श्रीनामदेव चरित्र - अभंग ३१ ते ४०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
३१
माझा नामा जंव नांवरूपा आला । जंव म्हणों लागला घरदार ॥१॥
तंव कैसें विघ्न उठिलें गे माये । नामा पंढरिरायें भुलविला ॥२॥
सांग बा विठ्ठला म्यां काय केलें । नामया कां भुलविलें कवण्या गुणें ॥३॥
आम्ही गा सिंपिये अनाथें पैं दीनें । करूं सिवने टिपणें पोट भरूं ॥४॥
त्यासी देवा तुवां आणियेला क्षयो । कैंचा आम्हां देवो निर्मिलासी ॥५॥
असतां चराचर न बुडतां हे सृष्टी । कां गा घेसी पाठी दुर्बळीची ॥६॥
एक बाळ माझें धरिली त्याची आस । त्यां कैसी निराश मांडियेली ॥७॥
दिसां मासां गर्भ जाणोनियां पोटीं । त्याची आस मोठी करिती लोक ॥८॥
एवढा माझा नामा कैसेन विसरेन । देई कृपादान दुर्बळासी ॥९॥
तूं अनाथा गोसावी दिनाचा कैवारी । तें ब्रीद श्रीहरी काय जालें ॥१०॥
बिघडलें पाडस करी एके ठायीं । विनवितें गोणाई केशिराजा ॥११॥
३२
तुझिया नाम्यानें बळी देउनि चित्त । जन्मोनियां आप्त केलें मज ॥१॥
इष्ट मित्र बंधु जननी जनक । सर्वव मीच एक करूनि ठेला ॥२॥
ऐसी याची करणी अजोनि नेणसी । बाळ माझे म्हणसी चाळविलें ॥३॥
प्रेमाचें लाघव लाउनि माझ्या पायीं । बांधलें ह्रदयीं धरोनियां ॥४॥
वृत्तिसहित मन लाविलें राखण । केलें जीवें जतन मजलागीं ॥५॥
उचंबळले नयन अंतरींच्या अनुरगें । रात्रंदिवस जागे मन माझ्या ठायीं ॥६॥
बोले चाले परी लक्ष मजवरी । बाहेरी भीतरीं मज देखें ॥७॥
सर्व सुख गुणा रूपा देउनि मिठी । आणि निर्गुंणीं हिंपुटी होऊं नेदीं ॥८॥
न मागे न घे न धरी सोय संसाराची । कल्पना देहींची मावळली ॥९॥
ऐसें येणें मज विश्वासी गोंविलें । सर्वत्र लाविलें मजचिकडे ॥१०॥
निर्गुणीं हा नामा न सोडी सर्वथा । सांपडला आतां एकरूपा ॥११॥
३३
बुडविली क्रिया बुडविलें कर्म । बुडविला धर्म पाहा येणें ॥१॥
तुझिया नामाचें लागलेसें पिसें । असोनि न दिसे लोकाचारीं ॥२॥
नेणों काय कळे तुवां वागविला । संबंध तुटला मज नाम्याचा ॥३॥
बुडविला आचार बुडविला विचार । बुडविडा संसार कुळासहित ॥४॥
आपुलें पारिखें सर्वथा सारिखें । नेणों कवणें सुखें वेडावला ॥५॥
बुडविला मोहों बुडविली ममता । बुडविली अहंता मीतूंपण ॥६॥
हा नेणें वेव्हार कां इंद्र्यांचें सुख । अखंड याचें लक्ष तुझे पायीं ॥७॥
बुडविली कल्पना समूळीं वासना । बुडविली सेवाअ त्रिविध कैसी ॥८॥
हांसे नाचे प्रेमें फुंदतु डुल्लतु । अहर्निशीं गातु नाम तुझें ॥९॥
असोनि नसता केला ये संसारीं । म्यां वाहिला उदरीं तैसा नाहीं ॥१०॥
गोणाई म्हणे देवा त्वां केली निरास । चाळविलें उदास बाळ माझें ॥११॥
३४
ऐके गोणाई म्हणे केशिराज । सदा अरज तुझें नामदेवा ॥१॥
संसारादि यासी नावडेचि कांहीं । मिठीच वो पायीं घातलीसे ॥२॥
नेणों याच्या जीवें घेतलेसें कांहीं । लोळणींच पायीं घातलिसे ॥३॥
पुसे वो जीवीचें काय काय आवडे । उमगोनि कोडें नेई यासी ॥४॥
देतां कांहीं न मागे नसतां कांहीं नेघे । गुज पैं न सांगें अंतरीचें ॥५॥
जन्मोनि सांकडें घातलें वो कैसें । गिळिल मज ऐसें वाटतसे ॥६॥
मी भावासि भुललों सांपडलों याचे हातीं । करिल काय अंतीं न कळे कांहीं ॥७॥
एक वेळ मज सोडवीं या पासोनी । दे कां मज लागोनि जीवदान ॥८॥
माझिये पैं बोले मजचि गोविलें । यातें आपंगिलें अनाथ म्हणोनि ॥९॥
अंगोळिये धरितां खांदा वोळंगिये । आतां माझें केलें न चले कांहीं ॥१०॥
तूं आपुलिया मनीं विचारूनि पाही । नामा आपुला नेई आवडता ॥११॥
माय लेक दोघे साम्राज्य करा । घ्यावें धरणीवरी सुख याचें ॥१२॥
कठिण बोल तुझे बहूसाळ ऐकिले । नाहीं त्वां गे पाहिलें मागेंपुढें ॥१३॥
आतां तुझी कैसी झांकोळिली माया । मज करिसी वायां इष्ट तूं गे ॥१४॥
ऐसें देवाचें बोलणें ऐकोनि उदास । नाम्या जाले क्लेश तयेवेळीं ॥१५॥
नामा म्हणे देवा ऐसें कैसें घडे । सृष्टीहि पैं बुडे तरी न सोडी तुज ॥१६॥
३५
विश्वजनमोहना कपटिया नारायणा । काय देवपणा मिरवितोसी ॥१॥
दर्शना आलिया हृदयीं संचरसी । देहभावा घेसी हिरोनियां ॥२॥
या विश्वावेगळें नवल तुझें करणें । सांगावें गार्हाणें कवणालागीं ॥३॥
सर्वांगें सुंदर परी ह्रदयें कठोर । नेणसी जिव्हार मज दुर्बळीचें ॥४॥
मज अनाथाचें बाळ वेधोनि मोहिलें । बहुत दुःख जालें सांगों कोणा ॥५॥
कासया पितृभक्ति पुंडलिकें केली । विवसी आणिली पंढरीसी ॥६॥
माय दुखवुनी मोहिसी बाळकें । देवपण निकें कैसें तुझें ॥७॥
यातें अनुसरल्या कैंची बाप माय । नाठवेची सोय संसाराची ॥८॥
ऐसियानें संग धरिला तुझा देवा । प्रत्यक्ष अनुभवा आलें मज ॥९॥
आतां माझिया जीवीचें जाणसी तें गुज । तरी काई तुज उणें होतें ॥१०॥
माझा नामा लावीं संसाराचे सोई । विनविते गोणाई केशवातें ॥११॥
३६
बहुत दिवस भरले पैं गोपाळा । अगा ये विठ्ठला कवण न ये ॥१॥
नामा माझा वेगीं देई माझ्या हातीं । जाऊं दे परती अनाथनाथा ॥२॥
खाऊं जेऊं तुज असोस पैं देऊं । कीर्ति तुझी गाऊं जगामाजीं ॥३॥
तुज काय जाणें ब्रह्मांडनायका । नव्हेसी मजसारिखा एकदेशी ॥४॥
अनंत ब्रह्मांडें क्षणें घडामोडीसी । कां मज दुर्बळीसी कष्टाविलें ॥५॥
तुज दुजेपणाचा सहज आला वीट । तूं तंव एकट एकालची ॥६॥
ऐसी कीर्ति वेद वर्णिती पुराणें । तें कां लाजिरवाणें करिसी देवा ॥७॥
तूं कृपेचा कोंवळा म्हणति विश्वजन । त्या तुझें निर्वाण कळलें नाहीं ॥८॥
मैंद मुद्रा धरणें गळां तुळसीमाळा । निवटितोसि गळा न कळतां ॥९॥
आतां आपुला भ्रमु राखे तो शहाणा । झणें माझ्या विर्वाणा पहासी देवा ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देऊनी हातीं । अंगिकारीं कीर्ति पंढरिराया ॥११॥
३७
थितें माझें प्रेम घेऊनि बैसला । अझुनि नुठी वाहिला नामा तुझा ॥१॥
जीवें भावें सर्वस्वें घेतलें धरणें । म्यां काय करणें ऐशियासी ॥२॥
कासया अपराध ठेविशिल मज । शिकवितें तुज नाहीं कोणी ॥३॥
संसारा गांजले जन्ममरणा उबगले । म्हणोनी शरणा आले भयाभीत ॥४॥
कृपा उपजली जीवें अनुसरला । जीव गुंतला माझे ठायीं ॥५॥
दवडितां वेगळे वोसंगा रिघालें बळें । बोलताहे साळे भोळे करुणावाचनीं ॥६॥
तेणें माझें ह्रदय कळवळलें । म्हणोनि देखतां डोळे निवती माझे ॥७॥
शरणा आलिया ते म्यां जरि अव्हेरावें । कोण कोणें आपंगावें सांग सत्य ॥८॥
शत्रुमित्र आदि करूनी सकळ । दुःख अळुमाळ पडों नेदी ॥९॥
संसाराची येणें सांडियेली सोयी । प्राणें माझ्या ठायीं अनुसरला ॥१०॥
आतां याची लटिकी करी दूर आस । नामा म्हणे उदास सर्वस्वासी ॥११॥
३८
निर्गुणपणाचा अभिमान सांडिला । निगम लाजविला नारायणा ॥१॥
कपट करोनि भक्तांसि तारिसी । तुझा तूं ठकसी पंढरीराया ॥२॥
ठकुनी पुंडलिकासी न्यावया वैकुंठासी । या बुद्धी आलासी पंढरिये ॥३॥
तंव त्या भक्तराजें धरियेलें चित्तें । परतोनि मागुतें जाऊं नेदी ॥४॥
अठ्ठावीस युगें गेलीं विचारितां । निर्गम सर्वथा नव्हे देवाअ ॥५॥
मग कटावरी कर धरोनियां धीर । उभा निरंतर राहिलासी ॥६॥
सर्व घे प्रेमें तें हिरोनि बांधिलें । विचारें साधिलें कोणें कोणा ॥७॥
द्वारीं द्वारपाळ जालासी अंकित । सांग बुद्धिमंत कोण ऐसा ॥८॥
नाथिलेनि करिसी आपणा गोंविसी । बोल कां ठेविसी नामयातें ॥९॥
गोणाई म्हणे तुझें नकळे विंदान । देईं कृपादान बाळ माझें ॥१०॥
३९
माझें घर तुवां पूर्वींच बुडविलें । जें दर्शनासी आलें बाळ माझें ॥१॥
नेणों काय वर्म तुझें सांपाडलें हातीं । रिघालासी चित्तीं जेणें द्वारें ॥२॥
लौकिक परिहार देसील कासया । मी तुज ऐसिया बरबें जाणें ॥३॥
कटीं ठेउनि कर उभा गरुडपारीं । हें तंव अंतरीं हारपला ॥४॥
नाहीं चळणवळण न लावी पात्या पातें । लागलें निरूतें लक्ष तुझें ॥५॥
तुझी याची खूण अंतरींची एकी । दाविसी लौकिकीं भिन्नपण ॥६॥
सांडियेली येणें लौकिकाची लाज । नव्हे माझा मज कांहीं केल्या ॥७॥
तुझेंनि सुखें धाला आनारिसा जाला । अभिमान मावळला समूळ याचा ॥८॥
देहीं पैंज असोनी विदेही दिसत । प्रेमें वोसंडत ह्रदयकमळीं ॥९॥
तूं अनाथा कैवारी ऐसी वेदवाणी । परी कां नये अजोनी कणव तुज ॥१०॥
गोणाई म्हणे माझा नामा देईं हातीं । लागेन पुढता-पुढती तुझे पायीं ॥११॥
४०
वाचेचेनि बळें बोलसी आगळें । मर्यादे वेगळें वायांविण ॥१॥
भ्रमलिस आरजे न पाह्सी आपणाकडे । धारिष्ट केवढें पाहें तुझें ॥२॥
नेईं आपला नामा काय चाड आम्हां । जरी आहे तुज भ्रम ममत्वाचा ॥३॥
पाहे पां पूर्वींचा कवणिये जन्मींचा । नकळे तुझा याचा ऋणानुबंध ॥४॥
तो सरला कींज उरला विचारी आपुला । हा तुज अंतरला कवण्या गुणें ॥५॥
येणें सांडिला संसार वेव्हार लौकिक । अविद्या अहंभाविक दोन्ही नाहीं ॥६॥
हा प्रपंचावेगळा नकळे याची लीला । लागालसे डोळा प्रेममुद्रा ॥७॥
ऐसी याची स्थिति देखोनियां डोळां । मज कां वेळोवेळां छळितेसी ॥८॥
जाणसी त्या परी बझावी वो यातें । जेणें सुखें तूंतें ओळखिला ॥९॥
याचेनि संसार चालविन म्हणोनी । ऐसी भ्रांती मनीं धरिलीं वायां ॥१०॥
नामा अंतरीं निमाला आत्मा असे उरला । तरंग निमाला जेवीं जळीं ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2015
TOP