मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५९॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५९॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


नमो नमो श्रीपरिज्ञानाश्रमा । परम दयाघना आनंदाश्रमा । गाऊं मंगल तुमचिया नामा । अहर्निश अंतरीं ॥१॥
जयजयाजी परिज्ञानाश्रमा । हे शिष्यवृंदाच्या सुखधामा । भक्तकामकल्पद्रुमा । आनंदाश्रमा नमन तुम्हां ॥२॥
श्री सद्गुरु श्रीमदानंदाश्रम । भासे वेद शास्त्रांचे धाम । मनामी वाटे बहु आराम । गुरुद्वयांनीसी देखतां ॥३॥
नमो नमो श्रीस्वामीराया । आनंदाश्रम श्रीसद्गुरु सदया । भक्तवृंदासी ताराया । बहुत कष्ट साहले ॥४॥
करुणासिंधु सद्गुरुमूर्ती । जनमनासी ओळखती । प्रेम तयांचे संपादिती । अलौकिक वर्तनें ॥५॥
स्निग्ध प्रेमळ ती गुरुमाउली । भक्तजनांची असे साउली । ज्ञानी समस्त उद्धरिली । ज्ञानामृत पाजोनी ॥६॥
नमन ऐशा श्रीगुरुदेवा । आम्हां लाभला अपूर्व ठेवा । तव कृपेचा प्रसाद द्यावा । अपंग दीन या दासीला ॥७॥
असो आतां श्रोते प्रेमळ । मागील अध्यायीं तुम्ही सकळ । ऐकिली कथा बहु रसाळ । रवीन्द्राच्या शैशवाची ॥८॥
ऐका सादर पुढें आता । सावधान करोनि चित्ता । शिष्यस्वीकाराची कथा । आहे बहु गोड ती ॥९॥
महात्यागी शंकरनारायणें । शिष्य स्वीकारा कारणें । पुत्र अर्पिला गुरुपदी जाणें । मोह माया आवरोनी ॥१०॥
रवीन्द्र झाला महाप्रसिद्ध । ज्ञातीमाजींही अनेक सुबुद्ध । ऐकोनि होती हतबुद्ध । कुमाराच्या रम्य कथा ॥११॥
ऐकोनियां रवींद्राची कीर्ती । पाहावयामी अधीर होती । आनंदोर्मी उचंबळती । जनमानसीं त्यासमयीं ॥१२॥
तेणें पाठशाळा त्यजिली जाणा । दुःख वाटे अध्यापकांना । हुरहुर लागे तयांच्या मना । चतुर छात्रा कारणें ॥१३॥
शिक्षक तयाच्या गृहीं येती । रवीन्द्राच्या पित्यासी पुसती । पैशाकारणें का हो काढिती । शाळेंतोनि पुत्रासी ॥१४॥
आम्ही देऊं गुरु दक्षिणा । पूर्ण करा पैं तयाच्या शिक्षणा । शिक्षक विनविती तेचि क्षणा । रवीन्द्राच्या पित्यासी ॥१५॥
जेव्हां कळली समूळ वार्ता । अभिमान वाटे तयांच्या चित्ता । अभिवादिती वाटोनि धन्यता । परतोनि जाती गृहासी ॥१६॥
रवीन्द्राचे वय लहान । खेळ खेळे बालकांसमान । जननी होई बहू खिन्न । वृत्ती तयाची पाहोनी ॥१७॥
करितां अत्यंत हूडपणा । शांती म्हणे रवीन जाणा । होशील केधवां तूं शहाणा । चिंता मजला वाटते ॥१८॥
कृष्णासाठीं यशोदेनें । व्रत आरंभिलें संकष्टिचे जाणें । तूंही तैसें मम कारणें । व्रत आचरीं चतुर्थीचें ॥१९॥
ऐसें विनोदें बोले बाळ । दंगा चाले सांजसकाळ । जमवोनियां बाळगोपाळ । विविध खेळ खेळती ॥२०॥
भिऊं नको वृथा आई । जधीं ठेविती सद्गुरुमाई । कृपाहस्तासी माझिये डोई । नेटकें डोईल बाळ म्हणे ॥२१॥
ऐसा गुरुंवरी विश्वास । मार्ग दाविती तेची खास । धीर ऐसा प्रिय शिष्यास । जाज्ज्वल्य ती गुरुभक्ती ॥२२॥
पूर्वसिद्धता आरंभिली । संसार बंधनें तुटूं लागलीं । महत्क्रांती घडूं लागली । रवीन्द्राच्या जीवनीं ॥२३॥
स्थायी समिती भरे मठांत । सभासद ते म्हणती निश्चित । मुंबापुरींच करणे उचित । शिष्यस्वीकारोत्सव ॥२४॥
समाज सकळही जोमें उठला । जनसागर तो उचंबळला । बहु प्रेमानें प्रवृत्त जाहला । उत्सव कार्यालागीं की ॥२५॥
ग्रामोग्रामीं सभा भरविती । उत्सवाचा विचार करिती । ठायींठायीं निधी जमविती । शिष्यस्वीकारा कारणें ॥२६॥
धर्म सेवक ते ग्रामी हिंडती । घरोघरीं ते जेधवां जाती । धन उचलोनी तयां देती । अत्यादरें सकळ जन ॥२७॥
सक्ती कोणी केली नाहीं । विनासायास जमोनी राही । सहस्त्रावधी निधी पाहीं । अहा कैसी गुरुलीला ॥२८॥
लोकांस जाहला अत्त्यानंदू । विसरोनिया आपपर भेदू । झटे समस्त भक्त वृंदू । अत्युत्साहें जाणा पैं ॥२९॥
चित्रापुरामाजीं वैदिक जमती । मंगलदिन ते पंचांगी पाहती । कार्यक्रमातें प्रसिद्ध करिती । धार्मिक विधानांचे कीं ॥३०॥
शके अठराशें एक्याऐंशी । विलंबी संवत्सर असे त्या वरुषीं । माघ वद्य सप्तमी दिवशीं । शुभ मुहूर्त निवडिला ॥३१॥
कार्यक्रमातें नियोजिलें । ग्रामोग्रामीं पाठविलें । भक्तगण ते अधीर जाहले । पर्वकाल साधाया ॥३२॥
सारस्वतांनी सजविली जी । ऐशा तालमकीच्या वाडीमाजी । येती आनंदाश्रम स्वामिजी । मंगलोत्सवा कारणें ॥३३॥
उत्सवासी जाहला आरंभ । घडला न कधीं ऐसा समारंभ । सपर्ण उभे कर्दळी स्तंभ । स्वागताप्रती वाडींत ॥३४॥
चहुंबाजांनी लोक येती । आबालवृद्ध तैं एकत्र होती दशसहस्त्रावरि जन जमती । मुंबापुरीं ते समयीं ॥३५॥
दुरस्थ ऐसे आप्त भेटले । जिवलग मैत्रिणी मित्र मिळाले । केक वरूषें जें ना जमलें घडलें उत्सव निमित्तें या ॥३६॥
शके अठराशें एक्याऐंशीं । पवित्र ऐशा माघमासीं । होती त्या दिनीं शुद्ध चतुर्दशी । आगमन जाहलें गुरुंचे ॥३७॥
जैजैकार हरूषें केला । दर्शन घडलें समस्तांला । नमस्कारिती सकळही गुरुला । स्वागत जाहने यथोचित ॥३८॥
शुभ्र पायघड्या भक्त पसरितीं । तयांवरोनी स्वामी चालती । आम्रपर्णांची तोरणें शोभती । पुष्पवृष्टी करिताती ॥३९॥
विविधरंगी सुंदर वेदिका । पर्णपुष्पें सजविली देखा । बहु शोभती सुरम्य मेखा । सद्गुरु बैसती उच्चासनीं ॥४०॥
किलपाड़ी गुरुदत्त मुख्याध्यक्ष । अग्रपूजा करिती प्रत्यक्ष । राहोनियां अत्यंत दक्ष । जन समस्त पाहती ॥४१॥
सहस्त्रावधी तैं भक्त जमती । आतुरले ते भेटी प्रती । धूळभेटीस प्रेमें घेती । श्रीफल समर्पण करोनी ॥४५॥
महापूजा अवलोकिती । मग जाहली मंगलारती । तीर्थ प्रसाद ग्रहण करीती । लीन होवोनी गुरुचरणीं ॥४३॥
रात्रीं दीपनमस्कार भजन । पूजा आरती अष्टावधान । चाले गंभीर वेद गायन । नित्य नियमानुनार तें ॥४४॥
तदनंतर दिवन तीन । चाले गायत्री पुरश्चरण । तैसेंचि चाले रूद्रानुष्ठान । धार्मिक विधान सर्वही ॥४५॥
मन वाचा आणिक शरीर । व्हावे तयांवरी शुद्ध संस्कार । संन्यास दिक्षेचा अधिकार । तेणें प्राप्त होई बटुला ॥४६॥
म्हणोनी शुद्धीकरण केले । कृच्छ्र प्रायश्चित घेतलें । तीन दिवस उपोषण जाहलें । दिधलीं पवित्र गोदानें ॥४७॥
चित्रापुरींचे वैदिक जमले । यथाविधी संस्कार जाहले । फडकेशास्त्री खास आले । काशी क्षेत्राहुनि जाणा ॥४८॥
पारंगत जे वेदादिशास्त्रीं । नाम जयांचे हळदीपूरशास्त्री । वद्य चतुर्थीच्या गुरुवासरीं अध्यक्षासवें ते निघाले ॥४९॥
सभासदांच्या समवेत येती । बटूच्या गृहीं सकलही जमती । यथोचित तैं स्वागत करिती । माता पितरें रवीन्द्राचीं ॥५०॥
तदनंतर बटुसी पाचारिलें । प्राशनासी दुग्ध दिधलें । पंचारतीनें ओवाळिलें । मंगल तिलक लावोनी ॥५१॥
रवीन्द्राची सात्त्विक माता । शांत ठेवोनियां चित्ता । आवरोनियां सारी ममता । स्वहस्तें करी विधानें ॥५२॥
दुग्धीं माया जणुं विरघळली । आरतीनें ममता जाळिली । वैराग्यवृत्ती जणूं बाणविली । मंगल तिलकें तिच्या मनीं ॥५३॥
मातेजवळी उभा होता । शशिकांत नामें कनिष्ठ भ्राता । दुःख वाटे तयाच्या चित्ता । नयनांतुनी जल वाहे ॥५४॥
दोघे बंधु आलिंगिती । परस्परांना प्रेमें भेटती । भांडण रात्रींचे विसरती । पाहताती स्नेहभरें ॥५५॥
आई जवळी निजणार कोण । दोघे म्हणती मी मी जाण । ऐसें जाहलें रात्रीं भांडण । निजण्यापायीं दोघांचें ॥५६॥
शशी म्हणे मी निजणार । कोण आला तूं रे थोर । रवी म्हणे मी नसणार । उद्यां येथें निजावया ॥५७॥
नीज तूंच रे आई जवळी ॥ उद्यांप सोनी सांज सकाळीं । मी न येई तये वेळीं । केवळ आजी निजतों मी ॥५८॥
ऐकोनियां द्रवली माता । दोहों बाजूंनीं दोन्हीं सुतां । घेवोनियां करी ममता । वर्षाव घडे प्रेमाचा ॥५९॥
पुसे आई रवीन्द्राला । सांग इच्छा तुझी बाळा । कांहीं नलगे आई मजला । रवीन्द्र बोले हांसोन ॥६०॥
केवळ वाटतें बाळ पाहावें । मुके तयाचे प्रेमें घ्यावे । तया मांडीवरि निजवावें । तुझ्या उदरी जें वसे ॥६१॥
पाहूं वाटतें सानुल्या भावा । आणोनि तयासी मजला दावा । रवीन्द्र तयाचें नाम ठेवा । जेधवां जन्मा येईल ॥६२॥
वार्ता ऐसी बोलतां बोलतां । निद्रा लागली दोन्ही सुतां । व्यथित जाहली परी माता । अंत:करण उचंबळे ॥६३॥
दु:खाचे पूर लोटले । हृदयाचे जणुं बांध फुटले । नयनांतुनी वाहू लागले । अश्रु जाहले अनावर ॥६४॥
पुत्रालागीं कवटाळोनी । चुंबन घेई दु:खित जननी । धैर्य भक्ति ईशचरणीं । प्रार्थितसे देवाला ॥६५॥
म्हणे देवा भवानीशंकरा । प्रभो रक्षावे माझ्या कुमारा । पुत्रविरहाचे दु:ख उमावरा । साहावयासी सामर्थ्य दे ॥६६॥
असो आतां पुढती ऐका । निरोप देती एकमेकां । बटू चालला गृहांतुनि देखा । वास्तू जाहली सद्गदित ॥६७॥
कुलदेवासी प्रार्थियलें । मग बटूनें सकलां वंदिलें । युक्त तयांसी अहेर दिधले । आशीर्वाद घेवोनी ॥६८॥
मंगलवाद्यें मधुर वाजती । गंभीर स्वरें शंखनाद होती । वाजत गाजत बटूस नेती । तालमकीच्या वाडींत ॥६९॥
जेधवां तेथें बटू पातला । सीमा नुरली आनंदाला । जैजैकार तयाचा केला । भक्तजनांनी आदरें ॥७०॥
कुंकुमोदकें ओवाळिलें । पुष्पहारा ते कंठीं वाहिले । वेदघोषें दुमदुमलें । प्रसन्न वातावरण तैं ॥७१॥
करविलें तयासी देवदर्शन । मग नेलें स्वामी सन्निध जाण । नम्रभावें करोन नमन । बटू पाहे प्रेमभरें ॥७२॥
धरोनी हस्ता तया आणिलें । बहुमानानें स्वागत केलें । वेदिकेवरी बैसविलें । दर्शनासाठीं तयासीं ॥७३॥
सजविली होती सुंदर वेदिका । चहूबाजोनी पुष्पवाटिका । विविध रंगी दीप मालिका । सुरम्य भंवती झळकती ॥७४॥
जाईजुईच्या माला शोभती । हरित पर्णे शोभा खुलविली । पुष्प गुच्छी संगे विराजती । सुगंध पसरिती चोहिंकडे ॥७५॥
बटू दिसे शोभायमान । कसिला पितांबर कांसे छान । वीर भरजरी उपवसन । कठीं आभरण सुवर्णाचें ॥७६॥
जणुं भासलें कीं श्रीकृष्ण । आले साक्षात भूवरी जाण । अवलोकिती समस्त जन । भान हरपलें तयांचे ॥७७॥
कोणी म्हणती किती सुंदर । दृष्ट काढावी खरोखर । कोणी वानिती त्याग अपार । बटूच्या माता पित्यांचा ॥७८॥
संतोषले भक्तजन । घेवोनियां शिष्यदर्शन । कित्येक दिवसांची तहान । आज शमली पूर्णत्वें ॥७९॥
‍मग पालखींत बैसविती । बटुस गौरवें मिरविती । पालखी फिरे वाडी भोंवती । मंगलवाद्यां समवेत ॥८०॥
पेढे वाटिले समस्तांसी । गोड केलें जनमुखासी । पाहोनियां तृप्त मानसीं । मंगलोत्सव साजिरा ॥८१॥
अहो प्रेमळांना ऐका । समय न दवडी मी फुका । वाटेल तुम्हांसी कवतुका । पुढील वार्ता ऐकोनी ॥८२॥
‍मुंबापुरीचें उपनगर । नाम तयाचें असे दादर । तेथील शिवाजी पार्क मनोहर । प्रसिद्ध असे ग्रामीं कीं ॥८३॥
शृंगारिला तैं मंडप सुंदर । नाम दिधलें पांडुरंगाश्रमनगर । तेची स्थळीं शिष्यस्वीकार । सोडला अपूर्व जाहला ॥८४॥
नगर दिसें बहु सुरेख । पर्ण पुष्पेंयुक्त लता अनेक । वरी झळकती विद्युत्दीपक । विविध रंगी पताकाही ॥८५॥
अष्टद्वारें मंडपाचीं । नामें जयासी अष्टगुरुंचीं । शोभा वाढविती नगराची । हरित वर्ण कर्दळी ॥८६॥
वेदिके मागे ॐकार चक्र । तेजोराशी फिरे गरगर । विद्युत् दीप ते गोलाकार । दिव्य प्रकाश पसरिती ॥८७॥
पर्ण तोरणें द्वारीं शोभती । पुष्पमालिका सुरम्य लोंबती । नयन मनोहर कमलाकृती । लक्ष वेधोनी घेतसे ॥८८॥
दीप उजळले नगराभंवतीं । येतां जातां लोक पाहती । छायाचित्रें अनेक घेती । चल चित्रपटही सुरेख ॥८९॥
अंर्तभागीं योजना उत्तम होती । स्वयंसेवक ते सदा झटती । अविश्रांतची सहायकरिती । कार्यवाहक समितीचे ॥९०॥
बैठक व्यवस्था बहु सुरेख । मार्गदर्शन अत्यंत चोख । भोजनालय होतें ठीक । मंडपाच्या बाहेरी ॥९१॥
ध्वनिक्षेपक तेथे बोलती । महत्त्वाची वार्ता कळविती । होतें प्रथमोपचारा प्रती । शुश्रुषालय सुसिद्ध ॥९२॥
पादत्राणासीं स्थान वेगळें । रक्षक होते तेथें निराळे । नाहीं हरवलें एकही तयांमुळे । सहस्त्रावधी राशी माजीं ॥९३॥
थक्क जाहली समस्त जनता । पाहोनी सेवकांची तत्परता । तैसेंचि तयांची कार्यकुशलता । कैसी वानावी कळे ना ॥९४॥
मंगल पंचमीच्या प्रातःकाळीं । मठपरिवारादिक मंडळी । भव्य मंडपीं येवोन जमली । पूर्वसिद्धता करावया ॥९५॥
पुष्पालंकृत गाडी माजीं । येती आनंदाश्रम स्वामीजी । जयघोष केला मंडपामाजीं । शिष्यवृंदे उच्च स्वरें ॥९६॥
सप्तसुरांनी संगीत गाइलें । नभिं सनईचे स्वर निनादले । प्रसन्न वातावरण जाहलें । मंगलवाद्यें एकोनी ॥९७॥
विद्वान वेदाचार्य गणेश । प्रार्थिती भावें भवानीशंकरास । आयुरारोग्य गुरुद्वयांस । मागोन घेती प्रभू जवळीं ॥९८॥
म्हणती देवा भवानीशंकरा । समस्तांवरी अनुग्रह करा । पार पाडी कृपासागरा । शिष्यस्वीकारोत्सव ॥९९॥
शिष्यांसी सामर्थ्य देवोन । करावें मठाचें संरक्षण । संस्थानाचें अनुशासन । व्हावें युक्त तयां हस्तें ॥१००॥
श्रीशंकरा पार्वतीरमणा । वंदन तुमच्या पवित्र चरणा । सारस्वतांच्या कल्याणा । कृपा प्रसाद देइजे ॥१०१॥
ऐसी मंगल प्रार्थना जाहली । वेदोक्त पुष्पें भावें वाहिलीं । नारिकेलादी फळें समर्पिलीं । भवानीशंकराच्या चरणीं ॥१०२॥
तद नंतर आरंभ जाहला । अष्ट श्राद्धांदिक कार्याला । क्षौर वपनादिक कर्माला । दिक्षांगेंहीं समस्त ॥१०३॥
मग करिती स्वस्तिवाचन । नंतर नांदी समाराधन । ब्रह्मयज्ञही सक्तु प्राशन । ब्रह्मान्वाधान पवित्र ॥१०४॥
रात्रीं मंत्रजागर जाहलें । ॠचा आणिक उपनिषद गाइलें । वेदघोषे पुनीत केलें । वैदिकांनीं सभागृह ॥१०५॥
उगवला सप्तमीचा दिवस । पवित्र वाटे सारस्वतांस । अत्युत्साहें दादरास । उषःकालीं धावती ॥१०६॥
समस्त उठती भल्या पहांटे । स्नान उरकितीं लहान मोठे । दीपावलीचा सण जणूं वाटे । सकलांसी त्या दिनीं ॥१०७॥
अधीर जाहली सारी जनता । वेध लागले तयांच्या चित्ता । नयन जाहले आतुर आतां । बटु दर्शन घ्यावया ॥१०८॥
पूर्व विधानें समस्त करोनी । केलें सागर स्नान बटूंनीं । कौपिनादी ग्रहण करोनी । मंडपीं ते परतले ॥१०९॥
देखोनिया कुमारासी । दुःख दाटलें जनमानसीं धार लागली नयनांसी । प्रिय जनांच्या ते क्षणीं ॥ ११०॥
करिती जरी प्रतिक्षा जन । परि जाहलें हृदय विदीर्ण । कुमाराचे वय लहान । पाहोनि कंठ दाटला ॥१११॥
म्हणती केवढा मनः संयम । परित्यागिलें प्रियजनधाम । आणिक जोडी संतसमागम । पावन जाहला कुमार ११२॥
ज्ञातीमाजींल मुलांमुलींनी । शिक्षण घ्यावे यापासोनी । ठेवावा बा सतत तो मनीं । आदर्श शिष्यस्वामींचा ॥११३॥
ऐसा विचार प्रेक्षकीं चालला । बटू ते क्षणीं सज्ज जाहला । गुरु उपदेश घ्यावयाला । आत्मोन्नतीच्या पथावरी ॥११४॥
मंत्र घोषे नभ दुमदुमलें । मंगलमय सर्वत्र जाहलें । वेदिकेवरी बटू चढले । अनिमिष नेत्रें पाहती ॥११५॥
अंगी शोभे काषायवमन । हस्तीं दंड कमंडलू सान । मूर्ती भासली शोभायमान । तेज मुखींचे झळाळें ॥११६॥
भस्म चर्चिलें विशाल भाळीं । रुद्राक्षांचा हार तो गळीं । इतरत्र कोठें लक्ष ना मुळीं । गुरुठायीं निमग्न ॥११७॥
गरूड मुद्रा करोनी जाणा । बटू वंदिती श्रीगुरुचरणा । मनोभावें करित प्रार्थना । उद्धार आमुचा करावा ॥११८॥
त्रैलोक्याचें बंधन तोडोनी । शरण गेला श्रीगुरुलागोनी । वरदहस्ता शिरीं ठेवोनी । दिधली संन्यास दिक्षा ही ॥११९॥
पवित्र समयही सन्निध येत । मीन लग्नाचा मंगल मुहूर्त । श्रीमत् आनंदाश्रम अंकी घेत । प्रिय शिष्यासी प्रेमानें॥१२०॥
पूर्वाभिमुख होवोनि । प्रणवोपदेश दिधला गुरुनीं । चतुर्वेदांचा अर्थ सांगोनी । केला शिष्यस्वीकार ॥१२१॥
'परिज्ञानाश्रम' नाम ठेवियलें । भक्तवृंदासी जाहीर केलें । जैजैकारें नगर दुमदुमलें । परंपरेच्या नामघोषे ॥१२२॥
धन्य जाहली बटूची सुमाता । धन्य तयाचा सुपूज्य पिता । खचित जाहली सुफलित आतां । पूर्वजन्मींची पुण्याई ॥१५३॥
विरक्त त्यागी सुशील आई । स्वप्रेमाची आहुती देई । वात्सल्य ओतिलें श्रीगुरुपायीं । चारी मुक्ति साधावया ॥१२४॥
त्याग तयांचा अत्यंत थोर । ॠण तयांचे असे अपार । पडेल कधीं ना तयाचा विसर । सारस्वतांसी निश्चित ॥१२४॥
आतां चालली पाद्यपूजा । शिष्य स्वामी करिती पूजा । भावे वंदिती श्रीगुरुराजा । कौतुकें प्रेक्षक पाहती ॥१२६॥
यावरी बैसती श्रीसन्निधी । मग महासंस्थांचे प्रतिनिधी । पूजन करिती यथाविधी । गुरुद्वयांच्या पायांचे ॥१२७॥
भाविक नागरकट्टी कुलाचा । सन्मान असे प्रथम पुजेचा । पूजा करिती काया वाचा । ज्येष्ठ प्रतिनिधी कुलाचे ॥१२८॥
गुरुद्वय बैसले वेदिकेवरी । विस्मित जाहली जनता सारी । वाटे आला स्वर्ग भूवरी । शिव विष्णूसी घेवोनी ॥१२९॥
कीं एकनाथ जनार्दन मुनी । कीं श्रीकृष्णची सांदीपनी । अवतरले का पुन्हां अवनीं । रामदास कल्याण ॥१३०॥
असो, आनंदाश्रम उभे राहती । ज्ञानबोध सभेला करिती । धर्मपालन करा म्हणती । श्रृती वचनें सांगोनी ॥१३१॥
धर्मपालनें चित्तशुद्धि । विकास पावे जीवबुद्धि । ध्यानधारणें आत्मसिद्धी । लाभतसे मानवा ॥१३२॥
सद्धर्म नाशितो पापांसी । उद्धरितो तो सकळिकांसी । नका विसरूं धर्मचारासी ब्राह्मण्य तैसें रक्षावें ॥१३३॥
आत्मज्ञानासाठीं धर्म । धर्मासाठीं पाहिजे कर्म । निजात्मदर्शनाचे हें वर्म । जाणोनि घ्या, गुरु म्हणती ॥१३४॥
प्रवृत्ति निवृत्तीचा अर्थ काय । उकलोनी सांगे सद्गुरुमाय । म्हणती ठेवा मनीं ध्येय । आत्मस्वरूप ज्ञानाचें ॥१३५॥
जधीं यम पुसति नचिकेतासी । कीं श्रेय पाहिजे का निश्रेय तुजसी । मागोन घेई निश्रेयासी । नचिकेत यमराजा पासोनी ॥१३६॥
प्रवृत्ति धर्माचें ऐसें श्रेय । कीं समाजाचा सर्वोदय । तेणें मानवाचा हो अभ्युदय । कल्याण होई सकलांचे ॥१३७॥
निश्रेयस् असे निवृत्ति धर्म । कीं करावें निष्काम कर्म । सत् चित् आनंदाचें मर्म । विस्तारोनी सांगती ॥१३८॥
बदलला असे आतां काळ । लोकांसि न मिळे बहुत वेळ । क्रिया कर्मे पूर्ण सकळ । साधती ना करावया ॥१३९॥
परी करावें संध्यावंदन । आणि गायत्रींचे ध्यान । नियमित करावें अध्यात्मवाचन । तेणें लाभे आत्मोन्नती ॥१४०॥
जयांनी केलें लालनपोषण । स्वर्गीय मातापितरें स्वजन करावें तयांचें पुण्यस्मरण । श्राद्धादिक करोनियां ॥१४१॥
जरी होतील धर्मकार्ये । विवाहादिक शुभकार्ये । उदरनिर्वाह या व्यवसायें । वैदिक पुरोहित करितील ॥१४॥
गुरुपीठ पाहिजे धर्मरक्षणा । पीठा कारणें वैदिक जाणा । तयांसी मिळावी युक्त दक्षिणा । भूषण तेची मठाचे ॥१५३॥
समाजसेवा करावी जाणा । मनीं सर्वदा सुविचार आणा । सतत अमो या एकनी बाणा । धर्मरक्षण हाच कीं ॥१४४॥
नष्ट करितां सद्धर्मासी । काय राहे तुमच्यापाशीं । दिसतील तुम्हां पशूंच्या राशी । समाजामाजीं हें सत्य ॥१४५॥
धर्माचरण जरी ना नीट । तरेल कैसें हें धर्मपीठ । मग कासयासी श्रीगुरुमठ । नाटक वाटेल उत्सव हा ॥१४६॥
म्हणोनी करावें धर्मपालन । करावें सदा सद्धर्तन । शुद्ध असावें आचरण । आत्मोद्धार तेणें हो ॥१४७॥
ज्ञानबोधामृत ऐसें संपलें । मग स्वामींनी कर जोडिले । परमात्म्यासी भावें प्रार्थिलें । अभिष्ट वांछले सकलां प्रती ॥१४८॥
सभागृह होतें निशब्द । शांत जाहला भक्तवृंद । वंदिती ते गुरुपादारविंद । नत मस्तक होवोनी ॥१४९॥
श्री आनंदाश्रम सद्गुरुवर । भासे शांतीचे जणूं आगर । आशीर्वाद देती कृपासागर । वेदोक्त अक्षता घालोनी ॥१५०॥
तितुक्यांत पातले स्वयंसेवक । सज्ज होती कार्यवाहक । सहाय करिती भक्त अनेक । अल्पोपहार द्यावया ॥१४१॥
श्रीगुरुंचे नाम जयांवरी । सुबक ऐशा कागदपात्रीं । सांजा केळीं आणिक जहांगिरी । प्रसाद म्हणोनी वांटिली ॥१५२॥
मधुर पेयांची शीतलता । वर्णू कैसी कळेना आतां । परी झाली तृप्त जनता । शीत पेयें पिवोनी ॥१५३॥
तितुक्यांत जाहला शंखनाद । सुस्वरें म्हणती वैदिक वेद । पसरला चहुंकडे सौगंध । सुवासिक धुपाचा ॥१५४॥
महापूजेला आरंभ झाला । कैसा वर्णू तो सुंदर सोहळा । सुचेना या मंदमतीला । शब्द जाहले मूकची ॥१५५॥
मध्यंतरी करिती भजन । गोड गाणीं गाती जमोन । कीर्तन करिती कुणी भक्तजन । आणिक स्त्रिया भाविक ॥१५६॥
सायंकाळी श्रोते जमले । श्रीस्वामीजी पुन्हां बोलले । अत्युत्तम तें प्रवचन जाहलें । सनातन धर्मावरी ॥१५७॥
व्याख्यान देती गुरुदत्त किलपाडी । तैसेंचि श्रीपादराव हेम्माडी । ऐकतां आली बहू गोडी । सुंदर व्याख्यानीं तयांच्या ॥१५८॥
येणें त्या पवित्र दिवशीं । उत्सव चाले अहर्निशी । मध्यरात्रीच्या सुमारासी । महोत्सव हा संपला ॥१५९॥
ऐसा हा अपूर्व सोहळा । याचि देहीं याची डोळां । अवलोकुनी समाज सगळा । परतोनी गेला गृहासी ॥१६०॥
दुसरे दिवशीं महासंतर्पण । आले भोजनासी ब्राह्मण । यथोचित दक्षिणा देवोन । तृप्त केले वैदिक ॥९६१॥
दशसहस्त्रावरी जन जमले । आनंदामृत आकंठ प्याले । पाहोनियां ते सुखावले । मंगलोत्सव साजिरा ॥१६२॥
म्हणती चित्रापूर सारस्वत । समाज असे बहु सुसंस्कृत । परि न तयांच्या इतिहासांत । घडलें ऐसें अपूर्व ॥१६३॥
सहहस्त्रावधी लोक जमती । सद्गुरुंवरी प्रेम दाविती । श्रद्धा भक्तीची ये प्रचिती । काय यासी म्हणावें ॥९६४॥
परमात्म्यचें अस्तित्व भासे । धर्म शिथिलता मुळीं ना दिसे । महोत्सव हा बळें देतसे । नास्तिकांसी आवाहन ॥१६५॥
कोण म्हणे ही उत्सवप्रियता । कोणा वाटे अंधानुकरणता । होईल का परि कार्यसिद्धता । केवळ मानव प्रयत्नें ॥१६६॥
कोण घडवितो महत्कृतींसी । शक्ती कैंची येई तयांसी । मानवही का करील ऐसी । अतर्क्य करणी या जगतीं ॥१६७॥
छी छी नोहे प्रभुची रचना । प्रेरित करितो तोची सर्वांना । म्हणोनी घडती विविधची घटना । जगतामाजीं अगम्य ॥१६८॥
तैसीच प्रभुनें कृपा केली । श्रीगुरुपरंपरा प्रसन्न जाहली । आणिक तपस्या फळास आली । पूर्वजांची पवित्र ॥१६९॥
म्हणोनियां जाहली कार्यसिद्धी । उत्सव घडविला यथाविधी । धावोनी आला तो कृपानिधी । भक्तांसि सहाय करावया ॥१७०॥
म्हणोनि प्रभुवरानी नमन माझें । तवपदीं हें मम मानस रिझे । संसाराचे भव्य ओझें । वाहवेना मज आतां ॥१७१॥
प्रभो देवा भवानीशंकरा । दयाघना दे तवपदीं थारा । करुणानिधी मजला उद्धरा । शरण आलें तव पायीं ॥१७२॥
मन असे माझें अति चंचल । स्थिर करावें आहे अचपळ । तसेंचि वाढे षड्रिपुंचे बळ । भवसागरीं बुडालें ॥१७३॥
काय करावें कांहीं सुचेना । मजवरि देवा कृपा कराना । अनुनाप दग्धा करी याचना । तव पायांसी हीच कीं ॥१७४॥
कानीं ऐकावें गुरुचें वर्णन । नेत्रीं पाहावें सद्गुरु स्वरूप पूर्ण । वाणी गावो गुरु गुणगान । हस्तें व्हावी गुरु पूजा ॥१७५॥
चालत जाया गुरुदर्शनासी । पाय न उरले माझ्यापाशीं । अंतःकरणीं परि अहर्निशीं । गुरुस्मरण घडावें ॥१७६॥
आणिक माझें एक मागणें । दीर्घायुष्य गुरुद्वयांस देणे । तयांच्याच हस्तें आम्हां तारणें । भवार्णवांतुनि दुस्तर ॥१७७॥
सदा वसावी श्रीगुरुभक्ती । आणिक श्रद्धा मठावरती । ऐसीच होवो धर्मजागृती । सदैव आमुच्या ज्ञातिमाजी ॥१७८॥
सर्वत्र करी मंगलमय । वृत्ती होवो निरामय । आतां संपवूं अध्याय । वंदोनिया समस्तांसी ॥१७९॥
येथवरि केलें कथानिरूपणा । श्रेय तयाचें असे श्रीगुरुंना । चुकलें तें ममही जाणा । क्षमा करावी सकळिकीं ॥१८०॥
लिहिलें जें एथे पाही । तयामाजि माझें कांहींच नाही । श्रीसद्गुरुंची सकळ कृपा ही । नाम मात्र शांतेचे ॥१८१॥
सागरांतोनी जळ घेतलें । परतोनी तयासी समर्पण केलें । तैसेंचि जें गुरुकडोन लाभलें । अर्पितसे मी गुरुचरणीं ॥१८२॥
श्री गुरुपरंपराचरित्र थोर । वाचोनि येती मनीं सविचार । ज्यात वर्णिला शिष्यस्वीकार । नवपंचशत्तमोध्याय गोड हा ॥१८३॥
अध्याय ॥५९॥
ओव्या १८३॥
ॐ तत्सत्-श्रीसगुरुनाथचरणारविंदापर्णमस्तु ॥
॥ इति नवपंचशत्तमाध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP