तूंचि माझा वक्ता । तूंचि घेता देता प्रेमसुख ॥१०॥
विष्णुदास नामा विनवी पुरुषोत्तमा । सोडवी भवभ्रमां पासूनियां ॥११॥

१०९
तुझ्या पायीं चित्त रंगलेसें माझें । नाहीं केशिराजें  ऐसें केलें ॥१॥
उठवितां काय होईल संतोष । मज अभाग्यास मोकलीलें ॥२॥
प्रपंच कावाडी न घाली मज दृढ । नको वाडें कोड झणीं देवा ॥३॥
नामा म्हणे भावें विनंति समस्तां । नको भंगू आतां प्रेमपान्हा ॥४॥

११०
बोलूं ऐसे बोल । जेणें बोलें विठ्ठल डोले ॥१॥
प्रेम सर्वांगाचे ठायीं । वाचे विठ्ठल रखुमाई ॥२॥
परेहूनि परतें घर । तेथें राहूं निरंतर ॥३॥
सर्वांचें जें अधिष्ठान । तेंचि माझें रूप पूर्ण ॥४॥
नाचूं कीर्तनाचे रंगीं । ज्ञानदीप लावूं जगीं ॥५॥
सर्व सत्ता आली हातां । नामयाचा खेचर दाता ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP