मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीचित्रापुरगुरुपरंपराचरित्र|
अध्याय ॥२६॥

चित्रापुरगुरुपरंपरा - अध्याय ॥२६॥

सुबोधाचा भाग तर अमोल आहे. तशीच प्रश्नोत्तरी ही ह्या गुरुचरित्राचें अपूर्व वैशिष्ट्य होय.


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीकृष्णाश्रमस्वामीगुरुभ्यो नमः ॥ श्रीभवानीशंकराय नमः ॥ॐ॥
जय जय सद्गुरो करुणासागरा । भक्तवत्सला जगदोद्धारा । येउनी भूतळीं जनांसी थारा । दिधला देवा त्वां पाहीं ॥१॥
येउनी 'नगर' कुळींच्या उदरीं । केला उद्धार जनांचा भूवरी । बहुत पुण्याई त्यांची खरी । म्हणोनि अवतरलां निश्चयेसीं ॥२॥
त्यांच्या पूर्वपुण्यें देवा । सर्व जनांसी लाभली सेवा । उद्धरिलें जडजीवां । कृपाप्रसादें माउलिये ॥३॥
धन्य धन्य ते मायबाप । गेलें सकलही त्यांचें पाप । ऐशियांसी आठवितां लोप । होईल आमुच्या पापांचाही ॥४॥
मायबापांची इतुकी थोरी । तरी तुझ्या स्वरूपा नाहीं सरी । कुणाचीही देतां येत निर्धारी । सत्य सत्य मम देवा ॥५॥
ऐसें तुझे स्वरूप सुंदर । कैसा ध्याईल हा अज्ञ पामर । तूंचि येउनी माझियासमोर । उभें ठाकावें बा देवा ॥६॥
तुझ्या प्रेमानेंचि मजला । प्रेमभाव उत्पन्न झाला । म्हणोनि ध्यावें देवा तुजला । ऐसें वाटतें मजलागीं ॥७॥
लोहचुंबक आकर्षे सुईसी । तैसें तूं भक्तांच्या मनांसी । झणींच आकर्षण करिसी । नाहीं शंका अणुमात्र ॥८॥
आमुच्या अंगीं नसतां प्रेम । आपुलें प्रेम घालुनी निःसीम । कैसें ओढिलें निजबळें परम । साहसें करूनि बा देवा ॥९॥
ऐसा तूं माझा प्रेमळ । कैसा मावसी हृदयीं वेल्हाळ । सद्गुरुऐसी आणिक रसाळ । नाहीं वस्तु या जगतीं ॥१०॥
म्हणोनि देवा न मागें कांहीं । तुझें प्रेम एकचि देईं । इतुकीच प्रार्थना करितों पाहीं । चरणकमलीं आतां मी ॥११॥
असो आतां श्रोते हो सज्जन । मागील अध्यायीं केलें निरूपण । श्रीस्वामींचे सद्गुणवर्णन । आणि मुलकीसी देऊळ बांधियले ॥१२॥
आतां ऐका आणिक बहुत । त्यांचे सद्गुण परम अद्भुत । ऐकतां पापें नासती समस्त । सत्वरी यावें ऐकाया ॥१३॥
असो आमुचे कृष्णाश्रम । स्वामी सद्गुरु सद्गुणधाम । काय त्यांची लीला उत्तम । वर्णूं न शकें मी पाहीं ॥१४॥
वाचेनें बोलती रसाळ वाणी । शांत राहती अंतःकरणीं । परम उत्कृष्ट त्रिकालज्ञानी । प्रेमाची खाणी ती पाहीं ॥१५॥
ते जें कांहीं बोलती वचन । तें असत्य न होय कदापि जाण । यावरी एक वृत्तांत कथन । करूं आतां श्रोते हो ॥१६॥
शिराली - ग्रामामाजीं देख । होता एक सारस्वत भाविक । दुर्गप्पय्या नागरकट्टी नामक । स्वामींचा भक्त तो जाणा ॥१७॥
बहुत विश्वास धरोनि मानसीं । स्वामींसी भजे अहर्निशीं । ऐसें असतां एके दिवशीं । प्रसन्न झाले गुरुराज ॥१८॥
जो असे निष्काम भक्त । तोचि आवडे श्रीगुरूसी सतत । न मागतांही आपणचि देत । सुख-संपत्ति त्यालागीं ॥१९॥
ऐशा त्या दुर्गप्पय्यासी । जवळी बोलावुनी दिधलें त्यासी । सप्तशती पुस्तक परियेसीं । प्रेमकटानें पाहूनियां ॥२०॥
आणि सांगितली त्यासी खूण । याचें करितां सदा पारायण । सकल कष्ट होती निवारण । सुख संपत्ति भोगिसी तूं ॥२१॥
प्रेमपूर्वक करीं पठण । अर्थाकार वृत्ति करोन । यापरी करितां निश्र्चयें जाण । सकलाभीष्ट पावशील ॥२२॥
ऐसें बोलूनि केला उपदेश । सप्तशतीचा वाचावयास । आणि म्हणती होईल खास । कल्याण तुमचें जगतीं या ॥२३॥
तेव्हां तो दुर्गप्पय्या भाविक । स्वामींची आज्ञा म्हणुनी देख । घेउनी सप्तशतींचे पुस्तक । करी पारायण नेमानें ॥२४॥
सद्गुरु-स्वामींच्या वचनापरी । झालें दुर्गप्पय्यासी सत्वरी । सकल कष्ट होउनी दुरी । सुख-संपत्ति झाली प्राप्त ॥२५॥
जन सकलही देती सन्मान । हें सद्गुरुस्वामीकृपेंकरून । एवं सर्वांत सुखी पूर्ण । झाला दुर्गप्पय्या त्यावेळीं ॥२६॥
नित्य करी तो पारायण । न विसंबे कधींही जाण । अजूनि त्यांच्या घराण्यामधून । करिती पारायण प्रेमानें ॥२७॥
जें स्वामींनीं दिधलें पुस्तक । तें कारवारामाजीं देख । देवासंनिध असे सम्यक । नागरकट्टी यांच्या गृहीं ॥२८॥
शिवरामप्पा प्रसिद्ध वकील । होऊनि गेले कारवारीं सच्छील । दुर्गप्पय्याचा पौत्र प्रेमळ । यांच्या सदनीं आहे तें ॥२९॥
नागरकट्टी दत्तात्रेय । दुर्गप्पय्याचा पोत्र अजुनीही होय । पारायण सप्तशती कार्य । करी प्रेमानें तो पाहीं ॥३०॥
होता तो मोठा अधिकारी । पेन्शन घेतलेंसे ये अवसरीं । असे पहा धारवाडामाझारीं । अद्यापिही भाविक तो ॥३१॥
तोही मठाचा प्रेमळ भक्त । आनंदाश्रमस्वामी विख्यात । यांसी पाचारी कधीं कधीं गृहाप्रत । परम प्रीतीनें तो पाहीं ॥३२॥
असो कृष्णाश्रम - सद्गुरुमूर्ति । गातां न पुरे त्यांची कीर्ति । आपुल्या भक्तांसाठीं जगतीं । खटपट करिती बहुविध ते ॥३३॥
जरी आलें त्यांच्या मानसीं । काय करिती हें न कळे कोणासी । सांगतां न ये आम्हांसी । कल्पनाही नच करवे ॥३४॥
परी यावें त्यांच्या मनास । तरीच सर्वही देतील भक्तांस । नातरी केला जरी प्राणनाश । तरी ढुंकोनि न पाहतील ॥३५॥
यावरी करितील श्रोते प्रश्न । इतुकें कां त्यांचे निष्ठुर मन । तरी ऐका चित्त देऊन । सांगूं आतां गुरुकृपेंचि ॥३६॥
सद्गुरु नव्हे निष्ठुर खचित । मन त्यांचें कोमल सतत । परी ते अंकित नाहीं होत । कवणाच्याही सर्वथा ॥३७॥
ते असती जीवन्मुक्त । प्रारब्धापरी सदा वर्तत । कर्तव्यचि नाहीं त्यांप्रत । सहजासहज क्रिया त्यांची ॥३८॥
'मी कर्ता' ऐशी भावना । कधींही त्यांच्या न शिवे मना । प्रारब्धापरी वर्तती जाणा । अकर्ता अभोक्ता या भावें ॥३९॥
त्यांसी नाहीं सान थोर । न पाहती गरीब श्रीमंत नर । सर्वांठायीं ब्रह्मचि साचार । बघती जाणा ते पाहीं ॥४०॥
भक्त अभक्त निंदक वंदक । सारे त्यांसी समान देख । एकासी कष्ट एकासी सुख । होवो ऐसें न वाटे त्यां ॥४१॥
ज्याच्या त्याच्या भावनेपरी । सद्गुरुकृपा होय त्यावरी । तेणेंचि भक्तांचें कार्य निर्धारीं । प्रपंची परमार्थीं होय पहा ॥४२॥
म्हणोनि सकळही जनांसी । सुखचि होईल ऐसें मानसीं । समजूं नये सर्वथा परियेसीं । निष्कामभावें भजावें ॥४३॥
पहा केलिया विचार आपण । श्रीस्वामींसी सर्वही समान । एकासी रक्षिती, आणिकां कां न । करिती रक्षण त्यांचे पैं ॥४४॥
तरी पहा रक्षिनी ते सकलां । भेदाभेद नाहीं तयांला । परी नाहीं भाव आम्हांला । काय करितील गुरुराज ॥४५॥
यावरी सांगूं दृष्टांत । सूर्यासी सारिखे समस्त । सकलांसी समान प्रकाश देत । पक्षपात त्यासी नसे ॥४६॥
परी जो असे अंध । त्यासी सूर्य असतां संनिध । जरी धरिला त्याचा छंद । तरीही उपयोग न होय ॥४७॥
ज्यासी असती शुद्ध नेत्र । तोचि प्रकाश घ्यावया पात्र । तेणेंचि तो करी पवित्र । व्यवहार आपुला सुखानें ॥४८॥
तैसी सगुरुकृपा सदा उदय । पावलीच असे चिन्मय । त्यांसी सर्व एकचि अद्वय । समान सारे जन पाहीं ॥४९॥
परी ज्याची भावना असे अंध । व्यामी गुरुकृपेचा काय संबंध । विषयांमाजी होती धुंद । कैसी कृपा संपादील ॥५०॥
विषयांधा गुरुकृपा कैसी । फळेल सांगा हो आम्हांसी । सूर्यप्रकाश न लभे अंधासी । कवण्याही काळीं निर्धारें ॥५१॥
जैसा सूर्य असे सहज । प्रकाश देऊनि करी काज । तैसा सद्गुरु स्वामिराज। सदा प्रसन तो पाहीं ॥५२॥
ज्याची असे भावना बळकट । त्याचे सद्गुरु निवारिती कष्ट । परी प्रारब्ध ज्याचें उलट । त्याचे कैसें निवारतील ॥५३॥
भावना प्रारब्ध-गुरुकृपा तीन्ही । एकवटतां कार्य होय झणीं । नातरी गुरुच्याही असतां मनीं । तरीही मनोरथ न फळती ॥५४॥
सूर्यप्रकाश पडला थोर । शुद्ध असती आपुले नेत्र । परी कपाटें लाविली सर्वत्र । काय उजेड मिळेल तया ॥५५॥
 त्यासी कैंचे दिसतील विषय । जगचि सर्व शून्य होय । तैसें येथें पहा काय । लाभेल सुख विषयांधा ॥५६॥
प्रारब्धाचा पडदा आड । असतां कैंची सुखाची जोड । प्राप्त होईल सांगा उघड । भावना - गुरुकृपा असतांही ॥५७॥
ज्याचें प्रारब्ध पावलें उदय । ज्याचा असे दृढतर निश्चय । त्यानीच रक्षी सद्गुरुमाय । प्रपंचीं परमार्थीं सर्वदा ॥५८॥
आतां म्हणाल काय यांत । सगुरु - महत्त्व असे दिसत । तरी व्यवहारीं जैसा सूर्य असत । महत्त्व पूर्ण जगीं या ॥ ५९ ॥
 तैसेचि येथें सद्गुरुराय । त्यांचे महत्त्व थोर होय । म्हणोनि धरावे त्यांचे पाय । निष्काम चित्तें हो पाहीं ॥६०॥
न मागावे त्यांकडे विषय । ते प्रारब्धाधीन असती निःसंशय । तैसा मोक्ष प्रारब्धाचा नव्हे चिन्मय । प्रयत्नासह गुरुकृपा पाहिजे ॥६१॥
परमार्थासी करणें अति प्रयत्न । आणि गुरुकृपाही करावी संपादन । बैसों नये प्रारब्ध म्हणोन । साधकानें कदापिही ॥६२॥
गुरूकडे न मागावे विषय । धरावे दृढतर त्याचे पाय । निष्काम चित्तें करोनि निश्चय । अर्पावें तनुमनवाचेसी ॥६३॥
मोक्ष मागावा सद्गुरुसंनिध । अति प्रयत्न करावा शुद्ध । जरी तो असेल मतिमंद । तरीही उद्धरी गुरुराज ॥६४॥
जरी आले नाना कष्ट । तरीही धरावे चरण घट्ट । तेव्हांचि सद्गुरुप्रेमाचा घोट । लाभेल आपुल्यासी निश्वयें ॥६५॥
तेणेंचि येईल आपणा अनुभव । सद्गुरुप्रेमाचा तो अपूर्व । मग त्यामाजींच रहावें सदैव । सारे विषय टाकोनि ॥६६॥
विषयींच जरी ठेविली प्रीति । तरी न लाभे स्वरूपज्ञानज्योती । म्हणोनि त्यागावी विषयासक्ति । तेव्हांचि गुरुकृपा होईल ॥६७॥
सोडूनि विषयेच्छा, निष्काम चित्तीं । भजतां सद्गुरु कृपा  करिती । गुरुकृपेंचि ज्ञानप्राप्ति । होय साधकांलागी पैं ॥६८॥
येथे आलेप येईल एक । कीं आधीं सांगितलें मोक्ष हा देख । यासी प्रयन करावे अनेक । तेव्हांचि प्राप्त होईल तो ॥६९॥
आतां म्हणसी गुरुकृपेंचि मोक्ष । प्राप्त होय सकल जीवांस । याचें समाधान सांगतों तुम्हांस । ऐका सद्भाव धरोनि ॥७०॥
गुरुकृपेंचि पावे आत्मज्ञान । तेणें मोक्ष लाभे न लगतां क्षण । यामाजीं नसे अनुमान । अणुमात्र जाणा श्रोते हो ॥७१॥
शिष्यें करितां अति प्रयत्न । सहजचि ओळे तो कृपाघन । पोहोंचवी बह्मपदासी पूर्ण । कृपाकटाक्षेकरूनियां ॥७२॥
ज्यासी असे मोक्षाची इच्छा । ते टाकिती सहजचि विषयांची वांछा । आणि करिती प्रयत्न साचा ।  ज्ञानप्राप्तीलागीं पैं ॥७३॥
प्रयन करितां - देईल फल । सद्गुरुमाउली आपुली कोमल । हिची कृपा अति निश्र्चल । कधीही न जाय ती पाहीं ॥७४॥
आणिक एक शंका ऐसी । उद्भवेल श्रोत्यांच्या मानसीं । वरी कथिले गुरुकृपेसरशीं । मिळालें दुर्गप्पय्यासी प्रपंचसुख ॥७५॥
आतां म्हणतां आत्मज्ञानासी । गुरुकृपा पाहिजे परियेंसी । प्रयत्न करितां होय आपैसी । सद्गुरुकृपा तयावरी ॥७६॥
तेथे कथिलें भावना असतां । गुरुकृपा होय सहजचि तत्त्वतां । येथें कथिलें प्रयत्न करितां । कृपा होय तत्काळ ॥७७॥
येथें कासया भावना धरितां । सद्गुरुकृपा न होय भक्तां । ऐशा प्रश्नाचें उत्तर आतां । सांगूं ऐका सावधान ॥७८॥
कांहीं जनांसी सद्गुरु थोर । परमेश्वराचाचि अवतार । ऐसा भाव असतो साचार । परी जग हें सत्य वाटे तयां ॥७९॥
ऐशियांच्या भावनेपरी । प्रपंचामाजीं सुख निर्धारीं । होय सद्गुरुकृपेनें सत्वरी । तया भक्तांलागीं हो ॥८०॥
परी येथें आत्मज्ञानासी । नित्यानित्यविचार त्यासी । करावा आपण अहर्निशीं । तरीच कार्य साधेल ॥८१॥
नित्यानित्य-विचार होतां । विषय सत्य न वाटे सर्वथा । मग तो होय परमार्था । अधिकारी जाण लवलाहीं ॥८२॥  
सकल कार्या लागे अधिकार । त्यावीण कार्य न होय निर्धार । कैसें तें ऐका एकाग्र । श्रोते तुम्ही भाविक हो ॥८३॥
ज्या कार्याचा ज्यासी छंद । जरी तो असे मतिमंद । तरी तो प्रेमानें होऊनि धुंद । करितो कार्य ते पाहीं ॥८४॥
ज्या कार्याचा ज्यासी अधिकार । त्यासीच त्याचा छंद निरंतर । छंद लागतां साचार । कार्य करी तो झटोनि ॥८५॥
तरी येथें परमार्था अधिकार । कवणा हें मागें कथिले सविस्तर । साधनचतुष्ट्यें युक्त जो नर । तोचि अधिकारी परमार्था ॥८६॥
ऐसा जो अधिकारी पूर्ण । तेणें करितां परम प्रयत्न । गुरुकृपें होय आत्मज्ञान । तया भक्तासी पाहीं पां ॥८७॥
सद्गुरु सांगतील जो अभ्यास । झटोनि करावा रात्रंदिवस । ऐसें करितां त्यासी खास । आत्मज्ञान दृढ होय ॥८८॥
यासीच म्हणती प्रयत्न । गुरुआज्ञेपरी करावा जाण । ठेवुनी विश्वास गुरुवचनीं आपण । तेव्हांचि समाधान पावे तो ॥८९॥
ज्यासी सत्य वाटती विषय । त्यासी सद्गुरु करतील काय । असती सदा ते प्रसन्न सदय । उद्धरावया जनांसी ॥९०॥
म्हणोनि आपण करोनि प्रयत्न । भावें भजतां सद्गुरुलागून । होय निश्र्चयें आत्मज्ञान । नाहीं संशय यामाजीं ॥११॥
सद्गुरुचरणीं भावना दृढतर । धरितां सकलही येई अधिकार । परमार्थाचा साचार । आम्हांलागी निश्र्चयेंसीं ॥९२॥
जरी आपुल्यासी न कळे कांहीं ।  तरी प्रेम ठेवितां पाहीं । पार घालती लवलाहीं । सद्गुरु माउली सत्य पहा ॥९३॥
जरी भजलां सकाम । तरीही न होय तें विषम । त्यांतही भजतां निष्काम । करिती कृपा तत्काळ ॥९४॥
सकामासी जवळी घेउनी । कामना पुरविती प्रेमेंकरूनी । मग हळू हळू त्यालागोनी । अधिकार येई परमार्था ॥९५॥
म्हणोनि सद्गुरूची धरितां कास । पुरवी तो सर्वही आस । भार वाही रात्रंदिवस । निजभक्तांचा प्रेमानें ॥९६॥
बालकाची मातेसी चिंता । तैसी भक्तांची सद्गुरु नाथा । सर्व साधनें येती हाता । धरितां दृढविश्वास त्या चरणीं ॥९७॥
असो आतां पुढील अध्यायीं । श्रीकृष्णाश्रम-सद्गुरुमाई । शिष्य स्वीकार करितील पाहीं । जगदोद्धाराकारणें ॥९८॥
ती कथा परम रसाळ । श्रीदत्तात्रेयचि अवनीं येईल । ऐकतां मनाची जाउनी तळमळ । लीन ना होईल तें निजरूपीं ॥९९॥
आनंदाश्रम-परमहंस । शिवानंदतीर्थ पुण्यपुरुष । यांच्या कृपाप्रसादें षड्विंश । अध्याय गुरुदासें संपविला ॥१००॥
स्वस्ति श्रीचित्रापुर - । गुरुपरंपराचरित्र सुंदर । ऐकतां लाभती साधनें चार । षड्विंशाध्याय रसाळ हा ॥१०१॥
अध्याय २६ ॥
ओंव्या १०१ ॥
ॐ तत्सत् - श्रीसद्गुरुनाथचरणारविंदार्पणमस्तु ॥    
॥ इति षड्विंशोऽध्यायः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2024

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP