मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥५३॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥५३॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीमदानंदाश्रमगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
 जय जया जी सद्गुरुराया । तूं सर्व जगासी अधिष्ठान सदया । मग मजला कैसा सोडुनियां । राहसी सांग दयाळुवा ॥१॥
ऐसा तूं माझा सद्गुरु असतां । मीं कासया वृथा करावी चिंता । सकलही कर्ता करविता । तूंचि अससी निर्धारें ॥२॥
उगीच अहंता घेऊनि माथां । काल दवडिला अज्ञानें ताता । परी तूं बा भरोनि हाता । आणिले मार्गी अनजनां ॥३॥
ना आणि दाविलें आपुलें स्वरूप । जें जगीं भरलें अमूप । परी आड आलें पाप । तेणेंच न दिसे आम्हांसी ॥४॥
म्हणोनि लागतों शोधावयासी । जिकडे तिकडे धावतों दिन - निशीं । नाना व्रतें तीर्थयात्रेसी । प्रवर्तलों तरीही मिळेचि ॥५॥
तेणें वाढला अभिमान थोर । म्यां तीर्थव्रतें केलीं अपार । न होय कदापि चित्त स्थिर । तब भक्तीवीण बा देवा ॥६॥
तुझ्या भक्तीवीण सर्वथा। अंतर्मुख वृत्ति न होय ताता । मग कैंचें समाधान चित्ता । होईल सांगा देवा हो ॥७॥
निजस्वरूपाचें न होतां दर्शन।  मग कैंचें मनासी समाधान । एवं तव भक्ति केलियावीण । आत्मज्ञान न होय ॥८॥
तुझी भक्ति करितां जाण । जगीं तूंचि दिससी संपूर्ण । सर्व जगाचे अधिष्ठान । इतुकें कळे निर्धारें ॥९॥
अधिष्ठानरूप तूंचि ताता । सकल कार्यासी तुझीच सत्ता । तेवींच जग हें नांदे तत्त्वतां । तुझियासत्तें दयाघना ॥१०॥
यावरी येईल श्रोतयां प्रश्न । सद्गुरूचि सर्वां अधिष्ठान । त्याची सत्ता सकलां कारण । हें कैसें ओळखावें ॥११॥
तरी ऐका त्याचें उत्तर । सांगूं त्याचा अणुमात्र विचार । सद्गुरुकृपेंचि साचार । सावध असावें श्रोत्यांनीं ॥१२॥
सद्गुरु म्हणिजे केवल स्वरूपचि । ऐसी मागील अध्यायीं साची । महिमा वर्णिली त्यांची । सद्गुरुकृपेंचि पहा हो ॥१३॥
तरी आणिक बोलूं किंचित । सद्गुरूचि आधार आम्हांप्रत । ते असती परब्रह्म साक्षात । नाहीं संशय यामाजीं ॥१४॥
जेणें जाणिलें निजस्वरूपासी । तो परब्रह्मचि होय परियेसीं । त्यावरीच जग हें निश्चयेंसीं । भासे जाणा तुम्ही हो ॥१५॥
जें असे जगाचें अस्तित्व । तेंचि अधिष्ठानस्वरूप नांव । नामरूपाविरहित सदैव । असे जें तेंचि निजस्वरूप ॥१६॥
रज्जूवरी दिसे जो सर्प । असत्य त्याचें नाम - रूप । परी अस्तित्वाचा न होय लोप । ज्ञान होतां निश्चयेंसीं ॥१७॥
पहा कैसें तें सांगूं आतां । रज्जूवरी सर्प भासतां । भयकंप होय चित्ता । मंदांधकारेंकरोनियां ॥१८॥
जेव्हां नेला दीप हस्तीं । जाय सारी त्याची भीती । परी रज्जु तेथे आहे निश्र्चितीं । न होय लोप अस्तित्वाचा ॥१९॥
दीपें होतां रज्जुज्ञान । सर्पभ्रांति होय निरसन । परी रज्जूचें अस्तित्व - अधिष्ठान । नच जाय सर्वथा ॥२०॥
तैसें येथें जग हें सारें । परब्रह्मावरी भासे निर्धारें । ज्ञानदिवा हातीं येतां त्वरें । मिथ्या होय नाम - रूप ॥२१॥
नाम रूप त्यागितां सर्व । उरे केवळ मीचि देव । नच जाय माझें अस्तित्व । कधीं काळीं अणुमात्र ॥२२॥
जग हें मिथ्या म्हणोनि त्यागितां । उरे केवळ ब्रह्मचि तत्त्वतां । एवं अस्तित्व राहिलें नच जाय सर्वथा । अधिष्ठान ब्रह्म याचें पैं ॥२३॥
सुवर्णामाजीं अलंकार । नाम - रूप आलें साचार । त्याचा त्याग केलियावर । उरे सुवर्ण एकचि पैं ॥२४॥
तैसें येथे केवल परब्रह्म । त्यांत जग हें रूप - नाम । तें त्यागितां उरे परम । ब्रह्मस्वरूप हेंचि पैं ॥२५॥
अलंकाराचा करितां त्याग । सुवर्ण आहे म्हणतों मग । तैसें त्यागितां नामरूप जग । उरे अस्तित्व एकचि ॥२६॥
अस्ति भाति प्रियरूप आत्मा । जगामाजीं दिसे आम्हां । पाहिलें जरी रूपनामा । अस्ति भाति प्रियचि असे ॥२७॥
एवं सत् - चित् - आनंद । हेंचि जगीं विलसे प्रसिद्ध । अज्ञानें आम्ही मतिमंद । म्हणतों 'जग हैं सत्य असे' ॥२८॥
सच्चिदानंद ब्रह्म पूर्ण । जगीं असे ओतप्रोत भरून । त्याहुनी नसे पदार्थ अन्य । तेंचि आश्रय सकलांसी ॥२९॥
ऐसें तें स्वरूप श्रीसद्गुरूंचें । आश्रयस्थान सकलांचें । त्यावरीच जग हें साचें । कार्य होय निर्धारें ॥३०॥
सर्पासी रज्जु अधिष्ठान । तेवींच दिसे सर्प तो पूर्ण । त्यासी कवणें केलें नाहीं उत्पन्न । कल्पिला अज्ञानें आपणचि ॥३१॥
रज्जु नसतां सर्प जा ही कल्पना । कैसी उद्भवे उगीच आपणा । एवं सर्पकार्यासी रज्जूच जाणा । कारण होय् निश्वयेंसीं ॥३२॥
तैसें ब्रह्मचि जगासी कारण । जग हें कार्य दिसे जाण । एवं सर्व कार्यासी मूळ कारण । ब्रह्मचि असे निर्धारें ॥३३॥
ऐसा तो परब्रह्म सद्गुरुनाथ । जगाचा सूत्रधार तोचि विख्यात । त्याच्या सत्तेवीण नाहीं होत । कवणही कार्य हो पाहीं ॥३४॥
ऐसा आमुचा सद्गुरुनाथ । अस्ति भाति प्रियरूप सत्य । नामरूप जग हें जें दिसत । त्यांतत्रि भरला घनदाट ॥३५॥
म्हणोनि आमुची श्रीगुरुमाय । सकलांसी अधिष्ठान होय । तिजसी भजतां अन्य उपाय । न लागे ब्रह्मज्ञानासी ॥३६॥
तशा त्या गुरुवरा भजाया मन । उत्सुक व्हावयालागोन । काय उपाय योजावा आपण । तरी ऐकावें चरित्र पहा ॥३७॥
चरित्राचे  करितां श्रवण पठण । चित्त शुद्ध होय जाण । मग गुरुभक्तीसी अंतःकरण । प्रवृत्त होईल सहजचि ॥३८॥
आतां परिसा सावधान । आनंदाश्रम दयाघन । यांचें आणिक महिमान । अणुमात्र बोलूं श्रोते हो ॥३९॥
भूत - भविष्य - वर्तमान । विदित असे त्यांलागून । न धरावा यांत अनुमान । सल्यचि जाणा निर्धारें ॥४०॥
एके काळीं स्वामीराय । 'सातारा' नामक ग्रामीं सदय । कांहीं दिन एकांतीं सुखमय । राहिले निवांत स्थळीं हो ॥४१॥
ऐसें असतां एके दिनीं । विठ्ठल सुब्राव भटजी यांनीं । गुंडिल नारायण यांलागुनी । लिहिलें पत्र ते समयीं ॥४२॥
कांहीं काज होतें म्हणोनि । पत्र लिहिलें तें गुंडिलांलागुनी। वाचिलें श्रीसंनिधीं जावोनि । सुब्राव भटजी यांनी पैं ॥४३॥
तें ऐकुनी स्वामीराज । स्मितमुखें बोलिले सहज । म्हणती सुब्राया काय तूं आज । लिहिलें ऐसें सांगें बा ॥४४॥
कीं गुंडिल यासी तूं लिहिलें । 'रावसाहेब' ऐसें म्हटलें । परी तो होईल ये वेळे । 'दिवाणबहादुर' बा पाहें ॥४५॥
म्हणोनि दिवाणबहादुर । ऐसें लिहावें साचार । हें वाक्य सत्य झालें सत्वर । ऐका चमत्कार श्रोते हो ॥४६॥
श्रीस्वामी सद्गुरु यांचे । वचन कदापि व्यर्थ न वचे । सत्यचि झालें वाक्य मुखींचें । परिसा प्रेमळ चित्तानें ॥४७॥
दुसर्‍या दिनींच आला हुकूम । गुंडिल नारायणांसी उत्तम । 'दिवाणबहादुर' पदवी नाम । पहा कैसी गुरुमहिमा ॥४८॥
आधींच कळलें स्वामींप्रती । म्हणोनि बोलिले ते निश्चितीं । अंतर्ज्ञानी ते असती । नाहीं संशय यामाजीं ॥४९॥
आतां म्हणाल तुम्ही आणिक । आम्हीही जाऊं सकळिक । पुसूं भविष्य स्वामींसन्मुख । बघू काय सांगती तें ॥५०॥
तरी तैसे खरे सत्पुरुष । कधींही ना सांगती भविष्य । त्यांची इच्छा न कळे कवणास । कैंच्या वेळीं काय असे ॥५१॥
ते न दाविती जनांसी अद्भुत । हें मागें कथिलें असे निश्चित । सहजचि केव्हां तरी निघत । ओघासरशीं मुखांतुनी ॥५२॥
आम्हीं पुसतां सांगती ऐसा । नेम नाहीं त्यांचा सहसा । त्यांची इच्छा इतुकीच परियेसा । यावरी अन्य शब्दचि ना ॥५३॥
भविष्य सांगाया नव्हे अवतार । केवळ कराया जगदोद्धार । त्यामुळे न सांगती गुरुवर । भूतभविष्य कदापिही ॥५४॥
असो यापरी अनेक घडती । नाना परी विचित्र संगती । सर्वही कथाया आमुची मती । नाहीं तीव्र हो पाहीं ॥५५॥
परी गुरुकृपें अणुमात्र कथिलें । आणिक एक कथा ये वेळे । संक्षिप्त सांगूं चित्त आपुलें । सावध ठेवुनी परिसा हो ॥५६॥
मुल्की - ग्रामीं एक शुद्र । नारायण नामें असे नर । तो होता सरकारी नोकर । प्रपंच करीत आनंदें ॥५७॥
ऐसें असतां एके काळीं । नारायणाची दैवगती फिरली । कामामाजीं चूक निवडिली । वरील हुद्देदारानें ॥५८॥
अन्याय नसतां त्याचा कांहीं । केला खटला त्यावरी पाहीं । काढिला कामावरुनी लवलाहीं । नारायणासी तेधवां ॥५९॥
तेव्हां तो झाला भयभीत भारी । काय करूं ऐशिया विचारीं । निमग्न असतां ग्रामांतरीं । होते भटजी सारस्वत ॥६०॥
त्यांसी याचा परिचय थोर । कळला वृत्तांत भटजींसी समग्र । तेव्हां बोले शुद्रासी तो नर । भिऊं नको तूं नारायणा ॥६१॥
म्हणे आनंदाश्रमस्वामी । आले आमुचे विठ्ठल ग्रामीं । तेथें जाऊं आतां आम्ही । प्रार्थूं त्यांसी भक्तीनें ॥६२॥
ऐकतां आनंद जाहला चित्तीं । नारायण शूद्रासी निश्चितीं । तत्काळ उठला जावयाप्रती । विठ्ठल - ग्रामीं हो पाहीं ॥६३॥
मग ते दोघे गेले ग्रामासी । भेटले त्वरित श्रीस्वामींसी । प्रार्थना केली बहुवसी । आणि करविली पाद्यपूजा ॥६४॥
घेउनी तीर्थ प्रसाद प्रेमानें । गेला आपुल्या ग्रामीं त्वरेनें । मनीं धरिली मूर्ति तयानें । श्रीस्वामींची ते समयीं ॥६५॥
आळवू लागला आपुल्या मनीं । म्हणे प्रभो तूं प्रेमाची खाणी । रक्षीं देवा मजलागोनी । भक्तवत्सला करुणाळा ॥६६॥
तुजवांचोनि नसे बा कवण । कराया दीनजनांचे रक्षण । ये ये आतां बा धांवोन । बालकाजवळी तूं माते ॥६७॥
यापरी आळविली श्रीगुरुमाय । आणि धरिले हृदयीं पाय । केला सरकारीं योग्य उपाय । यश आलें त्यामाजीं ॥६८॥
जेणें ठरविला गुन्हेगार । तोचि ठरला अपराधी थोर । न होय अपराधी अणुमात्र । नारायण हा निश्र्चयेंसीं ॥६९॥
पहा कैसी सद्गुरुमहिमा । काय सांगूं आतां तुम्हां । न कळे अज्ञांसी आम्हां । म्हणतों लटिकेंचि हें सारें ॥७०॥
लटिकें न होय कदापि जाण । यांत न धरावा अनुमान । दृढभावें धरितां चरण । महिमा कळेल सहज पहा ॥७१॥
करितां सहवास कांहीं दिन । कळती त्याचे सारे सद्गुण । आमुच्या अंगींही येती धांवून । सद्गुण त्यांचे हो पाहीं ॥७२॥
सत्संगति करितां खास । प्रपंचामाजीं सहजचि बहुवस । वृत्ति आपुली होय उदास । तेणेंचि सद्गुण येती पहा ॥७३॥
सद्गुणप्राप्ति जयालागीं । तया समाधान ये अंगीं । म्हणोनि सत्संगति हीचि जगीं । परमार्थासी सुलभ पहा ॥७४॥
सद्गुरुसहवास करितां थोर । सहजचि येती सद्विचार । कैसे तें सांगूं परिसा एकाग्र । तुम्ही सज्जन श्रोते हो ॥७५॥
सद्गुरुस्वामी यांच्या मुखींचे । सहजचि शब्द ऐकिले साचे । तेही होती उपयोगाचे । व्यर्थ न होती ते शब्द ॥७६॥
त्यांच्या वाक्यामाजीं सुरेख । अर्थ भरला सद्विवेक । तो श्रवण करितां देख । विचार उपजे तत्काळ ॥७७॥
हरएक वाक्यामाजीं त्यांच्या। सूक्ष्म अर्थ परमार्थाचा । परी चित्तीं न रिघे आमुच्या । मंदबुद्धि म्हणोनियां ॥७८॥
करितां सहवास वारंवार । सहजचि कळे चित्ता समग्र । मग येई अंगीं विचार । परमार्थाचा हळू हळू ॥७९॥
असो ऐसी सद्गुरुमूर्ति । किती वानूं त्यांची कीर्ति । लिहितां न पुरे मेदिनी ती । दाविती लीला अगाध ॥८०॥
लीला काय ती सांगूं आणिक । इकडेचि चित्ता लावा सकळिक । साक्षात् भगवान् अवतार देख । नाहीं संशय यामाजीं ॥८१॥
सद्गुरुस्वामी आनंदाश्रम । यांनीं घेतां चतुर्थाश्रम । कांहीं काळ लोटतां, उत्तम । अघटित वर्तलें तें ऐका ॥८२॥
विठ्ठल सुब्राव नामें एक । होता तेथें भटजी वैदिक । वेदमंत्र पढे तो सम्यक । मठामाजीं ते समयीं ॥८३॥
भक्तिप्रेम होतें अंगीं । म्हणे मनीं गुरूपदेश जगीं । असावा लागे मानवांलागीं । तरीच जन्म सफल पहा ॥८४॥
परी कवणाचा उपदेश घ्यावा । म्हणोनि प्रार्थी मानसीं देवा । आनंदाश्रम स्वामीरावा । पुसतां उपदेश व्यर्थ पहा ॥८५॥
कीं आनंदाश्रमस्वामी । समपाठी आहों दोघे आम्ही । तेही मजसम अज्ञानीच ऐसें मी । समजतों यांत संशय ना ॥८६॥
तैशियांलागीं सद्गुरु करितां । शांति कैसी लाभेल चित्ता । परी अंतरी विचारें बघतां । न जाय मन अन्यस्थळीं ॥८७॥
तेव्हां न सुचे कांहीं त्याप्रत । मग जाऊनि एकांतीं बैसत । ध्यान करूं लागला त्वरित । उपदेशावीण आपणचि ॥८८॥
तेव्हां जाहला चमत्कार । स्वामींची महिमा अपार । साक्षात् अवतरला श्रीधर । मग काय उणीवता तेथें हो ॥८९॥
ध्यान करूं लागतां लागतां । आनंदाश्रम स्वामी तत्त्वतां । दिसूं लागले ध्यानीं पहातां । प्रयत्नावीण आपुल्या पैं ॥९०॥
जेव्हां बैसे ध्यान कराया । तेव्हां दिसती स्वामी त्या ठाया । मग आश्चर्य वाटलें तया । सुब्रावभटजीलागीं पैं ॥९१॥
तेव्हां म्हणे निजमानसीं । महिमा अगाध निश्चयेंसीं । भक्तिप्रेम नसतां मजसी । कां तूं दिससी गुरुनाथा ॥९२॥
काय तुझी अगाध लीला । न वर्णवे पहा ती मजला । तुज बाहती कीं 'भक्तवत्सला' । परी अभक्तवत्सल झालासि तूं ॥९३॥
मी जरी तुज नाहीं । भजलों । तरी तूं प्रसन्न झालास कृपाळो । धिक्‌ धिक्‌ माझा अभिमान जळो । क्षमा करावी गुरुराया ॥९४॥
इतुकें बोलुनी निजमानसीं । उठला तत्काळ प्रेमासरशीं । धांविन्नला स्वामीपाशीं । घेतलें दर्शन आनंदें ॥९५ ॥
केला साष्टांग प्रणिपात । प्रेमपुरःसर प्रार्थना करीत । म्हणे स्वामिन् आतां मजप्रत । क्षमा करावी गुरुराया ॥९६॥
संनिध असतांही गुरुराया । नाहीं जाणिलें आपल्या पायां । 'समपाठी माझे' ऐसें कल्पूनियां । नाहीं घेतला उपदेश ॥९७॥
परी कराया लागलों ध्यान । तुजला न विचारितां जाण । तरी तूं न सोडिसी मजलागून । क्षणोक्षणीं तूंचि दिससी ॥९८॥
ध्यान करूं लागल्यापासुनी । ध्यानीं तूंचि दिससी येउनी । साक्षात् भगवान् अससी तूं म्हणुनी । कळली खूण मज आतां ॥९९॥
आतां उद्धरीं देवा दयाळा । तारीं तारीं अपराध्याला । क्षमा करीं आपुल्या बाळा । नच धिक्कारीं कृपाघना ॥१००॥
इतुकें बोलुनी घातलें दंडवत । अंगीं रोमांच उठले त्वरित । प्रेमाश्रु घळघळ वाहत । नयनांतुनी भटजीच्या ॥१०१॥
बोलवेना एकही शब्द । उभा राहिला कर जोडूनि स्तब्ध । हृदयीं धरिले सद्गुरुपद । बहुप्रेमानें ते समयीं ॥१०२॥
तेव्हां बोलिले स्मितमुखेंकरुनी । आनंदाश्रमस्वामी सद्गुणी । काय सुब्राया तुझिया मनीं । घ्यावा उपदेश वाटे कीं ॥१०३॥
यावरी बोले सुब्राव भटजी । उपदेश द्यावा मजला स्वामीजी । उद्धरावें देवा आजि । शरण आलों तव चरणां ॥१०४॥
मग नमूनि सद्गुरुराजा । केली पहा पाद्यपूजा । उपदेश - मंत्र घेतला ओजा । प्रेमपुरःसर ते समयीं ॥१०५॥
तेव्हांपासुनी सुब्रावभटजींसी । विश्वास बैसला पूर्णत्वेंसीं । श्रीस्वामींची मूर्ति निजमानसीं । धरिली त्यांनीं प्रेमानें ॥१०६॥
स्वामी म्हणिजे देवचि ऐसी । भावना जडली त्यांच्या मानसीं । भक्तिप्रेम वाढलें बहुवसी । निस्सीम भक्त झाले ते ॥१०७॥
पहा कैसी सद्गुरुमहिमा । लीला अगाध दाविली आम्हां । ज्याला भक्ति नसे त्या इसमा । केला श्रेष्ठ भक्त पहा ॥१०८॥
आतां बघतां त्यांची भक्ति । वर्णूं न शके माझी मति । निष्कपट भजे तो निश्चितीं । नाहीं संशय यामाजीं ॥१०९॥
म्हणोनि सद्गुरु - सहवास थोर । तेणेंच भक्ति वाढे अपार । अंगीं येती सद्विचार। गुरुकृपेंचि पहा हो ॥११०॥
जरी न लाभे त्यांचा सहवास । तरी करावें रात्रंदिवस । सद्गुणश्रवण बहुवस । श्रीसद्गुरूंचे निश्चयेंसीं ॥१११॥
आणिक ऐका पुढील अध्यायीं । सद्गुणी स्वामींची नवलाई । ऐकतां चित्त शांत होई । इतुकी महिमा श्रीगुरूंची ॥११२॥
परमहंस - आनंदाश्रम । शिवानंदतीर्थ सद्गुरु परब्रह्म । यांच्या कृपाप्रसादें त्रिपंचाशत्तम । अध्याय गुरुदासें संपविला ॥११३॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां चित्त होय एकाग्र । त्रिपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥११४॥
अध्याय ॥५३॥
ओंव्या ॥११४॥
ॐ तत्सत्- श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ इति त्रिपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP